कौतुक? चुकून कधीतरी !

Submitted by कुमार१ on 7 December, 2016 - 20:28

गेल्या अर्धशतकात शहरीकरण अफाट वाढले. महानगरांचा तर चेहराच हरवून गेला. तिथल्या गतिमान जीवनात माणसे पिचून निघाली. पैशापाठी धावता धावता आयुंष्यात भावनांना फारसे स्थान उरले नाही. निस्वार्थी विचारपूस तर दुर्मिळच झाली. ‘’मी माझा’’ हा माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. माणसे अनेक शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रस्त झाली. याच्या जोडीला काही ‘सामाजिक रोग’ ही आपल्याला चिकटले आणि त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला. त्यापैकी एक रोग म्हणजे ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’. या रोगाचा विचार आपण या लेखात करूयात.

तसा हा रोग पूर्वापार चालत आला आहे पण, सध्याच्या जमान्यात तो अगदी उठून दिसण्याएवढा फोफावला आहे. तो समाजातील सर्व वयोगटात आढळतो. किंबहुना त्याची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते.

आता हा एक किस्सा बघा परदेशस्थ भारतीयांचा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. शरद हे एक ज्येष्ठ संशोधक नोकरीसाठी परदेशात गेलेले व तेथे बरीच वर्षे स्थायिक झालेले. त्यांच्या आसपास काही मोजकी भारतीय कुटुंबे राहतात. त्यापैकी सुजय व सुजाता हे एक जोडपे. त्या दोघाना तिथे दोनच वर्षे झालेली. दोघेही उच्चशिक्षित व एका कंपनीत व्यवस्थापक. या कुटुंबाचा शरद यांच्याशी चांगला घरोबा जमलेला. शरद हे एक लेखकसुद्धा आहेत व त्यांची ललितलेखनाची एकदोन पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत आणि ती वाचकप्रिय आहेत. ते वर्षातून एकदा सुटीसाठी भारतात येतात व परत जाताना बरीच साहित्यिक पुस्तके खरेदी करुन नेतात. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह आता भरपूर आहे. सुजातालाही वाचनाची खूप आवड परंतु पुस्तके स्वतः विकत घेण्याबाबत मात्र कमालीचा कंजूषपणा! शरदांकडची पुस्तके हक्काने वाचायला नेणे हा तिचा नेहेमीचा उद्योग. गेल्या दोन वर्षात तिने त्यांच्याकडची बहुतेक पुस्तके वाचून संपवलेली.

एकदा शरद मोठ्या सुटीसाठी भारतात जायला निघाले होते.तेव्हा सुजाता त्यांची पुस्तके घेउन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे धडकली. पण, आता तिच्या लक्षात आले की त्यांच्या संग्रहातली आहेत बहुतेक पुस्तके तिची वाचून झाली आहेत. शरद हे तसे प्रसिद्धीपासून दूर राहणारे असल्याने अद्याप त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांबद्दल तिला बोलले नव्हते. पण आता तिने काहीतरी पुस्तके देण्याची गळ घातल्याने त्यांनी स्वतःची पुस्तके तिला दिली. घाईत तिने ती पुस्तके उचलली व त्यांचा निरोप घेतला. यथावकाश शरद सुटी संपवून तिथे परतले. दुसऱ्या दिवशी सुजाता त्यांची पुस्तके घेवून तिथे दाखल झाली. बराच वेळ तिने हवापाण्याच्या फालतू गप्पा मारल्या व अगदी निघताना त्याना ‘’सर, ही घ्या तुमची पुस्तके, झाली वाचून’’ असे म्हणून काढता पाय घेतला.

आता काय म्हणावे तिच्या या वागण्याला? त्या पुस्तकावरील कुठल्याही प्रतिक्रियेविना ते परत करणे ही हद्द झाली होती. ‘’सर, चांगले आहे तुमचे लिखाण’’ किंवा निदान ‘’आवडले हो’’ एवढीही औपचारिक प्रतिक्रिया नाही. आणि तेही स्वतः फुकटे वाचक असताना! बरे, नसले आवडले पुस्तक तरी तोंडदेखलं सुद्धा काही बरं बोलवलं नाही तिला. हीच ती मोठेपणी घट्ट मुरलेली रोगट मनोवृत्ती, नाही का?

अशा या कौतुक न करण्याच्या रोगाने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते!

मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते.

परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव संबंधितांकडून अपेक्षित असतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते.

भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते.

दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. मात्र, एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो!

थोडक्यात काय, तर दुसऱ्याचे दोष उगाळणे हा मानवी स्वभाव आहे खरा आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग आहे. त्यामुळेच समाजात निंदा करणारी तोंडे उदंड दिसतात पण, शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.

रच्याकने.............
आपल्या या संस्थळावर मात्र आपण एकमेकाचे बरेच कौतुक करतो बुवा !! ( स्मित)
*************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" बरां असा तां " हि सीमा असते !
>>>
हा हा, आमच्या घरी मालवणी बोलले जात नाही म्हणून मलाही येत नाही, पण आजोळी बोलतात... बरां असा तां .. आणि ते बोलायच्या टोनमधील गोडव्याच्या पातळीवरून कौतुकाची पातळी ही ठरवायची असते Happy

आणि ते बोलायच्या टोनमधील गोडव्याच्या पातळीवरून कौतुकाची पातळी ही ठरवायची असते

हो अगदी अगदी आणि नसलेल्या गोडव्यावरूनपण कळतं की काही खरं नाही Happy

लेख आवडला आणि पूर्णपणे पटला सुद्धा. (खरंच अगदी देवा शप्पथ ☺) काही प्रतिसादही सुंदर आहेत अगदी मनापासून लिहिले.
अगदी स्वच्छ मनाने दुसऱ्याचं कौतुक करणं हे सुसंस्कृत मनाचं एक लक्षण आहे.
जे दिवसेंदिवस नामशेष होत चाललंय अगदी टिपीकली uncommon असणाऱ्या कॉमन सेन्स सारखं.

कुमार१ ...खूप छान लेख .या लेखाबद्दल तुमचे खूप कौतुक.

मी सचिन काळे यांच्याशी सहमत आहे. जर आपल्याला कोणाचं कौतुक करायला आवडतं तर आपण करत राहावं .... आपल्या कौतुकाची अपेक्षा न करता. थोडं कठीण आहे पण जमून जातं.

माझा एक सुंदर अनुभव - मी माझ्या छोटीच वेळोवेळी कौतुक करत असते ,तीने काही शाळेत Achive केलं / स्पर्धेत नंबर आला कि आवर्जून Appreciation / congrets वगैरे चे मेसेज लिहिते ,या साठी भिंतीचा एक छोटा भाग राखून ठेवला आहे. समोरच्याचे Appreciation करणे हा पण एक भाग असेल तिच्या जडणघडणीतला,

एकदा सहज एक गोष्ट लिहायला बसले छोटी बाजूला आली तिने मला विचारलं "मम्मा आर्टिकल लिहिते आहेस? वॊव .मला पण लिहायच आहे ....कारण मी तुला मानते". अश्या प्रकारे नकळत माझं कौतुक झालं माझ्या लेकीकडून ,अणि त्याची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याची प्रचिती आली.

या प्रतिसादानिमित्त मायबोलीचे देखिल कौतुक.... वाचकांना / लेखकांना एक मनमोकळा हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला.

उत्तम लेख आहे.

<<किंबहुना त्याची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, <<

साधारण अश्याच स्वरुपाची घटना माझ्या बाबतीत घडली. पण इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्याकडुन नव्हे तर माझ्याच वर्गातील मुली. महात्मा फुले कृषी विद्यापीठातलया शाळेत शिकत असतांना ४थी, ७वीची स्कॉलरशिप मिळाली होती.
वर्गात, एक बडबड्या...मी मी करणाऱ्या, सरांच्या पुढे पुढे करणाऱ्या मुला-मुलींची एक जमात असते. ते सतत काहितरी करून शिक्षकांच्या नजरेत भरेल असं वागत असतात. मी वर्गात अबोल आणि शिक्षकांच्या पुढे पुढे ना करणारी! पण एकंदरीत तोपर्यंतचे एव्हरेज मार्क्स पहाता शिक्षकान्ना अगदीच खात्री नाही तरी थोडेफार वाटत होते कि मला स्कॉलरशिप मिळेल. आणि अचानक डिक्लेर झालं कि ४थी तल्या फक्त दोनच मुलींना स्कॉलरशिप मिळालीय. हा त्या 'जमातीला' मोठा धक्का होता. त्यात मोठमोठ्या प्रोफेसरांची, शाळेचे जनरल सेक्रेटरी वै यान्ची मुले होती. तर स्कॉलरशिप मिळालेल्या मुलींमध्ये एक नाव अस्मादिकांचे होते. पेपरलाही नाव आले. अर्थात ते वय ही कौतुक करून घेण्याचे होते. मी मोठया उत्साहाने पेपर शाळेत दाखवायला घेऊन गेले. तर या मुलींचे तेव्हा चेहरे उतरले होते. मग कुठे," परीक्षेच्या वेळेस असलेले सुपरवायझर तुमच्या जातीचे होते असं सांगून, तर कधी माझ्याकडूनच वाचायला नेलेल्या गोष्टींच्या पुस्तकातून मला प्रश्न विचारून 'या या प्रश्नाचे तुला उत्तर आले तरच तूला खरंच स्कॉलरशिप मिळालीय असा समजू" वै वै. बालिश छळून झाले. अर्थात हे आता हास्यास्पद वाटत असले तरी त्या वेळी अगदीच निराशाजनक नाही पण हिरमुसलेसे झाले होते.

हे तर नकळत्या वयातले होते. पण माझी एक शिक्षिकाही जी ६वी-७वीत गणित शिकवायला होती... जिची या लोकांच्या घरी बर्यापैकी उठबस होती. तर एकदा आम्हाला असच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची गणित प्रवेश कि हिंदी प्रबोध /सुबोध परीक्षेचे सर्टिफिकेट वाटप वर्गात करत असतांना, या मुलींना जवळ घेऊन तोंड भरून कौतुक करत होती. माझी पाळी आल्यावर माझ्याकडे ओठ मुडपून,भुवया उंचावून , खुन्नसभरल्या(?) नजरेने पहात ,"तुला पण ए ग्रेड आहे? " अस विचारले होते कि 'ती नजर.. ते शब्द' मला अजूनही लक्षात आहेत.

असो.. असा काही विषय निघाला कि या आठवणी डोकावतात. Lol

अमेरिकेत आल्यावर या चटकन कौतुक न करण्याच्या सवयीचा प्रॉब्लेम होतो. आता मुलीकडे पाहून "तू आज सुंदर दिसतेस" असे म्हंटले तर चप्पल खाण्याची वेळ येते हे भारतात माहित होते, पण इथे उलटेच, मी काही बोललो नाही तर उलट तीच माझ्यावर रागावून म्हणते - तू काही बोलला नाहीस?

बायकांनी केशरचना बदलली, नखांना वेगळे रंग दिले, चष्म्याची फ्रेम बदलली वगैरे गोष्टी नीट निरखून पाहिल्याखेरीज कळत नाहीत, नि मुलीकडे नीट निरखून पहायची तर जाम भीति, मग ऐकावे लागे.

एकदा तर काय झाले - एक सेक्रेटरी तिच्या एक दोन मित्र मैत्रीणींना अगदी प्रेमाने आलिंगन देत होती, मी तिथे उभा होतो, मला पण प्रसाद मिळाला. मी गप्प. मग तिने शेक हँड कर म्हंटले नि डाव्या हाताने शेक हँड केला. मी मठ्ठ. यडपटासारखा हसलो. मग दुसर्‍या ने सांगितले अरे तिच्या बोटातली अंगठी नाही का पाहिलीस, तिची एंगेजमेंट झाली आहे. मग एकदम वॉव वगैरे झाले, पण बूंदसे गयी वो हौदसे नही आती.
तर अमेरिकेत आल्यावर मुलींना कॉम्प्लिमेंट द्यायला लाजू नका!
आपल्याबद्दल चांगला समज होणार नाही. इथे अशी मायबोली असेल कुठे, तर त्यावर धागा काढतील, इथले भारतीय ना अगदी.....!

लेख पटला . टीका करायला लोक फार तत्पर असतात पण कौतुक. ? नाहीच .फार कमी किव्वा लेखात म्हटलंय तसं " ’’मराठीतून काय सोपं असतं रे’" वगैरे म्हणजे कौतुक बाजूलाच पण समोरच्या बद्दल असणारी असूयाच दिसते. किव्वा गप्पच रहायचे .:)

लेख आवडला.
अशीच कुणाचं कौतुक न करण्याची वस्तुस्थिती होत आहे सध्या, मी माझ्या भाच्यांचे नेहमी कौतुक करते.
माझ्या केसांचं कौतुक तर अगदी शाळेत होते तेव्हापासून होत आहे.
माझा मित्र त्याला मी compliment देत नाही असं त्याचं म्हणनं मग एक दिवस दिली छानशी compliment खूश झाला तो मग मला पण छान वाटलं.

'कौतुक' विषयी मी काही सांगू इच्छितो, बघा मला सांगायला जमतंय का.

आपणांस वाटत असेल कि मी दुसऱ्याचे कौतुक का करू? यात माझा काय फायदा? उलट यात नुकसानच दिसतंय.

बरोबर आहे. वरकरणी आपल्याला यात नुकसानच दिसतं. पण जेव्हा तुम्ही कोणाचे कौतुक कराल तेव्हा ती प्रक्रिया काळजीपूर्वक बघा. कोणाचेहि कौतुक करताना आपले मन भरून येत असतं. आपलं मन उचंबळुन येत असतं. आपल्या मनात गोड लहरी उठू लागतात. मनाच्या एका वेगळ्याच हव्या हव्याश्या भावनेत आपण तरंगायला लागतो. काय सांगू , किती सांगू , किती बोलू असं होऊन जातं.

कोणाचंहि कौतुक केल्यावर आपल्याला असं वाटतं जसं एखादे सृष्टी सौन्दर्य पाहिल्यावर आपल्याला वाटतं. जसं आपल्या प्रियजनांची भेट झाल्यावर आपल्याला वाटतं. जसे आकाशातले विविध रंग बघितल्यावर आपल्याला वाटतं. जसं एखाद्या स्त्रीचं सौन्दर्य पाहून आपल्याला वाटतं. जसा मुसळधार पाऊस कोसळताना पाहून आपल्याला वाटतं. जसं कुठल्याही पक्षाच्या पिल्लाला गोंजारताना आपल्याला वाटतं.

अगदी तसंच आणि त्याहीपेक्षा अजून गोड गोड काहीतरी वेगळंच वाटतं. आणि हि मनाची नशा जो कोणी अनुभवतो, तो ह्या नशेचा गुलाम होऊन जातो. आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा कोणाचे तरी कौतुक करून तो ह्या नशेचं रसपान करू पहातो.

मग सांगा दुसऱ्याचं कौतुक करण्यात फायदा कोणाचा आहे? आपलाच ना!!!?

@ समृद्धी, मी आर्या, सुजा, ग्रेंजर व पवनपरी : प्रतिसादाबद्दल आभार.
तुम्हा सर्वांचे अनुभव आवडले.

कौतुकाची आस ही कोणत्याही वयातील व्यक्तिला असू शकते. आपण कॉन्शसली हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही छोटी गोष्ट सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तिने केली तर आपण त्याची नोंद घ्यायला हवी, आणि नोंद घेतलेली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली पाहिजे. चांगला ड्रेस, चांगली हेअर स्टाईल, नविन फ्रेम, किंवा इतर कोणतीही चांगली गोष्ट योग्य त्या शब्दात वेळच्या वेळी पोहोचवली पाहिजे. त्यात काचकुच करू नये. अशाने आपण महत्वाचे आहोत, किंवा आपल्यात घडलेले छोटे बदल लक्षात घेतले जातात या विचाराने मन सुखावून जाते. कौतुक करायला आजतागायत पैसे पडल्याचं मी तर ऐकलं नाहिये. कधी कधी समोरच्याला बरं वाटावं म्हणून ही कौतुक करायला हरकत नाही. अशाने समोरच्या व्यक्तिचा आत्मविश्वासही (कधी कधी) वाढण्यास मदत होऊ शकते.
कौतुक करा, कौतुक करून घ्या. शेवटी म्हणतात ना, आपण जे पेरू ते उगवते.
मनसोक्त दिलखुलास कौतुक केलं हात न आखडता, तर लोकही आपलं कौतुक करू लागतात.
अर्थात गरज म्हणून नव्हे, पण एखाद्या गोष्टीचं कौतुक करणे, प्रशंसा करणे हा एक चांगला गुण आहे, तो आपल्यात निपजला पाहिजे हे मावै म.

यवतमाळ येथील प्रा. अनंत पांडे यांचे मी जाहीर कौतुक करीत आहे ! ते सार्वजनिक वीज-बचतीचे खूप छान काम करतात. सध्या तेथे पहाटे ५ लाच लक्ख उजेड असतो. पण, रस्त्यावरील दिवे मात्र सकाळी ७ पर्यंत चालू असायचे. त्यांना ही उधळपट्टी पाहवेना. त्यांनी सरकारी लोकांकडून त्या दिव्यांची सर्व बटणे माहित करून घेतली. आता ते ५ ला व्यायामाला सायकलने बाहेर पडताना ते सर्व दिवे बंद करत जातात.
सरकारी बाबू पण खूश कारण परस्पर काम होतंय ना !
पांडेंना मनापासून सलाम !

अरे हा लेख नजरेतुन सुटला होता.....
विषय चांगला आहे, मांडलाही छान आहे, अन प्रतिसादही उत्तम. Happy सहमत.

माझ्यापुरते म्हणाल, तर मी माझ्या "शत्रुपक्षावरही" प्रेम करतो, त्यांचे कौतुक करतो, त्यांच्या चांगल्या मला आवडलेल्या गोष्टी लक्षात ठेवतो. (शत्रुपक्ष काय करतो ते विचारू नका, तो फक्त "अनुल्लेख" करतो Proud )

परवाचीच गोष्ट, एसेस्सीचा निकाल लागलेला, भाची पिंचीमधे (बेस्ट ऑफ फाईव मधे) १००% गुणांनी पहिली आलेली.
अर्थातच व्हॉट्सॅप ग्रुपवर अभिनंदन अन कॉन्ग्रॅट्स अशा शब्दांचा राबता...... पण सर्व कृत्रिम वाटत होते.
मग मी म्हणले "भले शाब्बास.... अन सरळ कबुली दिली, की "तुझ्यामुळे आता आमची कॉलर ताठ होणार....."
मग कुठे अभिनंदनाची गाडी जरा बर्‍यापैकी रुळावर आल्याचे भासले.
आम्हाला खरेच, कौतुक करायला, अन कौतुक स्विकारायला शिकवलेच जात नाही. ते म्यानर्स शिकणे आवश्यक Happy

बा़की झक्कींनी सांगितल्याप्रमाणे, अमेरिकेत करतात तसे तरुणींचे कौतुक इकडे देशात करु पाहिले तर फटके खायचीच पाळी येईल हे नक्की. तेव्हा तसले काहि करायचे तर स्वतःच्या जबाबदारीवरच करावे हे उत्तम ! Wink

लिंबू, आभार !
तुमचा प्रतिसाद चांगला आहे.
तुमच्या भाचीचे अभिनंदन !

पांडेंना मनापासून सलाम ! >>>> +१००
नुसती टी का करणारे भरपूर असतात. पण, पांडेंसारखे लोक विरळाच.
चांगल्या कामासाठी ल श्कराच्या भाकर्‍या भाजणारे लोक खूप कमी असतात.

Pages