स्मिता पाटील - काही आठवणी .....

Submitted by समीर गायकवाड on 18 October, 2016 - 02:14

१९८१ च्या वर्षअखेरचे दिवस होते. महेश भट स्मिताकडे आले होते आणि त्यांनी 'अर्थ'मधील 'कविता सन्याल'ची भूमिका तिच्या हाती सोपवली होती. 'अर्थ'मध्ये तिच्या समोर होती शबानाची 'पूजा मल्होत्रा' ! या चित्रपटाचा कथानायक होता कुलभूषण खरबंदाचा 'इंदर मल्होत्रा' !..... स्मिताने स्क्रिप्ट वाचून होकार कळवला. तिला भूमिकेचे गडद टोन आवडले होते पण तिच्या मनात एक प्रश्न होता की महेश भटने आपल्याला 'कविता सन्याल'ची भूमिका का दिली असावी ? 'पूजा मल्होत्रा'चा रोल आपल्याला का ऑफर केला नसेल ? या प्रश्नाने तिला बेजार केले कारण या भूमिकेची वीण तिच्या रिअल लाईफशी साम्य राखणारी आहे की काय असं तिला वाटे. 'अर्थ'मधील 'इंदर मल्होत्रा'ची पहिली पत्नी 'पूजा' त्याच्या आयुष्यात सुखैनैव असूनही 'कविता सन्याल'च्या रूपाने दुसरी स्त्री त्याच्या आयुष्यात येते अशी कथेची प्राथमिक मांडणी होती. नेमक्या याच काळात विवाहित राज बब्बरच्या आयुष्यात तिने प्रवेश केला होता. यामुळे स्मिताने काही पत्रकारांजवळ सांगितले की, 'अर्थ'मधील ही नकारात्मक भूमिका देऊन महेशने माझ्यातील स्त्रीला हरवले आहे पण माझ्यातील अभिनेत्री माझ्यातल्या स्त्रीवर नेहमीच मात करत आलीय. याहीवेळेस माझ्यातील अभिनेत्रीच जिंकेल ! आणि तसंच झालं. अत्यंत डार्क शेड असणारी खलनायकी अंगाची ही भूमिका स्मिता अक्षरशः जगली. शबाना आणि स्मितामधील अभिनयाचे लाजवाब द्वंद्व यात पाहायला मिळाले. अर्थात शबानाची भूमिका नायिकेची होती अन तिने त्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आणि तिला 'अर्थ'साठी राष्ट्रीय पुरस्कारासोबत फिल्मफेअरदेखील मिळाले. मात्र सर्वत्र चर्चा स्मिताच्या अभिनयाची झाली ! योगायोग असा झाला की १९८२ मधील 'अर्थ'च्या सहा महिने आधी स्मिताचा अमिताभसोबतचा 'नमकहलाल' आला आणि त्याने तिकीटबारीवर टांकसाळ पाडली !

एप्रिल १९८२ मध्ये आलेल्या 'नमकहलाल'मध्ये स्मिताचे एक गाणे होते - ‘आज रपट जाये तो हमे ना उठैय्यो...’मूळ स्क्रिप्टमध्ये हे गाणं नव्हतं. प्रकाश मेहरांनी हे नंतर अॅड केले होते. स्मिता या गाण्याच्या पिक्चरायझेशनबद्दल अत्यंत नाखूष होती मात्र तिने मेहरांना शब्द दिलेला असल्याने फक्त आपली नाराजी कळवली, मात्र त्यांच्या मर्जीप्रमाणे गाणे शूट करू दिले. सिनेमा हिट झाला आणि गाणीही हिट झाली. स्मिताची ही अदा पब्लिकला खूप भावली पण नेहमीप्रमाणे काही क्रिटीक्सनी तिच्यावर या उथळ चित्रिकरणाबद्दल टीका केली. लोकांनी मात्र अमिताभचा 'अर्जुनसिंह' आणि स्मिताची 'पूनम'ची भूमिका डोक्यावर घेतली. या वर्षातच स्मितासाठीचा सरप्राईज रोल असलेला अमिताभ - दिलीपकुमार समवेतचा 'शक्ती' रिलीज झाला होता, त्याने मोठा गल्ला जमा केला! यातील 'रोमा'ची भूमिका स्मिताने का स्वीकारली असा सवाल तिला काही समीक्षकांनी केला पण तिच्या स्वभावाप्रमाणे ती शांत राहिली, ती कुणाच्याही तोंडाला लागली नाही.

पण या दोन सिनेमामुळे अमिताभ आणि स्मितामध्ये स्नेहपूर्ण मैत्रीचे संबंध निर्माण झाले. या संदर्भात एक किस्सा घडला होता जो अमिताभच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण घटनेशी संबंधित होता. दस्तूरखुद्द सुपरस्टार अमिताभनेच ही आठवण नंतर शेअर केली होती. ‘कुली’च्या शूटिंगच्यावेळी अमिताभ बाहेर असताना एकदा रात्री दोन वाजता त्याला स्मिताचा फोन आला. तिनं घाईघाईत विचारलं, ‘आपकी तबीयत कैसी है, मुझे अभी एक सपना आया था, आपके पेटसे खून निकल रहा है और आप हेल्प हेल्प चिल्ला रहे हो. अपना खयाल रखना.’ त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शूटिंगच्यावेळी अमिताभला अपघात झाला. हा दिवस होता २६ जुलै १९८२ ! पुन्हा १९८२ सालाचाच योगायोग !

याच वर्षी राजकुमार कोहलीच्या 'बदले की आग' या तद्दन फालतू सिनेमात ती झळकून गेली. खंडीभर नट नटयांची जंत्री आपल्या सिनेमात घेण्याची वाईट खोड राजकुमार कोहलीला होती, ती या सिनेमात अधिक जाणवली. खरे तर हा सिनेमा केवळ सुनीलदत्तच्या आग्रहाखातर स्मिताने केला होता. आपण कुठल्याही रोलला आपल्या परीने न्याय देतो हे तिने यातून दाखवून दिले होते. १९८२ मध्ये आलेला स्मिताच्या नऊ सिनेमापैकीच एक होता सुनील दत्तचाच 'दर्द का रिश्ता'. एका कॅन्सरपिडीत मुलीच्या संघर्षाची कथा यात होती, त्याला करुणेचा झालर होती. त्यामुळे हा सिनेमा लो बजेट असूनही उत्कृष्ट कथामुल्ये आणि संयत अभिनयाच्या जोरावर हिट झाला होता. यातला स्मिताचा रोल चांगलाच भाव खाऊन गेला होता.
१९८१ - १९८२ असे पूर्ण दिड - दोन वर्षभर चित्रीकरण चाललेला स्मिता राज बब्बरचा 'भिगी पलके' २४ ऑगस्ट १९८२ ला रिलीज झाला. या सिनेमाने सणकून मार खाल्ला. सिनेमा चालला नाही मात्र त्यांच्यातील प्रेमाला रंग चढत गेला.

स्मिता - नसीर - फारूक शेख या त्रयीचा 'बाजार' हा देखील याच वर्षातला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या दांपत्यांने आपल्या मुलीचा सौदा करून तिला आखाती देशातील लांडग्यांच्या हवाली करण्याचा प्रक्षोभक विषय यात होता. दिग्दर्शक विजय तलवारने या सिनेमाची जी स्टारकास्ट निवडली होती ती अत्यंत सबळ असल्याने सिनेमा खूप गाजला. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात याचे स्क्रीनिंग झाले. या सिनेमातील देखण्या अभिनयासाठी समीक्षकांनी मुक्तहस्ते स्मिताचे मनसोक्त कौतुक केले.

१९८२ मध्ये स्मिताचे राजेश - शत्रुघ्न बरोबरचा 'नादान' आणि 'सितम' हे दोन पडेल सिनेमे येऊन गेले पण त्याने स्मिताच्या कारकिर्दीत काही फरक पडला नाही कारण असे काही सिनेमे ती वर्षाकाठी करायची ते केवळ बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेच्या मुखवटयाच्या समाधानासाठी ! सर्वसामान्य प्रेक्षक ज्याला आर्ट पिक्चरबद्दल काही देणेघेणे नसते, जो केवळ दोन घटकाच्या करमणूकीसाठी तिथे आलेला असतो त्याच्या समोर आपलीही छबी दिसावी अशा हेतूने तिने या भूमिका केल्या होत्या...

१९८७ मध्येही स्मिताचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले होते. अशीच करामत तिने १९८२ मध्ये केली होती. या वर्षी 'सितम', 'बाजार', 'भीगी पलकें', 'दर्द का रिश्ता', 'नादान', 'शक्ति', 'बदले की आग', 'अर्थ', 'नमक हलाल' असे स्मिताचे नऊ चित्रपट आले होते. या सर्व चित्रपटांवर एक नजर टाकली तरी यातील भूमिकामधील विविधता लक्षात येते. या नऊ चित्रपटातील एकाही भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. मात्र १९८१त येऊन गेलेल्या झोपडपट्टीतील विखारी जीवनाचे उघडे नागडे जळजळीत सत्य मांडणाऱ्या 'चक्र'मधील अम्माच्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'नसीब'साठी हेमा मालिनी, 'उमराव जान'साठी रेखा, 'सिलसिला'साठी जयाबच्चन, 'एक दुजे के लिये'साठी रती अग्नीहोत्री अन 'बसेरा'साठी राखी या दिग्गज देखण्या बाहुल्या त्या वर्षीच्या फिल्मफेअरसाठी नॉमिनेट झाल्या होत्या मात्र यांना मात देत स्मिताने फिल्मफेअरच्या पुतळीवर आपले नाव कोरले. 'चक्र'मुळे तिला दोन्ही सन्मान मिळाले मात्र रेखाच्या नशिबी हे भाग्य नव्हते. 'उमराव जान'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण त्या वर्षीचे फिल्मफेअर मिळवता आले नाही ते स्मिताने जिंकले !

या गोष्टीची ची रुखरुख कदाचित रेखाला असावी. त्यामुळे ती स्मिताशी कधी मोकळेपणाने वागली नाही. स्मिताला मात्र तिच्याशी मैत्री करावी असे वाटे परंतु रेखाने स्मिताला आयुष्यभर ठराविक मर्यादेपलीकडे मैत्री करू दिली नाही. स्मिताच्या मृत्यूनंतर मात्र याच रेखाला दु:खावेग अनावर झाला होता. आपल्या संबंधाबद्दल एकदा रेखाने मन मोकळे केले. त्यात या मागचे कारण सांगताना ती म्हणते, ‘की मी हिला जास्त जवळ येऊ दिलं, तर मी नकळत हिच्यात इनव्हॉल्व्ह होईन. हिच्यात दुसऱ्याला खेचून घेण्याची शक्ती आहे.’पण रेखाला हुरहूर लागून राहिली की आपण स्मिताशी मैत्री करायला हवी होती. असो पण तिला पश्चातबुद्धी सुचली हेही कमी नाही कारण बॉलीवूडमध्ये गेलेल्या व्यक्तीबद्दल फारशी आस्था दाखवण्याचा ट्रेंड कधीच रुजला नाही.

अभिनेत्री असण्याखेरीज एक व्यक्ती म्हणून स्मिता जीवाला जीव देणारी, दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आणणारी होती. असे अनेक प्रसंग आहेत तिच्या वागण्यातून तिचं मोठेपण सांगणारे.....तिच्या नवीन घराचं काम सुरू असताना तिथे काम करणाऱ्या कामगारांसोबत चहा प्यायला बसे. स्वत: त्यांना किटलीतून चहा ओतून देत असे. एक व्यक्ती म्हणून कितीजणांनी असं केलं असतं. त्यात स्मिता तर एक अभिनेत्री होती. अशीच एक आठवण स्मिताची आई सांगते, ‘‘स्मिता शूटिंगच्या सेटवर असताना एक स्पॉट बॉय तिथे काम करत होता. त्याच्या घराचे पत्रे उडाले होते. तरीही आज काम केलं नाही तर पैसे मिळणार नाहीत म्हणून तो तिथे येत होता. हे जेव्हा स्मिताला कळलं तेव्हा तिनं पर्समधून पैसे काढून त्याला दिले आणि तू घराचे पत्रे लावून मगच कामाला ये असं सांगितलं.’’ ही गोष्ट स्मिताच्या आईला ती गेल्यानंतर कळली.

अगदी आपल्यापैकी एक वाटावी असा चेहरा घेऊन आलेल्या स्मिता पाटीलची अभिनय क्षमताच इतकी अफाट होती की तिने केलेली कोणतीही भूमिका म्हणजे एकेक लखलखता हीरा ठरली आहे. अर्थपूर्ण आणि दर्जेदार सिनेमांसाठी ओळखल्या जाणार्‍या शाम बेनेगल यांनी ’भूमिका’ हा सिनेमा बनवला होता. चित्रपटसृष्टी आणि त्यातले लोक यांचं सही सही चित्रण करणारा हा सिनेमा त्या काळच्या हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या जीवनावर बेतलेला होता असं म्हटलं जातं. या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आणि त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. स्मिता पाटील यांचे खाजगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिले. चित्रपटात बोल्ड दृश्य देण्यास संकोच न करणारी स्मिता रियल लाईफमध्ये एक शांत, संकोची महिला होती.

दूरदर्शनवर बातम्या सांगणारी वृत्तनिवेदिका ते जगविख्यात अभिनेत्रीचा प्रवास ‘कसा’ घडत गेला असावा, याचं स्मिताच्या व्यक्तिमत्त्वाचं उत्तर वाचकालाच शोधावं लागतं. स्मिताचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. स्मिताचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. तिची आई विद्याताई पाटील प्रथम गृहिणी व नंतर नर्स. स्मिताच्या कारकिर्दीची सुरुवातच फिल्म इन्स्टिटय़ूटमधून झाली. त्या नंतर उमेदवारीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर तिने वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. श्याम बेनेगल एकदा बातम्या पाहात असताना त्यांना तिचे डोळे फार आवडले होते. ते एका चांगल्या अभिनेत्रीचे डोळे आहेत हे त्यांनी ताडले व आपल्या चित्रपटासाठी तिला बोलावले. बेनेगलनी तिला 'चरणदास चोर' या चित्रपटात भूमिका दिली त्यानंतर मग स्मिताने कधीही मागे वळून पाहिले नाही. स्मिताच्या घरात समाजवादाचा, जेपींचा प्रभाव होता. तिचे विचार पुरोगामी होते आणि अर्थातच ‘स्मिता’च्या मनाचा एक कोपरा त्यातून घडत गेला. परिस्थिती व नवऱ्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध घर सोडून जाणारी ‘उंबरठा’मधील ‘सुलभा महाजन’ त्यातूनच साकार झाली. १९७७ मध्ये आलेल्या स्मिताच्या `मंथन`ला हिन्दी सिनेजगतातील उत्तम सिनेमांमधील एक म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या दूध व्यापाऱ्यांवर आधारित या सिनेमाला गुजरात येथील सुमारे पाच लाख मजुरांनी आपल्या दैनंदिन उत्पन्नापैकी २ रूपये निर्मात्यांना दिले. हा चित्रपट हिट होण्यात जितका हात निर्माता, दिग्दर्शकांचा तितकाच महत्त्वपूर्ण आहे स्मिता पाटील यांचा अभिनय ! १९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन सिनेमे यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसीरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला. सहजसुंदर असा कसदार अभिनय करणारी स्मिता अल्पावधीतच रसिकांच्या हृदयात विराजमान झाली होती.

स्मिताच्या जीवनात स्थिरता न येण्याचे कारण तिची इमेज होती. अभिनयाव्यतिरिक्त स्त्री चळवळींशी जोडली गेल्याने, आपल्या आयुष्यातले ‘क्रांती’कारक निर्णय ‘स्वत:च’, काही वेळेस, कुटुंबाशी फारकत घेतल्याने, समांतर चित्रपटांतील भूमिका असल्याने तीच ‘खरी’ स्मिता असावी असा जगाचा समज झाला; परंतु प्रत्यक्षात तिला तसं व्हायला आवडलं असतं. केवळ चित्रपटांतून काम करणे इतकेच तिचे जीवनाचे ध्येय्य नव्हते. समाजसेवेचे बाळकडू तिला आपल्या आई-वडिलांकडून मिळाले होते. त्यामुळे ती अनेक महिलांविषयक कार्य करणा-या संस्थांशी जोडलेली होती. आपल्या कमाईचा मोठा हिस्सा तिने या लोकांसाठी खर्च केला. अनेकांशी अगदी जवळून संपर्क ठेवला. तिच्या या वैशिष्टय़ाने ती लोकांच्या अधिकच जवळ होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना तिने केलेली मदत आजही आठवते. समाजातल्या सर्वच गोष्टींचा तिचा चांगला अभ्यास होता. त्यावर तिची स्वत:ची अशी मतं होती. आपण बरं की आपली स्टार व्हॅल्यू बरी असा विचार त्या काळात अनेकजण करत असत. स्मिता त्याला अपवाद होती. तिला माणसांचा सोस होता आणि माणसांबरोबरच्या नात्यांतून मिळणाऱ्या ‘प्रेमा’च्या ती शोधात असावी! प्रेमातून विरक्ती येते आणि विरक्तीतून अध्यात्म, म्हणूनच कदाचित जीवनातल्या आपल्या सर्वात सुंदर निर्मितीचा, प्रतीकचा जन्म झाल्यानंतर मृत्यूपूर्वी ती सलग १५ दिवस आजारी अवस्थेत व मनाने संपूर्ण खचल्यावरही ‘मोगरा फुलला’ ही ज्ञानेश्वरांची ओवी त्यांच्यासाठी गुणगुणत असे. जीवनाचं अंतिम ध्येयचं साध्य झाल्यासारखं! त्या अर्थाने स्मिताला ‘ध्येय’ नव्हतं. तिला ‘मूड स्विंगस्’ होते आणि त्यातल्या अनिर्णयातून येणारे वैफल्य तिला असावं. आपलं सर्वस्व दिल्यानंतरही, येणाऱ्या अपूर्णत्वाची जाणीव, हीच आपली ‘उणीव’ असावी, असं बहुधा तिला वाटलं असावं. ते समीकरण कायमचं सोडविण्यासाठी तिने बहुधा ‘राज’शी लग्न केलं-परंतु मुळातच गणित चुकलं होतं! वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी स्मिता हिंदी मराठी चित्रपटसृष्टीसाठी केवळ अभिनयसम्राज्ञीच नव्हती तर एक आयडॉल बनून गेली.

समांतर सिनेमावर आपलं अधिराज्य गाजवणारया स्मिताने व्यावसायिक चित्रपटात काम करताना आपली प्रतिमा कशी जपली होती याचं एक अत्यंत बोलकं उदाहरण देऊन लेखाचा शेवट करतो....
यश चोप्रा यांची शेवटची मुलाखत शाहरुखने यशराज स्टुडिओत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी आपला जीवनपटच उलगडून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी स्मिताच्या प्रामाणिकपणाचा उल्लेख केला होता. 'सिलसिला'साठी आधी त्यांनी स्मिताची निवड केली होती. त्यांच्या बरोबर नवीन निश्चल, परवीन बाबी अशी स्टार कास्ट निवडली होती. पुढे या चित्रपटाची स्टारकास्ट बदलण्यात आली. यश चोप्रांना ही गोष्ट थेट स्मिताच्या कानावर घालणं फारच जड जात होतं. त्यांनी आपल्या एका मराठी मित्राला स्मिताला ही गोष्ट सांगायला सांगितली. त्यांनी स्मिताला ही गोष्ट सांगितली. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता स्मिताने त्यांना साईनिंग अमाऊंट परत केली. यशचोप्रा यावर म्हणाले होते की, 'या पैशांची मला काहीच गरज नाही. ते तुमच्याकडेच ठेवा.' त्यावर 'ज्या चित्रपटात मी भूमिका करत नाही त्या चित्रपटाचे कोणतेही पैसे मी घेणं लागत नाही.' असं स्मिताने त्यांना सांगितलं. हे पैसे तर तिने परत केलेच केले त्याचबरोबर तिने यशजींबरोबर कोणतीही नाराजी ठेवली नाही. तो विषय ती सहज विसरून गेली. तिच्या जाण्यानंतरही यश चोप्रासारख्या एका मोठय़ा निर्मात्याने तिची तिच्या प्रामाणिकपणाबद्दल आठवण काढणे हाही स्मिताचा मोठा सन्मानच आहे.....

स्मिताचा काल जन्मदिवस होता. तिची जयंती होती असं मी मुद्दामच म्हणत नाही कारण ती आपल्यातून मनाने निघून गेलेली नाही, तिच्या अनेक आठवणी अन अनेक भूमिका आजही आपल्याला आपलं रुक्ष जगणं सुलभ करून देताना कसं जगावं अन कशासाठी जगावं याचं भान देतात...
अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही ... म्हणूनच स्मिता तुला त्रिवार सलाम !

-समीर गायकवाड.

लेखनसंदर्भ -
‘स्मिता पाटील: अ ब्रीफ इन्सिडेंटस’ - ले. मैथिली राव.
'स्मिता स्मितं आणि मी’ - ले. ललिता ताम्हाणे.

https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_73.html

download (3).png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख खूप छान झाला आहे. एक काळ होता जो या अभिनेत्रीने झपाटला होता. मागे केव्हा तरी सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि ती म्हणजे स्मिता पाटीलने लावलेलं झाड आहे. खरं तर अशी कितीतरी झाडं स्मिता पाटीलने लावली आहेत. तिच्या आठवणीत पण एक व्याकुळता आहे.

छान लिहिलयं..
हा लेख तुम्ही थोपूवर सुद्धा टाकलाय का? तिथे सुद्धा वाचण्यात आला..
स्मिताचा फक्त उंबरठा हा चित्रपट बघीतला आहे मी.. इतर वेळी फक्त गाण्यांमधे तिचे दर्शन व्हायचे सकाळच्या चित्रहार मधे.. Sad

'बाजार'चे दिग्दर्शक सागर सरहदी होते.
'अर्थ'मध्ये स्मिता खलनायिका?
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या स्मिता - राजेश खन्ना - शत्रुघ्न सिन्हा यांच्या चित्रपटाचं नाव 'दिल - ए - नादान' असं होतं.
'चक्र'साठी स्मिताला फिल्मफेअरच्या अगोदरच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार आणि १९८१चा फिल्मफेअर.
'सितम' हा पडेल चित्रपट?

असो.

उमरावजान मधली रेखा म्हणजे देखणी बाहुली? कुछ भी. संपूर्ण असहमत.
अर्थ मधे तिची भूमिका खलनायकी वळणाची अगदी वाट्त नाही. उलट पॅरेनॉइड शिझोफ्रेनिया झालेल्या मानसिक रोग असलेल्या असहाय स्त्रीची आहे. हा एक आयकॉनिक रोल आहे. खरे तर शबानाच्या रोल पेक्षा ही अवघड कारण ह्याला लोकांची साहानुभूति नाही. अर्थ मधले तिचे दोन सीन लै भारी आहेत.
एक आईला फोन करते तो. व दुसरे आपले मूल कसे असेल ते ती कल्पना करते मग पुढे जाउन
शबानाच्या मंगळसुत्रातील काळे मणी आपल्या दोघांच्या एकांतातही मला टोचत राहतात असे म्हणते तो सीन. अगदी काटा येतो. शी नीड्स मेडिकल हेल्प बिफोर शी कॅन कॅरी एनी रिलेशन शिप. महेश भट्टाने परवीन व त्याच्या संबंधांना चित्ररूप दिले होते. असे तेव्हा वाचले होते. ही मानसिक दॄष्ट्या अनस्टेबल
स्त्री महेश भट्टच्या अनेक सिनेमात येते. पुढे फिर तेरी कहानी याद आयी पण त्याचेच पुढले रूप आहे.
पूजा भट्ट ची व्यक्तिरेखा.

अर्थ मधील सर्वात भुसकट पात्र म्हणजे ते गिटार वाला गायक. केक वर मेणबत्ती लावून विश करणा रा.
शबाना बरोबर त्याला दूर ठेवते. असे मेणचट लोक फारसे भेटतच नाहीत. प्रिडेटर जास्ती.

स्मिताला न्युज रीडर म्हणूनही पाहिले आहे. आपली वाटायची. डिक्षन सुरेख