टाळ्याटाळ

Submitted by झंप्या दामले on 10 January, 2017 - 14:28

परवा माझ्या ऑफिसमध्ये नाम फाऊंडेशनच्या कामाची माहिती देण्यासाठी आणि मदतीचे आवाहन करण्यासाठी खुद्द नाना आणि मकरंद आले होते. नानाने अपेक्षेप्रमाणेच 'माहौल' केला हे वेगळं सांगायला नकोच. त्याने (नेहमीप्रमाणेच) अनौपचारिक संवाद साधत मैफल रंगवत नेली. हिंदी/मराठी दोन्हीत बोलता बोलता सहज येणारे गुलजारचे शेर, नटसम्राटमधले स्वगत, 'थोडासा रूमानी हो जाए' मधले बारिशकरचे काव्यमय संवाद.... आणि बरंच काही. नाना बोलत असतो तेव्हा ऐकतच राहावंसं वाटतं. शब्द हात जोडून उभे असतात त्याच्यासमोर. सिंधुताई सपकाळ यांच्या बोलण्याचीच आठवण करून देणारं.... तसंच ओघवतं, अनुभवातून आलेलं.... सगळे जण भारून गेले होते ऐकता ऐकता. 'नाम'ची माहिती अमराठी लोकांना माहिती नव्हती, तेही प्रभावित झाले होते. बोलताना नानाच्या कोपरखळ्या, त्याची स्वतःची कविता, त्याने मक्याची केलेली नक्कल या सर्वांना उपस्थित मंडळी उत्स्फूर्तपणे कडाडून टाळ्या वाजवत होतीे. त्याचं बोलून झाल्यावर प्रश्नोत्तरे सुरू झाली. प्रेक्षकांमधल्या भारावलेल्या एकाने 'I Salute you, मी सर्वांना विनंती करतो की एकदा नाना सरांसाठी एकदा आपण सर्वजण टाळ्या वाजवू या'. नाना फट्कन त्याच्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, "मी नेहमी म्हणतो, टाळ्यांची भीक नका रे मागू अशी".

नानाच्या त्या एका वाक्याने खूप दिवस माझ्या डोक्यात याबद्दल काही घोळत असलेले काहीतरी पुन्हा ट्रिगर झाले, तेच आता मांडतोय

टाळ्या म्हणजे नुसती एक कृती नसून शरीराने म्हटलेलं 'वा !!' असतं. काहीतरी विलक्षण आवडून गेलं की खरं म्हणजे विजेच्या वेगाने दोन हात एकमेकांना उस्फूर्तपणे भिडतातच. मग त्यासाठी अर्ज-विनंत्या करायची सुरुवात का, कुठे आणि कशी झाली ? कुणी केली ? मला माहित नाही. पण माझ्या आठवणीत एका व्यक्तीने ही 'भीक' अत्यंत लोकप्रिय केली ती म्हणजे पल्लवी जोशी !
तिला गाणं आवडलं की तिने लोकांना सांगायचं टाळ्या वाजवा... असं वाटायचं की "असं का ? लोक एवढे माठ आहेत ?" पण लोक खरंच असायचे/असतात. कुणीतरी आवाहन केलं म्हणून टाळ्या पिटायचे /पिटतात.

आपल्याकडे नव्वदीनंतर टीव्हीने २ अत्यंत घाणेरडे प्रकार रूजवलेले आहेत. एक म्हणजे प्रेक्षकांच्या विनोदबुद्धीचा उपमर्द करणारे सिरियलमधले रेकॉर्डेड हशे - कुठे हसायचे ते सांगणारे (असला पोरकट प्रकार अत्र्यांच्या भाषणांच्या पुस्तकातही पाहिला आहे) आणि दुसरा म्हणजे ही टाळ्यांची मागणी - कुठे दाद द्यायची याचा आदेश देणारी.

एकतर मी अशा दोन गोष्टींशी संबंधित आहे जिथे टाळ्या हा प्रकार जवळपास अस्तित्वात नाही - त्या म्हणजे ज्ञानप्रबोधिनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मी लहानपणापासून या दोन्ही ठिकाणच्या व्याख्यान/भाषण/बौद्धिक या नंतर कधीही टाळ्या वाजवलेल्या नाहीयेत, त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर आहेच (आणि तेच मला दिवसेंदिवस योग्य वाटू लागले आहे !) तीथेच नाही तर एकूणच पंधराएक वर्षांपूर्वी पर्यंत कुठेच एवढा टाळ्यांचा सुकाळ असल्याचे स्मरत नाही.

हळूहळू हे फार वाढत गेलं. उत्स्फूर्तता नाही हे लक्षात येऊ लागलं. फारच यांत्रिक प्रकार व्हायला लागला. अध्यक्ष बोलला तरी टाळ्या, वक्ता बोलला तरी टाळ्या, सूत्रसंचालक बोलला तरी टाळ्या, एवढंच काय तर 'या कार्यक्रमासाठी सतरंज्या, खुर्च्या व तांब्याभांडे उपलब्ध करून दिल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर खंचनाळे यांचे आभार' वगैरेला सुद्धा टाळ्या कडकडू लागल्या.

अलीकडे कुठल्याही नाटकाला जा, दोन प्रवेशांमध्ल्या ब्लॅकआउटमध्ये कम्पल्सरी टाळ्या वाजतात. त्या प्रवेशमध्ये खरोखरच प्रभावी असे काही घडले असेल तर ते समजू शकतो पण रंगमंचावर अक्षरशः हूं का चू झालेले नसतानाही ब्लॅकआउटमधल्या टाळ्या मी ऐकलेल्या आहेत.

'चला हवा येऊद्या'ने तर सर्व विक्रम मोडीत काढायचे ठरवलेले दिसते आहे. प्रत्येक पाहुण्याच्या दर तिसऱ्या वाक्याला टाळ्या बडवायचा प्रघात यांनी पाडलाय. 'जिलेटने दाढी केल्यास अडथळे दूर होतील' असे प्रेक्षकांमधल्या एखाद्या पावट्याला सांगितल्यावरसुद्धा टाळ्या वाजवणे म्हणजे मेंढरेगिरीची हद्द आहे. हे पाहून मला तर 'बटाट्याची चाळ' मधल्या 'गच्चीसह झालीच पाहिजे'तल्या द्वारकानाथ गुप्तेच्या भाषणाची आठवण होते. गच्चीच्या मागणीसाठीच्या धडाकेबाज भाषणात कडाडून टाळ्या पडू लागतात "माझी Earned Leave चाळीसाठी खर्च करेन" (टाळ्या), चळवळीचे नेतृत्व आचार्य बाबा बर्व्यांनी स्वीकारले पाहिजे (टाळ्या), त्यांचा त्याग अलौकिक आहे (टाळ्या)" नंतर नंतर तर इतका कहर होतो की आधी टाळ्या आणि मग घोषणा असा उलटा प्रकार सुरू होतो. च ह ये द्या मध्ये तो दिवस फार दूर दिसत नाही. टाळ्या या उद्गारचिन्ह असायला हव्यात हे यांना कळत कसं नाही ? त्या स्वल्पविराम म्हणून वापरायला लागलेत हे लोक.

एकुणात सगळीकड्च्याच वाढीव टाळ्या म्हणजे एकूणच प्रचंड वाढीस लागलेला उथळपणा, दिखाऊपणा, appeasement याचेच प्रकटीकरण वाटायला लागल्या आहेत मला. हे ओढून ताणून आणले जाणारे गौरवीकरण सगळ्याच फॉर्मममध्ये आपल्याला दिसायला लागले आहे. रिऍलिटी शो मध्ये येताजाता कुर्निसात, सॅल्यूट, फेटे उडवणे, स्टँडिंग ovation, १०० रुपयांच्या नोटा ओवाळणे वगैरे खैरात करत सुटायची, परीक्षेमध्ये सगळ्यांनाच ९०% च्या वरची खिरापत वाटून खुश करायचं. नाणे खणखणीत आहे की नाही हे दाखवण्यापेक्षा किती चकचकीत आहे त्याचे प्रदर्शन व्हायला पाहिजे !! पूर्वी रेशनिंगमुळे जीवनावश्यक वस्तू फार काटकसरीने वापरायला लागायच्या. जसजसं सगळं कोपऱ्यावरच्या दुकानात सुद्धा सहज आणि मुबलक मिळत गेलं तसतशी काटकसर संपली आणि उधळपट्टी वाढत गेली. ही दाद टाळ्यांची सूज म्हणजे असाच प्रकार आहे. मी सवाई गंधर्व महोत्सवात कधी गेलेलो नाहीये पण मला खात्री आहे तिथेही हा अस्थानी टाळ्या कुटण्याचा प्रकार नक्की सुरू झालेला असणार आहे. 'सूर आम्ही चोरतो का दाद का हो चोरता' असे आरती प्रभू म्हणून गेलेत. आता ते अवतरले तर 'दाद नको पण टाळ्या आवर' म्हणतील अशी भीती वाटते.

दाद देण्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट काहीतरी विलक्षण आवडलं/भिडलं तर उत्स्फूर्तपणे ज्या काही टाळ्या दुमदुमतात त्यांना रोखण्याची कुणाच्याही बापाची हिम्मत होऊ शकत नाही. पण हे असं निरर्थक टाळ्या वाजवणं खरंच एवढं गरजेचं किंवा अपरिहार्य आहे ?

माझी ही टाळ्याटाळ पटते आहे का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलयं...
सद्ध्या या सगळ्या रिअ‍ॅलिटी शोज, स्पर्धा अन जोडीला कॉमेडी एक्स्प्रेस, कपिल शर्मा वगैरे शोज ने वात आणलाय..
अर्ध्यावेळ तर समोरचा नेमक काय बोलतोय हे पन ऐकू येत नाही..
फडतूस अन् पिटलेल्या फालतू पीजेवर टाल्या काय वाजवतात हे लोक...शी..
अन् ते शाळ टोपी सत्कार म्हणजे बकवास झालयं सगळं.. असो हे सारं पाहायच सोडून दिलय कधीच..पण चुकुन काही बघायला तूनळीवर गेल तर तिथे पण ओरिजनल रेकॉर्ड्स कमी अन् हे उगाच्च हसणे, टाळ्या अन् शिट्टीवाले रेकॉर्डींग बघायला मिळतात तेव्हा त्रागा होतो..

मस्त लिहीले आहे! :). टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधे हे फार डोक्यात जाते. फिलर म्हणून सुद्धा टाळ्या वाजवत असतील. ते उठसूठ इतरांच्या पाया पडणे ही तितकेच डोक्यात जाते.

छान लिहिलंय. अगदी अगदी पटलं.
ते लाफ्टर भरलेलें असतात ते डोक्यात जातात.

<<<<<रिऍलिटी शो >>>> कुर्निसात, सॅल्यूट, फेटे उडवणे, स्टँडिंग ovation, १०० रुपयांच्या नोटा ओवाळणे वगैरे>>>>>> +१ अगदीच नाटकीपणा.

फारच मार्मिक लिहिले आहे.
मी मागच्या वर्षी सवाईला गेलो होतो, तिथला आँखो देखा किस्सा आहे.
निलाद्रीकुमार यांचे सतारवादन चालू होते, अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी कमाल केली, अगदी जीवाचा कान करून ऐकावे एवढ्या मंद्रापर्यंत आले होते, आणि अचानक एका क्षणी लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर निलाद्रीकुमार यांनी चिडून हाताचा पंजा उगारला (थांबा अशा अर्थाने) आणि पुन्हा ज्या पॉईन्टला होते तेथून वाजवत मग संपवल्यावर लोकांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या.
ते पाहिल्यावर आजकाल गोष्टी फार उथळ आणि उताविळ होत चालल्या आहेत असे जाणवले. लोकांचे दाद देणे, इ.

छान जमलय हे टाळ्याटाळ..!

त्या कपिल शर्मा च्या शो ने ऊथळ, पांचट, बिभत्स, अश्लील, ईत्यादी सर्व विशेषणे केव्हाच मागे टाकली आहेत. ऊघड ऊघड पणे तिथे अगदी कुठल्याही स्त्री वा पुरूषावर अगदीच खालच्या दर्जाचे विनोद केले जातात. आमिर खान ला ईन्टॉलरंस बद्दल फासावर चढवणार्‍या लोकांचे या शो बद्दल मात्र एक चकारही शब्द नसतो ही गंमतच आहे.
पण तिथल्या श्रोत्यांच्या 'हशाह्शी' बद्दल काय मत आहे? (अगदीच चुकून कधी एखादा एपिसोड लागला तर पाच मिनिटे बघतो.. पण तेही झेपत नाही.) आणि तो म्हणे 'विनोदी' कार्यक्रम आहे. तरिही त्या शो वर सर्वच घोडे येऊन पाणी पिऊन जातात..!
मिडीया आणि मार्केटींग च्या पुढे तर्क आणि बुध्दी किती हतबल आहेत याचे हे ऊत्तम ऊदाहरण आहे.

हवा येऊ द्या जरा तरी बरे आहे... पण लवकरच तेही कपिल ला मागे टाकतील असे वाटू लागले आहे.

एकदम बरोबर! सगळाच उथळपणाचा कारभार! प्रेक्षक जर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत नसतील आणि प्रोत्साहनाची गरज असेल ( लहान मुलांचा बक्षीस समारंभ वगैरे) तर एकवेळ 'टाळ्या वाजवा' असं सुचवणं ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी काय तेच तेच! पल्लवी जोशीने 'एजोटाझापा' ची सुरूवात केली Happy टीव्हीतले हशे मला वाटतं जुन्या अमेरिकन इंग्लिश मालिकांमधेही होते, हिंदीत ' हम पांच' मधे असायचे.

इथे बंगलोरमधे एकदा महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होता. सुरूवातीला महेश काळे यांनी विचारलं ' तुमच्यापैकी किती जण कट्यारची गाणी ऐकायला आले आहेत? ' बहुतांशी हात वर गेले. ते पाहून त्याच हातांनी टाळ्याही वाजल्या. मग महेश काळे म्हणाले की आम्ही आज कट्यारची गाणी न गाता शास्त्रीय संगीत गाणार आहोत. परत टाळ्या. दोन्ही वेळा तितक्याच जोरदार. म्हणजे नक्की काय समजायचं?

माझी ही टाळ्याटाळ पटते आहे का ? >> हो पटते आहे.
सहमत आहे.

अतिशय डोक्यात जाणारा प्रकार आहे नको तिथे टाळ्या वाजवणे. विनोदाची खालावत जाणारी पातळी हा अजून एक अतिशय उबग आणणारा प्रकार आहे.

ह्या कृत्रिम टाळ्या आणी हशांमुळे हे विनोदाचे कार्यक्रम बघावेसे वाटत नाहीत.
एकतर तेच तेच कौटुंबिक कटकारस्थाने, नैतर हे पकावु विनोद, बातम्यांच्या चॅनलवर तीच तीच रणधुमाळी, कुकरी शोज तरी कितीवेळ बघायचे? Sad

गिरीकंद>> म्हणुन बेश्ट टू बेश्ट उपाय करायचा... हाय स्पीड इंटरनेट घ्यायच अन तूनळी वर वेळ घालवायचा.. बहोत क्वालिटी मटेरिअल पाहायला मिळेल..

लेख आवडला.
टिना, +१ युट्यूब आणि इतर स्ट्रीमिंग चॅनेल्स. मी कित्येक महिने स्वतःहून रिमोटला हातही लावला नाहीये.

मी कित्येक महिने स्वतःहून रिमोटला हातही लावला नाहीये. >> मी १२वीनंतर नाहीच म्हटल तरी चालेल..
आय कान्ट स्टँड टूडेज् सिरियल्स.. बकवास असतात...रिअ‍ॅलिटी शोज फक्त पहिले सिझन बरे असतात..त्याचा नेक्स्ट सिझन आला म्हणजे क्वालिटीची वाट लावुन टाकतात आपल्याइकडले लोक.. कपिल अन चहयेद्या पन सुरुवातीला झेलेबल वाटले पण आता किर्र करतात अगदी..चीप कॉमेडी.. यांना कॉमेडी कशाशी खातात हेपन कळत नाही..
दॅट गुथ्थी कॅरेक्टर डीड वेल पण कितीवेळ? आता बेक्कार इर्रिटेट होतय.. चहयेद्या मधे डॉक्टर डोक्यात जातात मला..अन् ते उगा पब्लिक डिमांड आहे म्हणुन बायांची सोंग..अरे किती ओव्हरडोज करणार एखाद्या गोष्टीचा..श्या..

लेख अगदी पटला.. मी तर आता असले कार्यक्रम बघयाचेच सोडून दिले आहे.

अस्थानी टाळ्या पडल्यावर डोळे वटारणार्‍या धोंडूताई कुलकर्णी, आता होणे शक्य नाही !

टीना>>चहयेद्या मधे डॉक्टर डोक्यात जातात मला..अन् ते उगा पब्लिक डिमांड आहे म्हणुन बायांची सोंगं------

ह्याच कारणांसाठी मी चहयेद्या पाहणे सोडुन दिले.

मस्त लिहिलेयं एकदम Happy
विषयही मस्त .. पटलं आणि ..
कधी मित्रांमध्ये एखादा मस्त जोक होतो तेव्हा दोन्हीकडून एकाच वेळी उत्स्फुर्तपणे एकमेकांना जी टाळी दिली जाते तिला तोड नसते.

मान्य मान्य.

कपिल शो आणि 'चल हवा' मधे त्यांच्या पोतडीतले विनोद संपले असावेत बहुधा म्हणुन कंटाळवाणे झालेत.

अगदी मनातलं लिहिलत. तुमच्याशी सहमत आहे. वक्त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच किंवा गायकाच्या गळ्यातुन जरा बरी तान निघाली कि लगेच टाळ्यासुरु होतात हल्ली. दाद इतकि "स्वस्त" झाल्यामुळे क्वालिटी ची किंवा दर्जाची व्याख्याच पाणचट होत चालली आहे.
वैताग येतो हल्ली टाळ्यांचा. त्याचबरोबर हल्ली "व्हू" करून एक तो आवाज काढतात ना (म्हणजे एखादा किल्ला वगैरे चढून वर पोचल्यावर किंवा बंजी जंपींग करताना एखादा ओरडतो ना तसा) तो पण खूप डोक्यात जातो. गायकाच्या तर चांगल्या जागा ऐकू येत नाहीत आणि टाळ्या, "हू" मुळे अनेकदा त्यांना विनाकारण थांबावं लागतं.

छान लेख आहे. स्वस्त झालेल्या टाळ्या, सपक निवेदन आणी पब्लिक व्होटींग सुरू झाल्यापासून सुरू झालेला भावनिक गोष्टींचा त्रास ह्यामुळे कार्यक्रम बघायला नकोसे होतात. प्रत्येक स्पर्धकाची लाईफ-स्टोरी - अगदी चार-चौघांसारखी असली तरीही- उगाच बॅकग्राऊंड म्यूझिक वाजवून, डोळ्यात पाणी आणून सांगतात. एखाद्याच्या स्टोरीत खरच असलं काही सापडलं की सतत त्याच गोष्टीचा उल्लेख करून वात आणतात. प्रत्येक परिक्षक, प्रमुख पाहूणा ह्यांच्यावर विशेषणांची खैरात, आणी ते 'आय लव्ह यू' आणी 'गॉड ब्लेस यू' वगैरे खूप बेगडी वाटतं.

पटलं! प्रतिसादांमधले इतर मुद्देही पटले.
रिअ‍ॅलिटी शोजमधल्या या टाळ्या, 'माईंड ब्लोईंग!!' सारख्या कमेंटस, सहभागी स्पर्धकांचं 'थँक्यू व्हेरी मच, थँक्यू' (दोनदा थँक्यू का म्हणतात ते मला कळतच नाही) - या सगळ्याचं अजीर्ण झाल्यापासून अशा प्रकारचे कार्यक्रम पाहण्याचं सोडून दिलंय.
निलेश साबळेचं रेकत म्हटलेलं आणि अति लांबवलेलं "वाव्वाऽऽऽऽऽ" तर महान, भयंकर, अति डोक्यात जायला लागलं होतं.

Pages