रुग्णास देण्यासाठी पातळ किंवा द्रवरूप आहार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 December, 2016 - 07:17

घरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.
संबंधित रुग्ण जर कोणत्या शस्त्रक्रियेतून सावरत असेल तर खूपच काटाकाळजीने हे सर्व अन्न तयार करावे लागते. रुग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत या अन्नाचेही महत्त्वाचे योगदान असते हे ध्यानी ठेवून ते तयार करावे लागते.

श्वासमार्गातून पोटात थेट नळी सोडून जेव्हा त्यावाटे अन्न द्यावे लागते त्या अन्नाची घनता, तापमान, चिकटपणा, पचण्यास सुविधा, प्रमाण, त्यात घातलेल्या घटकांनी नळी खराब होऊ नये यासाठी तसे घटक टाळणे, पोषण वगैरे सर्वच बाबी पाहावयास लागतात. असे अन्न डॉक्टर व आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच बनवावे लागते व अनुभवी नर्सेस असे अन्न रुग्णाला देतात. परंतु ही नळी काढल्यावरही लगेचच घन आहार देता येत नाही. पुढचे अनेक दिवस मुख, अन्ननलिका, श्वासनलिका व पचनसंस्थेतील सर्व अवयवांना तोंडावाटे आहाराची पुनश्च सवय करवून घ्यावी लागते. हे अन्नही नळीवाटे पोटात जाणार्‍या अन्नासारखेच असले तरी आता जीभ, दात, तोंडाचा अंतर्भाग हेही अन्नग्रहणाच्या प्रक्रियेत सामील झाले असल्यामुळे त्या अन्नात स्वादासाठी सौम्य स्वरूपात वेगवेगळे घटक पदार्थ वापरता येतात. तरीही डॉक्टर्स सुरुवातीला चवीला अगदी फिके, पचायला हलके व तापमानास कोमट असे अन्नच रुग्णाला द्यावे हे सामान्यतः सुचवतात.

खालील काही अन्नप्रकार हे याच दृष्टिकोनातून आहारतज्ज्ञांनी सुचवले व त्यांत सुयोग्य भर टाकत, त्यांची मान्यता मिळवून आमच्या घरातील रुग्णासाठी आम्ही हे अन्नप्रकार नियमित रूपात बनवतो. खालील प्रमाण हे साधारणपणे २०० ते २५० मिली द्रवरूप अन्नप्रकारांसाठीचे आहे. फक्त वरणभाताचे प्रमाण हे साधारण ४०० ते ४५० मिलीचे आहे. दिवसात साधारणपणे दर दोन ते तीन तासांनी हे अन्न रुग्णाला गरम करून / ताजे बनवून ते कोमट तापमानास आणून खायला द्यावयाचे असल्यामुळे जातीने लक्ष घालून सर्व प्रकार बनवावे अथवा बनवून घ्यावे लागतात.

हे अन्नप्रकार पचावयास तुलनेने हलके आहेत, पोषणमूल्ययुक्त आहेत, पातळ किंवा द्रव स्वरूपातील आहेत, तसेच ते त्या व्यक्तीच्या नेहमीच्या डॉक्टरांनी व आहारतज्ज्ञांनी मान्यता दिलेले आहेत. व्यक्तीनुरूप, व्याधिनुरूप व प्रकृतिनुरूप यांत नक्कीच फरक पडेल.

तांदळाची पातळसर खिचडी, पोळीचा कुस्करा दूध / वरण / ताकातून, आरारूटची खीर, वेगवेगळी सौम्य चवीची सूप्स, तांदळाचा पातळसर वरणभात / कढीभात / दूधभात / ताकभात, तांदळाची कणेरी, पातळसर सांजा / शिरा, वेगवेगळ्या खिरी हे प्रकार रुग्णाची पचनशक्ती, अन्न चावून खाण्याची व गिळण्याची क्षमता, तब्येत व पथ्य पाहून त्यानुसार देता येऊ शकतात.

याखेरीज डॉक्टरी सल्ल्यानुसार आहारपूरके, आहारपूरक पावडरी पाण्यात मिसळून देता येतात. प्रोटीन पावडरी, डायबेटिक मील्स वगैरे अनेक प्रकारची व ब्रँड्सची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती योग्य प्रमाणात घ्यावीत.

तसेच मोड आलेले हिरवे मूग शिजवून व कुस्करून, उकडलेले रताळे कुस्करून, गाजर / श्रावण घेवडा उकडून व कुस्करून, अधमुर्‍या दह्याचे गोड ताजे ताक, फळांचा गर, शहाळे यांचाही आहारात डॉक्टरी सल्ल्यानुसार, ऋतुमानानुसार व आवडीनुसार समावेश करू शकता.

ही आहेत आमच्याकडे रोज तयार होणार्‍या द्रवरूप अन्नप्रकारांतील काही प्रकारांची प्रकाशचित्रे :

aai feed1.jpg

वरणभात, भाज्यांचे सूप, दलिया, उकडलेले व कुस्करलेले मोड आलेले हिरवे मूग, उकडून कुस्करलेले गाजर

fodni.jpg

ही साजूक तुपातील फोडणी एकत्रच बनवतो व त्या त्या खाद्यप्रकारावर वरून घालतो. घालताना त्यातील कढीपत्ता व आले वगळून ही फोडणी वरून घालतो. फोडणीतला बाजूला सारलेला कढीपत्ता व आले घरातील मूगडाळ वरणात वापरतो.

aai feed with fodni.jpg१.
मिश्र भाज्यांचे व धान्याचे सूप :

घटक पदार्थ :
दुधी भोपळा, साल काढून ४-६ मध्यम आकाराच्या फोडी
लाल भोपळा, बिया, शिरा, साल काढून ४-६ मध्यम आकाराच्या फोडी
गाजर, साल काढून, ४-६ मध्यम आकाराच्या फोडी
कुट्टू (बकव्हीट) भाजून चमचाभर

याखेरीज शेवगा, बीट, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, कोबी वगैरे आवडीनुसार व पथ्यानुसार भाज्याही थोड्या थोड्या वापरू शकता.
धान्यात बार्ली, ओट्स, कुट्टू शिजवून वापरू शकता.

कृती :

वरील सर्व भाज्या नीट धुवून, चिरून प्रेशर कुकरमध्ये बार्ली/ कुट्टू यांसह उकडून घ्याव्यात व मिक्सरमधून किंवा ब्लेंडरमधून त्या मऊसूत कराव्यात. आवडीनुसार व गिळण्याच्या क्षमतेनुसार पाणी कमी जास्त करावे.
स्वादासाठी वरून तूप-जिरे- चिमटीभर हिंग-आले-कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. तसेच चवीसाठी सैंधव, थोडीशी मिरपूड, दालचिनीपूड, चाट मसाला हेही घालू शकता.
देताना गरम करून मगच द्यावे. आम्ही या सूपमध्ये डॉक्टरी सल्ल्यानुसार चमचाभर सोयाबीन पावडर सूप गरम करण्याअगोदर घालून देतो.

२.
वरण-भात:

घटक पदार्थ :
कोणताही कणी प्रकारातील तांदूळ
मूगडाळ
मिळत असल्यास व रुग्णाच्या पथ्यास हितकर असल्यास राळे (फॉक्सटेल मिलेट / ईटालियन मिलेट)

कृती :

सर्व घटक १:१:१ (नैवेद्याची वाटी) प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवावेत.
या शिजलेल्या वरणभाताला ब्लेंडरमधून योग्य प्रमाणात पाणी घालून मऊसूत करून घ्यावे. वरून स्वाद, रंग, चव यांसाठी चिमूटभर हळद-हिंग, सैंधव, तूप-जिरे-हिंग - आले - कढीपत्ता यांची फोडणी घालू शकता.
रुग्णास पथ्यास चालत असेल तर क्वचित दिवशी मूगडाळीऐवजी मसूर डाळही वापरू शकता.

३.
लाह्यांचे सूप :

घटक पदार्थ :
राजगिरा लाही
वरई लाही
नाचणी लाही
ज्वारी लाही पीठ / राजगिरा लाही पीठ / साळी लाही पीठ / केळीचे पीठ यांपैकी कोणतीही दोन पीठे.

कृती :

एका लहान पातेल्यात चमचाभर साजूक तूप गरम करून त्यात जिरे, चिमटीभर हिंग-हळद-तिखट (अगदी जेमतेम) यांची फोडणी करून त्यात २०० मिली पाणी व चवीनुसार सैंधव घालून हे पाणी उकळावे. त्यात प्रत्येक लाहीप्रकार व लाहीपीठ २-२ स्कूप्स किंवा आवडीनुसार व उपलब्धतेनुसार घालावेत. २ मिनिटे हे मिश्रण उकळावे व नंतर कोमट होऊ द्यावे. रुग्णास पथ्यास चालत असेल तर यात चवीसाठी थोडेसे ताजे ताकही घालू शकता. रुग्णाला खायला देण्यापूर्वी यात एखादा स्कूप राजगिरा लाही वरून घालावी म्हणजे या लाही सूपला चांगला पोतही येतो.

laahya soup.jpg४.
नाचणी सत्त्व लापशी / खीर :

घटक पदार्थ :

चमचाभर नाचणी सत्त्व (आम्ही साखरविरहित वापरतो, रुग्णास चालत असल्यास साखरयुक्त नाचणीसत्त्वही वापरू शकता)
पाणी १५० मिली
दूध ५० मिली
दूध मसाला चिमूटभर (घरगुती दूधमसाल्यासाठी जायफळ पूड, वेलची पूड, केशर, बदाम पावडर वापरले आहे)

कृती :

१५० मिली पाण्यात चमचाभर नाचणीसत्त्व चांगले गुठळ्या मोडून, दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्यात ५० मिली दूध घालून एक उकळी काढावी. स्वादासाठी चिमटीभर दूध मसाला घालावा.

५.
राजगिरा लाही खीर

घटक पदार्थ :

राजगिरा लाही ४ स्कूप्स
पाणी १५० मिली
दूध ५० मिली
मिल्क पावडर १ स्कूप
खारीक पावडर १ चमचा
वरून घालायला १ स्कूप राजगिरा लाही
स्वादासाठी चिमटीभर दूध मसाला

कृती :

पाण्यात ४ स्कूप्स राजगिरा लाही घालून ते गरम करावे. त्यात ५० मिली दूध व १ चमचा खारीक पावडर घालून व्यवस्थित उकळावे. कोमट करून देताना त्यात १ स्कूप मिल्क पावडर मिसळून द्यावे व वरून स्कूपभरून राजगिरा लाही घालावी. चवीसाठी चिमटीभर दूध मसाला मिसळावा.

६.
रव्याची सरसरीत लापशी / उपमा

घटक पदार्थ :

भाजलेला रवा ४-५ चमचे (लापशी दाटसर हवी असेल तर रव्याचे प्रमाण वाढवावे)
पाणी २०० मिली
फोडणीसाठी चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, आले, किंचित तिखट (पथ्यास चालत असेल तरच)
चवीसाठी सैंधव

कृती :

पातेल्यात किंवा कढईत साजूक तुपाची फोडणी करून त्यात जिरे घालावेत, ते तडतडले की अनुक्रमे हिंग, आले, तिखट, कढीपत्ता घालून त्यात भाजलेला रवा घालावा व खमंग परतावा. त्यात २०० मिली पाणी घालून रवा फुलून येईपर्यंत मिश्रण उकळावे. लापशीत चवीनुसार सैंधव घालावे. लापशी कोमट करून मगच रुग्णास खायला द्यावी.

७.
दलिया सूप

बाजारात मिळणारा गव्हाचा दलिया घरी आणल्यावर हवा असल्यास स्वच्छ धुवून, निथळून कढईत कोरडा खमंग परतून घ्यावा. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावा.

कृती :

दलिया सूपसाठी नैवेद्याची वाटी भरून दलिया पुरेसे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावा व तो गार झाल्यावर एकूण माप २०० मिली होईल एवढे पाणी मिसळून तो ब्लेंडरमध्ये मऊसूत करावा.
त्यात चवीसाठी वरून साजूक तूप-जिरे-हिंग-कढीपत्ता-आले यांची फोडणी घालावी. सैंधव, चिमूटभर मिरपूड, दालचिनीपूड घालावी. कोमट / गरम करून मगच खायला द्यावे.

(वरील सर्व पदार्थ व त्यांच्या बनवण्याची कृती, घटक इत्यादी हे आमच्या घरातील रुग्णाच्या तब्येतीनुसार व डॉक्टर तसेच आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरविले आहेत. अशा प्रकारच्या आहाराचेही डॉक्युमेंटेशन व्हावे, नोंद व्हावी व इतरांना मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने वरील माहिती व प्रकाशचित्रे दिली आहेत. काही कमी-जास्त असल्यास तो माझ्या लिखाणाचा दोष समजावा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु तुला अनेक धन्यवाद आणी दंडवत!:स्मित: मायबोलीला मी माझे दुसरे माहेर मानते ते याचमुळे.:स्मित:

Hi please also try the soup maker. Available on amazon. Good recipes

अकु, अग किती व्यवस्थित लिहीलय हे. घरात कोणी आजारी असल्यावर काळजीने आधीच सुचत नाही. खायला काय द्यावं, हा प्रश्न तर फार मोठा वाटतो. फार उपयोगी धागा आहे. पाठीवर हात फिरवून हात फिरवावा तसा.

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!
अमा, सूपमेकर बघते काय प्रकार आहे ते.

डॉक्टरांनी खालचे पदार्थ खायलाही रुग्णाला परवानगी दिली आहे. परंतु आमच्या रुग्णाला सध्या तरी ते फारसे खाववत नाहीत व खाल्ले तरी आवडत नाहीत.

१. घरी बनवलेली इडली कुस्करून, सार / वरण / सौम्य सांबारासोबत.
२. पावभाजीची भाजी, बटाटा नगण्य प्रमाणात घालून / वगळून व सौम्य, कमी तिखट व कमी मसालेदार
३. मऊभात, मेतकूट-तूप-भात, खिमटी, कढी-पोळी कुस्करा
४. सुके अंजीर व मनुका रात्री पाण्यात भिजवून व सकाळी त्याच पाण्यात थोड्या शिजवून, कुस्करून.
५. वेगवेगळी व पथ्याला चालणारी फळे.

मस्त.
अकु, थोडेसे मटार, कोथिंबिरीचे देठ, पुदिना एकत्र उकडायचे. मिक्सर्मधून काढून मीठ घालायचे.हिंगजिर्‍याची थेंबभर तुपात फोडणी द्यायची. सुरेख लागते.

अमा +१

अकु, सूपमेकर खरेच मस्त पर्याय आहे. त्यात सगळे शिजवले ही जाते आणि प्युरी देखील होते.
http://www.amazon.in/Philips-Collection-HR2201-81-1-2-Litre/dp/B00PW2XFU...

खात्रीचे रिव्ह्यू उत्तम आहेत त्यामुळे आमच्या नात्यातील नव्या माता आणि जे. ना. साठी भेट म्हणून घेणार आहे.

देवकी, थँक्स. पेशंट जरा चालायला लागला की हे द्यायला हरकत नाही. सध्या मुक्कामपोस्ट फाऊलर बेड हेच आहे. वॉकर घेऊन वीस पंचवीस पावले व थोडा थोडा वेळ व्हीलचेअर / साधी खुर्ची यांत बसून, असे दिवसातले जेमतेम दोन तास बेडपासून दूर असतो. नेहमीच्या अन्नानेही थोडे गॅस होत असतात, त्यामुळे सध्या मटारचे चार-सहा दाणे उकडून कधीतरीच खायला देतो. Happy

ओके.

Thnx a ton, Much appreciated your efforts -loving & caring ideas,noted, God Bless U dear,

अकु पावभाजी धिरडे ट्राय करा:
पावभाजीच्या भाज्या, कांदा बटा टा सोडून उकडून घ्या. व मिक्सरला लावून फिरवून घ्या. थिक सूप सारखे दिसेल. त्यात अगदी चिमूट भर पाव भाजी मसाला, आले लसूण पेस्ट व तिखट मीठ अगदी चवी पुरते असे घाला. मग दोन दोन मोठे चमचे मैदा/ कणीक किंवा तांदुळाचे पीठ आणि रवा घालून सारखे करून घ्या.

बारीक धिरडी घाला. वरून झाकून ठेवा. दुसृया बाजूने शेकून घ्या. अगदी कमी तेल वापरा. अगदी अलाउड असेल तर बारीक ठिपका व्हाइट बटर घालून सर्व्ह करा. ह्यात पाव भाजीचा ठसका व हाय कॅलरीज नाहीत पण चव बदल आहे . तेच तेच खाउन कं टाळतात तेव्हा करायला. पेशंट खाउ शकत असेल तर कोथिंबीर बारीक चिरून घाला पिठात.