आणि त्याने माझा पोपट केला होता कि हो!

Submitted by सचिन काळे on 2 January, 2017 - 22:41

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा रेल्वेच्या प्रवासाची तिकिटे काढण्याचे संगणकीकरण झाले नव्हते. बाहेरगांवच्या प्रवासाची अनारक्षित तिकिटे हि तिकीटखिडकीवरच रांग लावून मिळत.

असेच एकदा मला कामानिमित्त पुण्यास जावयाचे होते. काही कारणाने अगदी गाडी येण्याची वेळ होता होता मी स्टेशनवर पोहोचलो. बघतो तर काय!!? तिकीटखिडकीवर हि भली मोठ्ठी रांग! तिकिटे काढायला लोकांची ढकलाढकली चाललेली. आरडाओरडा चालू होता. काही लोकं रांग मोडून पुढे घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी इतर लोक वाद घालत होते. त्यात भर म्हणजे गर्दीचे नियंत्रण करायला दंडुकावाले पोलीसमामापण नव्हते. आता मला तिकिटे काढून गाडी पकडता येईल कि नाही, याचीच चिंता सतवायला लागली. तरी दैवावर हवाला ठेऊन तिकिटे काढायला मी रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहिलो.

हळूहळू रांग पुढे सरकत होती तसतशी माझ्या मनाची चलबिचल वाढत होती. तिकिटे काढणारी आता फक्त तीन चारच लोकं माझ्या पुढे राहिली होती. त्यांचे तिकीट काढून झाले कि आता माझाच नंबर होता. तेव्हढ्यात एक बावीस तेवीस वर्षांचा तरुण माझ्याजवळ आला. आणि मला गयावया करून म्हणू लागला "मला तळेगावला जायचे आहे. बरोबर माझी म्हातारी आई आणि लहान भाऊ आहे. आईची तब्येत बरोबर नाही. फारच आजारी आहे. आजच तिची तळेगावमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आहे. रांगेत तर एवढी गर्दी आहे कि लवकर तिकीट मिळणे मुश्किल दिसते आहे. आता येणारी गाडी चुकली आणि जरका आम्हाला हॉस्पिटलला जाता आलं नाही तर आईची तब्येत अजून बिघडू शकते. कृपा करून आपण माझी तळेगावची तीन तिकिटे काढून द्याल का?" आधीच माझा भिडस्त स्वभाव आणि त्यात माझ्या संसाराची नवीनच सुरवात झालेली. त्यामुळे मला जगाचा अनुभव शून्यच होता. मी दया येऊन त्याला त्वरित होकार दिला. त्याने तीन तिकिटांचे पैसे माझ्या हातात दिले आणि दूर कोपऱ्यात जाऊन उभा राहिला.

रांग मुंगीच्या गतीने सरकत होती आणि गोंधळ दुप्पट वाढलेला होता. तेवढ्यात मागे कोणीतरी रांगेत घुसण्याचा प्रयत्न करू लागला. त्याबरोबर रांगेत उभ्या असणाऱ्या इतर लोकांनी त्याच्यावर जोरजोरात आरडाओरडा करायला सुरवात केली. तेवढ्यात कुठून कसे काय कोण जाणे, पोलिसमामा आपला दंडुका आपटत हजर झाले. त्यांनी रांगेत पुढे घुसू पहाणाऱ्या त्या व्यक्तीचे बखोट धरून त्याला बाहेर ओढून काढले. सर्वांना दमात घेऊन रांग सरळ केली. आणि सगळ्यांना तंबी दिली कि कोणीही रांगेत पुढे घुसायचे नाही. तेवढ्यात रांगेत माझ्या मागे उभ्या असलेल्या दोन चार लोकांनी पोलिसमामांकडे माझी तक्रार केली कि बघा! बघा हो साहेब! ह्यांनीपण आत्ता आलेल्या त्या तरुणाकडून तिकिटे काढून देण्याकरिता पैसे घेतलेत. झाले! पोलिसमामा माझ्याकडे आले. त्यांनी माझे बखोट धरले. आणि "दुसर्यांची तिकिटे काढून देतोस काय? चल तूसुद्धा रांगेच्या बाहेर हो!" असे म्हणत मलाही ओढून रांगेच्या बाहेर काढले. मी गुपचूप रांगेच्या बाहेर पडलो. कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या तरुणाला त्याच्या तिकिटांचे पैसे त्याला परत देऊन म्हणालो. "माफ कर मित्रा, मी तुझे तिकीट काढू शकलो नाही" त्यावर "ठीक आहे, बघतो काय करायचे ते!" असं म्हणून तो तरुण निघून गेला.

आता मला तर तिकीट काढायचेच होते म्हणून मी पुन्हा रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहिलो. ह्यावेळी नशिबाने रांग लवकर पुढे सरकली आणि गाडी यायला अवघे पाच मिनिटे शिल्लक असताना माझ्या हातात तिकीट पडले. मी पुलावरून धावत पळत धापा टाकत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. आता गाडी येण्याची उद्घोषणा होत होती. मी सहप्रवाशांचे निरीक्षण करू लागलो आणि माझ्या नजरेस ते दृश्य पडले. मला तळेगावची तिकिटे काढून मागणारा मघाचाच तो तरुण आणि त्याच्यासारखाच दिसणारा कदाचित त्याचा लहान भाऊ प्लॅटफॉर्मवरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरून काही खायला प्यायला घेत होते. पण त्यांच्या शेजारी त्यांची आजारी, म्हातारी आई मला काही दिसेना. तेवढयात त्या तरुणाने स्टॉलवरून खरेदी केलेला कसला तरी एक पुडा पलीकडे उभ्या असलेल्या एका तरुण स्त्रीच्या हाती नेऊन दिला. तिने तो आपल्याजवळील पिशवीत ठेवला. त्यांच्या एकंदर अभिर्भावावरून ते दोघं आपसात पतीपत्नी असल्याचं स्पष्टपणे प्रतीत होत होतं.

अरे देवा! म्हणजे त्या तरुणाने मघाशी आपल्या आजारी, म्हाताऱ्या आईविषयी जे काही सांगितले होते ते सर्व काही खोटे होते तर! माझी त्याने काकुळतीला येऊन विनंती केली, ती फक्त मला त्याची दया वाटून त्याला तिकीट काढून द्यावे म्हणून! मोठी रांग लावण्याचा त्याचा त्रास वाचावा म्हणून! दुसरी गोष्ट म्हणजे तो माझ्या अगोदर येऊन गाडीत चढतोय म्हणजेच त्याच्याकडे प्रवासाची तिकिटेही असावीत. मग त्याला माझ्या अगोदर तिकिटे कशी काय मिळाली? याचा अर्थ पोलीसमामाने मला रांगेतून बाहेर काढल्यावर, त्याने पुन्हा दुसऱ्या कोणाला तरी आपल्या म्हाताऱ्या आजारी आईचं कारण सांगून, त्याच्याकडून तिकिटे काढून घेतली असावीत. आणि माझ्या अगोदर प्लॅटफॉर्मवर येऊन गाडीची वाट बघत होता. अरेरे! त्याने माझा पोपट केला होता कि हो!

माझा ब्लॉग : www.sachinkale763.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला अक्षरशः ह्या शब्दाचा अर्थ माहित आहे का? बहुधा नसावा. एखाद्या जादूगाराने तुमचे पोपटात रुपांतर केले असते तर त्याला अक्षरशः पोपट म्हणता आले असते. पण तुमचा अनुभव हा अक्षरश: पोपट नसून आलंकारिक अर्थाने झालेला पोपट आहे. असो.
अनुभव डोळे उघडवणारा आहे आणि अनुभवकथन चांगले आहे.

अरे अरे!

अशा लोकांमुळेच ज्यांना मदतीची खरोखर जरूर आहे त्यांना देखील कोणी मदत करीत नाही. त्यातल्या त्यात एक बरं म्हणजे तुम्हाला पैशाला गंडा बसला नाही.

@ shendenaxahtra, तुम्हाला अक्षरशः ह्या शब्दाचा अर्थ माहित आहे का?>>> प्रतिक्रियेकरीता आणि सुचनेकरिता धन्यवाद. योग्य तो बदल करतोय.

अरेरे. असे लोक भेटतात कधी कधी.
पण आता ईथुन पुढे अडचणीत असणार्‍या कुणाला तुम्ही मदत कराल का? (मनापासुन विचारलेला प्रश्न आहे हा.)

@ गिरीकंद, पण आता ईथुन पुढे अडचणीत असणार्‍या कुणाला तुम्ही मदत कराल का? >>> वास्तविक हा बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. असल्या कटू अनुभवाने मी अडचणीत असणार्यांना मदत करणे काही सोडलेले नाही. पण जमेल तशी योग्य खातरजमा केल्यावरच करतो. अनुभवाने शहाणपण येते म्हणतात ना!!! ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या त्याच्याजवळ. कर्माच्या सिद्धांतावर माझा पुर्ण विश्वास आहे. 'जैसा करम करेगा, वैसा फल देगा भगवान!'

असल्या कटू अनुभवाने मी अडचणीत असणार्यांना मदत करणे काही सोडलेले नाही >>>> हेच माहित करुन घ्यायचे होते. धन्यवाद Happy

रेल्वे चे टिकिट काढ़ते वेळी असा प्रसंग तर आला नाही कधी पण सध्या बैंक किंवा एटीम मधे असे प्रसंग सर्रास् बघायला मिळतात..
अनुभवातून आपण सुज्ञ होतो हेच खरे..

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांना धन्यवाद! आपण देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्यासारख्यांना दोन शब्द लिहिण्याचा हुरूप येतो. आपले पुनः एकवार आभार!