दहशतवाद आणि त्याची मानसिकता

Submitted by अंबज्ञ on 15 February, 2017 - 22:24

मानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे? अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.

आजमितीला आपल्या देशातल्या ६०८ जिल्ह्यांपैकी २३१ जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे. ज्या प्रमाणात अफाट शस्त्रास्त्रनिर्मिती आणि त्यांची जग भरात सुरू असलेली बेकायदा खरेदी-विक्री पाहता सारे जगच दहशतवादाच्या कचाट्यात सापडलेले आहे एवढे मात्र नक्की. मग त्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या अतिप्रगत देशांचाही आता अपवाद राहिलेला नाही हे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते. पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अनेक जणांनी अधोरेखित केली आहे. भारतात एक मोठा राजकीय विचारप्रवाह असा आहे, की ज्यांच्या मते पाकिस्तान पूर्णत: नेस्तनाबूत करायला हवा. या विचारप्रणालीनुसार बहुसंख्य मुस्लीम हे ‘मनाने’ पाकिस्तानी आहेत. मागील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले नाहीत हा काही प्रमाणात नशिबाचा आणि काही प्रमाणात त्या त्या समाजातील राजकीय जाणतेपणाचा भाग मानायला हवा; परंतु तो जाणतेपणा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. आणि ह्याचाच फायदा अशा दहशतवादी संघटना उचलत असतात. अनेक देशातून आय एस सारख्या कुख्यात संघटनेत सहभागी होण्यासाठी नव युवकांची चाललेली धडपड पाहून हे प्रकर्षाने दिसून येते.

दहशतवाद हा ‘हिरवा’ आहे, की ‘भगवा’, की ‘लाल’ याबाबत बरीच चर्चा चालते. परंतु जेव्हा परदेशात शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा एकच निष्कर्ष निघतो कि - दहशतवादाला कुठलीच जात व धर्म नसतो , त्याची ओळख निव्वळ अमानवी क्रूरता एवढीच उरते. म्हणूनच अशी मंडळी नेहमीच निष्पाप निरपराध लोकांना वेठीस धरून व धमकावून आपले कार्य साधून घेतात आणि मागण्या पूर्ण होणार नसतील तर बिनदिक्कतपणे ह्या ओलिसांची हत्या करतात. बहुतांश दहशतवाद हा इस्लाम धर्मीय देशातच फोफावलेला दिसतो व तेथून तो जगभरात पसरतो असे दिसते. आजही अल-अझहर, नगाफ आणि झासटोन या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते. सध्या तर सोशल मिडीयाचाही बेमालूम परिणाम कारक वापर अशा दहशतवादी संघटनांकडून केला जातो. दहशतवादी फक्त शहरी भागातच सक्रिय असतात हा समज अलीकडे खोटा ठरू लागला आहे. याचे कारण दहशतवाद्यांचे ग्रामीण भागाशी असणारे कनेक्शन वेळोवेळी उघड होत आहे. ह्या घटना थांबवण्यासाठी कारणाच्या मुळाशी जावून बघता दोन गोष्टी आवश्यक ठरतात - १) मूळ धर्माची योग्य शिकवण व प्रसार त्या त्या धर्माच्या अधिकारी लोकांकडून जन मानसात खोलवर रुजवणे आणि २) दहशतवादात प्रमुख टार्गेट ठरवलल्या गेलेल्या मंडळींच्या सुरक्षेवर अधिक मेहनत करणे. अशी मंडळी म्हणजे लहान मुले (शाळा इत्यादी ठिकाणे), स्त्रिया (सामाजिक परीवाहानातील राखीव डबे वगैरे) आणि हॉस्पिटल सारखी आपद्ग्रस्त व्यवस्थेची ठिकाणे.

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ज्या उपाययोजना राबवित आहे त्यांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या लष्कराची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी लष्कर ड्रोन विमाने, फायटर विमाने, प्रचंड हिंसाचार घडवणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या शस्त्रास्त्र वापरामुळे आजवर तीन लाख स्थानिकांना आपल्या घरादारावर पाणी सोडायला लागले आहे. जम्मू-काश्मीर मध्ये सुद्धा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर कधीच झालेला नाही. येथे एक फरक आपणास प्रकर्षाने जाणवतो ते म्हणजे देशाच्या सैन्याप्रमाणेच आधुनिक हत्यारांनी सज्ज असलेला दहशतवादी बाह्यगणवेशात एखाद्या सैनिकाप्रमाणे सजला तरी त्याची मानसिकता कधीच सैनिकाची असू शकत नाही. कुठल्याही देशाचा जवान आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची पर्वा न करता लढत असतो व प्रसंगी युद्धात हौतात्म्य स्वीकारत असतो. दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे. ह्यांची हीच कमकुवत मानसिकता समाजातील कमजोर दुव्यांचा शोध घेते आणि छोटी मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक ह्यांचे सहज सोपे टार्गेट ठरवले जाते. म्हणूनच कुठलाही दहशतवादी हल्ला हा "भ्याड हल्ला" म्हणूनच अधोरेखित होतो कारण त्यात कसलेच शौर्य नसते …. असते ती फक्त स्वत:च्या विकृत विचारसरणीच्या अस्ताची भीती.

-अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users