प्रश्न कर नेत्यांस तू

Submitted by निशिकांत on 28 February, 2017 - 23:41

ते मिळाले का जनाला?
देय जे होतास तू
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

हात ध्वज फडकावणारे
डाग दिसती त्यावरी
राष्ट्रभक्ती, त्याग वृत्ती
मंत्र जपती वैखरी
क्रोध बघुनी जनमनांचा
शांत का असतोस तू
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

अपेक्षा तर खूप होत्या
आम जनतेच्या मनी
केवढे वैफल्य! गेले
रात्र दिन अंधारुनी
का जनांच्या वेदनांना
नेहमी गुणतोस तू?
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

प्रजेसाठी अन् प्रजेची
निर्मिलीही जी प्रजेने
त्याच घटनेला बनवले
आज दासी शासनाने
पायमल्ली रोजची ही
मख्ख का बघतोस तू?
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

पाहती स्वातंत्र्यसैनिक
आज आकाशातुनी
हेच का फल मम तपाला?
भावना त्यांच्या मनी
कदर थोडी हुतात्म्यांची
ना कधी करतोस तू
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

जाळण्या प्रचलित व्यवस्था
सुप्त ठिणग्यांनो चला
पेटवावे रान कैसे
आठवा तुमची कला
सज्ज हो लिहिण्यास अपुला
माणसा इतिहास तू
हे प्रजासत्ताक दिवसा!
प्रश्न कर नेत्यांस तू

टीप :--२६ जानेवारीला लिहिलेली कविता. त्या दिवशी राष्ट्रभक्तीने सारे प्रेरित असतात; आणि असावेतही. म्हणून ही वास्तवदर्शी कविता उशिरा पोस्ट करत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!