एक वादळी जीवन: ओशो!

Submitted by मार्गी on 25 January, 2017 - 00:05

एक वादळी जीवन: ओशो!

सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.

विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. आज त्याला सत्तावीस वर्षं झाली, पण अजूनही त्या वादळातील नाट्य अजिबातही कमी झालेलं नाहीय. ओशो आणि कॉन्ट्रावर्सीज ह्यांचा अतूट संबंध. ओशोंसारख्या व्यक्तिमत्वांच्या बाबत एक गोष्ट नेहमी आढळते. त्यांच्यासंदर्भात दोनच प्रकारचे संबंध असू शकतात- एक तर त्यांना मानणारे; त्यांचे भक्त किंवा शिष्य आणि दुसरे ते खोटे आहेत; ते कसे चुकीचे होते हे सांगणारे त्यांचे विरोधक! तिसरा मार्गच अशा रॅडिकल व्यक्तिमत्वाच्या संदर्भात उरत नाही. नुकत्याच झालेल्या नोटाबंदीसंदर्भात त्यांचा एक विचार व्हॉटसअपवर फिरत होता. त्यांनी एका ठिकाणी म्हंटलं होतं की, चलन ह्या शब्दाचा अर्थच मुळी प्रवाह आहे (करंसी- करंट). चलन ही शाश्वत वस्तू नसून केवळ एक मान्यता आहे, एका रात्रीत सरकारने त्या कागदाला दिलेली मान्यता काढून घेतली तर चलन कवडीमोल होतं! आणि तसंच झालेलं आपण बघितलं. असे अतिशय स्पष्ट व जगावेगळ्या विचारांच्या ओशोंविषयी थोडक्यात बोलायचा प्रयत्न करतो.

जैन धर्मीय कुटुंबातून आलेल्या ओशोंनी- अर्थात् आचार्य रजनीशांनी १९६८ मध्ये 'संभोग से समाधी की ओर' ह्या प्रवचन मालेद्वारे पूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडवून दिली! ज्या काळी चित्रपट सृष्टीमध्ये चुंबनाचं दृश्य जवळजवळ नसायचं, त्या काळात ह्या अवलियाने लैंगिकतेवर अतिशय रॅडिकल आणि मौलिक मांडणी केली. एकाच वेळेस अध्यात्म- परमार्थ- साक्षात्कार ह्यावर ते बोलायचे आणि त्याच वेळेस माणूस आत्ता ज्या गर्तेमध्ये व अंध:कारामध्ये आहे, त्याविषयीही बोलायचे. ईश्वराचं महात्म्य, परम ज्ञान ह्यांचं विवरण करणा-या गुरू व संतांपेक्षा वेगळं- आज माणूस जिथे आहे; तिथून त्याला इश्वराभिमुख करण्याचं अतिशय वेगळं व दुर्मिळ कार्य त्यांनी केलं. आणि त्यामुळे पारंपारिक धर्म, पुजारी व सत्ता नेहमी त्यांची विरोधक राहिली.

ओशोंचे विचार सांगणं अतिशय अवघड आहे. कारण ते फक्त विचार नाहीत; त्यामध्ये 'निर्विचारता' सुद्धा आहे. ते सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवचनाची सुरुवात "मेरे प्रिय आत्मन्" ने करत आणि प्रवचन संपताना म्हणत "आपके भीतर बैठे परमात्मा को प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम स्वीकार करें.” लोकांनी स्वत:मधली भगवत्ता ओळखावी असं त्यांना अपेक्षित होतं. आणि १९७३ नंतर त्यांनी स्वत:ला भगवान असं म्हणण्यास सुरुवात केली होती. त्याचाही हेतु हाच होता की, सगळे जणच भगवानस्वरूप आहेत, फक्त ते मान्य करण्यासाठी हिंमत हवी. मी स्वत:ला भगवान म्हणतो आणि तुम्हांलाही स्वत:मधला ईश्वर बघण्यासाठी प्रेरित करतो, असं ते म्हणतात. त्यावेळी त्यांना शेकडो पत्र आली की तुम्ही कसले स्वयंघोषित भगवान, स्वत:ला भगवान कसे काय म्हणता इ. इ. त्यावर ओशोंनी म्हंटलं, 'जेव्हा मी तुम्हांला प्रणाम करायचो, तुमच्यातल्या ईश्वराचा उल्लेख करायचो, तेव्हा मला एकानेही 'का' असं विचारलं नाही. कारण ते तुमच्या अहंकाराला अनुकूल होतं. पण जेव्हा मी स्वत:चा उल्लेख भगवान असा केला, तेव्हाच मग मला तुम्ही का विचारलं? तेव्हा एकानेही प्रश्न केला नाही आणि आता इतके जण विचारत आहेत.' त्यांनी नंतर म्हंटलं आहे की, भगवान नसण्याचा पर्यायच नाहीय. जे काही आहे, ते सर्व भगवानस्वरूपच आहे. फक्त ते उघड्या डोळ्यांनी बघणं किंवा न बघणं, इतकाच फरक आहे.

ओशोंनी जी मांडणी केलेली आहे, ती अतिशय जोरदार आहे; युनिक आहे. फक्त वेगवेगळे धर्मपंथ आणि साधना मार्गच नाही; तर त्यांनी प्रचलित समाज; प्रोजेक्टेड ट्रूथ; देश-काळ ह्याविषयी जे काही भाष्य केलं आहे; ते अतिशय विलक्षण आहे. एका प्रवचनात ते म्हणतात की एक राजा होता. त्याचा मुलगा तरुण असताना एका वेळेस त्यांचं भांडण झालं आणि तो राजवाडा सोडून निघून गेला. तरुण राजकुमार घराबाहेर पडला. राजाने अनेक वेळा त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अनेक वर्षं गेली. खूप काळानंतर राजाच्या प्रधानाने एका भिका-याला राजवाड्यात येताना बघितलं. कफल्लक असलेला एक कंगाल भिकारी भीक मागण्यासाठी आशेने उभा होता. निरखून बघितल्यावर प्रधानाला कळालं की, अरे, हा तर तोच राजकुमार आहे! त्याने लगेच राजाला जाऊन सांगितलं. आपण राजकुमार होतो आणि इथलेच होतो, ह्याची त्याला काहीही शुद्ध नव्हती.

राजा अवाक् झाला. काय करावं त्याला सुचलं नाही. म्हणून त्याने प्रधानाचं विचारलं. प्रधान म्हणाला की, त्याला लगेच खरं ते सांगितलं तर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो पळून जाईल. म्हणून त्याला हळु हळु सांगूया. त्यानुसार पहिले प्रधानाचा एक सेवक त्या भिका-याला बोलवायला गेला. सेवकाला बघून तो पळूनच जाणार, तेवढ्यात सेवकाने त्याला सांगितलं की, राजा तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला इथे काम दिलं जाणार आहे. जरा घाबरतच तो भिकारी तिथे थांबला. मग आधी त्याला चांगले कपडे दिले; आंघोळ घालण्यात आली. मग त्याला जुजबी काम देण्यात आलं. काही काळाने त्याला थोडं मोठं काम दिलं गेलं. नंतर पुढे त्याला आणखी वरच्या दर्जाचं काम दिलं आणि शेवटी तो तिथे रुळल्यावर राजाने सांगितलं की, तो भिकारी नसून राजकुमार आहे; राज्याचा वारस आहे. आणि आता मात्र त्याला ते लगेच पटल, समजलं.

ओशो म्हणतात की, अगदी तीच परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. आपण आहोत तर ईश्वरमय; आपण ईश्वराचे अंश आहोत, पण स्वत:ला कफल्लक मानतो. जर लक्षात आलं तर एका क्षणात उमगू शकतो. पण आपला स्वत:वरच विश्वास नाही; स्वत:वरच श्रद्धा नाही. मी आणि ईश्वराचा अंश? शक्यच नाही, कारण मी तर. . . ओशो म्हणतात म्हणून मी तुम्हांला ध्यानाच्या विधी देतो, साधना देतो. त्यातून हळु हळु तुमचा विश्वास वाढतो; स्वत:वर तुमची श्रद्धा उत्पन्न होते. मग तुमच्यामध्ये ही वस्तुस्थिती बघण्याची समज येते; हिंमत येते. पण मला विचाराल तर तुम्ही आत्ताही भगवानस्वरूपच आहात, दुसरे होऊही शकत नाही. . .

प्रसिद्ध विचारवंत शिवाजीराव भोसले ह्यांनी म्हंटलं होतं की, केवळ 'संभोग से समाधी की ओर' ह्या प्रवचनांसाठी ओशो नोबेल पारितोषिक मिळवण्यास पात्र आहेत. मोहम्मद, कृष्ण, जीसस, भगवान बुद्ध, कबीर, महावीर, लाओ त्सू, मीराबाई, सहजो अशा असंख्य ज्ञानी पुरुषांविषयी व स्त्रियांविषयी ओशोंनी अतिशय सुंदर भाषेमध्ये निरूपण केलेलं आहे. भारतामध्ये त्यांनी नव संन्यास आंदोलन सुरू केलं. यशवंत देव, कवयित्री शिरीष पै असे मराठी दिग्गज आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले विजय आनंद, विनोद खन्ना असे स्टार्स त्यांचे शिष्य बनले. त्यांचा संन्यास हा जगापासून पलायन करणारा संन्यास नव्हता तर जगामध्ये- बाजारामध्ये राहून जागरूक होण्याचा मार्ग होता. विनोद खन्ना ह्याला संन्यास देतांना ओशोंनी सूत्र दिलं- तू अभियन असा कर की जणू अभिनय हे वास्तविक जीवन आहे. आणि वास्तविक जीवनात जगताना तू असं जग की तो जणू अभिनय आहे. कुठेच आसक्त न होता डोळसपणे जगण्याचा हा मंत्र! पुढे विनोद खन्ना अर्थात् स्वामी विनोद भारती ह्यांनी ओशोंच्या अमेरिकेतल्या रजनीशपुरममधल्या कम्युनमध्ये काही वर्षं बागकाम केलं! जगभरातून मानसशास्त्रज्ञ, बुद्धीजिवी, डॉक्टर्स, शिक्षणतज्ज्ञ, त्यांच्या पुण्यातल्या आश्रमात आणि नंतर पाच वर्षे अमेरिकेतल्या आश्रमात एकत्र आले.

संत गोरा कुंभार ह्यांनी म्हंटलं आहे की, गुरू हा घड्याला आकार देणा-या कुंभाराप्रमाणे असतो. बाहेरून तो घड्यामध्ये असलेले दोष दूर करतो; त्यातल्या कमतरता बाहेर काढतो आणि आतमध्ये हात ठेवून तो घड्याला आधार देतो. अगदी तसेच गुरूही एका बाजूने शिष्यातले दोष, आणि वरवरचे लेप बाजूला काढतात आणि एका बाजूने त्याला धीर देतात; त्याला आधारही देतात. आणि ह्याचीच प्रचिती ओशोंना ऐकताना येते. एका बाजूला त्यांचा प्रेमळ स्वर वेगळ्याच सफरीवर आपल्याला नेतो आणि त्याच वेळी मनातल्या असंख्य जळमटांना साफ करतो... ओशोंची अतिशय रसाळ प्रवचनं इंटरनेटवर आणि पुस्तक रुपाने उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा. ओशोंनी एका ठिकाणी म्हंटलं आहे की, मला तुम्ही गुरूही मानू नका आणि मित्रही मानू नका. तुम्ही रस्त्यावर जाताना तुम्हांला भेटणारा एक अनोळखी वाटाड्या समजा. मित्र जरी मानलं तरी माझ्याप्रती आसक्त व्हाल. मला एक अनोळखी वाटाड्या मानून माझ्यामध्ये अडकून न पडता तुम्ही मी दाखवतोय त्या मार्गाने फक्त जा...

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्व लेख...
आवडला...
तुमचे बाकीचे लेख पण नक्की वाचणार...

खूप सुंदर लिहिलंय. ओशो हयात असताना त्यांच्याबद्दल केवळ नकारार्थी लेखन वाचलेले. काही वर्षांपूर्वी ओशोंच्या एका निओ संन्यास घेतलेल्या मराठी लेखकाचे ओशोंवरचे पुस्तक वाचून कुतूहल जागृत झाले आणि मी ओशोंचे साहित्य वाचायला सुरुवात केली. खूप छान वाटते वाचायला. खरे तर त्यांचे विचार आचरणात आणा असे म्हणायची गरज नाही कारण ते काय म्हणताहेत हे समजावून घेतले की आपल्याला नवी दृष्टी प्राप्त होते. त्यांचे विचार आपले विचार होतात.

अजूनही काही लिहिलं असेल तर वाचायला आवडेल.

चांगला लेख. शाळा कोलेजात प्रचंड ओशो वाचलेले. आवडायचेहीं . नंतर मात्र तोच तोच पणा जाणवला. बहुदा खूप वाचून असेल - अर्थहीन वाटू लागलं. अनेक वर्षात काही वाचलं नाही त्यांचं. पुन्हा ट्राय करायला पाहिजे.
अर्थात - लेखनाबद्दल हे मत असलं तरी त्या माणसाबद्दल अफाट आदर आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीचा अभूतपूर्व संगम!

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Happy

@ साधनाजी, मी इथे अजून सविस्तर लिहिलं आहे: http://niranjan-vichar.blogspot.in/2016/10/blog-post_24.html आणि वाचलं नसल्यास हेसुद्धा वाचू शकता: एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई!" धन्यवाद!