दंगल, शाहरूख, नववर्ष, संकल्प, मोदी आणि जागो ग्राहक जागो.. वगैरे वगैरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2017 - 16:10

खरे तर शीर्षकावरून समजले असेलच, नसेल तर सांगतो. एकंदरीत आज तीन-चार वेगवेगळे धागे सहज काढू शकलो असतो. पण नवीन वर्षांचा संकल्पच मुळी तसा केला आहे. शक्य तितके कमी धागे काढावेत. गरज असेल तर आणि तरच काढावेत, अन्यथा टाळावेत. वर्षभरासाठी एक लिमिट आखून घ्यावी, उदाहरणार्थ आठवड्याला सरासरी दिड प्रमाणे वर्षाचे फक्त ७८ च धागे. या मर्यादेत राहण्यासाठी जर दोनतीन विषय एकाच धाग्यात गुंफावे लागले तरी मागेपुढे पाहू नये. बस याच तत्वाला अनुसरून हा आजचा धागा आहे असे समजा.

३१ डिसेंबरची रात्र जागवल्यानंतर आज नववर्षाचा पहिलाच सकाळचा ९ चा शो दंगलचा. तिकीटे आधीच बूक केल्याने टाळता येणार नव्हता. झोपलो तर झोपलोच आणि पिक्चर बुडालाच म्हणून समजा, याची कल्पना असल्याने पहाटे केवळ दोनेक तासांसाठी न झोपता पुर्ण रात्र जागवली. असे या आधी फक्त गणपती आणि दसर्‍याच्या सणाला करायचो. गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री शेवटच्या क्षणापर्यंत डेकोरेशन करत सकाळी न झोपता थेट आंघोळ उरकून गणपती आणायला जायचो. तसेच नवरात्रीच्या शेवटच्या रात्री, रात्रभर गरबा खेळून पहाटे आंघोळ करत महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो. यंदा हेच ख्रिस्ती सणाला केले.

दंगल बद्दल आतापर्यंत बरेच जणांचे बोलून झालेय. मी आणखी काय बोलणार. काही वेगळे बोलायचे झाल्यास त्यातला मला सर्वात आवडलेला डायलॉग - शाहरूख को कभी ना नही कहते ... पलट.. पलट .. पलट ........ एऽऽ पलटीऽऽऽऽऽऽ
मी शाहरूखचा फॅन असलो तरी आमीरही आवडतोच. पण त्याच्या चित्रपटात शाहरूखची झलक दिसणे या सुखद धक्याने नववर्षाची सुरुवात होणे हे माझे भाग्यच. डिडिएलजे चित्रपट प्रदर्शित झाल्याचे वर्ष आणि चित्रपटात दाखवलेला काळ यातील फरक पाहिला तर लक्षात येईल की राजने तरुणांवर किती काळासाठी आपली जादू केली होती. आमीरने ते स्विकारत आपल्या चित्रपटात दाखवणे या प्रामाणिकपणाची दाद द्यायला हवी.

चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले द्रुश्य ५ पॉईंट शॉट. खुर्चीत बसल्याबसल्या मी सुद्धा माझ्या पाठीची उलटी कमान केली. आणि कधी नव्हे ते ती झालीही. चित्रपटातील ही इन्वॉल्वमेंट माझ्यासाठी चित्रपटाला ५ पॉईंट देण्यासाठी पुरेशी आहे.

चित्रपट संपल्यावर एकाच गोष्टीचे वाईट वाटले की छोट्या बहिणीने देखील भारतासाठी पदकांची लयलूट केली असताना पिक्चरमध्ये तिला नकुल-सहदेव सारखे टोटली साईड ट्रॅकला टाकले गेले. आतापर्यत वाचलेल्या परीक्षणात कोणीही याची खंत व्यक्त केली नाही याचे जास्त वाईट वाटले. म्हणजे ती सुद्धा त्याच ताकदीची पैलवान आहे हे लोकांपर्यंत कदाचित पोहोचलेच नाहीये.

तर दंगलपुराण ईतकेच, आता जागो ग्राहक जागो कडे येऊया.

हे मल्टीप्लेक्सवाले फारच लुटतात. जिथे सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत तिकीट असते तिथे बाजूला पंख्याने वारा घालायला माणसे ठेवलेली असतात की काय अशी शंका येते. मी तर बाबा २५० च्या पुढे आजवर कधी गेलो नाही. आजचेही तिकीट २३० चे होते. ते देखील सकाळचा पैला शो असूनही. त्यावर इंटरनेट हॅन्डलिंग चार्ज वगैरे जोडून दोघांचे पाचशेच्या वर गेले. अजून करा डिजिटल ईंडिया आणि कॅशलेस ईकोनॉमी. बर्रं हा खर्च परवडला असे वाटावे असे ते पॉपकॉर्नचे भाव असतात. त्यात तो पदार्थही असा की कितीही खाल्ला तरी कमीच वाटावा. म्हणून पोटभरीला ५०-६० रुपये नग किंमतीचे प्रत्येकी दोन समोसे घ्यावे लागतात. त्यावर पाण्यासारखे कोल्ड्रिंक पिणे ओघाने आलेच. ही उधळपट्टी कमीतकमी व्हावी म्हणून मी गर्लफ्रेंडला नेहमी पिक्चरची वेळ अर्धा तास आधीचीच सांगतो. आणि त्या वेळात जवळच्याच एका ठिकठाक हॉटेलामध्ये नेऊन पोटभर खाऊ घालतो. पण तरीही हाताला चाळा म्हणून पॉपकॉर्न कोल्ड्रींक्सचा खर्च काही चुकत नाही. तर या विरुद्ध आवाज उठवण्यात काही अर्थ नाही. कारण त्यांनी काही घ्याच म्हणून आपल्यावर जबरदस्ती केली नसते. याला जबाबदार आपलेच काही चुकीचे कन्सेप्ट आहेत की पॉपकॉर्न शिवाय पिक्चर बघायला मजा येत नाही, जे आपण पाश्चात्यांकडून उचलले आहेत. अन्यथा दहा रुपयांचे कुरकुरे खाणेही काही वाईट आयडीया नाहीये.

असो, तर शीर्षकातील जागो ग्राहक जागो हे चित्रपट संपल्यानंतर मला कसे गिर्हाईक केले गेले त्याबद्दल आहे. झाले असे, पिक्चर संपताच तेथील फूड ई स्टॉल्सना चुकवत मी मोठ्या शिताफीने गर्लफ्रेंडला झपझप एस्कलेटरच्या मार्गे बाहेर नेऊ लागलो. पण एक्जिटमधून निसटणार ईतक्यात तिला समोरचा एक स्टॉल बघून आइसक्रीम खायची इच्छा झाली. पाहिले तर २० रुपये फक्त सॉफ्टीची पाटी झळकत होती. म्हटलं हे एकदमच बजेट प्रकरण आहे. त्यामुळे मलाही कधी नव्हे ते आईसक्रीम खायची इच्छा झाली. चलं दोघं खाऊ म्हणून गेलो. तर तिथे समजले त्या पाटीवरचा वीस रुपयांचा माल संपलाय. मी निराश झालो, पण माझी गर्लफ्रेंड निराश होऊ नये म्हणून त्यांनी दुसरे मेनूकार्ड तिच्यासमोर सरकावले. नुसते मेनूच मेनू होते. किंमती कुठेही लिहिल्या नव्हत्या. झाली पंचाईत. एकीकडे गर्लफ्रेंड त्या रंगीबेरंगी आईसक्रीमपैकी एक सिलेक्ट करत असताना दुसरीकडे आपण किंमती विचारायच्या तरी कश्या. तसे तिने एक फायनल केले. आणि मी त्याचीच किंमत विचारली... वन नाईंटी डॉलर्स !

वन नाईंटी डॉलर्स?? मी अविश्वासाने किंचाळलो
डॉलर्स नही सर, रुपीज .. हा हा.. तो हसला.
मला वाटले माझेच कान वाजले. तरीही वन नाईंटी रुपीज. जरा जास्तच वाटले. काहीतरी संडेज म्हणून प्रकार होता. आजही नेमका संडेच होता. किती हा दुर्दैवी योगायोग!
मी ऑर्डर देताच तो म्हणाला, और आपके लिए सर? मला त्या स्थितीतही गहिवरून आले. नाही रे राजा, ती खाते त्यातच माझे पोट भरते.. आणि खिसा रिकामा होतो.
तर त्या चॉकलेट फज वज च्या नावावर एका प्लेटमध्ये सजवलेले तीन चॉकलेट आइसक्रीमचे गोळे आले. ते पाहून मनातल्या मनात म्हटलं एवढेच!.. मग काय परात भर येणार होते.. हे देखील माझ्याच दुसर्‍या मनाने म्हटले.
एकेक चमचा अधूनमधून मी सुद्धा खात होतो. छोटे छोटे घासच घेत होतो. उगाच मोठा घास घेतला असता तर एकेक घास दहा दहा रुपयांना तोंडात विरघळतोय असे वाटले असते. किती तो मिडलक्लास विचार. पण दुर्दैवाने मी असाच आहे. नवीन वर्षात जरा बदलायचा विचार करतोय. बघूया आता किती जमतेय.

गर्लफ्रेंडचे खाऊन झाल्यावर मी प्लेट माझ्याजवळ सरकवत उरलेले चाटून पुसून खरडवत खात संपवले. कारण माझ्या कॅल्क्युलेटरनुसार तो किमान सात-आठ रुपयांचा माल होता. संपता संपता जाणवले, पैसे घेतले पण चव आणि क्वालिटी छान होती. मग त्याच पैसे वसूल केल्याच्या समाधानात समोर आलेल्या बिलावरून एक नजर फिरवली...

३४९ रुपये फक्त !

अरे देवा, काल मोदी घोषणा करणार होते. थर्टीफर्स्ट पार्टीच्या नादात ती बघायची राहिली होती. काही नवीन टॅक्स तर नाही ना जोडले त्यांनी? १९० चे डायरेक्ट ३४९ झाले कसे?
मी त्या काऊंटरवरच्या स्मार्ट पोरालाच विचारले..
त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते,
१९० रुपीज नही सर, १९० ऑनवर्डस कहा था ..
मी ते ऑनवर्डस ऐवजी बहुतेक डॉलर्स असे ऐकलेले ..

चूक कदाचित माझीही असेल, जे मी बरोबर ऐकले नसेल. पण एवढ्या महागड्या पदार्थांची किंमत न लिहिता मेनूकार्ड बनवायचे. काही लोकं संकोचून किंमत विचारणार नाहीत. जरी किंमत विचारलीच तर त्या प्रकारातील सर्वात स्वस्त आयटमची किंमत सांगत ऑनवर्डस बोलायचे. लोकं त्याच आसपास आहे असा अंदाज करून तो पदार्थ विकत घेणार. आणि मग बिल करतेवेळी काहीतरी वेगळाच बॉम्ब फुटणार.

मी बिल पे करत असतानाच तिथे अजून एक प्रेमी युगुल आले. दोघांनी सॉफ्टी विचारली. समोरून नकार आला. त्याबदल्यात त्यांनाही आईसक्रीम सुचवले गेले. त्यांनी ते लाडात घेतले. मुलाने ज्यादा हुशारी दाखवत दोघांना दोन घेतले. मला किंचाळून त्याला सांगावेसे वाटत होते की अरे बाबा किंमत विचार आधीच. पण नाही. आता याच्या डोक्यालाही शॉट लागणार हा माझा अंदाज खरा ठरला जेव्हा त्याने शंभर रुपयाची नोट पुढे केली. पण प्रत्येकी १८० रुपये प्रमाणे त्यांचे ३६० रुपये बिल झाले होते. मला अशक्य वाईट वाटले त्याच्याबद्दल. मधल्या काळात माझे कार्ड पेमेंट करून झाल्याने मी पुढे त्याचे सांत्वन करायला थांबलो नाही. पण या लोकांना काहीतरी धडा शिकवायच्या निर्धारानेच तिथून बाहेर पडलो.

पुढच्या वेळी चार मित्र घेऊन तिथे जाणार. प्रत्येकी चार-चार आईसक्रीमच्या टेस्ट करणार. त्यातील काही सिलेक्ट करत किंमत विचारणार. आणि अरे बापरे हे तर खूप महाग आहे, कुछ कम नही होगा क्या? आम्ही तर वीस रुपयांचा बोर्ड वाचून आलेलो असे म्हणत तिथून फुकटात आईसक्रीम चाखून निघून जाणार. हे असे चार वेळा चार वेगवेगळ्या मित्रांना नेऊन करणार. जोपर्यंत ती वीस रुपयांची पाटी त्यांना हटवायला लावणार नाही तोपर्यंत माझे समाधान होणार नाही . आता हेच माझे जानेवारी २०१७ चे ध्येय आणि संकल्प.

.........................................................................

बघा, प्रतिसाद द्यावासा वाटला तर जे आवडेल त्यावर द्या, नाहीतर तुम्हाला जे आवडेल त्यावर अवांतर द्या. पण काहीतरी द्या, नवीन वर्षाची बोहनी होऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
पटले काय म्हणताय ते. कितीही टाळायचा म्हंटले तरी हा खर्च टाळता येत नाही. अति होऊ नये म्हणून आम्ही आ़जकाल जेवणानंतर पडेल अशी वेळ घेतो आणी घरून जेवून जातो. तरीही किमान एक पॉपकॉर्न घेतलेच जातात.

मध्यन्तरी, एका थेटरमध्ये वाईट पॉपकॉर्न मिळायचे तेव्हा खर्च कमी झाला होता पॉपकॉर्न घेणं बंद केल्याने. पण आता ते थेटर पण बंद पडले. बाकी तिथे पॉपकॉर्न खायला जी मजा येते, ती घरी तेच पॉपकॉर्न खायला नाही .

म्हणुन गफ्रे ला नाही तर बायकोला पिच्चरला न्यायचं. तुला खायची इच्छा असली तरी एवढं महागाचं घेउ द्यायची नाही. Lol

एक विचार डोक्यात आला, मुलांना स्वयंपाक शिकवता शिकवता मुलींना बिलं भरायलाही शिकवल पाहीजे....>>>> धाग्याच्या अनुषंगाने कुस्ती लिहायचे ना Light 1

अरे वा, आले चारसहा प्रतिसाद. मला वाटलेले की माझ्या काटकसरी आणि फक्त महागाई आणि आर्थिक फसवणूकीविरुद्ध उसळून उठणार्‍या मध्यमवर्गीय विचारांना कोणी ईथे समजून घेणारे अभावानेच असतील..

@ सस्मित, अहो पण त्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवणार आहे ना, तिने भविष्याचा विचार नको का करायला ..

@ अदिती, अगदीच तसे नाहीये. ती सुद्धा निम्मी बिले भरतेच. याबाबत आम्ही ५०-५० खर्च उचलणारे आदर्श कपल आहोत. फक्त ती गोष्ट वेगळी की तो खर्च करण्याचे प्रमाण ९०-१० ते ९५-०५ असे असते Happy

अवांतर - जुन्या वर्षाचा अखेरचा दिवस आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि तसेच या दोन्ही रात्री धडाक्यात साजर्‍या केल्याने आज जरा आराम करायला सुट्टी टाकली आहे. तर दिवसभरात माझा आणखी एखादा धागा आल्यास मनाची तशी तयारी ठेवा Happy

धन्यवाद अंजू, दोन हजार सतरा म्हणजे खतरा. या वर्षात तरी कठीण दिसतेय. माझ्याकडे पाहून तिच्या घरचे पटकन तयार होतील असे वाटत नाही Happy