पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2)

Submitted by रसप on 11 February, 2017 - 01:42

~ ~ पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2) ~ ~

'जॉली एलएलबी - २' चा फर्स्ट हाफ जबरदस्त आहे. अगदी जबरदस्त !
नंतर मात्र सिनेमा जरासा ढेपाळतो.

इथला 'जॉली' म्हणजे पुन्हा एकदा एक धडपड्या वकील आहे. फरक इतकाच की मागच्या भागात तो अर्शद वारसी होता, इथे अक्षय कुमार आहे आणि कहाणी दिल्लीऐवजी लखनऊत घडते.

अ‍ॅडव्होकेट रिझवी (राम गोपाल बजाज) हे 'लखनऊ'च्या न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं प्रस्थ. ह्याच क्षेत्रातलं नव्हे तर एकंदरीतच समाजातलं एक खूप इज्जतदार नाव. त्यांच्या 'लॉ फर्म'मध्ये कारकुनी काम करणारा जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली (अक्षय कुमार) स्वत:चीही एक 'लॉ फर्म' असावी, असं स्वप्न बाळगणारा धडपड्या वकील असतो. ह्या महत्वाकांक्षेपोटी माणुसकी, तत्वमूल्ये वगैरे किरकोळ गोष्टी सोयीस्करपणे पाळणारा जॉली, एकदाच जरा जास्तच भ्रष्ट वागतो आणि त्याची चांगलीच किंमत मोजतो. पुढे होणारी न्यायालयीन लढाई एका अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठीची कमी आणि त्याच्या अपराधगंडावरचा एकमेव इलाज म्हणून जास्त असते.

Jolly LLB 2 Movie First Look - Akshay Kumar.JPG

पहिल्या भागामुळे सौरभ शुक्लाची व्यक्तिरेखा आधीच establish झालेली असल्याने, पुढे काय होणार आहे आणि कसं होणार आहे, हे आधीच माहित असतं. बरेचसे पंचेससुद्धा त्यामुळे अपेक्षितच ठरल्याने कमजोर पडतात. स्टोरीलाईन दमदार होती, पण जॉलीचा सत्यशोधाचा प्रवास योग्य दिशेने झाल्यासारखं वाटलंच नाही. पहिल्या भागात ज्याप्रमाणे, एक महत्वपूर्ण व्यक्ती कोर्टात पेश करून केस निर्णायक केली जाते, तोच प्रकार इथेही आहे. पण त्या व्यक्तीपर्यंत लीड करणारे अनेक महत्वाचे क्ल्यूज् परिस्थितीत असतानाही त्यांवर जॉली लक्ष देत नाही, किंबहुना लेखकाने लक्ष दिलेलं नाही आणि योगायोगाची ठिगळं जोडावी लागली आहेत. माझ्या मते, हा एक जर बदल घडला असता तर कदाचित दुसरा भागही अजून जास्त उत्कंठावर्धक झाला असता.

अक्षय कुमार अत्यंत आवडता आहे. महान अभिनेता म्हणून कधी त्याचं नाव घेतलं जाणार नाही, पण एक अतिशय समंजस अभिनेता म्हणून त्याला नक्कीच पाहिलं जाऊ शकतं. त्याला पडद्यावर वास्तववादी दिसण्यासाठी आमुलाग्र मेकओव्हर करायची कधीही आवश्यकता वाटत नाही. जी व्यक्तिरेखा असेल, ती तो त्याच्याकडे असलेल्या कुवतीचा पुरेपूर वापर करून खरीखुरी उतरवतोच.

अन्नू कपूर हा एक तगडा अभिनेता आहे, असं माझं मत. बऱ्याच दिवसांनी त्याला एक चांगल्यापैकी लांबी व महत्व असलेली भूमिका मिळालेली आहे. पण त्याने तिचं पूर्ण चीज केलं, असं वाटत नाही. ही माझ्यासाठी खूप मोठी निराशेची बाब होती. कारण मला त्याच्या कामाबाबत प्रचंड उत्सुकता होती. पहिल्या भागात बोमन इराणीने साकार केलेला हाय प्रोफाईल वकील खूपच उच्च दर्ज्याचा ठरावा. कदाचित पुन्हा एकदा, predictability मुळे काही ठिकाणी फुसकेपणा आलेला असू शकतो. मात्र तरीही रुबाब आणि माज ह्यांचं जे मिश्रण अपेक्षित होतं, ते अन्नू कपूरला करता आलेलं नाही. उलटपक्षी, काही वेळेस तर त्याचा अति-अभिनय इरीटेटही करतो !

कुमुद मिश्रा आणि सयानी गुप्ता ह्या दोघांना अगदी कमी लांबीच्या भूमिका आहेत. तरीही दोघांचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे कारण दोघांनीही अगदी अफलातून परफॉर्मन्स दिला आहे.
ही कहाणी इन्स्पेक्टर सूर्यवीर सिंग (कुमुद मिश्रा) ह्या सुपर कॉपच्या एका फेक एन्काऊन्टरसंबंधीच्या केसची आहे. सूर्यवीर सिंगला जेव्हा सीबीआयचे अधिकारी काही प्रश्न करतात, त्यानंतर ते अधिकारी गेल्यानंतर कमिशनरच्या केबिनमधून बाहेर पडणाऱ्या सूर्यावीरला कमिशनर एकच प्रश्न विचारतो आणि त्याचं तो उत्तर देतो. साधारण मिनिटभराचा प्रसंग. त्यातही कुमुद मिश्राचं उत्तर काही सेकंदांचंच. त्या काही सेकंदांत त्याची नजर जे काही बोलते, ते केवळ लाजवाब आहे.
'सयानी गुप्ता' ही अभिनेत्री ह्या आधी काही सिनेमांत किरकोळ भूमिकांत दिसली आहे. त्या भूमिकांत लक्षात राहावं असं काही नव्हतंच. पण तरी हा चेहरा ओळखीचा वाटत होता म्हणून जरा शोध घेतल्यावर ओळख पटली. हिला मी 'बार बार देखो' आणि 'फॅन' मध्ये पाहिलं आहे. इथे तिला मोजून ३-४ प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी तिने कमालीचा सहजाभिनय केला आहे.

'सौरभ शुक्ला' ची व्यक्तिरेखा 'जॉली एलएलबी-१' मधून पुढे आली आहे. (आधीच्या भागात दिसलेले इतर सहाय्यक अभिनेते इथेही सहाय्यक म्हणून दिसतात, पण त्यांच्या व्यक्तिरेखा बदलल्या आहेत.) शुक्लांचा जज त्रिपाठी काही जागांवर अति वाटतो. पण चालसे. ओव्हरऑल, पुन्हा एकदा मजा आणली आहे त्यांनी.

हुमा कुरेशीसुद्धा आहे. ती नेहमीसारखीच भक्कम दिसते. ह्याउप्पर तिच्याविषयी काही लिहावं, असं काहीही नाही.

एक होळीचं गाणं म्हणून काही तरी आहे, त्याला गाणं का म्हणावं हा प्रश्न पडतो. आजकाल कोणत्या निकषांवर गाण्यांची निवड केली जाते, हा एक प्रश्न मला काही वेळी भयानक सतावतो. 'ओ रे रंगरेजा..' ही कव्वाली आणि 'बावरा मन' हे रोमॅण्टिक गाणं, अशी दोन गाणी मात्र खूपच सुंदर जमली आहेत.

विनोदातला खुसखुशीतपणा लोप पावत जात असतानाच्या काळात काही मोजकेच लोक अस्तित्व टिकवू शकत आहेत. 'जॉली एलएलबी' हा ब्रॅण्ड जर एस्टॅब्लिश झाला, तर त्यांपैकी एक असणार आहे. कदाचित पहिल्या भागइतका दुसरा भाग आवडणार नाही, पण तरीही एक स्वतंत्र सिनेमा म्हणून विचार करता निखळ मनोरंजनाची खात्री निश्चितच आहे. मुलांना कॉपीसाठी मदत करणे, गुरुजी (संजय मिश्रा) चं बनारसमध्ये क्रिकेटच्या 'कल्पक' मॅचेस घेणे अश्या काही वेगळ्याच गंमतीजंमती इथे आहेत. जोडीला मुख्य अभिनेत्यांचे चांगले परफॉर्मन्सेस आहेत. वेगवान कथानकही आहे आणि दमदार संवादही.

एकच गोष्ट जी खूपच खटकली ती म्हणजे अर्शद वारसीच्या जागी अक्षय कुमार. अक्षयने चांगलंच काम केलं आहे आणि तो कुठेही अर्शदपेक्षा कमीही पडलेला नाही, हे खरं पण अश्या रिप्लेसमेन्ट्स इंडस्ट्रीची स्टारशरणता दाखवतात. समजा उद्या तिसरा भागही आला आणि त्यात पुन्हा वेगळा अभिनेता 'जॉली'च्या भूमिकेत असला, तर वेगळी गोष्ट. पण आजचा विचार करता, जी कमाल अर्शदने पहिल्या भागात केली होती, ते आठवता दुसऱ्या भागात त्याचा नंबर लागायला हवा होता.

असो.
सेन्सॉर बोर्डाच्या बिनडोक कारभारामुळे दोन ठिकाणी लावलेल्या कात्र्या समजून येतात. सेन्सॉर बोर्ड आपलं उपद्रवमूल्य जेव्हा शून्य करेल, तो 'सोनियाचा दिनू' असेल.

एनीवे, फायनल प्रोडक्ट काही वाईट झालेलं नाही. काही डिफेक्ट्स आहेतही, पण त्यांसकटही, जॉली आवडून घेतला जाऊ शकेल. आपण 'लाईव्ह' पाहिलेल्या एखाद्या क्रिकेट सामन्याचं पुनर्प्रक्षेपण जितकं मनोरंजन करेल, तितकं (इफ नॉट मोअर) 'जॉली एलएलबी - २' देतो.

वन्स नक्कीच वॉचेबल !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/02/movie-review-jolly-llb-2.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळे आवडते घटक या चित्रपटात आहेत, नक्की बघणार.. संजय मिश्रा वगैरे मंडळीना काही सेकंद जरी पडद्यावर मिळाली तरी ते स्वतःची दखल घ्यायला लावतात.
आणि असा ब्रँड खरोखरीच लोकप्रिय व्हायला हवा. चांगला विनोद आजकाल दुर्मिळ झालाय.

चांगली गाणी मात्र अजूनही स्वप्नरंजनच आहे.. लाखात एखादे लक्षात राहणाजोगे असते.

अर्शद वारसीच शोभून दिसलेला. अक्षय कुमारने कितीही चांगले काम केले तरी तो मिसमॅच वाटला. त्याचा प्रत्येक चित्रपटात "देशभक्तीचा रंग" देण्याचा आग्रह अजीर्ण होत आहे. पहिल्या पार्ट मधे समाजासाठी काही देणे लागते हा मेसेज फ्ल्युंटली ( मराठी शब्द ?) आलेला होता. जसजशा घटना उलगडत जात होते वारसीच्या समोर नव्याने सत्य समोर येत होते. त्यामुळे त्याच्यात होणारे बदल हा मुख्य गाभा होता. आणि तो नविन होता.

यात पण समान धागा आहे. पण त्यात नाविन्य नसल्याने निरस होतो. अक्षयला पहिल्यापासूनच "सच्चाई का सिपाही" टाईप दाखवले असते तर ते वेगळे ठरले असते त्या अनुषंगाने त्याला होणारा त्रास वगैरे या वळणाने जायला हवे होते. प्रत्येक चित्रपटात "वकिलाची अंतरात्मा नंतर बदलते" हेच दाखवले तर चित्रपटाच्या सिक्वल मधे नविन काहीच राहणार नाही.

या खेपेस अक्षय सारखा तगडा अभिनेता घेतलेला होता तर कोर्ट ड्रामा गंभीर दाखवायला हवा होता. सु.शि यांच्या कथेतला "अमर" व्यक्तिरेखेत अक्षय चपखल बसतो. तशा पध्दतीने केस सोडवली असती तर एकदम वेगळा चित्रपट बनण्याची संधी होती.

हो. ओघाने शब्द बरोबर आहे. अक्षय सारखे व्यक्तिमत्व गयावया करताना शोभून दिसत नाही. ते ही "अन्नू कपूर" समोर.
अशा कडक भुमिकेसाठी "अमरिश पुरी" सारखे ताकदीचे भारदस्त व्यक्तीमत्व हवे. ज्याच्या "आवाजात" एक जरब हवी. "मी म्हणेल तोच कायदा" हे संवादफेकीमधून प्रेक्षकांपर्यंत पोहचले पाहिजे. "अ‍ॅडव्होकेट चड्ढा" हे अजरामर व्यक्तीमत्व अमरिश पुरींनी उभे केले होते.

Yes..
Amrish Puri is deeply missed these days. अमरीश पुरी जिवंत होते तेव्हा लोक आपापल्या कोशात अडकलेले होते. आजकाल सगळेच बऱ्यापैकी प्रयोगशील झालेले असताना, अमरीश पुरींसारख्या चतुरस्र अभिनेत्यामुळे खूप सपोर्ट मिळाला असता.
त्या वयातल्या दमदार भूमिकांसाठी आजकाल फक्त बच्चनचाच पर्याय उरला आहे.. Sad

अक्षय सारखे व्यक्तिमत्व गयावया करताना शोभून दिसत नाही. ते ही "अन्नू कपूर" समोर. .. दीपस्त.. हे मात्र अगदी बरोबर.

आणि, अमरिश पुरी यांच्यासारखा आवाज असलेला कुणी कलाकारच नाही आता !

अमिताभ बच्चन यांना सुध्दा अशा नकारात्मक भुमिकेत घ्यायला हवे. गेला बाजार सुरेश ओबेरॉय सुध्दा शोभून दिसले असते. वकिलाच्या भुमिकेत त्याचा आवाज हे वेगळे व्यक्तिमत्व उभे करते. "सनी देओल" चा "तारीख पे तारीख" हा एकच संवाद निव्वळ सनीच्या जबरदस्त आवाजावर प्रसिध्द झाला. अन्यथा तोच संवाद "हृतिकच्या आवाजात कल्पना करून बघा. लयच मिळमिळीत वाटेल.
शिरवाळकरांच्या "अमर" कथेत कित्येक चांगल्या कथा आहे ज्यात वकिलांची चांगली जुगलबंदी रंगवलेली आहे.
अशा दोन व्यक्तिरेखांमधे आमिर विरुध्द अमिताभ, शाखा विरुध्द अमिताभ, आमिर विरुध्द शाखा / इरफान अशा अजुन पडद्यावर न दिसलेल्या जोड्या योग्य बसतील.

मी अक्षय ची फॅन आहे पण फॅन आहे ते ऍक्टर म्हणून पेक्षा माणूस म्हणून !! माणूस म्हणून ग्रेट च आहे
कारण "नमस्ते लंडन " पासून तो हळू हळू बदलत गेला कदाचित देशभक्ती चे पिक्चर करता करता तो खरोखरच देशभक्त झाला !
म्हणतात ना fake to feel असाच प्रवास असावा !!
ह्या दोन चार वर्षात तर तो खरंच बदललाय . २०१५ साली त्याने आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली , शाहिद सैनिकांच्या कुटुंबाना मदत केली आता तर महसूल मंत्री चन्दाकांत दादा पाटील ह्यांच्याशी बोलून रीतसर एक आत्महत्या ग्रस्त गाव दत्तक घेतलंय !!

ट्रेलर पाहता चित्रपटाची जातकुळी पहिल्यापेक्षा टोटल वेगळी वाटते.
म्हणजे बॉलीवूडी मसाला टाईप्स, अक्षय कुमार स्टारर च वाटतो.
त्यामुळे पहिल्याशी तुलना करण्यात अर्थ नाही. रावडी राठोड समजून बघायचे. मी अजून पाहिला नाहे, पण एकदोन मित्रांनी ज्यांनी पाहिला त्यांना बरा वाटला.

विवेक ओबेरॉय चा पण आवाज चांगला आहे, पण बिचारा पद्धतशीरपणे या क्षेत्राबाहेर फेकला गेला.

तो त्याच्या बापाकडून विरासत मधे मिळाला आहे पण चेहर्‍यावर एक्स्प्रेशन्स बदलत नाही. भाईगिरी मधे असा "मख्ख" चेहरा चालुन जातो. जसे "रक्तचरित्र" सारख्या चित्रपटात चालून गेले. पण सर्वत्र नाही चालणार.

वकील म्हणून चालला असता कि, बोलताना चेहरा निर्विकारच ठेवायचा असतो वकिलांना... नाहितर आणखी एखादा चेहरा आणि त्याचा प्ले बॅक..

मला वाटतं एक दूजे के लिये मधे, रति ला कुणा झरीना कादीरचा प्लॅ बॅक होता. साधना खोटे हि मराठी कलाकार पण असा प्ले बॅक देत असे.

तो जयकांत शिकरे, सयाजी जाधव, नागेश भोसले ही मंडळी आहेत की खलनायक व्हायला. त्यांना हिंदित किती भाव आहे, देवच जाणे. अन्नु कपुर अंताक्षरी च्या नादी लागुन वाया गेला. अक्षय कुमार चांगला एंटरटेनर आहे पहिल्यापासुनच.

मी जॉली एल एल बी भाग एक पाहिला होता. आणि पहिल्यांदा लागल्या बोर असेल असंच मनात आलं होतं, पण कथेने आणि अर्शद वारसीने मला खिळवून ठेवलं.
त्याच्या सगळ्याच भूमिका उल्लेखनीय आहेत, पण समहाऊ अपेक्षित क्रेडीट त्याला मिळत नाही. त्याचा पहिला सिनेमा तेरे मेरे सपने (बहुतेक) त्यात तो चंद्रचूड् पेक्षा कितीतरी उठून दिसला होता, मुन्ना भाई तल्या भूमिकेत तर तो कुठे कुठे संजूबाबाला ही खाऊन टाकतो.
यात ही त्याचा नंबर लागायला हवा होता न्क्की, पण अक्षय काही वाईट नाही.
टिव्हीवर लागला की पाहिनच. परिक्षण आवडल.

फक्त ते पुनर्प्रक्षेपण "पुनः प्रक्षेपण' असं लिहिलंत तर चालेल.

विवेक ओबेरॉय चा पण आवाज चांगला आहे, पण बिचारा पद्धतशीरपणे या क्षेत्राबाहेर फेकला गेला. >>> + १

जॉली एल एल बी २, वनपेक्षा बराच वेगळा आहे , अक्षयकुमार , अन्नूकपूर आणि जज शुक्ला ची कामं आवडली , हुमा कुरेशी भारी दणकट दिसते , सिनेमा आवडला .

रिव्युज चांगले आहेत. बघण्याची इच्छा आहे. पण जवळपासच्या कुठल्याच थिएटरला लागला नसल्याने TV वर येण्याची वाट बघावी लागेल.

कारण बोलताना पुर्नप्रक्षेपण असं बोललो तरिही लिहिताना पुनः प्रक्षेपण असं बरोबर आहे.
जाणकार अधिक प्रकाश टाकतील.

पुनर्प्रक्षेपण , पुनः प्रक्षेपण दोन्ही बरोबर आहेत.
रसप, काल तुमचं परीक्षण वाचून आधी जॉनी LLB बघितल, अर्शद चा. सुपर्ब पिक्चर! मी आणि नवरा, बोमन इरानी चे पंखे झालो!!

अगदी हेच मनात आलं हा चित्रपट पाहून, शेवटी तर वाटलं कि काहीतरी व्टिस्ट येईल पण काहीच नाही, त्यात तो बुवा/ कादरी उगाचच गालात हसत असतो पुर्ण वेळ, त्याचा अभिनय एक्दमच मवाळ वाटला.

या चित्रपटात एक प्रसंग प्रचंड आवडला.

अक्षय कुमारच्या मुद्देसूद चर्चेपुढे अन्नु कपूरचे खोटे चालेनासे होते. त्यामुळे अन्नू कपूर एक भावनिक खेळ खेळतात. अन्नु कपूर देशभक्तीचे गोडवे गायला सुरुवात करतात आणि जनतेसमोर कोर्टात स्वतःच्या वयोवृध्द वडीलांना घेऊन येतात. जेणेकरून भावनिक दबाव लोकांवर न्यायधिशांवर वाढेल आणि खटला आपण जिंकू. परंतू अक्षय कुमारच्या मुद्द्यांपुढे त्यांचे काही चालत नाही.

स्वतःचे खोटे हे "खरे" सिध्द करण्याकरीता काही लोक आपल्या वयोवृध्द आई-वडीलांचा सुध्दा वापर करतात.

Baghitala. Courtroom drama aavadala. Baakee pratyek babtit deshbhakteepar bhashan jaraa jaastach hotaat.