रात्र बिचारी

Submitted by संतोष वाटपाडे on 22 February, 2017 - 05:12

रात्र बिचारी,केविलवाणी,एक कुशीवर,वळते बाई
तुझा दुरावा,तुझा अबोला,तुझी आठवण,छळते बाई...

दारापुढच्या,ओट्यावरती,एक वाळवण,सुकते आहे
ऊन पांगते,पुढे सरकते,तिथे सावली,झुकते आहे
ऊब मिळाया,मागे मागे,रोज वाळवण,पळते बाई
तुझा दुरावा,तुझा अबोला,तुझी आठवण,छळते बाई...

पडवीमधल्या,गायीचाही,पिलावाचुनी,पान्हा भरला
माथ्यावरच्या,लाल रवीने,मावळतीचा,रस्ता धरला
तिची पापणी,ओली पाहुन,काळीज माझे,झुरते बाई
तुझा दुरावा, तुझा अबोला,तुझी आठवण,छळते बाई...

रोज छतावर,साळुंखीचे,एक जोडपे,येउन बसते
त्यांच्या गप्पा,प्रेम जिव्हाळा,दारामधुनी केवळ बघते
चोचीमध्ये,चोच मिसळते,तेव्हा मी तळमळते बाई
तुझा दुरावा,तुझा अबोला,तुझी आठवण छळते बाई...

पांघरुणाला,अंथरुणाला,ओढ मिठीची,आहे केवळ
या घरट्याचा,संसाराचा,धनी रांगडा,आहे प्रेमळ
किती रोखले,तरी मनाचे,धुंद पाखरु, पळते बाई
तुझा दुरावा,तुझा अबोला,तुझी आठवण,छळते बाई...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users