किनारा गाठण्यासाठी - जुलकाफिया गझल

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2017 - 00:18

(२००९ मध्ये इतरत्र प्रकाशित)

कसाही का..! दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी?

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
असो किंवा नसो आता पिसारा नाचण्यासाठी

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा कर जरा अवघड, 'इशारा' वाटण्यासाठी

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

इथे प्रत्येक हृदयावर 'पुढे व्हा' हीच का पाटी
कुठे जावे समस्यांचा ढिगारा टाकण्यासाठी

कधी विश्वास माझा वाटला नाही नशीबाला
हजारो यत्न केले मी 'बिचारा' भासण्यासाठी

तुला बोलावले नाही मनाला हासण्यासाठी
तुला बोलावले होते पसारा लावण्यासाठी

दिला आहे मनाने वेग स्वप्नांना प्रकाशाचा
जरी काळाकडे आहे खटारा हाकण्यासाठी

पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कुणाची कैद आहे ही?
कुणाला अर्ज धाडावा पहारा काढण्यासाठी?

अशा मुर्दाड लोकांच्या मनी रोमांच आणावा
मरावे 'बेफिकिर'से मग शहारा आणण्यासाठी

- 'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल बेफी. आशय पण आवडला.
स्वतंत्र शेर म्हणून प्रत्येक शेर मस्त आहे.
समग्र गझलेचा एकत्र अर्थ लागत नाही.
मला गझलेचे तंत्र अवगत नाही त्यामुळे मी काही बाळबोध बोलले असेन तर मोठ्या मनाने माफ करा Happy

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा कर जरा अवघड, 'इशारा' वाटण्यासाठी

.... मस्त, झक्कास

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

.... क्या बात हैं बेफिजी

>>>मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा कर जरा अवघड, 'इशारा' वाटण्यासाठी>>>मस्त!

>>>जुना वाडा बिर्हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी>>>खासंच!

वा