"तो सध्या काय करतो?"

Submitted by चिन्गुडी on 6 February, 2017 - 02:15

ती सध्या काय करते " च्या धर्तीवर "तो सध्या काय करतो?" असा साधारण पडलेला प्रश्न !

काहीही कारण नसताना, अचानक आलेल्या अवकाळी पावसासारखा आज अचानक "तो" समोर आला. क्षणभर .. फक्त क्षणभरच काळजात चर्रर्र झालं. संथ झालेल्या पाण्यात अचानक कोणीतरी दगड मारावा आणि सगळा तळ ढवळून निघावा तसंच काहीसं झालं. आयुष्यात असे काही हुरहूर लावणारे क्षण असतात, जे क्षण आपण कायमच चुकवत असतो. त्यांना सामोरं जाण्याचं धाडस आपल्यात नसतं किंबहुना ते धाडस आपल्याला दाखवायचंच नसतं. तो क्षण येऊच नये असं आत खोलवर कुठंतरी वाटत असतं. पण दूसरीकडे... जाऊदे एकदाच का तो विषय मिटवून टाकू म्हणून उसनं अवसान आणायचा केविलवाणा प्रयत्न ! यालाचं बहुदा द्वंद्व म्हणत असावेत लोकं.

जग गोल आहे, जग लहान आहे म्हणतात ते यासाठीच बहूदा, अनपेक्षित व्यक्ती, अनपेक्षित ठिकाणी, अनपेक्षित वेळी भेटते आणि भेटतेचं! वेळ अशी दबक्या पावलांनी का येते? सूड उगवण्यासाठी का आपल्याला मोकळं करण्यासाठी? छान कुटकुटीत खपली धरलेली असताना अचानक कपड्याच्या सुतात अडकावी आणि जखमेला परत रक्त पुवाची धार लागते. तसा निचरा व्हायला लागतो,... जखम बरी होण्यासाठी हे गरजेचं असावं बहुदा!

विचारांचं काहूर हजारो मैल कापून आलं ,
त्याला पाहतांच राग, प्रेम, मत्सर सगळ्या सगळ्या भावना क्षणात जगून आलं

नजरेला नजर! क्षणातच चोरलेली नजर
पुन्हा कटाक्ष ...ओळख द्यावी कि नाही
पुन्हा तोच to be or not to be चा pause
म्हणजे तो बदलला नाहीच , अजूनही
मीच पुढाकार घ्यावा, मीच समजून घ्यावं
पुन्हा परत तोच clause

कॉलर धरून त्याची, वाटलं विचारावं
का रे? तूच सोडून गेला होतास ना
मग आज ही guilt का?

तेव्हाच्या गळाभेटी, सुख दुःखाच्या आणाभाका
रोजची मजा मस्ती आणि पॉपकॉर्न सिनेमा
माझ्या सगळ्या इच्छा, तळहातावर अलगद झेलणारा तू
आणि आज अनपेक्षित भेटून नजर चोरणारा तू
यातला खरा खुरा कोणता तू?

खरा तू कोण आणि कसा?
शोधण्यातच मग्न झालेली "मी"
दुनियादारीच्या गर्तेत खोल खोल जाणारा "तू"
निसटू पाहणारे हात, परत परत पकडण्याचा
निष्पाप प्रयत्न करणारे "आपण"

तुझे आणि माझे निष्ठुरतेने तोडलेले बंध
परत आपण विणू शकू का रे?
"तू" तुला आणि "मी" मला सोडून
पुन्हा एकदा "आपण" बनू शकू का रे?

विचारांच्या वादळात अडकलेली, वावटळीसारखी सैरभैर झालेली "ती", आणि खरंच अकाली आलेल्या पावसासारखा "तो"! खरंच अवकाळी आलेल्या पावसासारखाच आला आणि सुखदुःखाच्या चार सरी तिच्या पदरात टाकून गेला. तिचे डोळे चमकले तसे त्याचे डोळे अपराधी भानवनेने व्यापल्यासारखे वाटुन गेले. त्याची पाठ फिरली तशी, वाटलं हक्काने त्याच्या मागे जाऊन त्याचा हात धरावा आणि जाब विचारावा, कसा राहिलास इतके दिवस माझ्याशिवाय?इतक्या दिवसात एकदा तरी मला विसरलास का रे? वाटलं विचारावं, आजही परत मला मागे टाकून निघालास? का परत एक लुटुपुटूची लढाई करून, पुन्हा एकदा घट्ट मिठीत विसरून जाणार आहेस का जुनी दु:खं? चल नव्यानी उभं करू परत सगळं!

तंद्री मोडली तशी भानावर आली, त्याला जाऊनही थोडा वेळ लोटला होता. परत एक रडीचा डाव , आजही तो अर्धवट सोडून गेला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जग गोल आहे, जग लहान आहे म्हणतात ते यासाठीच बहूदा, अनपेक्षित व्यक्ती, अनपेक्षित ठिकाणी, अनपेक्षित वेळी भेटते आणि भेटतेचं! मस्त... खुपच छान लिहलय...!

छानय Happy

मस्त