कॉम्पाटीबिलीटीचे तांदूळ...!

Submitted by Charudutt Ramti... on 8 February, 2017 - 14:44

घट:स्फोटा ला लागणारे सर्व प्रकारचे उत्तम असे पोषक वातावरण सध्या समाजात चौफेर उपलब्ध आहे. असे विधान केल्यास अजिबात अतिशयोक्ती होणार नाही, पण गदारोळ मात्र लगेच माजेल. घट:स्फोटा ला लागणारे पोषक वातावरण ? अहो घट:स्फोट म्हणजे काय तुम्हाला, डास उघड्या पाण्यावर अंडी घालतात तितकं सोप्प वाटलं काय? पोषक वातावरण म्हणे.

वा: एकदम मस्त सुरूवात लेखाची. काsय आहे, मी बरेच दिवस एका स्फोटक विषयाच्या शोधात होतो. लेखासाठी. पण काही केल्या विषयच सापडेना. सर्दावलेल्या फटाक्यांसारखे सगळे स्फोटक विषय फुसके बार झाल्यासारखे वाटत होते. शेवटी स्फोटक विषय शोधता शोधता, 'स्फोटक' ह्या शब्दानेच माझं लक्ष वेधून घेतल. स्फोटक --- स्फोट --- ‘घट:स्फोट’ :- वा: काय दमदार शब्द आहे. लग्न झाल्यावर लोक टुमदार घर बनवायच्या नादात घटस्फोट नावाच्या ह्या दमदार अजगराच्या विळख्यात कधी सापडतात ते त्यांच त्यांनाच काळत नसावे, नाई ? वा: वा: आज काय खर नाई. काय उपमा सापडली आहे. लग्न नावाच टुमदार घर आणि घट:स्फोट नावाचा एक ‘दमदार अजगर’. लेख होणार नक्की होणार....पण टीकेची झोड ही उठणार हे नक्की. एवढ्या गंभीर विषयाला एवढ्या थिल्लर पणे घेतल्या बद्दल आणि लेखकाला अजिबात 'पोच' नसल्याची 'पोच' पावती मिळणार. लेखकाला लग्नसंस्थे विषयी अजिबात आस्था नाही आणि संस्कृती ची खिल्ली उडवणे सोपे आहे. तिकडे पश्चात्य देशात पहा काय वाट लागली आहे ते पहा !

विषय गंभीर आहे ह्यात काही शंकाच नाही. पण ‘थिल्लर’ लोकांना लोक जेवढ्या गांभीर्याने लोक घेतात तेवढे विद्वानांना कुणी घेत नाही. दुसरं, विषय गंभीर असला म्हणजे तो फक्त गंभीर्यानेच घ्यावा असा काही नियम नाही. उदा: नट-नटयान्चे घटस्फोट हा विषय आपण सुपारी सारखा दुपारच्या जेवणा नंतर चघळतो की नई ? राजकारण्यांची लफडी आणि त्यांची विवाह बाह्य प्रकरण आपण सामोश्याला सॉस लावून खावा तसे किंवा गप्पांच्या गूर्हाळात व्हिस्की चा पेग लावताना चकणा म्हणून तोंडी लावून खातो की नई. मग समाजात आजूबाजूला होणारे घटस्फोट हा विषय मात्र 'जोन्सन अँड जॉन्सन्स' बेबी सोप एवढा निरजंतुक का म्हणून?

सामाजिक प्रश्न पहिला. त्यांच दोघांच पटत नाही. तुमचा काय संबध? मान्य. एकदम मान्य. पण तुम्ही दोघांनी लग्ना ला अगदी 'नक्की या...बघा हं....आला नाहीत तर परत...तुमच्या कडे येणार नाही आम्ही परत कद्धि कद्धि!' असं बोलावून निमंत्रण दिलं होतंत. होतंत की नई. आणि आम्ही तुमच्या ह्या धमकी ला घाबरून ऑफीस मधे कॅज्यूअल लिव्ह मिळत नसतानाही, सिक लिव्ह टाकून दुपारच्या मे महिन्यातल्या भर उन्हाळ्यात बस, रिक्षा, उबेर, ओला, जे काही सापडत होतं त्या वाहनानं अर्धा शर्ट घामानं ओला होत असतानाही, तुमचा दुपारचा बारा पन्नास चा मुहूर्त पळत पळत गाठला की नई? अहो थोडी तरी कल्पना द्यायची....आमच्या एकमेकांच्या कंपॅटिबिलिटी चा थोडा इश्यू आहे. त्यामुळे...अठरा ते चोवीस महिन्यांनी कदाचित आम्ही 'डायवॉर्से' घेऊ म्हणून. अहो...आम्ही एटलिस्ट थोडं आमचं प्रेज़ेंटच 'बजेट' तरी कमीजास्त केल असत? एक मात्र मी मान्य करतो, काय आहे...शेवटी तुमची कंपॅटिबिलिटी एकमेकांविषयी किती आहे, हे समजायला काही पर्यायी व्यवस्था आपल्या लग्न संस्थेत ( हे ‘लग्नसंस्था’ वगरे शब्दप्रयोग वापरले की लेखाला थोड वजन प्राप्त झाल्यासारख वाटत बुआ ) हां, तर ती कंपॅटिबिलिटी मोजणार कशात? म्हणजे एक सोय आहे. पण ती प्रस्थापित समाजाला अजिबातच मान्य नाही. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असा नुसता शब्दप्रयोग जरी केला तरी, पुअर वेजिटरीयन असलेल्या 'आत्याबाईंच्या' ताटात 'लेगपीस' पडला तर आत्या कश्या किंचाळतील, तसे 'लग्नसंस्थेचे' पदाधिकारी किंचाळतात. अहो ऐकलत का, मार्केटयार्डा तून डायरेक्ट पंचाहत्तर किलोची गोणी आणण्या आधी एक किलो आंबेमोहोर आणि अर्धा किलो 'बास्मती' ( तुकडा ) आणलाय. दोन्ही पैकी जो जास्त चांगल्या वासाचा असेल तो पहा...आणि त्या प्रमाणे वर्षाचा तांदूळ घ्या...काय आहे...मागाहून उगाच किट किट नको. असे साधे सरळ हिशेबी लोक 'सॅंपल' बेसिस वर लिमयांच्या किराणा स्टोर मधून तांदूळ घेता विकत येतो, तसे सॅंपल बेसिस वर लिमयांच्या मुलीशी 'सप्तर्षीन्च्या' मुलाने लग्न केले तर...सॅंपल बेसिस वर होणार्या मुलांची बाळन्तपणे कुणी करायची हा एक गंभीर सामाजिक प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे तशी सोय उपलब्ध करून देता येणार नाही - असा युक्तिवाद करून ह्या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्यात आले आहे.. (इथे, लिमये हेच नाव का? आणि सप्तर्षीन्चाच मुलगा का? ह्या दोन ही प्रश्नांचे उत्तर ह्याला काहीही कारण नाही असे आहे. 'लिमये' ह्या ऐवजी 'मित्तल' आणि ‘सप्तर्षी’ ह्या ऐवजी 'गोगोई' असे नाव घेऊन हा परीच्छेद वाचून, तुम्च्या दृष्टीने जर मला अभिप्रेत असलेली विनोद निर्मिती होत असेल, तर ‘गोगोई’ नावाला माझी काहीही हरकत नाही. ) काही लोकांच्या दृष्टीने लिव इन रीलेशनशीप आणि 'लफडं' ह्यात मुळात काही फरकच नसतो. अयशस्वी प्रेम म्हणजे लफडं. आणि यशस्वी लफडं म्हणजे प्रेम - इतकी साधी सरळ सोप्पी व्याख्या यांनी ह्या सगळ्या ‘प्रकरणा’ ची केन्व्हाच करून टाकलेली आहे. त्यामुळे 'कंपॅटिबिलिटी' आधी चेक करता येते का ह्याचे सरळ सोप्पे उत्तर - नाही असेच आहे. ह्या विषयात पुढे फार हात घालण्यासारखे काही नाही. फार काही होणार नाही...फक्त हात पोळतील.

आता उरतो प्रश्न लग्नानंतर जुळवून घेण्याचा. ह्यात खरा कळीचा प्रश्न असतो तो म्हणजे...तुमची पार्टी कुणाची. म्हणजे, मुलाकडची की मुलीकडची. मुलाकडची असेल...तर लग्नानंतर ‘मुली कडचे लोक बदलले’ असे धडधाकट विधान करा. आणि मुली कडची असेल तर 'मुला’ कडच्यांनी (श्रियुत विजय माल्यान्नि बँकांना फसवलं तसं) आम्हाला हातोहात फसवल, अस विधान 'शपथे वर' ही करायला हरकत नाही. दोन्ही विधान फॅमिली कोर्टात ग्राह्य धरली जातात. मात्र आपापल्यात बोलताना घटस्फोट हा शब्द प्रयोग शक्य तितका टाळावा. त्या ऐवजी...'जरा कुरबूर सुरू आहे' ( स्टेज वन ) 'दोघे जरा जास्तच ईगोयिस्टिक आहेत' ( स्टेज टू ) ' ती ही त्याच्या एवढाच लाख भर पगार आणते की घरी, कुठ बिघडल त्यान जरा भांडी घासली तर ?' ( स्टेज थ्री ) 'मी काय म्हणते ते हल्ली कौन्सिलिंग की काय ते करतात...ते तरी करून पहाव ना, काही फरक पडतो का ते...' ( स्टेज फौर ) ' नई...हल्ली आमची 'पियू' तिकडे फ्लॅट घेऊन राहते एकटीच... ऑफिस जवळ पडत ना तिला तिथून (स्टेज फाइव – ओल्मोस्ट फायनल )
आता तुम्हीच पहा...वर कुठे तरी एकदा ही घटस्फोत हा 'शब्दप्रयोग' आहे. नाही. पण त्या मुळे कुणाच कुठे काही अडल. अजिबात नाही. तुझ्या मुळे माझ काहीही आडत नाही. हा एटस्फोट नावाच्या संस्थेचा पाया आहे. तो जेवढा भक्कम तेवढा घटस्फोट दीर्घकाळ टिकतो. ( हो घटस्फोट मोडल्याची ही अनेक उदाहरणे ह्या समाजात आहेत. म्हणजे लग्न मोडतात तसे ह्यांचे घतस्फोट ही मोडतात. हसू नका...फॅक्ट आहे. कारण एकच...जसा लग्नाचा पाया ह्यांचा भक्कम नसतो तसा घटस्फोटाचाही पाया भक्कम नसतो ह्यांचा..त्यामुळे हे असले घटस्फोट ही फार वेळ टिकत नाहीत. ) थोडक्यात काय लग्ना सारखा घटस्फोटा चा पाया जेवढा भक्कम तेवढा घटस्फोट दीर्घकाळ टिकतो. मला कधी कधी उगाच असे वाटत राहते. लग्न झाल्यावर नवदांपत्य कसे रविवारी संध्याकाळी साडेचार वाजता चहा बरोबर मारी बिसकिटे खात खात लग्नाचे आल्बम पाहत पाहत पहिले दोन तीन महिने संपवत आणि मग लग्नातल नाविन्य ओसरल्यावर, थोडे घटस्फोट करून पाहुयात ना कसं होताय ते? अस एकमेकांच्यात ठरवत असावेत सामंजस्याने. आणि मग घटस्फोट झाल्यावर तोही सहन न झाल्यामुळे परत एकत्र आलेली ही दांपत्य रविवारी संध्याकाळी चार वाजता बाल्कनी मधे बसून 'आपले' घटस्फोटा चे पेपर्स आल्बम मधले एक एक पान उलटावे तसे उलट्त पाहत असतील काय? नाई उगाच आपली माझ्या मनातली एक शंका...!

घटस्फोटाची कारणे ही हल्ली फार च समर्पक असतात. 'मला हा वेळ देत नाही' इथपासून ते 'मला ही माझी स्पेसच देत नाही’ इथपर्यंत किंवा 'मला सोशल लाइफ जगू देत नाही' इथपासून ते मला कसली प्रायव्हसी च राहिली नाही’ इथपर्यंत. मला वॉटसॅप आणि फेस्बूक मधे घटस्फोटाची कारणे शोधायची नाहीत. कारण...काही वाद विवाद हे कसे अनंत काळापासून चालत येऊन ही अनिर्णित असतात ( उदा : गांधी वाद योग्य की अयोग्य, माणूस मुळचा शाकाहारी की मौसाहरी , देव आहे की नाही ) तसा, एफ बी आणि वॉटस्अप मुळे घटस्फोट होतात की नाही...हे भाष्य करण्याइतपत माझा वकुब नाही. पण तेही अश्याच अनेक करणान्च्यापैकी एक.

लग्न न टिकल्यास, लग्न ठरवणार्या वधूवर सूचक मंडळकडे जाऊन तक्रार करणे म्हणजे 'ओसामा बीन लादेन' किंवा सध्या च्या लष्करे तैयब्बा च्या 'लक्वी' ला 'चांगला वागत का नाहीस तू आमच्याशी?' असं विचारल्या सारख आहे. तरी पण कुणी गेलच तर, पहिल्याच विज़िट ला नाव नोंदणी करायला आलेल्या 'जवळच्या मावशी' ने एक रिक्को च्या शाई पेनाने सही केलेला 'डिसक्लेमर' फॉर्म ते तोंडावर मारतात आपल्या. खरं बॉडी शॉपिंग सॉफ्टवेर कंपन्यांनी सुरू करण्या पुर्वी, वधूवर सूचक मंडळांनी सुरू केल. ही मंडळे लग्न झाल की सवडीशास्त्राचे नियम सांगत बाजूला होतात. त्यातही तुम्ही धिराने वधु किंवा वरा बद्दल तक्रार करायला गेलात तर ह्या सूचक मंडळातले सभासद 'भोचक' उत्तरे देऊन समोरच्या पार्टी ला गार करतात.
"अहो लग्ना नंतर त्यांचं एकमेकांशी पटत नाही त्याला आमची संस्था काय करणार ? त्यांना एक ‘चान्स’ घ्यायला सांगा. बरीच प्रकरण ‘चान्स’ घेतल्यावर सरळ लायनीवर होतात.”
भली माणस हा 'फुकटाचा' सल्ला घेऊन निमुट चप्पल घालून बाहेर पडतात. पण काही लोक वधु वर सूचक मंडळाला 'चान्स घेतल्यावर ही नाही पॅटल तर...दुपटी धुवायला आणि शेक शेगडी द्यायला तुम्ही येणार आहात तिकडे कोथरूड ला की बाळा चे शू चे लंगोट इकडे पाठवून द्यायची सोय करू?" असा आहेर ‘परत’ करून येतात.
तुमचा अप्रोच कसा ही असला तरी एक 'सूचक' हास्य करून ‘वधूवर संशोधन मंडळे' नामनिराळी होतात. एकदा तर मी चक्क एका अश्या वधूवर सूचक मंडळाने 'पोस्ट मॅरेज डिस्प्यूट कौन्सिलिंग ब्युरो' अशी सबसिडियरी काढल्याचे ही ऐकले आहे. म्हणजे लग्न जमले तरी ह्याची चैनी आणि नाही पटले तरी ह्यांचीच चांदी. स्थळ नोंदवायला आल्यावर दोन्ही फॉर्म ( वधु संशोधन आणि डिस्प्यूट कौन्सिलिंग ) एकत्र भरून घेतले नाही म्हणजे भरून पावलो.

हल्ली निमंत्रण पत्रिका आली की नाही म्हणायला हूरहुर च लागते. दिवस भर मुलगा मुलगी बिचारे डोक्यावर पडलेले अक्षदांचे तांदूळ झटकत झटकत गर्भ रेशमी कपड्यात वडीलधार्यांना नमस्कार करत 'अष्ट पुत्र सौभाग्यवती' असा आशीर्वाद घेत फिरत असतात...? तिकडे मुलाची आजी नव्वदि ला केव्हाच टेकलेली असते. शरीराचा अस्थि पंजर झालेला. “माधवा...आला फक्त एक पणतू झाला आणि सोन्याची फूलं उधळली की ‘मी माझ्या विठठला कडे' जायला मोकळी” असे लग्न ठरल्या पासून अक्षदा पॅडेस्तोपर्यंत पन्नास वेळा तरी घोकून झालेल असत. पत्रिका हातात घेतल्या वर वाटत... पणतवाच तोंड पहिल्याच सुख देऊन ह्या पणजी ला सुखाने मरु देतील ना ही एकमेकांमधे 'कॉम्पाटीबिलीलिटी' शोधण्याच्या नादात संसार करायचाच विसरून जाणारी ही मूलं?

चारूदत्त रामतीर्थकर
९ फेब्रु २०१७, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचे लेख जनरली आवडतात, हा लेख मात्र फार विस्कळीत वाटला. नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही, विनोदनिर्मिती चा प्रयत्न दिसतो पण इतके काही विनोदी वाटत नाही लिखाण !

उथळ वाटला लेख. एकतर तुमचा स्टँडही कळत नाहीये आणि रोखही.
गंभीर विषयावर विनोदी लिहिण्याचा प्रयत्न म्हणताय पण विनोद तोंडी लावण्यापुरताही दिसला नाही.
बाकी विषयाचं गांभिर्य वगैरे दूरच.

आवडला हा लेख. Happy
सध्या च्या काळात काहीतरी वेगळ वाचल माबोवर.

खूप हसले. पण हा लेख फक्त विनोदनिर्मितीसाठी लिहिलेला वाटत नाहीये. Probably you are quite upset about this divorce culture. वाईट तर वाटतं पण आपण काय करू शकतो.

लेख हलकाफुलका आहे. नो डाऊट. पण विषय गंभीर असल्याने तो कोणालाही तितक्या हलक्या फुलक्या प्रकारे स्वीकारता येणे शक्य नाहीये.

शिवाय नवरा बायको सहज.. गंमत म्हणून.. असंच आपलं वाटलं म्हणून.. घटस्फोट नाही घेत. आपल्याकडे तर नाहीच नाही. दोघांनाही समाजाचे मॉरल पोलिस आपल्याला टोचून खाणार याची संपूर्ण कल्पना असते. त्यामुळे त्या जखमांपेक्षा लग्नात राहाण्याच्या जखमा जास्त असतील तरच शक्यतो घटस्फोट घेतला जातो (आईवडील / समाज घेऊ देतात).

अजून एक म्हणजे तुम्हाला दु:ख त्यांचा घटस्फोट झाला यापेक्षा तुमची सीक लीव्ह वाया गेली याचे जास्त झाले आहे असे वाटते. जसं तुम्हाला सीक लीव्ह वाया जाणार हे माहित नसते तसे लग्न करणार्‍यांनाही आपला वेळ, पैसा, भावना सगळं वाया जाणार आहे याची कल्पना नसते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतांना तुमच्या सीक लीव्हचा आणि आहेराचा विचार करावा हि अपेक्षा बाष्कळ आहे.

लेख - विनोदी ललित काय ते पोहोचले.
असे स्पोट होण्याचं कारण करिअरवाल्या मुलींचा रवीग्रह फार प्रभावी असतो. तोच संसाराला तितकाच वाईट असतो.
हे आमचे स्फोटक विचार.

The rate of divorce in India is about 13 per 1,000 marriages

उगाच ओढून ताणुन इनोद निर्मिती चा प्रयत्न ...