स्फुट ४० - इच्छा एकच असेल

Submitted by बेफ़िकीर on 2 January, 2017 - 09:03

हे वॉशिंग मशीन बंद पडेल
गीझर ऑन होणार नाही
फ्रीजची घरघर घर व्यापेल
टीव्हीच्या स्क्रीनवर पाटी असेल
'केबलचे बिल पेंडिंग आहे'
मोबाईल नुसता गेमपुरता उरलेला असेल
मायक्रोवेव्हच्या खोक्यात असतील जुनाट वस्तू
वॉटर प्युरिफायर गंजलेला असेल
एखादीच कामवाली येईल
दिखाऊ साफसफाई करेल
काम करताना नांवे ठेवेल कामालाच
तुच्छपणे आदळेल चहाचे कप
तोर्‍यात कूकर लावेल
ताटं वाट्या आपटेल टेबलावर
धाडकन् दार आपटून निघून जाईल

घरातील प्रत्येक वस्तू
असहाय्य तान्ह्या मुलासारखी
टँहँ टँहँ करेल
आपण उठून तिला जोजवावे, दुरुस्त करावे म्हणून
आंघोळ घालावी, दुपट्यात गुंडाळावे म्हणून

लँडलाईनवर येतील
महिन्यातून चार पाच कॉल्स
एक केबलच्या बिलासाठीचा
एक क्रेडिट कार्ड हवे आहे का विचारणारा
एक किराणा मालवाल्याचा
एक राँग नंबर
आणि एक....
'बरे आहात ना तुम्ही' असे विचारणारा
आऊटगोईंग कॉल्स
करायचे कोणाला
हा प्रश्न पडेल

तू कशीबशी उठून
भात वरण वाढून घेशील
एक ताट मला देशील
एक स्वतः घेशील
धुळीने भरलेल्या घरात
कबूतरे ये जा करत असतील
आठवणींच्या गर्दीतून घरट्यासाठी जागा शोधतील

ह्या वास्तूत येऊन राहिलेले
ह्या वास्तूत आनंदाने वावरलेले
ह्या वास्तूत घरच्यासारखे वागवले गेलेले
अनंत जीव
विसरून गेले असतील ह्या वास्तूच्या सुवर्णकाळाला

शेजारीपाजारी
नाक मुरडत असतील
बंद, केविलवाण्या दाराला पाहून

पैसे असतील
पण ते काढायला जाता येत नसेल
ते काढून द्यायला इतर कोणाला वेळ होत नसेल

एक दिवस घरातले पैसे संपतील

मग जाईल वीजही
कामवाली येणे बंद करेल
फोनही बंद होईल
किराणावाला फोन करणे विसरेल
दूधवाला एक घर टाळेल

विषण्णपणे पाहत बसू तेव्हा आप़ण
एकमेकांकडे
अश्रूमय देहाने
विरघळत विरघळत
अचेतन होऊन जाऊ

इच्छा एकच असेल
दोघांचे एकाचवेळी व्हावे

===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! भयंकर अंगावर आलं स्फुट.
जराजर्जर निराधार म्हातारे दाम्पत्य आले डोळ्यासमोर.

अरेरे ...