ती सध्या काय करते - मराठी चित्रपट परीक्षण

Submitted by समीरपाठक on 13 January, 2017 - 10:35

प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण clarity कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्की. प्रथितयश मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियत. खरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा. बरे तुमच्याजवळ संवेदनशील मन नसले तरी, तुमच्या मनात अलगद शिरून तुम्हाला भूतकाळात जाण्यास बाध्य करणारा हा विषय. त्यामुळे सगळेच अप्रतिम जुळून आलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात स्थान न मिळवले तरच नवल!!

अनुराग आणि तन्वी हे मित्र अन मैत्रीण. या दोघांची लहानपण-तारुण्य अन प्रौढपण यांची कहाणी म्हणजे 'ती सध्या काय करते' !! या कहाणीत अनुरागचे लहानपण, तारुण्य अन प्रौढपण यातल्या विविध कला दिग्दर्शकाने कौतुकास्पदरित्या टिपलेल्या आहेत. लहानगा अनुराग, तारुण्यातला अनुराग अन जरासा मोठा झाल्यावर mature झालेला अनुराग यांच्यातील फरक हा रसिकांना पटणे हे या कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यास आवश्यक होते, कितीही चांगला विषय असला अन या आघाडीवर अपयश असतं तर कपाळमोक्ष (तिकीटबारीवर) नक्की होता. हा फरक प्रेक्षकांनी विश्वास ठेवण्यालायक जुळून आलेला आहे.

अनुरागचे आणि तन्वीचे लहानपण हा या कहाणीच्या पाया बनविण्यासाठी आवश्यक घटक होता. हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी अक्षरश: अप्रतिमरीत्या हे लहानपण उभे केलेले आहे. मध्यमवर्गीय अन अपेक्षांना बासनात न बांधणारे लहानपण जे सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते.सकारात्मक तर असते पण या सकारात्मकतेतही practicality ची कास न सोडणारे लहानपण. या अभिनेता वा अभिनेत्रीने दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जरा चुकविले असत तर जो पाया कहाणीच्या मजबुतीसाठी आवश्यक होता तो ठिसूळ राहिला असता अन.......

वास्तविक बघता 'ती' च्या बद्दल हळवे असणारे कोणतेही 'त्या'चे मन ज्या वयात तिला बघते ते वय म्हणजे तारुण्य आणि म्हणूनच कदाचित पण या कहाणीत सगळ्यात नजाकतदार अन अन साकारण्यास कठीण हि भूमिका अभिनयची होती. अभिनयात नावाप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी तो उजवा असल्याचे भासवून देतो प्रेक्षकांना. बरेच प्रसंग असे होते उदा. त्याचा कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या फेयरवेलला तन्वीसोबतचे शेवटचे भांडण असे कि त्यात तो जर पुरला नसता तर दिग्दर्शकाला अपयशी हा शिक्का मिळवून देण्यात मुख्य हिस्सा त्याचा असता. पण तसे तर घडले नाहीच उलट मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्कृष्ट अभिनेत्याने आपल्या आगमनाची चुणूक दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की.

त्याच्या भूमिकेप्रमाणेच तिची भूमिकाही इथे महत्वाची होती. ती सध्या काय करते (?/!) हा प्रश्नच मुळात एखाद्या त्याला पडेल जेंव्हा एखाद्या त्याला एखाद्या तिच्याबद्दल काहीतरी माहित असेल. ती एक मैत्रीण जी 'वीट' येण्याइतकी सवयीची. जिच्या असण्याची इतकी सवय एखाद्या त्याला व्हावी कि तिच्या नसण्याने तो जिवंतपणी नेस्तनाबूत व्हावा. आर्या आंबेकर ने अपेक्षेबाहेर उत्कृष्टरित्या हि भूमिका निभावलेली आहे हे नक्की. तिचे सौंदर्य हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचे प्रतीक म्हणून इतके व्यवस्थितरीत्या शोभून गेलेले आहे कि कदाचित म्हणूनच बघणारा प्रत्येक 'तो' त्याच्या 'ती'ला शोधतो यात अन बघणारी प्रत्येक 'ती' आरसा. 'ती सध्या काय करते (?/!)' या शीर्षकातील ती म्हणजेच तरुणपणची. आणि म्हणूनच या चित्रपटाची खरी नायिका.

सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणजेच आमचा 'दुनियादारीतला दिग्या' अन येथे प्रौढ अनुराग देशपांडे बनलेला आहे. प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यानंतर उन्मळून पडलेला पण नंतर स्वतःच स्वतःला सावरून कालांतराने एक यशस्वी व्यक्ती बनलेला 'तो'. प्रौढ तन्वी आहे तेजश्री प्रधान. ती हि तिच्या आयुष्यात मश्गुल पण त्याच्याशी सामना होताच ती हि थोडीशी अडखळते. अगदी क्षुल्लक भूमिका दोन्ही अप्रतिमरीत्या निभावल्यात दोघांनीही.

सतीश राजवाडेंचे दिग्दर्शन हे 'ती सध्या काय करते' (?/!) चे मुख्य यश. सतीश राजवाडे म्हणजे 'प्रेमकथांना अप्रतिमरीत्या हाताळणारा व्यक्ती' अशी एक प्रेक्षकांची मानसिकता मुंबई-पुणे-मुंबई (१/२) अन 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या दोन मुख्य यशानंतर त्यांनी अन झीने मराठी प्रेक्षकांची बनवून ठेवलेली आहे. पण या मानसिकतेत 'फक्त स्वप्नील जोशी बरोबर' या शब्दांना वगळण्यास प्रेक्षकांना बाध्य करण्यात राजवाडे यशस्वी होतात हे नक्की. वेवेगळ्या वयातल्या प्रेमकथांना हाताळताना एकाचवेळेस (म्हणजे एकाच तीन तासांच्या कथेत/पडद्यावर) फक्त भाव-भावनांना महत्व देऊन मराठी प्रेक्षकांना पचेल इतपत संयमितरित्या हाताळणे हे नक्कीच कठीण होते. मुळात तीनही वयातल्या या प्रेमकथांना हाताळताना त्या-त्या वयाप्रमाणे त्यांच्या भावनांना 'manipulate ' करणे हेच जोखमीचे होते. हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलल्याबद्दल सतीश राजवाडेंचे कौतुक.

"ती" हा प्रत्येक "त्या"च्यासाठीचा नाजूक विषय. अगणित "त्या"च्यासाठी भळभळणारा अन काही मोजक्या “त्या”च्यासाठी आयुष्याचे सार बनलेला. अश्या या विचित्र गोष्टीत म्हणजे कश्या तर एका 'त्या'ला महत्व दिले तर दुसरा 'तो' नाराज व्हायचा अन तिच्यासाठी व्हायसेव्हर्सा. तर असल्या या नाजूक विषयावर लेखक सतीश राजवाडे अन पटकथा लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे विशेष कौतुक कारण आपापल्या भूमिकांना दोघेही यशवीपणे पुरेपूर निभावतात.

मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाऊसफुल होता.
संपादनात / दिग्दर्शनात काही किरकोळ मुद्दे कच्चे राहिले आहेत.
पण छान आहे. नक्की बघा.

मी पण पाहिला! ओके आहे नॉट दॅट ग्रेट! आर्या आबेकर आणी अन्कुश मस्त , बाकिचे ठीकठाक , लहानपणीचे प्रेम वैगरे फन्डा नाही पटला, तेजश्रिला एवढा डस्की मेकप का केलाय? तिचा आणी उर्मिलाचा लुक आजारी किवा कन्टाळलेला वाटला, उर्मिलात काही जाण आहे की नाही अस वाटत.
तेजश्रीने काही काही हाय आनी लो पॉइन्ट दाखवलेत पण शेवटचा सीन मधल हसण वैगरे फार क्रुत्रिम!
अन्कुश आणी आर्या मात्र एक्दम फ्रेश , गाणी गोडमिट्ट ! शेवटचा सिन मात्र मस्ट वॉच आहे.

मी पण पाहिला! चांगला वाटला.
तेजश्री खरंच आजारी वाटतेय. उर्मिला पण एकदम मलुल. मेकप्मुळे असेल पण तेजश्रीच्या आयब्रोज अगदी पेन्सिलीने रेखाव्यात इतक्या बारीक केल्यात. त्यामुळे ती अजुनच आजारी दिसतेय.
उर्मिलाला अ‍ॅक्टींगला जास्त स्कोप नाहीये. पण तेजश्रीने ती जेव्हा अन्याच्या घरी जाते आणि त्याच्या मुलीच नाव तन्वी आहे हे सांगतात त्यावेळचा अभिनय मस्त केलाय. पण हसणं जान्हवीचंच. कृत्रिम.
अभिनय बेर्डे छान फ्रेश वाटला. त्याचा भाउ पण मस्त. आर्या पण छान वाटलीये.
आणि... अंकुश तर काय आपलाच आहे. आवडलाच नेहमीप्रमाणे. Happy

शेवटचे २ प्रतिसाद (ताजे ताजे वाचले असल्याने) +१
त्यात अशीही बनवा बनवी नंतर पाहिल्याने मला अधे मधे बोअर झालं पण तसा चांगलाय

पाहिला. छान आहे. आवडला.
आर्या मस्त. अभिनय पण छान.
गाणी नसती तरी चालले असते.
शेवट तर सुंदरच.

चांगला आहे सिनेमा, हलका-फुलका. वन-साईडेड किंवा अव्यक्त प्रेमवीराची घालमेल, पुढचा प्रवास वगैरे मस्त दाखवला आहे. काहि सीन्स तर अफलातुन आहेत - एस्पेशीयली तो ज्यात तन्वी अन्याला सांगते कि शैलेशनेच तीला सर्वप्रथम लग्नासाठी विचारलं, त्याआधी कोणी विचारलं नाहि...

मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच
>>>>>

सिनेमा पाहिला ठिक ठाक वाटला...एवढा खास नाही भिडला... अ‍ॅव्हरेज आहे अस माझ मत...
नटसम्राटच्या यशाशी याची तुलना होणार नाही... आणि "सैराट" सारख्या ब्लॉकबस्टरशी तर नाहीच नाही....

परवा झी वर लागला तेव्हा बघितला.

कथाबीज छान होतं पण कास्टींग, अभिनय आणि एडीटींग जाम गंडलय..
१. लक्श्या च्या मुलाची ओव्हरॅक्टींग
२. आर्या चं कास्टींग पूर्ण गंडलय... कुठल्याच प्रसंगात कुठल्याही संवादात कुठेच बसत नाही. निव्वळ वेशभूषा बदलून पात्र 'फीट' होत नसतं ना राव.. त्यात आर्या ला अभिनयाचा काहीच गंध नाही. लहान मुलीचा आवाज आणि लहान मुलीची प्रतिमा ही त्या अख्या पात्राला मारक आहे. आर्या ही ऊत्तम गायिका आहे... तीने त्यात करीयर केलं तर सर्वांच्याच भल्याचं होईल. (अलिकडे लंडन मराठी संमेलनात भेटली होती... पडद्यामागील ओळख असल्याने ती खरेच अत्त्यंत गुणी गायिका आहे हे निश्चीत सांगता येते. पण बाकी ईतर झेपले नाही...)
३. अंकुश चौधरी अक्षरशः वाया गेलाय या भूमिकेत... गोंधळेलेलं पात्र दाखवताना त्याचं हरवलेलं पात्र झालंय..
४. तेजश्री प्रधान- मालिके मधील काहीही श्री.... या पलिकडे अभिनयाला विशेष वाव आणि गुण नाही... Happy
५. आणी एडीटींग ने तर ईतका रसभंग केला... (नशीब तरी रेमोट ने फॉर्वर्ड करून बघितला) भूतकाळ व वर्तमान यातील परिस्थिती व परसंग यातील पॅरलल दाखवायचे म्हणून किती तुकडे करायचे...? शेवटचा गच्चीवरील दोघांचा एक सलग सीन सोडता बाकी सर्व चित्रपटात भयानक काळाच्या ऊद्या घेतल्या आहेत... वर्स्ट एडीटींग आजवर पाहिलेले.

गाणी छान वाटली... पण पुन्हा एकदा पोक्त वयातील नायिकेला आर्या चा आवाज अजून तरी सूट होत नाहीये...

असो.
एखाद्या चित्रपटा बद्दल मिडीया मधेय रोज चर्चा... मार्केटींग.. आणि रकाने भरून लेख आले की त्या बद्दल ऊत्सुकता वाढते.
(सैराट अजूनही पूर्ण बघितलेला नाही... अर्धा बघितल्यावर पुढचा बघावासा वाटला नाही...).

मी पण टिव्हिवरच पाहिला. बरा वाटला. आर्या, अंकुश, सुकन्या आवडले. हृदित्य राजवाडे सर्वात जास्त आवडला.
गाणी पण सगळी सुरेख आहेत, खूपच आवडली.
फक्त चित्रपट पाहताना सारखं फ्लॅशबॅक आणि प्रेझेंट यांची सांगड घालताना पळापळ झाली खूप.
शेवटचा सिन खासच आहे अगदी. तेजश्री ऐवजी मुक्ता बर्वे किंवा प्रिया बापट हवी होती असं प्रकर्षाने वाटले. मुक्ताने तो प्रसंग अजून खास बनवला असता हे नक्की.
तेजश्री ला अजून अभिनय शिकण्याची गरज आहे असे वाटते, वावरण्यात अजिबात सहजपणा नाही.
अंकुश तेजश्री ला भेटण्यापूर्वी जो लाल टि शर्ट हॅशटॅग या दुकानातून घेतो ते दुकान आमच्या शेजारच्या सोसायटीत आहे, तेव्हा भलती गर्दी झाली होती... पण मला नव्हते माहित त्याचे शूटिंग सुरू होते.

(सैराट अजूनही पूर्ण बघितलेला नाही... अर्धा बघितल्यावर पुढचा बघावासा वाटला नाही...).
>>>>
चुकून पार्ट टू (ईटरवल नंतरचा) आधी नाही ना पाहिला Happy
तो भाग बोर होऊ शकतो...

मला आवडला चित्रपट, ओघवता आहे. परवा टीव्हीवर बघितला. अंकुश बेस्ट एकदम अभिनय आणि दिसणं दोन्ही. तेजश्री जानुबाई असताना अजिबात आवडली नव्हती, आत्ता काही ठिकाणी बरी वाटली. आर्या मध्ये मध्ये गोड दिसते. अभिनय पण काही ठिकाणी आवडला. लहान असतानाची तन्वी जास्त आवडली आणि उर्मिला कानेटकर खूप आवडली, एकदम सहज वावर, काम कमी तरी.

मुक्ता बर्वेबद्दल दक्षिला अनुमोदन.

सध्या तरी मुक्ता बर्वे ला पर्याय नाही(च)...
स्मिता पाटील नंतर तितक्याच क्षमतेची व प्रतिभेची अभिनेत्री.

>>सैराट तुम्ही अर्ध पाहून पुढचा बघावा वाटलं नाही तुम्हाला ??? किती अरसिकता
वयाचा परिणाम... दुसरे काय. Happy

आवडला चित्रपट. शेवटचा सीन पण.
अनुराग पार्टी मधे तन्वी वर उचकतो 'तू मला इतकी का ओळखतेस म्हणुन' तो सीन बेर्डे आणि आर्या दोघांना जमला नाही असं वाटलं.
बेर्डे तेव्हडा वैतागलेला वाट्ला नाही आणि आर्या चं रडण ही खोटं. वरवरच वाटलं सगळं.

अनुराग पार्टी मधे तन्वी वर उचकतो 'तू मला इतकी का ओळखतेस म्हणुन' तो सीन बेर्डे आणि आर्या दोघांना जमला नाही असं वाटलं. >>> +१

मला तर, कॉलेज हल्लीच जॉइन केलेली मुलं दारु पितात, गच्चीवर, कॉलेजच्या गॅदरींग, अ‍ॅनुअल डे मधे पण पितात हेच शॉकिंग वाटलं

मला तर, कॉलेज हल्लीच जॉइन केलेली मुलं दारु पितात, गच्चीवर, कॉलेजच्या गॅदरींग, अ‍ॅनुअल डे मधे पण पितात हेच शॉकिंग वाटलं
>>>
का?

अभिनय बेर्डेच्या नावातच फक्त अभिनय आहे.

जेव्हा ते रेस्तरॉ मधे भेटतात तेव्हाचा तेजश्रीचा अभिनय आवडला. शेवटच्या सीनमधे मात्र ती खूपच तोकडी पडली. तिथे मुक्ताच हवी असं प्रकर्षाने जाणवलं.

Pages