कळले मला

Submitted by निशिकांत on 28 October, 2016 - 01:14

कळले मला

जिवाला दु:ख का अष्टौप्रहर, कळले मला
तुझ्यासाठीच जगलो आजवर कळले मला

नको सांगूस आवडतो तुला मी का सखे
सुचवते काय ही नजरानजर, कळले मला

सखीने जो दिला अंधार, लपवाया मनी
किती मोठे दिले देवा विवर, कळले मला

सरावानेच माझ्या पापण्या ओलावती
नसे कोणीच घ्यायाला खबर, कळले मला

कळी उमलायच्या आधीच येथे एवढे!
कशाला मारती चकरा भ्रमर, कळले मला

स्त्रिया हरवून गेल्या अंगभर वस्त्रातल्या
ढळाया ना अता उरला पदर, कळले मला

भदंतांच्या मनी वसतात लोभी माणसे
दिखावा पोसते पिवळे चिवर, कळले मला

चला परतूत पोरांनो पुन्हा खेड्यांकडे
प्रदूषणमुक्त ना कुठले शहर, कळले मला

न आवडली कधी चमचेगिरी "निशिकांत"ला
जगी म्हणुनीच त्याची ना कदर, कळले मला

१)भदंत= बौध्द धर्मगुरू. २)चिवर= भदंत नेसतात ते पिवळ्या रंगाचे वस्त्र.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users