द विनर इज .......

Submitted by आनन्दिनी on 21 February, 2017 - 21:46

स्पोर्ट्स डे म्हटलं की माझं मन भूतकाळात जातं. मला माझ्या पार्ल्याच्या शाळेतले स्पोर्ट्स डे आठवतात.... रनिंग रेस, चमचागोटी, रिले अशा शर्यती आणि त्यानंतर विजेत्यांना लाकडी पोडियमवर उभं राहून मेडल.... अजूनही सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
माझा मुलगा जेव्हा पहिलीत गेला तेव्हा बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात स्पोर्ट्स डे आला. युकेमधल्या अॅबरडीनमधे आम्ही रहातो. चकचकीत उन्हाचा उबदार दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. तर असा छानसा दिवस होता. शाळेबाहेरच्या मोठ्या ग्राउंडवर उत्साहाने भरलेली, बागडणारी, फुलपाखरांसारखी मुलं आणि आपल्या पिल्लाना बघायला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेले बहुसंख्य पालक....

भरपूर मोठी जागा असल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांच्या वेगवेगळ्या रेसेस चालू होत्या. माझ्या मुलाच्या वर्गाची रेस जिथे चालू होती तिथे इतर पालकांसोबत मी उभी होते. धावणं, डोक्यावर पुस्तक घेऊन धावणं, सॅक रेस अशा वेगवेगळ्या शर्यती झाल्या पण गम्मत म्हणजे कुठेच विनर्सचं विशेष कौतुक नव्हतं. प्रत्येकालाच रेस पूर्ण झाली की टीचर शाबासकी देऊन स्टिकर देत होत्या. पहिलं, दुसरं आणि तिसरं येणार्याला अजून एक स्टिकर मिळत होता एवढंच! पालकही टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देत होते पण ज्या चुरस, चढाओढीची मला अपेक्षा होती, तशी काही नव्हती. हार जीत काही नाहीच.... नुसता उत्साह आणि आनंद.... पेप्पा पिगच्या एपिसोडमधलं "व्हॉट'स इम्पॉर्टन्ट इज टेकिंग पार्ट" (हारजीत नाही, तर भाग घेणं , प्रयत्न करणं महत्वाचं आहे) हे, हे लोक खर्या अर्थाने आयुष्यात उतरवतात.

मग एक गम्मत झाली. मोठ्या भावाला बघायला आलेला एक छोटासा तीनेक वर्षांचा मुलगा प्रत्येक रेसमधे जाऊन पळायला बघत होता. तो अजून शाळेतही जात नव्हता पण आता सगळ्यांना बघून त्यालासुद्धा भाग घ्यायची फार हौस वाटत होती. त्याची आई त्याला "अजून तू लहान आहेस, ही शाळेतल्या मुलांची रेस आहे" वगैरे समजावत होती पण तो ते काही फारसं मनावर घेत नव्हता. तेव्हा टीचरने एका बाजूला त्या छोट्या मुलाला, त्याच्या भावाला आणि अजून दोनतीन मुलांना घेऊन एक इन्फॉर्मल रेस घेतली आणि अजून शाळेतही नसलेल्या या मुलाला त्या रेसमधे पळू दिलं. बरोबरीची ती दोनतीन मुलं फास्ट पळाली पण त्या छोट्याचा पाच वर्षांचा दादा मात्र मुद्दाम स्लो मोशन मधे पळत होता. कारण त्याला त्याच्या छोट्या भावाने शेवटी एकटं मागे रहायला नको होतं! रेसमधे भाग घेता आला , स्टिकरही मिळाला. ते पिल्लू एवढं खूष झालं की बघायला नको...

माझ्या मुलाच्या पहिलीच्या वर्गात एक मुलगी आहे. तिचे दोन्ही पाय गुढग्याखाली अधू आहेत. ती क्रचेस (कुबड्या) किंवा व्हीलचेअर वापरते. तिला वर्गात मदत करायला एक हेल्पर असते. अशा मुलांच्या मदतीसाठी गव्हर्नमेंट कडून शाळेला असे हेल्पर्स मिळतात. तर ही मुलगीसुद्धा क्रचेस घेऊन रेससाठी उभी होती. रेस सुरु झाली. तिची हेल्पर आधारासाठी तिच्यासोबत होती. बाकी मुली पुढे धावल्या. ही अजून अर्ध्यावरच पोहोचली होती. तिचा चेहरा पडला. उत्सफूर्तपणे आम्ही पालकांनी टाळ्या वाजवून "फ्लोरा.... फ्लोरा.... " असं जोरजोरात तिला चीअर करायला सुरुवात केली. तिच्या चेहर्यावर पुन्हा हसू पसरलं. ती नेटाने पुढे जात राहिली. टाळ्या आणि घोषणांनी सारं ग्राउंड दुमदुमलं. फ्लोराने अख्खी रेस पूर्ण केली. टीचरने तिला शाबासकी देऊन स्टिकर दिला. तिचा चेहरा आनंदाने फुलला. तिला तसं बघून तिच्या आईचे डोळे भरून आले. माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. स्पर्धेचा 'सोहळा' झाला होता. पोडियम नव्हतं , मेडल नव्हती तरीही आम्ही सगळेच जिंकलो होतो......

आनन्दिनी
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/02/blog-post_21.html?m=0

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख!
मुलांचा आत्मविश्वास असाच वाढवायचा असतो. Happy

मुलांचा आत्मविश्वास असाच वाढवायचा असतो. >>>+१
तो उत्साह ती जिंकण्याची ओढ त्यासाठी धडपडन, खरचटन सगळच मजेशिर असतं. खूप छान लिहलय तुम्ही. पु.ले.शु.

पाच वर्षांचा मुद्दाम स्लो मोशन मधे पळणारा दादा खुप आवडला. ही इज द विनर फॉर मी.>>>+१११११११

खूप छान ताई..... Happy

छान

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.... समोरून मिळालेली दाद ही नेहेमीच उत्साह वाढवते.
वेळ असेल तेव्हा माझ्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या .

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

मस्त लिहिलंय

पार्ल्याची शाळा ... पार्ले टिळक विद्यालय तर नव्हे ?

मी पण याच शाळेचा विद्यार्थी ... आमच्या या शाळेत मोठ्या मैदानांबरोबर एक विहीर पण होती ... मी पोहायला येथेच शिकलो ....

सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या

छान!
मलापण तो पाच वर्षाचा दादा फार आवडला.

छान लिहिले आहे.
व्हॉट'स इम्पॉर्टन्ट इज टेकिंग पार्ट >> हे जरी खरे असले तरी जोपर्यंत हार स्वीकारता येत नाही तोपर्यंत स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येत नाही. आणि जोपर्यंत सुधारणा घडत नाही तोपर्यंत जिंकता येत नाही. अशा स्पर्धा फक्त शाळेत होतात; प्रत्यक्ष आयुष्य हे खूप कठीण आहे. ग्रेसफुली हार स्वीकारता येणे खूप महत्वाचे आहे. ते जर आले नाही तर पुढील आयुष्यात नैराश्य येऊ शकते. हरणे ह्या गोष्टीला इतका नकारात्मक रंग देण्याची काहीच गरज नाही. आपल्या लहानपणी आपल्याला "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" असे शिकवले जायचे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना प्रमाणाबाहेर प्रोटेक्ट करून आपण त्यांना कमकुवत तर बनवित नाही ना हे बघणे महत्वाचे आहे अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे!! आणि हे मत फ्लोरासारख्या स्पेशल चिल्ड्रेनबद्द्ल नाही आहे.

मस्त!
'पोडियम नव्हतं , मेडल नव्हती तरीही आम्ही सगळेच जिंकलो होतो......'सही!
हे आपल्याला खर्या अर्थानी कधी कळणार?

सुमुक्ताताई - "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" याला प्रोटेक्शन म्हणणं अवघड आहे. "Losing occasionally is an unavoidable part of life." याचं हे मराठीकरण आहे.
"तू धावू नकोस, पडशील." हे प्रोटेक्शन झालं.

स्वीट टॉकर.....नुसते सुमुक्ता चालेल Happy

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे>>> ह्याला मी प्रोटेक्शन म्हणत नाहीच आहे (माझ्या प्रतिसादावरून तसे वाटत असेल तर क्षमस्व) "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" हेच शिकायला आणि शिकवायला हवे. पण अपयश हे खरे अपयश नाहीच असा सूर हल्ली दिसतो. तू हरलास/हरलीस हे म्हणणे नकारात्मक वाटते म्हणून तू हरला/ली नाहीसच असे म्हणणे कितपत योग्य आहे?? यश मिळवायचे असेल तर अपयश पचवता आलेच पाहिजे.

"अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" याला प्रोटेक्शन म्हणणं अवघड आहे.

>> स्वीट टॉकरजी, त्या अपयशाला प्रोटेक्शन नाही म्हणत आहेत. तर उलट अश्या प्रकारे जिंकणे-हरणे न ठेवता मुलांना 'हारणे / पराजय/ पराभव / बक्षिस न मिळणे' या भावनेपासून लांब ठेवणे याला प्रोटेक्शन म्हणत आहेत. कारण या निगेटिव्ह भावना जेवढ्या लवकर मुलांच्या वाट्याला येतील तेवढेच ते ती भावना हँडल करणेही शिकतील. "मुझे हारनेंकी आदत नहीं" हे वाक्य हिरोपेक्षा गुंडाच्या तोंडी जास्त वेळा असतं यावरून तुमच्या लक्षात येइल त्यांना काय म्हणायचे आहे ते.

माझ्या लेखाचा गाभा 'यशाचं फार कौतुक नको , आणि अपयशाचा अतिरेकी बाऊ नको. भाग घ्या , जर्नीचा आनंद लुटा' हा आहे
मला वाटतं की कॉम्पिट करणं आपण भारतात खूपच लवकर शिकतो. पहिली पायरी ही 'आनंद लुटायला' शिकण्याची हवी. 'नुसताच ध्येयहीन आनंदच लुटत राहणं' जे पाश्चात्य देशांमध्ये खूप दिसून येतं आणि अतिशय स्पर्धा असल्यामुळे 'आयुष्यभर स्पर्धेमध्ये रेसच्या घोड्यासारखं पळणं ' जे भारत आणि बहुतांश एशियन देशांमध्ये दिसून येतं याचा सुवर्णमध्य साधायला हवा .
स्वतःच्या मनावर स्पर्धेचं अवाजवी ओझं नसलेल्या व्यक्तीच इतरांच्या, दुबळ्यांच्या बाबतीत अधिक संवेदनाशील असतात कारण ज्याला पाहिलं यायचं असतं त्याला वाटेत थांबून या गोष्टी करायला वेळ नसतो, असं माझं ऑब्जर्वेशन आहे. अर्थात हा माझा दृष्टिकोन झाला . इतरांचा वेगळा असू शकतो.

'नुसताच ध्येयहीन आनंदच लुटत राहणं' जे पाश्चात्य देशांमध्ये खूप दिसून येतं आणि अतिशय स्पर्धा असल्यामुळे 'आयुष्यभर स्पर्धेमध्ये रेसच्या घोड्यासारखं पळणं ' जे भारत आणि बहुतांश एशियन देशांमध्ये दिसून येतं याचा सुवर्णमध्य साधायला हवा +१००