"विश्वनाट्य सूत्रधार"

Submitted by अमेय२८०८०७ on 12 January, 2017 - 13:31

एका मित्राच्या फेसबुकवरील थंडी व नाट्यगीतांच्या पोस्टमुळे काही रम्य स्मृती जागृत झाल्या.

बाबांना नाट्यगीतांचे फार वेड. त्यांच्यामुळे टू इन वन वर वसंतराव, अभिषेकीबुवा, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, अजित कडकडे इत्यादी मंडळी नेहमी आ वासून कार्यमग्न असायची. कुचभल्ली वक्षाला...वगैरेचा तंतोतंत अर्थ उमगला नाही तरी हे काहीतरी चावटपणाकडे झुकणारे प्रकरण आहे इतपत समज आली होतीच.

या सर्वात मौजेचे वाटायचे ते राम मराठे. आहाहा हा हा हा....हा हा हा टाईपच्या त्यांच्या ताना ऐकल्या की मला कधीमधी घरी जेवायला येणारे मुंडले म्हणून गृहस्थ आठवायचे. आईच्या हातचा उत्तम कढी भात किंवा कुळीथ पिठले ओरपताना त्यांच्याकरवीही आनंदविभोर झाल्याने अशा दाणेदार ताना निघत असत त्यामुळे राम मराठे रेकॉर्डिंग करताना कढीभात खाऊनच येतात अशी आपली माझी बाळबोध समजूत होती.

विश्वनाट्य सूत्रधार हे माझे फेवरीट गीत होते. संपूर्ण गाणे कसे रसरशीत आणि जिवंत वाटे. पहिल्या तानेपासूनच हृदयात कल्लोळ सुरू होई आणि गाणे संपू नये असे वाटे. ते गाणे मूळबरहुकूम म्हणता यावे ही माझी अभिलाषा होती. अर्थात बाबांचा गाता गाळा माझ्यात इतकुसाही न आल्याने जनुकीय शक्ती माझ्या विरोधात होत्या पण असल्या किरकोळ गोष्टींनी मी दबून जाण्यातला नव्हतो.

जळीस्थळी मी तालीम आरंभली. याचे अनेक दृश्य अदृश्य परिणाम झाले. उदा. शाळेत मी मुक्तकंठाने गात जाताना मला 'ऐकून' घरी कामाला येणाऱ्या गुरवीण बाईंनी, "झिलाक साळेत जाऊच्या टायमास मारू नका, बिचारो रडत जाई होतो", असे आईला सुनावले. एकदा दुपारी घरी असताना मी संगीतसेवा आरंभली तर शेजारचे चिलेमास्तर आग लागल्यासारखे वामकुक्षी सोडून आले. त्यांनी दुपारची झोप सोडणे म्हणजे कुंभकर्णाने रात्रपाळी मागून घेण्यासारखे होते, यावरून माझ्या बाळगळ्याची ताकद लक्षात यावी.

कलाकार निर्मितीबद्दल असमाधानी असतो त्याप्रमाणे मीही होतो. हजारवेळा गाऊनही या गाण्याचा आत्मा गवसत नव्हता. मुंडलेकाकांना कॉम्प्लेक्स येईल इतका कढीभात उडवूनही अजून सूर का काय तो दिसला नव्हता. नाईलाजाने 'मृगनयना रसिक मोहिनी'ची आराधना सुरू करावी असा विचार असताना एकदम चमत्कार झाला.

उन्हाळ्याचे दिवस होते, दिवसभर डोंगरात, आमराईत मनसोक्त हुंदडावे आणि संध्याकाळी जेवणाआधी गार पाण्याने यथेच्छ आंघोळ करावी असा रिवाज होता. असाच एक दिवस पहिला टोप मी डोक्यावरून घेतला आणि आपसूक तान निघाली, अगदी राम मराठ्यांसारखेच गळ्यातून "आ हा हा हा हा, हा हा हा". झाले, सुतळीचा बिंडा सुटावा त्याप्रमाणे पुढचे गाणे पद्धतशीर येऊ लागले. पाण्याची मात्रा कमी जास्त करून मी तंत्रही आपलेसे करून घेतले. पुढच्या काही दिवसांत मोरीऐवजी मागे उघड्यावर आंघोळ केली तर गार वाऱ्यामुळे काही जागा अधिक सफाईने घेता येतात याचाही शोध लागला आणि गाणे घटवून गिरवून टाकले.

आजही तुम्ही कधी आमच्या गावी गेलात आणि विश्वनाट्य सूत्रधार गायलेत, तर आमचे शेजारी जुन्या स्मृती जागृत झाल्याने तुमच्या दिशेने एखादे जळते लाकूड, दगड, नारळाचे सोढण किंवा शेणीचा तुकडा भिरकावणारच नाहीत, याची खात्री नाही. माझ्याकडे येऊन तक्रार केलीत तर उत्कृष्ट कलेचा ठसा सहजी पुसला जाऊ शकत नाही, इतकेच मी तुम्हाला सांगेन.

तर संगीतविशारद बनण्याची थोडक्यात कृती अशी आहे:-

स्थळकाळ परवानगी देईल इतपत वस्त्रे उतरवावीत.
दीर्घ श्वास घेऊन गारेगार पाण्याचा तांब्या थेट डोक्यावर ओतावा:

इथे पहिल्या ताना आपसूक येतील. जोम कमी पडतोय असे वाटले तर एखादा तांब्या वाढवावा

विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा ।
(तांब्या क्र 3,4)
चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा ॥
(तांब्या क्र 5,6 थोडेसे थयथया नाचले तर प्रभाव वाढतो)

सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमिरी ।
(इथे लाक्षणिक जोरापेक्षा श्वासाची परीक्षा आहे, त्यामुळे भाता भरून घ्यावा)
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा ॥
(इथे तांब्या क्र 7 आणि साबणाचा पहिला हप्ता घ्यायला हरकत नाही, साजिरा वर येणारा झटका मान चोळण्यासाठी सोयीचा असेल, फक्त शेवटच्या तानेआधी योग्य हुडहुडी भरून घ्यावी)

मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास ।
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा ॥
(या कडव्यांत पहिल्या कडव्याप्रमाणेच योग्य टायमिंगला तांब्ये ओतून घ्यायचे आहेत, सवयीने अधिक सफाई येईल)

कुंचला न तव करांत, तरीही तूच रंगनाथ ।
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा ॥
(इथे भसाभस तांब्ये लागतील त्यामुळे हात, तांब्या, श्वास आणि पाणी यांचे गणित साधणे महत्त्वाचे)
(यानंतर बाकी साबण वगैरे लावून प्रसन्नपणे आंघोळ पूर्ण करावी. शेवटचा खटका आणि लाष्टचा तांब्या यांची सम जुळली की ट्रेनिंग पूर्ण झाले समजायला हरकत नाही)

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशक्य लिहिलंय Rofl
कढी भात, उत्कृष्ट कलेचा ठसा सहजी पुसला जाऊ शकत नाही, आणि शेवटचं हात, तांब्या, श्वास आणि पाणी यांच्या गणिताची उकल. Lol
मस्त.

Lol कहर लिहीले आहे. चुकून खाताना वाचले. लिटरली दाणेदार ताना निघाल्या असत्या.

इत्यादी मंडळी नेहमी आ वासून कार्यमग्न असायची >>>
नाईलाजाने 'मृगनयना रसिक मोहिनी'ची आराधना सुरू करावी >>>
स्थळकाळ परवानगी देईल इतपत वस्त्रे उतरवावीत. >>>
इथे पहिल्या ताना आपसूक येतील. >>> Lol इथे अनेकदा ठसका लागला.

आधी मला वाटले गाण्याचा परिचय आहे. या गाण्याची शब्दरचना आवडत असल्याने आधी गाण्याचेच वर्णन वाचले. तेथे तांब्या बघून चक्रावलो. वाटले की जुन्या बखरी, इतिहासांत 'रूमाल' असतो तसा जुन्या गाण्यांच्या अशा वर्णनांत "तांब्या" असतो की काय :). मग पूर्ण लेख वाचला.

धमाल आहे लेख Happy

नेहेमीप्रमाणेच जबरदस्त अमेयराव Happy तुम्ही विनोदी फार कमी लिहिता ही तक्रार आहेच. मजा आ गया Happy

या कडव्यांत पहिल्या कडव्याप्रमाणेच योग्य टायमिंगला तांब्ये ओतून घ्यायचे आहेत, Rofl

धमाल लेख आहे. शीर्षक वाचून काहीतरी जडशीळ असेल असे वाटल्याने टाळत होते. मजा आली.
(या लेखात अनेक संभाव्य आयडींची नावे दडलेली आहे असे वाटले )

>>>>"झिलाक साळेत जाऊच्या टायमास मारू नका, बिचारो रडत जाई होतो",

फारच खोखो झाले या वाक्याला.
खूप आवडले लेखन. एकदम कसदार!!

काय रेसिपी लिहिलीये, अफलातून! Lol
अप्रतिम नाट्यगीत आणि स्मरणरंजन Happy
सुतळीचं सुटलेलं बिंडुळ आणि विश्वनाट्यकडून मृगनयनाकडे होऊ घातलेली वाटचाल वगैरे वाचून मुरकुंडी वळली.

खूप वर्षांपूर्वी माबोच्या लॉजिकल मराठी अंताक्षरीत मिलिंदानं एकदा 'सुई दोरा' क्लू दिला होता ते आठवलं Happy

धमाल लेख आहे. Lol

विश्वनाट्य सूत्रधार गायलेत>> मला ऐकु आलेली चुकीची गाणीमधे माझी एंट्री आज. मला हे विश्वनाथ सुकुमार ऐकायला येत होते आज्पर्यंत. Proud

>>>विश्वनाथ सुकुमार
सेम!! मला हे गाणं माहितीये हे मला आज माहिती झालं हा लेख वाचून.
मला ते विश्वनाथ सुप्रभात असं वाटायचं!!

आहाहा हा हा हा!! जबरदस्त..
आता विश्वनाट्य सूत्रधार ऐकताना हसणे कंट्रोल होणार नाही Happy

भारी लिहिलेय Lol

आपल्या लेखातील मराठीचे शब्द अफाट असतात. उच्च प्रतीचे मराठी भाषा ज्ञान जाणवते. माझ्यासारख्या उथळ मराठी वाचकांना सावकाश समजून एकेक वाक्य वाचावे लागते Happy

<<<<<झिलाक साळेत जाऊच्या टायमास मारू नका, बिचारो रडत जाई होतो>>>>> Rofl
"सप्तसूर झंकारीत बोले" हे गाणं थंडीत गार पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला येऊ शकते Lol

अमेय _/\_
या गीतावर कोणी असे काही खुमासदार लिहू शकेल हे त्या गीतनिर्मात्यांना कधी स्वप्नातही वाटले नसेल. Happy
फारच भारी लिहिले आहे. माझ्यादेखील आवडत्या नाट्यगीतांपैकी हे एक आहे.
वर कोणी उल्लेख केलेले "सप्तसूर झंकारीत बोले" यावर पण एक होऊन जाउद्या लेख.

Pages