तुला झालेला कॅन्सर....

Submitted by बेफ़िकीर on 30 December, 2016 - 01:26

एका संध्याकाळी एकटाच पुष्पकमध्ये बसलेलो असताना तुझा मेसेज आला.

Friends, I am diagnosed with cancer.

पुढे तू दोन तीन वाक्ये लिहिली होतीस की तुझी ट्रीटमेन्ट कशी कशी ठरली आहे ते!

पण ती दिसत नव्हती. डोळे भरलेले होते. लक्ककन् २५ वर्षे सरकली अश्रूंच्या आतून!

तुझी आणि माझी पहिली भेट! फर्स्ट सेमचा रिझल्ट आल्यावर कॅन्टीनपाशी तू सगळ्यांदेखत मला विचारले होतेस.

"काय ऑल क्लीअर का? असणारच ऑल क्लीअर"

मी उत्तर दिले होते.

"नाही रे बाबा, एम ३ आणि एफ एम राहिलेत"

"एटीकेटीकरांमध्ये स्वागत आहे"

तू असे म्हणालास आणि मुहुर्तमेढ रोवली गेली एका वादळी मैत्रीची!

तू श्रीमंत घरातला! मी गरीब घरचा! तुझे सगळे मित्र एकाहून एक श्रीमंत! तुझ्या त्या वाढदिवसाला मी तुझ्या वाड्यात आलो तेव्हा तुझे मित्र आणि त्यांनी आणलेल्या गिफ्ट्स पाहून शरमल्यासारखे झाले. मला फक्त एक भेटकार्ड आणणे परवडले होते, तेही आई वडिलांचा विरोध सहन करून! इतरांनी कॅसेट्स आणल्या होत्या, लेदरचे पाकीट होते आणि कायकाय! वाढदिवस असा साजरा केला जाऊ शकतो हेच मला पहिल्यांदा कळले.

मी लांब लांब राहू लागलो. पण तुला जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा कायम मित्रच श्रेष्ठ वाटायचे. आई वडिलांपेक्षाही!

तुझ्यापुरता मैत्री ह्या शब्दाचा अर्थ समजायला मला २५ वर्षे लागली. २५ म्हणतो आहे कारण त्यानंतर तू गेलासच! राहिला असतास तर मैत्री समजलीच नसती मला!

लक्ष्मीनारायणला दीवाना बघण्यासाठी जमलो तेव्हा तू विल्स किंगचे एक अख्खे पाकीट घेतले होतेस. मी विचारले की अरे आपण चौघे आहोत, दहा सिगरेटी कशाला? तू काहीच बोलला नाहीस. तेरी इसी अदापे सनम ह्या गाण्यात दिव्या भारतीचा ढळलेला पदर पाहून मी म्हणालो होतो, आता समजले एक अख्खे पाकीट का आणले ते! खदखदून हसत तू थिएटरचे अक्ष वेधले होतेस.

आपल्या मैत्रीतील अनेक धाग्यांपैकी एक होता विल्स किंग्ज! भारतीच्या कॅन्टीनला पिरियड बंक करून थंडीत चहाबिडी करायचो तेव्हा फ्लुईड मेकॅनिक्सची लेक्चरर आणि टी ई इलेक्टची नीलम माथुर हे विषय तासतास पुरायचे. कॉलेजच्या कॅन्टीनला विद्यार्थ्यांनी सिगरेट ओढणे चालण्याचा जमाना होता तो!

दोघांचेही एस ई गेले आणि मैत्री दृढ होण्याला आणखी एक कारण मिळाले. मी कन्सल्टन्ट्सला पार्टटाईम जॉइन झालो आणि सकाळी बीसीएल समोर समोसा आणि चहाबिडीला तू खास शनवारातून येऊ लागलास.

तुझ्याआधीपासूनचा माझा मित्र मुज्या आणि तू अशीही एक मैत्रीची गाठ बांधली गेली. सेन्ट्रलला रात्री दहा ते साडे अकरा बसून पैश्यांचा धूर काढून आणि त्या वयास शोभणार्‍या गप्पा मारून निघताना आपल्याजवळ ना मोबाईल होते ना काही! पण निव्वळ अंडरस्टँडिगवर होणार्‍या त्या भेटी हा आयुष्यातील एक अविस्मरणीय काळ ठरला.

तुझ्या प्रासादतुल्य वाड्यातील तुझ्यासाठी असलेल्या एका स्वतंत्र खोलीत तू लपवून ठेवलेला डेबोनेर आणि प्लेबॉयचा साठा हा एक मोठाच चर्चेचा विषय असे! मला अजूनही आठवते, तू ब्लूमिंग्टनला गेल्यानंतर तिथून एका मित्राला फोन करून त्याला तुझ्या खोलीतील तो साठा घेऊन जायला सांगितले होतेस. तुला चिंता होती की चुकून तुझ्या आई वडिलांच्या हाती तो लागेल की काय? आम्ही हे ऐकून हसत सुटलो होतो.

दोघेही बी ई झालो आणि तू लागलास भोसरीतल्या कोणत्यातरी अश्या कंपनीत जिला तू चोवीस तास शिव्या घालत असायचास. तुझा सात्विक संताप आणि त्या संतापात तू घातलेल्या खानदानी शिव्या ऐकून मला भयंकर हसू यायचे.

मी अर्थमूव्हिंग इक्विपमेन्ट्सचे स्पेअर्स विकू लागलो आणि मीही माझ्या कंपनीला शिव्या घालू लागलो.

संध्याकाळी नियम असल्याप्रमाणे आपण सनराईजला भेटायचो. तू विल्स किंग्ज वरून गोल्ड फ्लेकवर शिफ्ट झाला होतास आणि मी विल्सवर! आपल्यातील आर्थिक दरी व आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार असलेल्या आपल्या चॉईसेसमधील फरक तसेच राहिलेले होते.

विजयानंद, श्रीनाथ आणि श्रीकृष्ण असल्या थेटरांना लागणार्‍या मल्याळी बी ग्रेड आणि उत्तान पोस्टर्स असलेल्या चित्रपटांना जाण्याचे आपले धाडस कधी झाले नाही. पण त्या चित्रपटांच्या नावांवरून आपण कैकदा हसायचो.

मी दोन वर्षांतच लग्न करून बसलो. माझ्या लग्नानंतर दोन एक महिन्यांतच तू माझ्या सोसायटीत खाली आलास आणि मला हाका मारून खाली बोलवलंस! तुझ्या स्वरातील घाबरलेपण जाणवल्यामुळे मी धाडधाड खाली उतरलो.

तुझे डोळे डबडबलेले होते. तू एखाद्या लहान मुलासारखा माझ्याकडे बघत म्हणालासः

"माझ्या बाबांना कॅन्सर झाला आहे"

मी धीर देण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. डॉक्टरांनी तुझ्या बाबांना तत्क्षणी सिगरेट सोडायला सांगितली होती. तुझ्या बाबांनी खिशातून सिगरेटचे पाकीट आणि काडेपेटी काढून डॉक्टरांच्या हातात दिली होती आणि म्हणाले होते, ह्या क्षणापासून मी सिगरेट सोडली, पण मला वाचवा!

मकरंद, तुझे बाबा आजही ठणठणीत आहेत मित्रा! सुदैवाने ते ठणठणीत आहेत आणि तुमच्या सिंहगडच्या फार्म हाऊसच्या बागेत तुझ्या अस्थींमधून आलेल्या झाडाला ते पाणीही घालत आहेत.

तुझ्या बाबांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला पण त्यामुळे त्यांच्या चेहर्‍याची एक बाजू कायमस्वरुपी बिघडली.

एक दिवस संध्याकाळी तू मला आणि हिला आदित्यपाशी बोलावलेस. आम्ही आलो तर तू ओळख करून दिलीस. ही म्हणे माझी भावी बायको! आम्ही पाहतच राहिलो. गोरी पान, सुंदर, तुला शोभणारी! मग आपली चौघांची घट्ट मैत्री झाली.

ती आमच्यासारख्याच परिस्थितीतील होती. तिचे आणि आमचे विचारही जुळत होते. तुझे लग्न झाले आणि आयुष्यातील एका मोठ्या वादळाला आरंभ झाला.

दरम्यान मोघल मोनार्च ह्या व्हिस्कीने आपल्या आयुष्यातील एक कोपरा पकडला होता.

लग्नानंतरची पाच, सहा वर्षे नेहमीप्रमाणेच गेली. मुले बाळे, संगोपन वगैरे! तू बजाज टेम्पोमध्ये काम करत होतास. आता तुझे आणि मुज्याचे कॉमन टॉपिक्स खूप होते कारण मुज्या आधीपासूनच टेम्पोमध्ये होता. आपण संध्याकाळी भेटतच होतो. आठवड्यातून एकदा २४ कॅरेट्सला जेवायलाही भेटायचो सगळे!

अचानकच तुझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. डॉक्टर तेच! आई त्यातून सुखरूप बाहेर पडली. आजही तुझी आई आसवे ढाळत जगत आहे.

तू सॉफ्टवेअरचा कसलासा कोर्सही करत होतास. तेव्हा काहीच कल्पना नव्हती की तू नक्की काय करत आहेस. पण १९९८ मध्ये तू एकदम बाँबच टाकलास.

पाच वर्षे ब्लूमिंग्टन!

हातातून काहीतरी निसटले. श्वास क्षणभर थांबला! मैत्री अशी अचानक तुटू शकते हे माहीतच नव्हते.

एकदम आयुष्यच बदलले. ज्याला रोज भेटतो, ज्याची आपल्या आयुष्यात फार महत्वाची जागा आहे, तो आता पाच वर्षे दिसणारच नाही.

तू अमेरिकेला गेलास आणि प्रकाश पडला. तुझा स्वभाव नव्हता अश्या देशात राहण्याचा! तुला अमेरिकेचा मनस्वी तिटकारा होता. तासनतास तू माझ्याशी फोनवर बोलायचास. म्हणायला म्हणायचे म्हणून तासनतास नाही, खरोखर तास तास बोलायचास. दररोज फोन करायचास! तुझी बायको आणि मुलगाही आले तिकडे!

तुझा स्वच्छ हिशोब होता. भारतात येताना वीस पेट्या आणता आल्या पाहिजेत. तू वेगासल जाऊन आलास. कपडे उतवरत नाचणार्‍या नर्तकी बघितल्यास. अमेरिकन मित्रांबरोबर पार्ट्या झोडल्यास. पण तू कधीच मनापासून तिथे नव्हतास.

अमेरिका हा देश तू प्यायलास आणि सोडलासही! पण ह्या पाच वर्षांनी तुझ्यात आमुलाग्र बदल घडवला. तुझे भारतावर, भारतियांवर आणि मैत्रीवर अधिक घट्ट प्रेम बसले. तुझे आणि तुझ्या बायकोचे वाद विकोपाला गेले. तुझ्या मोठ्या मुलावर तुमच्या भांडणाचे विपरीत परिणाम झाले. त्याची मानसिकता विचित्र झाली असे तूच म्हणू लागलास. मोठा मुलगा म्हणण्याचे कारण असे की तुझ्या बायकोने हट्टाने अमेरिकेत आणखी एका मुलाला जन्म दिला. तू नाही म्हणत असतानाही! तिला अमेरिकन नागरीक असलेला मुलगा हवा होता म्हणे! तुमची भांडणे अश्या पातळीला पोचली होती जेथे तुझी बायकोही मला आणि माझ्या बायकोला हस्तक्षेप करू द्यायला तयार होती.

तू भारतात आलास आणि नेमका मी राहतो त्याच कॉलनीत तू तीनमजली फ्लॅट घेतलास. नेमका काही दिवसांतच मुज्याही त्याच कॉलनीत आला. आता तीन जोडपी एकमेकांची सबकुछ झाली होती.

तुझ्या सवयी बदलल्या होत्या. आता तू ब्लॅल लेबल किंवा शिवास रीगलशिवाय काही घेत नव्हतास. तुझ्याचमुळे माझी ह्या ब्रँड्सशी ओळख झाली. स्मोकिंग आणि तुझे असे नाते होते की वर्षवर्ष तू सिगरेटशिवाय राहू शकायचास, ठरवून सिगरेट सोडू शकायचास आणि मधेच कधीतरी काही दिवस खूप स्मोकिंगही करायचास. तुझा निर्धार फार भारी असायचा.

हातात पैसे असणे, अमेरिकेच्या राहणीमानाशी परिचय झालेला असणे, मुळातच स्वभाव हटवादी आणि डॉमिनेटिंग असणे आणि घरात अजिबात मनःशांती नसणे ह्यामुळे तू अतिशय विक्षिप्त होऊ लागला होतास. तुझे चॉईसेस अधिकच बेहतर झाले होते.

आता तुझी आणि तुझ्या बायकोची भांडणे हा एकमेव विषय आपल्या 'फॅमिलीसकटच्या' आणि 'बॅचलर्स'च्या मीटिंग्जमध्ये असायचा. हळूहळू तुझी बायको फक्त माझे ऐकून शांत होऊ लागली. तिची समजूत काढण्याचे काम सर्वानुमते माझ्यावर सोपवण्यात आले. तुमची भांडणे रात्रीबेरात्री व्हायची आणि मी आणि मुज्या आणि आमच्या दोघांच्या बायका तिथे धावायचो. वरच्या खोलीत जाऊन मी तुझ्या बायकोची समजूत काढून तिला खालच्या मजल्यावर सगळ्यांमध्ये आणायचो. तुमचे वाद आम्ही सोडवायचो आणि परतायचो.

आपल्या सहली, ट्रेक्स, पार्ट्या सगळेच एकसे एक! आपण तिघेच राजमाचीला गेलो होतो तेव्हा तू किती वैतागला होतास हा कालपरवापर्यंत आपल्या हसण्याचा विषय होता. पाचगणीच्या रॅव्हाईनमध्ये रात्री अकरा ते पहाटे पावणेपाच इतका वेळ तुझ्या बायकोने अविरतपणे तुझ्या चुका तुझ्यासमोर आम्हा चौघांना सांगणे आणि तू या नुसत्या ऐकून घेणे हा प्रसंग फार बोचतो. त्याच्याच आदल्या संध्याकाळी रॅव्हाईनच्या ओपन गार्डनमध्ये हंड्रेड पायपर घेताना शेवटी जो पाऊस आला त्यात आपण तिघेही भिजत भिजत पीत राहिलो होतो. ते दिवस पुन्हा येणार नाहीत.

पन्हाळ्याला झालेली सगळ्यांची पार्टी अशीच अविस्मरणीय! दरीकडे पाहताना मुज्याने सहज म्हणून गायलेले आंधीमधील 'तेरे बिना जिंदगीसे' ऐकून तू इतका उदास झालास की मुज्याला शिव्याच घातल्यास जणू! गाण्यांचा तुझ्यावर भयंकर परिणाम होतो हे आम्हाला तेव्हा समजले. 'दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये' ह्या गाण्याचे तुला दोन अर्थ समजले असे तू अर्धा तास आम्हाला सांगत बसला होतास.

माझा अ‍ॅक्सिडेन्ट झाला आणि तुझ्यातील मित्र अधिक चांगला समजला. मैत्री तुझ्यासाठी काय आहे ते प्रकर्षाने समजले.

मला धरून लिफ्टमधून खाली नेणे, तुझ्या एस्टीमच्या डिकीत माझ्या चपला ठेवणे, मला धरून मागच्या सीटवर बसवणे आणि लाँग ड्राईव्हला घेउन जाणे, चहा वगैरे पाजणे! मी थक्क झालो होतो. मला शारीरिक वेदनांपेक्षाही असे मित्र आपल्याला मिळालेले आहेत ह्या भावनेनेच गहिवरून रडू येत असे. आणि हे तू रोज कात होतास. रोज! इतक्या नियमीतपणे की त्यावरूनही तुमची भांडणे झाली आणि मी स्पष्टपणे सांगितले की असे रोज यायचे नाही.

हे सांगताना मला कसे वाटले असेल? ज्याला घराबाहेरचे जग केवळ तुझ्यामुळे दिसू शकत होते त्याने तुला हे सांगितले तेव्हा त्याला कसे वाटले असेल?

यथावकाश माझा पाय दुरुस्त झाला आणि त्यासाठीची पहिली पार्टी बाबाज गार्डनमध्ये ठरली. बाबाज गार्डन हे आपल्या सहाजणांच्या मिलियन आठवणींचे साक्षीदार होते. मिलियन! हास्याचे गडगडाट, टाळ्या, वादविवाद, भांडणे, अश्रू, अबोले आणि काय काय! आज ते बाबाज गार्डन जमीनदोस्त होऊनही अनेक वर्षे झाली. पण जर ते बोलले असते तर मी हे सगळे लिहीत आहे त्यापेक्षा अधिक छान बोलले असते आपल्या नात्याबद्दल!

मग सुरू झाला एक निराळा टप्पा! तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या भांडणात मला आता तिचे म्हणणे अधिक पटू लागले. मग माझे आणि तुझे वाद होऊ लागले. आपल्या दोघांची भांडणे हा आता एक ठरलेला कार्यक्रम होऊन बसला. मी तर तुला हाही सल्ला दिला की तू तिच्यापासून वेगळा हो. पण मुलांसाठी तुला तसे करावेसे वाटत नव्हते. आणि नेमके माझ्या बायकोचे आणि तुझ्या बायकोचे एकदा थेट भांडण झाले. दोघींनी एकमेकींशी संबंध पूर्ण संपवले. आता आपण सहा जण एकत्र भेटणे अशक्य झालेले होते.

त्याच काळात माझी गार्गीशी ओळख झाली. गार्गी, एक अत्यंत चांगल्या मनाची मुलगी! माझ्यामार्फत तुझीही तिच्याशी ओळख झाली. मग माझी आणि गार्गीची ओळख राहिली बाजूला, तुमचीच घट्ट मैत्री झाली.

२००७ ते २०१२ हा संपूर्ण काळ तुमच्या दोघांमधील भांडणांनी गाठलेली परिसीमा, त्यावर काहीही उपाय न निघू शकणे, तू आणि मी एकमेकांपासून लांब जाणे, तू एकलकोंडा होणे ह्यातच गेल. तुझी बायको तुला घरात करून खायला घालायची नाही म्हणून तू रोज बाहेर जेवायचास हे मला समजले तेव्हा मी एकांतात ढसढसा रडलो. त्यानंतर मी नेहमी तुझ्याबरोबर राहायला लागलो.

तुझ्या आईला दुसर्‍यांदा ब्रेस्ट कॅन्सरने गाठले. डॉक्टर तेच! ह्यावेळी त्यांची ब्रेस्ट्स काढून टाकली गेली. पण त्या वाचल्या.

माझ्या कविता तुला तोंडपाठ असायच्या. नशिबात पाहिजे ना, मीही तयार आहे आणि आलास तू उशिरा तर तू सतत गुणगुणायचास! पण मी गझलेकडे वळलो आणि तू माझ्यावर प्रचंड टीका सुरू केलीस. तंत्रात अडकून मी नैसर्गीक खयालांची वाट लावत आहे हे मत तू प्रत्येक भेटीत बोलू लागलास. इतक्या तीव्रपणे, की शेवटी ते सहन न होऊन तुझे आणि माझे वाद झाले.

तुझे आयुष्य निराळ्याच रुळांवरून चालले होते. घरात काहीही सुख नसणे, मुलांनाही आईने बापाविरुद्ध फितवलेले असणे, हिंजवडीला जॉब, सतत गाणी ऐकणे, एकटे एकटे जगणे, खूप पैसे हाताशी असणे, ड्रिंक्स आणि चिकन!

एक दिवस तुझी बायको तुला म्हणाली की ती तुझ्या मुलांना घेऊन माहेरी चालली आहे. 'ओव्हर माय डेड बॉडी' असे ओरडून तू रडत राहिलास.

मकरंद, कोणालाही समजू न देता तू जे दु:ख भोगत होतास ते आठवले की असे वाटते की तुझ्याऐवजी मी गेलो असतो तर बरे झाले असते. निदान आज ही अपराधी भावना नसती माझ्या मनात!

२०१२ साली मला माझ्या रक्ताने मृत्यूच्या दारात नेले आणि परत आणले. तेव्हा आपले नाते घटनाक्रमाचे अविरत घाव सोसून विशविशीत झाले असूनही तू दररोज हॉस्पीटलला यायचास. मी नोकरी सोडली आणि तू मला म्हणालासः

"आय अ‍ॅम जेलस, तुला इतका फ्रीडम मिळतो हे पाहून"

आपण परत कधीच पूर्वीसारखे हसलो नाहीत, फिरलो नाहीत. भेटलो नाहीत. पण मने एकमेकांतच गुंतलेली राहिली.

तू एस्टीम विकून डिझायर घेतलीस. एक लाख ऐंशी हजाराची बुलेटही घेतलीस.

मी आजारातून उठल्याला दिड वर्ष झालं आणि २०१३ च्या ऑगस्टमध्ये तुझा मेसेज आला.

Friends, I am diagnosed with cancer.

२५ वर्षे डोळ्यांपुढून सरकली. तुझ्या बाबांना कॅन्सर झाला होता तेव्हा तुझ्या डोळ्यांत पाणी होते. तुला कॅन्सर झाला तेव्हा तुझा एक कोरडा, रुक्ष मेसेज फक्त आला. अरे एकदा तरी म्हणायचंस की ये, मला मिठी मार, आपली मैत्री साजरी करू. पण नाही. तुला मिळवायचा होता विजय, कॅन्सर ह्या रोगावर! त्यामुळे तू तुझी मनस्थिती उत्तम ठेवत होतास. पराजिताची भावना स्पर्शूही देत नव्हतास. काही झालेच नाही अश्या थाटात वावरत होतास. तुला सहानुभुती दाखवणे म्हणजे मूर्खपणा ठरला असता.

ह्याहीवेळी डॉक्टर तेच! ज्यांनी तुझ्या वडिलांना एकदा आणि आईला दोनदा, ह्याच रोगातून वाचवले होते.

दुसर्‍याच दिवशी तुझ्या बायकोचा लांबलचक मेसेज मला! मकरंदला जे झालेले आहे त्याचे गांभीर्य तुम्हाला माहीत नाही. तुझी बायको हॉस्पीटलमध्ये येता कामा नये. तुला यायचे असेल तर ये. पण सहानुभुती दाखवायची गरज नाही.

आयुष्यात पहिल्यांदा मला तिचा इतका राग आला की ती समोर आली असती तर मी अक्षरशः फोडून काढले असते तिला!

मी तुला भेटायला पहिल्यांदा हॉस्पीटलमध्ये आलो आणि आपली झालेली नजरानजर! त्यापुढच्या तीन वर्षांमध्ये तू एकदाही डोळ्यांत पाणी आणले नाहीस, पण त्या एका क्षणी झालेल्या नजरानजरीत मात्र तुझ्या डोळ्यांत पाणी तरळले. मी धसकाच घेतला. आणि तुला रोग झाल्याचे कळल्याच्या तिसर्‍या दिवशी तुझी बायको तुझ्याशी कशावरून तरी कडाक्याचे भांडली आणि त्यानंतर तुझे प्रेत पाहायलाही आली नाही.

मकरंद, दु:खाचे कोसळणारे हे डोंगर तू कसे सोसत होतास काही समजतच नाही! ज्या क्षणी आपल्यांची सर्वाधिक सोबत आवश्यक असते तेव्हा तू एकटा एकटा होऊ लागला होतास. एक प्रकारे बरेच झाले म्हणा, तुझ्याशी फक्त भांडणच करू शकणारी व्यक्ती निदान बाजूला तरी झाली. त्यामुळे गार्गीच तुझ्या आयुष्यात ऑफिशिअल प्रवेश तरी सुकर झाला.

पहिल्या सर्जरीनंतर डॉक्टरांनी बाहेर येऊन गाठी दाखवल्या. ते बघतानाही कसेसे होत होते. तू आतच होतास.

मृत्यूंजय म्हणजे काय ते पुढच्या तीन वर्षांत मला दिसत राहिले. कणाकणाने पोखरणारा कॅन्सर तुला खेळवत राहिला आणि तू त्याला! एकदा तू मला म्हणालास की तुझ्या डॉक्टरांनी तुला सांगितले आहे की 'मकरंद, ह्या रोगाची गांड मार'! तू पुढे म्हणालास की 'मी खरोखर गांड मारणार आहे कॅन्सरची'! मी थक्क होऊन तुझा वावर पाहात राहायचो.

तुला केमोला नेताना तू गाडीत शेजारी बसायचास आणि स्वतःच गाणी लावायचास! गप्पा मारायचास! मी आणि मुज्या हादरलेलो असायचो.

कैकदा तुला जोशी हॉस्पीटल आणि रुबीला नेताना मी तुझ्यातील योद्धा पाहिला. हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिशनही तुझी तूच घ्यायचास. म्हातारे आई वडील सिंहगडला असल्यामुळे त्यांना येणे शक्य नसायचे. गार्गी तिचे काम आटोपले की यायची आणि तुला डिसचार्ज मिळेपर्यंत तुझ्यासोबत राहायची. पण तू स्वतःच अ‍ॅडमिशन घ्यायचास. कॅन्सर म्हणजे जणू कोणी देवदूत असल्यासारखा तू वागायचास! कोण जाणे, कदाचित तुला मनात असेही वाटत असेल की हा रोग बरा झाला ते बरे झाले, इथून सुटका तरी मिळेल.

तू, मी आणि मुज्या एकदाच मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा तू म्हणालास.

'मी डॉक्टरांना विचारले. ते म्हणाले स्मोकिंगने नाही होत कॅन्सर'

नंतर एकदा रुबीला रेडिएशनच्या सेशनसाठी आपण दोघे थांबलेलो असताना तू म्हणालासः

'मी खूप अ‍ॅसिडिक खायचो ना सारखे? समोसे, चिकन वगैरे, त्यामुळे झाला बहुतेक मला कॅन्सर'

प्रत्येक केमो झाली की म्हणायचास. 'नाऊ इट इज डन डील'! केस गेले, गळा काळाकुट्ट झाला. आवाज घोगरा झाला. वजन झरझरा खाली आले. तरी म्हणायचास. आय अ‍ॅम नॉट बॉदर्ड अबाऊट कॉस्मेटिक चेंजेस!

एकदा रेडिएशन आणि केमोचा एक संपूर्ण कार्यक्रम संपला. काही महिन्यांनी पुन्हा डोके वर काढले कॅन्सरने! तेव्हा म्हणालास. 'डॉक्टर म्हणतायत की काही वेळा असा उपटू शकतो पुन्हा रोग, एक लास्ट केमो आणि रेडिएशन घेतले की इट इज डन'.

गार्गी आता कायमस्वरुपी तुझ्या घरीच राहू लागली. तुझी बायको मुलांना घेऊन तुझ्या दुसर्‍या फ्लॅटवर कायमची निघून गेली. रोगातून बाहेर पडलास की तू आणि गार्गी लग्न कराल हे आता कोणीही सांगू शकत होते. तुझ्या आई वडिलांचे मनही जिंकले गार्गीने! तू तर तिचा जीव की प्राण होतास आणि तीही तुझी!

तुझ्यावर झालेल्या वैभवशाली पण एकाकी, अशांत अश्या आयुष्य नावाच्या शस्त्रक्रियेसाठी गार्गी हा दैवाने दिलेला अ‍ॅनेस्थेशिया होता.

तू हळूहळू रोगाचे टप्पे एन्जॉय करू लागलास.

परत उगवलेला रोग तुला वजनाने निम्मा करून गेला. तुझा आहार बदलला. आवाज बदलला. आणि एक दिवस तू घोषणा केलीस.

'आय अ‍ॅम आऊट ऑफ इट, लेट्स सेलिब्रेट'

३१ डिसेंबर २०१५ रोजी तुझ्या घरी पार्टी करण्याचे ठरले. पण काही कारणाने ते एक जानेवारीला करायचे असे ठरवण्यात आले.

मकरंद, त्या दिवसाला परवाच्या दिवशी एक वर्ष होईल! आपण सहा जण होतो. फक्त तुझ्या बायकोच्या जागी गार्गी इतकाच फरक होता. सोबत काढलेली अडीच दशके फळाला आली होती. तू रोगमुक्त झाला होतास. आपण स्कॉच घेतली. तुला स्कॉच वगैरे घ्यायला परवानगी मिळालेली होती.

जबरदस्त पार्टी झाली. तुला बोलताना त्रास होत होता. तुझ्यासारखा अखंड बोलणारा माणूस बोलल्याशिवाय कसा राहत असेल असे वाटले. ते फोटो आजही बघताना भडभडून येते.

नंतर लगेचच तू एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप काढलास. फक्त तू, मी आणि मुज्याचा! त्यावर तू स्टेटस लिहू लागलास,. तो ग्रूप अजूनही तसाच आहे. त्यावर तुझे शेवटचे मेसेजेस वाचून गलबलते म्हणून मी तो आता पाहतच नाही.

मग एक दिवस तू गार्गीबरोबर तिच्या सासवडच्या घरी गेलास. तुला ड्रायव्हिंगचीही परवानगी मिळाली होती.

परत येताना तुझ्या तोंडातून रक्त येऊ लागले. गाडीत सर्वत्र रक्त पसरले. तसाच घरी परतलास. दुसर्‍या दिवशी पहाटे परत रक्त जाऊ लागले. तुला घेऊन गार्गी हॉस्पीटलमध्ये धावली. मी आणि मुज्याही धावलो.

तुझ्याकडे पाहताना अक्षरशः काटा येत होता अंगावर! तुझ्या तोंडातून प्रचंड रक्त जात होते. नर्सेस, आजूबाजूचे पेशंट्सही हादरलेले होते. गार्गी धाय मोकलून रडत होती. आणि तू सगळ्यांना त्या अवस्थेत सांगत होतास की तू ठीक आहेस, काळजी करण्याचे कारण नाही. मी ह्या डोळ्यांनी पाहिले की तीन मग भरून रक्त फेकले गेले. गादी आणि चादर रक्ताने माखलेल्या होत्या. तुला आय सी यू मध्ये ठेवले. तिथेही तू खाणाखुणा करून इतरांनाच धीर देत होतास. दोन दिवसांनी तुला साध्या रूममध्ये हलवले. डॉक्टर तुला पाहायला आले. तेच डॉक्टर!

तुला म्हणाले:

"आय डोन्ट वॉन्ट यू टू फाईट विथ इट एनी मोर, मेक पीस विथ इट"

हे वाक्य ऐकताना मी आतल्याआत गदगदत होतो. पण तू? तू हसत हसत डॉक्टरांना घोगर्‍या आवाजात 'येस सर' म्हणालास. तुला थोपटून डॉक्टर बाहेर आले आणि आम्हाला म्हणाले.

"त्याची शेवटची स्टेज आहे. त्याला शांतपणे जाऊदेत"

तुझे आई वडील कोसळले. मीही भिंतीला टेकलो. गार्गीची अवस्था बघवत नव्हती.

आणि आश्चर्याचा धक्का! तू घरी परत आलास. आधाराने का होईना, पण स्वतःच्या पायांनी जिना चढलास. रक्त येणे थांबले. आता तुझ्या घशातून अन्न जात नव्हते. म्हणून काही दिवसांनी तुझ्या पोटातून थेट ट्यूब घातली. गार्गी त्यातून पौष्टिक लिक्विड तुला पाजायची. ज्या माणसासाठी 'स्वाद' हे जगण्याचे एक महत्वाचे कारण होते त्याला चव न घेताच अन्न पचवावे लागत होते.

आम्ही दोन वेळा गार्गीला सांगितले. आपण सेकंड ओपिनियन घेऊयात का? पण बहुधा तुलाच ते मान्य नसावे.

असेच दोन महिने गेले. ३१ मार्चला तुझा सेहेचळिसाव्वा वाढदिवस साजरा झाला. तू कसाबसा हसत होतास. नेहमी तुझ्या वाढदिवसाला ग्लेनफिडिश ओपन व्हायची.

आणि मग आणखी एक महिना गेला. पाच एप्रिल उजाडला.

नेहमीसारखाच एक दिवस! गार्गी कॉल सेंटरमध्ये कामाला असल्यामुळे संध्याकाळी कामाला गेली. रात्री साडे नऊला तिचा मला कॉल आला. नेमक्या वेळी माझे फोनकडे का लक्ष नसते कोण जाणे! मग तिने मुज्याला कॉल केला. तुला त्रास होऊ लागला होता. मी मिस्ड कॉल बघून गार्गीला फोन केला आणि हे कळताच तुझ्या घरी धावलो.

तू नेहमीच्याच सोफ्यावर बसला होतास. डोळे फिरवत होतास. छातीतून घरघर आवाज ऐकू येत होता. मी आणि मुज्या आणि तुझे आई वडील तुला गदागदा हालवत होतो. हाका मारत होतो. मध्येच तू आमच्याकडे पाहिलंस आणि हात हलवलास. गार्गी कॅब घेऊन सुसाट निघाली होती परत यायला. तुला हॉस्पीटलमध्ये हलवायला तुझे आई बाबा नकार देत होते. कदाचित त्यांना जाणवले होते.

तुझ्या चेहर्‍यावर कितीदातरी पाणी शिंपडले. माझी बायको आणि मुज्याची बायकोही धावून आल्या. बालगंधर्वपाशी जेव्हा गार्गीची कॅब पोचली तेव्हा तिने फोन केला. तेवढ्यात मुज्या म्हणाला आपण अँब्युलन्स बोलवू. मी अँब्युलन्स बोलावली.

तू हळूहळू ह्या आयुष्यातून बाहेर चाललेला होतास. कोणत्यातरी क्षणी मला समजले की प्रयत्न करण्यात काही अर्थच नाही आहे. तुझ्यासाठी आयुष्यात सर्वाधिक प्रिय असलेल्या सातपैकी सहाजण तिथे उपस्थित होते.

सातवी व्यक्ती म्हणजे गार्गी आणि अ‍ॅम्ब्यूलन्स एकदमच आले. गार्गीने घरात प्रवेश केला आणि शेवटचा निष्फळ प्रयत्न केला तुला रोखण्याचा! तुला जेमतेम समजले की हवे ते सगळे जमलेले आहेत आता आणि तू डोळे फिरवून जमीनीकडे झेपावलास.

तुझा मृत्यू! बावन्न मिनिटे मी आणि आम्ही सगळे तुझा मृत्यू बघत होतो. माणूस कसा सर्व सेन्सेसच्या पलीकडे जातो ह्याचे जिवंत उदाहरण पाहत होतो. तुला हॉस्पीटलमध्ये नेल्यावर मृत म्हणून घोषित केले आणि गार्गीचा संयम संपला. तुझे आई बाबा हमसू लागले.

मी आणि मुज्या शुन्यात बघत बसलो होतो. तू कसा आयुष्यात आलास आणि कसा गेलास, सगळेच हादरवणारे होते.

तू बनवलेला व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप आता निर्जीव झालेला आहे. तुझ्या स्मृतीप्रीत्यर्थ गार्गीने आम्हा पाचजणांचा वेगळा ग्रूप बनवला आहे आणि त्याचे डीपी आहे तुझा फोटो!

तुझ्या बायकोने तुझे प्रेत पाहिले नाही. मोठा मुलगा तेवढा येऊन रडून गेला.

तुझ्या अस्थींवर झाड लावले आहे.

गेल्या आठवड्यात तुझ्या आईला पुन्हा कॅन्सर झाला. पण किरकोळ उपचारांनंतर त्या त्यातून बाहेर पडणार आहेत.

तू ज्या पद्धतीने कॅन्सरशी लढलास ते पाहून कॅन्सर हा रोग अक्षरशः लज्जित झाला असेल. इतकी हिम्मत, इतके धाडस! तू आम्हाला खूप काही शिकवून गेलास, पण ते तू गेल्यानंतर प्रकर्षाने जाणवले हे दुर्दैव!

तुझ्या घरावरूनच रोज यावे जावे लागते. आता ते तीनमजली घर अंधारात बुडलेले असते. आपल्या मैत्रीसारखेच!

अजून दोन दिवसांनी आपल्या पार्टीला एक वर्ष होईल. तू जिथे कुठे असशील तेथे तुला हॅपी न्यू इअर!

मकरंद, एकदा जरी वाटलं असतं की तू असा जाणारेस, मी माझं आयुष्य पणाला लावून तुझा प्रत्येक क्षण आनंदी बनवला असता.

कधीतरी हे लिहायचंच होतं मला! तुझा माझ्या हातात झालेला मृत्यू, मृत्यूसमयी तुझे हळूहळू शुद्ध हरपणे, आपण व्यतीत केलेली एकुण २८ वर्षे! ह्यातून उतराई होण्यासाठी माझ्याकडे फक्त हे असं काहीतरी लिहिणंच उरलेलं आहे. बाकी सगळं वैभव तर तुझ्यामुळेच होतं!

जब जिस वक्त किसीका
यार जुदा होता है
कुछ ना पुछो, यारो दिल का
हाल बुरा होता है
दिलपे यादोंके जैसे
तीर चलते है
दिये जलते है, फूल खिलते है....
बडी मुश्किलसे मगर दुनियामे दोस्त मिलते है!

तुला झालेला कॅन्सर........

माझा प्रत्येक दिवस आजही उदास करतो........आणि हे मी म्हणत आहे हे तुला माहीतही होणार नाही........

मकरंद........

जे काय चुकलं माकलं, माफ कर मित्रा, हात जोडतो........

- भूषण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी , काय लिहु कळत नाही.
तुमच्या मित्राने मृत्युला दिलेल्या झुंजीला आणि त्याला प्रतिकुल परिस्थितीत साथ देणार्‍या गार्गीला सॅल्युट !

बेफी,
कित्येक दिवस वाट पहात होतो तुमच्या एखाद्या अफाट, धडाकेबाज लिखाणाची, पण ते असे किंवा अश्या एखाद्या लेखाच्या रुपातून समोर येईल असे वाटले नव्हते....हादरुन गेलो वाचताना.
सुन्न करुन गेले हे मैत्र !!!

-प्रसन्न

अदिती +१
कॅन्सरशी लढा सोप्पा नसतो Sad आम्ही तीन वेळा लढलोय... आजीबाबत त्याने हरवलं आम्हाला मात्र Sad
पण दॅट्स इट... आजी घेऊन गेली त्याला आपल्यासोबत... आता आम्ही सगळे सेफ आहोत !!
आज लेख वाचायला नको होता मी... आणि त्यात पुन्हा पुन्हा वर येतोय हा लेख Sad

बेफी, अक्षरशः रडवलंत. तुमच्या कोणत्याही लेखनाने मी इतकी अंतर्मुख झाले नव्हते, तितकी या लेखाने झाले. प्रत्येक क्षण तुम्ही डोळ्यासमोर उभा केलात. एका किमोनंतर मकरंदचे वजन निम्मे झाले असं लिहिलंत तिथे हडकलेला फुल शर्ट मधला मकरंद आला डोळ्यांसमोर. हे सगळं लिहिताना तुम्हाला किती वेदना झाल्या असतील याचीही फक्त कल्पनाच करू शकले.
हे सगळं वाचून ४६ वर्ष ऐकताना खूप जास्त वाटत असली तरिही आयुष्य क्षणभंगूरच आहे. आणि मकरंद नी सगळ्यातून वाट काढली कॅन्सर सारख्या भयंकर रोगाशी २ हात केले.
तसा प्रत्येक सजीव हा योद्धाच म्हणावा लागेल, पण मकरंदसारखे जीव खूप कमी असतात.
तुमच्या लेखणीने त्याच्या आयुष्यावर लिहिलेला हा लेख म्हणजे त्यांना वाहिलेली उत्तम श्रद्धांजली आहे बेफी.
तुमचं लेखन वाचून तुमच्यातला लेखक किती संवेदनशील आहे याचीही प्रचिती आली.
तुमच्या मित्राला मनःपूर्वक श्रद्धांजली.

बापरे... अशक्य लिहिलय.. खरच रडवलत..

.जब जिस वक्त किसीका
यार जुदा होता है
कुछ ना पुछो, यारो दिल का
हाल बुरा होता है.....

सार्थ आहेत ओळी या दोस्तीला...

छान लेख असं म्हणवतं नाहिये...
खुप रडवलत हो ....
ईतकं दु:ख कधीही कोणाच्याही वाट्याला येउ नये..

छान लेख असं म्हणवतं नाहिये...
खुप रडवलत हो ....
ईतकं दु:ख कधीही कोणाच्याही वाट्याला येउ नये..+ १

बेफी,छान लिहीले आहे असे म्हणवत नाही,पण शब्दांकन चांगले केले आहे.माझ्या मते मकरंद यांच्या कुटुंबात कॅन्सर पिढीजात असतानाही त्यंनी पथ्य पाळायला हवी होती.
असो,चांगला मित्र गमावने ही मोठि पोकळी आहे.तुम्हाला आज हे लिहुन मोकळे झाल्यासारखे वाटले असेल .

बेफी,
कित्येक दिवस वाट पहात होतो तुमच्या एखाद्या अफाट, धडाकेबाज लिखाणाची, पण ते असे किंवा अश्या एखाद्या लेखाच्या रुपातून समोर येईल असे वाटले नव्हते....हादरुन गेलो वाचताना.
सुन्न करुन गेले हे मैत्र !!! + ११११११११११११

निशब्द करणार लिखाण बेफीकीर,
कॅन्सर म्हटलं कि वाचायचं टाळतेच कारण तो शेवट नको असतो. जवळच्या माणसांना ओरबाडून नेलंय या रोगानं. वर्षभरा पूर्वीच मैत्रीण आपल्या दोन वर्षाच्या पिल्लाला सोडून गेली ब्रेस्ट कॅन्सरन. पुन्हा ताज्या झाल्या त्या आठवणी...

@ बेफिकीर - तुम्ही ह्या लेखात तुमच्या मित्राच्या वैयक्तीक आणि कौटुंबिक गोष्टी उगाचच नाव न बदलता मांडल्या आहेत.

तुमचा मित्र मकरंद हा माझ्या कंपनीत काही वर्ष होता, तो कँसरनी गेल्याचे पण मला माहिती होते. तुम्ही त्याचे नाव न बदलल्यामुळे आणि ब्लुमिंगटन चा उल्लेख केल्यामुळे त्याच्या खाजगी बाबी पण समजल्या.

मकरंद तर आता गेला आहे पण त्याच्या त्याकाळातल्या बायको बद्दल वाचणार्‍याचे समज्/गैरसमज होऊ शकतात.

कृपया हे टाळता आले तर बघा.

तुमच्या मित्राला मनःपूर्वक श्रद्धांजली............

मकरंद तर आता गेला आहे पण त्याच्या त्याकाळातल्या बायको बद्दल वाचणार्‍याचे समज्/गैरसमज होऊ शकतात.

कृपया हे टाळता आले तर बघा.
१०० ++

टोचा यांच्याशी सहमत

नको होता का वाचायला? सुरु केल्यावर थांबवल पन नाही.. मावशीचं जाणं आठवलं.. वयाच्या ४२व्या वर्षी कॅन्सरनं.. तब्बल ९ ऑपरेशन झेलले तिने.. कळस होता तो तिच्या आमच्यासाठी Sad

जीवघेणं लिहिलंय .रडवलत Sad
तुमचं लेखन वाचून तुमच्यातला लेखक किती संवेदनशील आहे याचीही प्रचिती आली.>>+१११

Pages