संकल्पाची संकल्पना !

Submitted by किंकर on 27 December, 2016 - 13:45

संकल्पाची संकल्पना ! -

वर्ष संपत आले कि , यावर्षीच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या एक तारखेपासून मी .......
१. ......पहाटे उठून फिरावयास जाणार
२...... दररोज नियमित व्यायाम करणार
३..... या या विषयांचे संदर्भात वाचन करणार असे ,
आणि त्या पुढे आपल्या मनातले संकल्प मांडण्यास सुरवात करतो .

संकल्प सोडणे किंवा केलेला संकल्प मध्येच सोडून देणे हे आपण नेहमीच करतो. यावर्षी आपण असा संकल्प करू या की , मी जो संकल्प करेन तो मध्येच सोडणार नाही.

एखादी गोष्ट करायचे ठरवले कि होते . हे सहा शब्दांचे वाक्य म्हणायला सोपे पण आचरणात आणणे अवघड असते . पण अशक्य कधीच नसते. आणि असा माझा यावर्षीचा संकल्प आणि त्याची आजची फलश्रुती यावर आपणाशी संवाद साधणार आहे .

यावर्षी सुरवातीला एका लग्न समारंभासाठी सुट्टी घेतली. भारतीय प्रजासत्ताक दिनी विवाह सोहळा पार पडला समारंभाचे सूप वाजले आणि सुट्टी संपवून परत रहाटगाडगे सुरु करताना वजन काट्यावर उभा राहिलो. आणि काटा अशा काही वेगाने फिरलो कि बस्स ... काट्याने अवघे पाऊणशे किलोमान गाठले होते.

ती तारीख होती १७ फेब्रुवारी २०१६ .

त्याच दिवशी संकल्प केला कि , घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, पण वजनाचे काटे नक्कीच उलटे फिरवता येतील . चला तयारीला लागु या .

सर्वात प्रथम ठरवले कि , कोणताही संकल्प करताना नवीन वर्ष ,पहिली तारीख असे काही लागत नाही. आज आत्ता या क्षणी मनाशी नक्की करा मला हे करायचे आहे आणि मी ते करणार .

आणि माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरु झाला. आता तो प्रवास कसा झाला हे मी तुमच्या समोर उलगडणार आहे.

शारीरिक व्यायाम - यामध्ये -

१. यापूर्वी योगासने नियमित करीत असे त्यात खंड पडला होता प्रथम ठरवले पुन्हा योगासनांकडे वळायचे .पूर्वी योगासने सकाळी सहा ते सात यावेळेत करत असे ,आता कामासाठी घर सकाळी सहा वाजता सोडावे लागत असे म्हणून ,सायंकाळी घरी परत आल्यावर सहा ते सात हि वेळ योगासनां साठी नक्की केली, आणि सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस दररोज योगासने केली. जर या पाच दिवसात एखादा दिवस चुकला तर शनिवारी तो दिवस एक तास योगासने करून भरून काढायचा अशी शिस्त पाळली. गेल्या दहा महिन्यातील आठ महिने यात सातत्य ठेवले.

एक तासाची योगासने करताना त्यात पहिली पाच मिनिटे पूरक व्यायाम , पुढील वीस मिनिटे तेरा सूर्यनमस्कार ,दहा मिनिटे पाठीवर झोपून ,दहा मिनिटे पोटावर झोपून ,दहा मिनिटे बैठक स्थितीत ,व पाच मिनिटे उभा राहून ,आणि शेवटी ओंकार जप असे योगासनांचे व्यायाम केले

२. याप्रकारे योगासने सुरु असताना तीन महिन्यानंतर , रात्रीच्या जेवणानंतर पहिला एक महिना पंधरा ते पंचवीस मिनिटे भरभर चालण्याचा ( वेगवान शतपावली करण्याचा ) जोड व्यायाम सुरु केला त्यानंतर जेवणाची वेळ रात्री नऊ वरून साडेआठ वर आर्धा तास अलीकडे आणली.

३.त्यानंतर जेवणानंतर मध्ये एक तास जाऊ देऊन मंदगतीने धावण्यास सुरवात केली व त्याची वेळ पंचवीस मिनिटांपासून वाढवत एक तासापर्यंत नेली असा व्यायाम पुढे सहा महिने चालू ठेवला.

४ गेला एक महिना आता थंडीमुळे धावण्याचा व्यायाम बंद आहे, पण योगासने व अधून मधून (आठवड्यातून एक/दोन वेळा ) ट्रेडमिल वर पंचवीस ते तीस मिनिटे धावण्याचा सराव ठेवला आहे .

आहार नियंत्रण - यामध्ये
१. पेयपान - यात चहा पूर्वी साधारणतः ३ कप होत असे तो १ कपावर आणला . पूर्वी चहात कपाला २ चमचे साखर असे ती कपाला १ चमचा इतकी केली.

२. वजन वाढण्यापूर्वी खात असलेल्या कोणत्याही गोष्टी खाण्याचे थांबवले नाही. पण सर्व आहार घेताना सावकाश जेवण्यास सुरवात केली .याठिकाणी सावकाश म्हणजे सह + अवकाश = सावकाश. म्हणजे पोटामध्ये अवकाश (पोकळी )राखून जेवण्याची सवय केली . सुरवातीस हे थोडे जाणीव पूर्वक करावे लागते पण नंतर मेंदू स्वतः सूचना देऊ लागतो .

म्हणजे तुमचा सध्याचा आहार एक वाटी भात , तीन चपात्या ,एक वाटी भाजी एक वाटी आमटी , आणि काही गोड असे खाण्याची सवय असेल तर सावकाश जेवणे म्हणजे भात आर्धा वाटी , दोन चपात्या इतका बदल पुढील एक/दोन महिन्यात आठ आठ दिवसांच्या अंतराने टप्याटप्याने करणे. गोड खाणे कमी करणे. म्हणजे दोन बर्फीचे तुकडे खात असाल तर दोन वरून दीड , मग एक आणि मग अर्धी असे प्रमाण कमी करणे

या प्रकारे सातत्याने आठ महिने जाणीवपूर्वक शिस्त पाळली. परिणाम स्वरूप मला पुढील प्रमाणे यश मिळाले -
पहिला महिना - दोन किलो
दुसरा महिना - दोन किलो
तिसरा महिना - दोन किलो
चौथा महिना - तीन किलो
पाचवा महिना - एक किलो
सहावा महिना -एक किलो
सातवा महिना -एक किलो ,याप्रमाणे सात महिन्यात सप्टेंबर २०१६ अखेर १२ किलो वजन कमी झाले आता वजन काटा ६२ किलो ते ६३ किलो यामध्येच खालीवर होत राहतो .
आणि त्यामुळे मी आता म्हणू शकतो - एखादी गोष्ट करायचे ठरवले कि होते .

हे झाले आधी केले मग सांगितले या प्रकारातील संकल्पाबाबत .

आता २०१७ साठी संकल्प केला आहे तो म्हणजे मॅरेथॉन शर्यत प्रकारातील अर्ध मॅरेथॉन शर्यत मे २०१७ मध्ये पूर्ण करणे . जेंव्हा वजन कमी करण्यासाठी धावण्यास सुरवात केली तेंव्हा रोज पंधरा मिनिटे इतकेच धावत होतो . मग विचार केला वजन तर कमी झाले आता या धावण्याला एक दिशा द्यावी .

मग सर्वात प्रथम मॅरेथॉन विषयी माहिती घेण्याचे ठरवले . मग त्याची माहिती गोळा करताना खूपच मजा आली प्रथम मनात आले कि आपण मॅरेथॉन मध्ये ५५ ते ६० या वयोगटात असताना पहिल्यांदा भाग घेतोय ,इतक्या उशिरा असे धाडस करणारे फारसे कोणी नसेल .

पण जेंव्हा फुजासिंग हे नाव ऐकले तेंव्हा माझा आपण खूप उशिरा मॅरेथॉन कडे वळतोय हा भ्रम दूर झाला. कारण फुजासिंग यांनी वयाच्या ८९व्या वर्षी धावण्यास सुरवात केली आणि स्वतःची सातवी मॅरेथॉन वयाच्या १००व्या वर्षी टोरोंटो कॅनडा येथे पूर्ण केली .

महिलांच्या बाबत हाच मान थॉमसन नावाच्या महिलेस सॅन दिएगो येथील मॅरेथॉन स्पर्धेत जुन २०१५ मध्ये मिळाला आहे .सदर स्पर्धा संपवताना थॉमसन यांचे वय ९२ इतके होते .

मग विचार केला कि जर धावण्यास या पूर्वी लहानपणीच सुरवात केली असती तर किती बरे झाले असते ,कारण खूप लहानपणी धावणारे फारसे कोणी नसेल .

पण जेंव्हा बुधिया सिंह हे नाव ऐकले तेंव्हा आणखी एक धक्का बसला . कारण ओरिसा भारत येथील बुधिया सिंह वयाच्या चौथ्या वर्षी पुरी ते भुवनेश्वर हे ६५ किमी चे अंतर सात तास दोन मिनिटे इतक्या वेळेत धावला.

यातून मी इतकेच शिकलो कि एखादी गोष्ट पूर्ण करायची हे ठरवण्यासाठी वयाचे बंधन नसते. बंधन असते ते आपण स्वतः मनात तयार केलेल्या आपल्याच बंधनाचे. आणि या वर्षी असे बंधन तोडायचे हे मी ठरवून टाकले आहे .

वजन कमी करण्याचा कार्यक्रम म्हणून वेगे वेगे नाही पण थोडे थोडे धावण्यास सुरवात केली आहेच . पंधरा मिनिटे सलग पासून धावत राहण्याची वेळ आता सत्तर मिनिटांपर्यंत पोहचली आहे. सलग धावण्याचे अंतर एक किमी पासून वाढवत दहा किमी पर्यंत वाढले आहे.

आता येथील दीर्घ हिवाळा संपला कि पुन्हा रस्त्यावर धावण्याच्या सराव सुरु होईल मग मात्र पळता भुई थोडी होईल कारण पुढील तीन महिन्यात धावण्याची वेळ ,वेग आणि अंतर वाढवण्याचे उद्दीष्ट आहे .

जर सर्व काही नियोजनानुसार घडले तर मी २०१७ मध्ये अर्ध मॅरेथॉन व नंतर नजीकच्या भविष्य काळात पूर्ण मॅरेथॉन धावण्याचे ध्येय आहे . गरज आहे तुम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छांची !

हो पण मला फक्त तुमच्या शुभेच्छा नको आहेत तर पुढील वर्षी तुम्ही पूर्ण केलेल्या एखाद्या संकल्पाची माहिती देखील तुमच्या कडून ऐकायला आवडेल .चला तर संकल्पाची मॅरेथॉन धावण्यास प्रारंभ रेषेवर जमू या आणि सगळेच म्हणू या -" On our mark get set go " .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ किंकर, आपण केलेला संकल्प पूर्ण केला, त्याबद्दल आपले अभिनंदन! त्याकरिता आपण घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. मॅरेथॉन धावण्याचा आपला संकल्पही तडीस जावो हीच सदिच्छा!

श्री. सचिन काळे - आपल्या प्रतिसादासाठी आणि मॅरेथॉन उपक्रमास दिलेल्या शुभेच्छांसाठी आपले मनपूर्वक आभार .

अदिती - धन्यवाद !
राया - एखादी गोष्ट करायचे ठरवले कि होते . तेंव्हा मॅरेथॉन साठी लगेचच तयारीला लागा ,तुमचा मॅरेथॉन मधील सहभाग ह्याच सर्वात सुंदर शुभेच्छा