तुला मी मला तू मला तू तुला मी

Submitted by द्वैत on 10 February, 2017 - 23:58

वृद्धाश्रमातील एका जोडप्याशी झालेल्या संवादातून सुचलेली ही कविता येणाऱ्या प्रेम दिवसाच्या निमित्ताने पोस्ट करत आहे.

तुला मी मला तू मला तू तुला मी

जरी जीर्ण झाले हे जगणे जरासे
जरा जुन झाल्या ह्या वाटा तरीही
आता सांगतो एकमेकांस आम्ही
तुला मी मला तू मला तू तुला मी

जरा वृद्ध झालो जरा आज थकलो
तरीही कधी सांग प्रेमास चुकलो
अजून माळता मी तुला प्रेम गजरा
तुझ्या लाजण्याला कधी सांग हुकलो
अजून छेडतो एकमेकांस आम्ही
तुला मी मला तू मला तू तुला मी

किती ते उन्हाळे किती पावसाळे
कशी वर्ष सरली कधी ना कळाले
तुझा हात हातात होता म्हणुनी
जरा अर्थ जगण्यास माझ्या मिळाले
अजून मांगतो एकमेकांस आम्ही
तुला मी मला तू मला तू तुला मी

किती सांग माया पिलांवर करावी
उन्हे सोसुनी सावली पांघरावी
उभा जन्म जावा पिलांना जपाया
जरा पंख फुटता ती भुर्रकन उडावी
आता पाहतो एकमेकांस आम्ही
तुला मी मला तू मला तू तुला मी

कवी - dwait

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव....नाव भारिये....तुला मी मला तू....
मस्त जमलिये....
जरा वृद्ध झालो जरा आज थकलो
तरीही कधी सांग प्रेमास चुकलो
अजून माळता मी तुला प्रेम गजरा
तुझ्या लाजण्याला कधी सांग हुकलो
अजून छेडतो एकमेकांस आम्ही
तुला मी मला तू मला तू तुला मी>>>>>सो स्वीट....

क्या बात है !!
तुमच्या कवितांमधे खोल अर्थ तर आहेच, तसेच व्याकरणदृष्ट्याही कविता उत्कृष्ट आहेत.
प्रस्तुत कवितादेखिल आवडली !!