...कसा म्हणू मी?

Submitted by सत्यजित... on 8 January, 2017 - 15:03

अंदाज आरश्याचा चुकला कसा म्हणू मी?
तो चेहरा फुलाचा सुकला कसा म्हणू मी?

सलतात फार गाठी नात्यांस सांधणाऱ्या...
ते बांधतात त्यांना,उकला..कसा म्हणू मी?

उध्वस्त हा किनारा,लाटेत सागराच्या...
मिलनास तो सखीच्या मुकला कसा म्हणू मी?

घायाळ पाखराची केली शिकार त्याने...
शर काळजात घुसला,हुकला कसा म्हणू मी?

आशीष मागताना,तो वाकला असावा...
इतक्यास ताठ बाणा,झुकला कसा म्हणू मी?

घुमतो अजून येथे,हुंकार ओळखीचा...
आवाज मैफलीचा,रुकला कसा म्हणू मी?

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users