शेअरिंग: एक आवडता उद्योग

Submitted by विद्या भुतकर on 7 February, 2017 - 22:41

आपल्याला आयुष्यात नसते उद्योग करायला लै जोर असतो. शेअरिंग म्हणजे तर आवडता उद्योग. Happy अगदी पोराच्या 'डायपर रॅश' क्रीमबद्दलचं आपलं मतही एकदम उत्साहाने देणार. आधी कधी इतकं लक्षात आलं नव्हतं, पण एकूणच मी मला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा नसेल तर त्याबददलचं मत लगेच मित्र-मैत्रिणींना वगैरे सांगून टाकते. म्हणजे मला आवडलंय तर बाकीच्यांना ते समजलं पाहिजे ना? आणि नसेल तर त्यांचा तरी त्यांचाही त्रास वाचेल असं माझं स्पष्ट मत असतं. तर अशीच 'स्पष्टं' मी ऊठसूट देत असते.

या मत देण्याच्या यादीत बऱ्याच गोष्टी येतात. मुलं, त्यांचे अनुभव आणि त्यानुसार लागणाऱ्या सर्व गोष्टींबाबत तर देतेच. पण एखादे हॉटेल, शॉपिंग मॉल, एखादा कपडा, एखादे पुस्तक अशी बरीच मोठी यादी आहे. आता हा विषय निघाला तो म्हणजे गाण्यांवरून. अनेकदा आपण एकदम विचारतो, "अरे तू हे गाणे ऐकलंस का?" आणि मग गप्पा सुरु होतात. काल असंच एका मैत्रिणीला दोन चांगली गाणी 'नक्की ऐक' म्हणून सांगितलं. तिनेही लगेच त्यातलं एक ऐकून घेतलं आणि खूष झाली, "अरे कसलं भारी गाणी आहे म्हणून". मग मी उत्साहात अजून दोन-चार सांगितली. आता हे गाणी शेअर करणं तसं नवीन नाही. पण समोरच्या व्यक्तीने ते लगेच ऐकून त्यालाही आवडले म्हणजे जणू आपण स्वतःच गाणं लिहिलंय, गायलंय अशा टाईपचा आनंद होतो. खरं की नाही?

असे लगेच ऐकणारे लोक म्हणजे अशा शेअरींग टाईप लोकांचे फेव्हरेट. त्यांना मग जितके जास्त माहिती देता येईल ती द्यायची. तेही ऐकून घेतात आणि लगेच एखादी वस्तू किंवा जे काही असेल ते अनुभवतात. कधी कधी या शेअरिंग मध्ये साध्या रेसिपीज वगैरे असतात किंवा त्याच्या छोट्या टिप्सही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरंच एखाद्याचा पदार्थ चांगला झाला की केव्हढा तो आनंद होतो, दोन्ही पार्टीना. रेसिपी किंवा टिप्स जाऊ दे, एखादा पदार्थ ठराविक पद्धतीनेच कसा खाल्ल्यावर भारी लागतो हेही मी सांगितलंय आणि ऐकलंय. म्हणजे उदा: गुलाबजाम गरम करून आणि आईस्क्रीम, तूप मीठ भरलं वांग आणि भात(तोही कोरडा), असे अनेक. मग समोरच्याला ते आवडलं की अजून मस्त. सानुला मी अनेकवेळा असं सांगत असते, 'हे असं खाऊन बघ भारी लागतं'. Happy

आता सगळ्यांच लोकांमध्ये हे असे गुण दिसत नाहीत. अनेकजण समोरच्याचे मुकाट्याने ऐकून घेतात. 'मी असे करते' किंवा 'तसे बनवते' वगैरे अजिबात बोलत नाहीत. तर असेही काही असतात जे समोरच्याने सांगितले की लगेच त्याला पर्याय सांगतातच. 'मी असे करते' म्हटलं की 'त्याऐवजी असे करून बघ', आपण एक गाणं सांगितलं की त्यापेक्षा हे अजून भारी आहे असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात. Happy असतो एकेकाचा स्वभाव. पण माझ्यासारखे जे काही असे उत्साही लोक असतात जे सर्व बाबतीत मत/सूचना देतातच, त्यांच्याकडे पाहून कधी कधी साशंक लोकांना सारखे वाटत राहते,'अरे हा इतका त्या प्रॉडक्ट बद्दल का सांगतोय? नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार'. अशा वेळी मात्र मी धडा शिकले आहे, कितीही वाटलं तरी गप्प बसायचं. काही अडत नाही आपल्या सूचनांशिवाय कुणाचं. Happy अर्थात तसं ठरवलं तरी मूळ स्वभाव जात नाहीच.

एका गाण्याच्या गप्पांवरून हे विचार मनात आले म्हणून लिहिले. बाकी, त्याच मैत्रिणीला लगेच एक मूव्हींची यादी पण दिली आहे. Happy आणि तिचीही घेतली आहे. Happy अशा गोष्टीत जे सुख असतं ते किती लहान असलं तरी इतकं सहज मिळून जातं, नाही का? तुम्ही अशा काय गोष्टी किंवा वस्तू किंवा अनुभव शेअर करता का? इथेही लगेच सांगून टाका. चान्स मिळाला तर का सोडा?

विद्या भुतकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं काही ऐकलं, वाचलं, पाहीलं की मलाही कोणाला तरी सांगितल्याखेरीज चैन पडत नाही!

>>> तर असेही काही असतात जे समोरच्याने सांगितले की लगेच त्याला पर्याय सांगतातच. <<<<
एक क्याटेगरी सुटली बघा.... काही (खरे तर बरेच ) असेही असतात की समोरच्याने एक सांगितले की यांचे त्याहुनही वरचढ ठरणारे/ठरविणारे सांगणे असते. जाम डोक्यात जातात अशी माणसे.

साधारणतः वकिली/डॉक्टरी पेशातील लोक (फुकट) सल्ले द्यायच्या / शेअरिंग करायच्या भानगडीत पडत नाहीत, कारण त्यांनी दिलेला सल्ला/शेअरिंग हे त्यांच्या उपजिविकेचे साधन असते, व पैसा मिळणार असेल, तरच तोंडातून शब्द उच्चारतात. हे आपले माझे मत. (शेअर कर्तोय Proud )

लिंबुकाका Lol
बर्याच वेळा हे शेअरींग करणे ठराविक कॅटेगिरी,ग्रुप मधे होते. घरातल्या बायकांचे ग्रुप वेगळे,मित्र मैत्रीणीचे वेगळे , फिलोसोफिकल ग्रुप वेगळे आनि धांगडधिंगा ग्रुप वेगळे.त्या त्या नुसार शेअरींग केले की मस्त मज्जा येते.

बर्याच वेळा हे शेअरींग करणे ठराविक कॅटेगिरी,ग्रुप मधे होते.
त्या त्या नुसार शेअरींग केले की मस्त मज्जा येते. >> +1

limbutimbu Lol

THank you all.

चांगलं काही ऐकलं, वाचलं, पाहीलं की मलाही कोणाला तरी सांगितल्याखेरीज चैन पडत नाही!>>> आणि हे सांगण्याकरिता आजच्या काळातील whatsapp हे सर्वात मोठे साधन आहे. आपणांस आलेले सर्वच मेसेज आपण फॉरवर्ड करत नाही. त्यातील आपण जे चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं तेच आपण फॉरवर्ड करतो. माणसाच्या शेअरिंग करण्याच्या प्रवृत्तीचाच WhatsApp मध्ये वापर करून घेण्यात आला आहे.

आपणांस आलेले सर्वच मेसेज आपण फॉरवर्ड करत नाही. त्यातील आपण जे चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं तेच आपण फॉरवर्ड करतो. >>>>>
तुम्ही करता ते योग्य आहे, तसेच तुम्ही चांगल्या व्हॉट्सॅप ग्रुप्सचे सदस्य आहात आणि चांगल्या लोकांच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये आहात.

अस म्हणतात शेअरींग केलं की बरं वाटत मग तो शाळेतला डब्बा असो किंवा गॉसिफ रादर एखादं आवडलेलं गाणं, जोक , सिनेमा कोणाला तरी सांगितल्याखेरीज राहवत नाही..!