जिगरबाजांची दुनिया

Submitted by ललिता-प्रीति on 14 October, 2016 - 06:13

अनुभव (सप्टेंबर २०१६) अंकात प्रकाशित झालेला लेख

-------------------------------

Don’t be surprised... I will still rise... (रिओ ऑलिंपिकमधे वाजलेलं गीत, केटी पेरी)

१८ ऑगस्टच्या पहाटे कुस्तीपटू साक्षी मलिकने केटी पेरीचे हे शब्द अक्षरशः खरे केले. ०-५ पिछाडीवरून मुसंडी मारून ब्राँझ पदक जिंकलं. साक्षीच्या विजयाच्या ‘र’ला सुविचारात्मक ‘ट’ जोडणार्‍या संदेशांचा व्हॉटसअॅपवर एकच पूर आला. त्याच्याच जोडीने रेपचाज (कुस्तीतला एक नियम) म्हणजे काय, भारतीय महिला-कुस्तीच्या क्षेत्रात दादा मानलं जाणारं फोगट घराणं, त्यांच्यात साक्षीने कसं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय, वगैरे, वगैरे माहितीचे डोस, त्यावरच्या चर्चा हे देखील सुरू झालं. ते सारं वाचताना मला साधारण वर्षभरापूर्वीचा एक अनुभव आठवला...
मे, २०१५. स्थळ : रोम विमानतळ, डिपार्चर लाऊंज. आम्ही आमच्या विमानाची वाट पाहत उभे होतो. सगळीकडे गर्दी, गडबड, गलका सुरू होता. इतक्यात गर्दीतल्याच लांबवरच्या एकाच्या पाठीवर ‘INDIA’ अशी अक्षरं दिसली. पाहिलं तर ट्रॅकसूट, स्पोर्ट्सशूज... तो कुणीतरी खेळाडू होता. मग त्याच्या आजूबाजूला तसेच आणखी तिघं-चौघं दिसले. माझी उत्सुकता चाळवली. ते कोण असावेत याचा अंदाज बांधायचा मी प्रयत्न करत होते. काही वेळाने त्यांच्यातला एकजण आमच्या दिशेने आला आणि माझ्या पुढ्यातूनच आमची रांग ओलांडून पलिकडे गेला. तो होता योगेश्वर दत्त, लंडन ऑलिंपिक्समध्ये ब्राँझपदक पटकावलेला आपला कुस्तीपटू. मला इतका आनंद झाला! मी आयुष्यात प्रथमच ऑलिंपिकपदक मिळवलेल्या कुणालातरी असं प्रत्यक्ष आमोरासमोर पाहत होते! मी परत त्या इतर खेळाडूंच्या दिशेला पाहिलं. त्यांतल्या एकाच्या हातात एक मोठी ट्रॉफी दिसली. इटलीत कुस्तीची कुठलीतरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली असणार आणि तिथे यांनी ट्रॉफी मिळवली असणार हे मी ताडलं. अगदी उत्स्फूर्तपणे मी ही गोष्ट आजूबाजूच्या भारतीय सहप्रवाश्यांना सांगितली. त्यातल्या कुणालाही माझ्या अशा उचंबळून जाण्याचं कारण कळलेलं नाही हे त्यांच्या चेहर्‍यांनीच मला सांगितलं...
सुविचारात्मक संदेशांचे पूर आणणारे हे तेच चेहरे...
हे तेच चेहरे, जे रिओत महिलांच्या ४०० मी. फ्रीस्टाईल जलतरणाची पदकं नीता अंबानींच्या हस्ते प्रदान केली गेल्यावर ‘अखेर एका भारतीयाच्या हाताला ऑलिंपिकपदकाचा स्पर्श झाला’ असा संदेशही अहमहमिकेने सर्वांना पाठवत होते...
हे तेच चेहरे, जे दीपा कर्माकरने ऑलिंपिक-पूर्व स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकाची बातमी ‘ऑलिंपिकमध्ये पहिलं गोल्ड’ या मथळ्यासह फेसबूकवर पोस्ट करत होते...
हे तेच चेहरे, जे हातात राखी घेऊन युसेन बोल्टच्या मागे पळणार्‍या ‘डीडीएलजे’तल्या काजोलच्या ‘मॉर्फ्ड’ फोटोला मनमुराद हसत होते...

क्रीडाक्षेत्राबद्दलचं असं औदासिन्य दर चार वर्षांनी अंगावर येऊन आदळतंच. प्रत्येक ऑलिंपिक्सदरम्यान आपल्याला पदकं का मिळत नाहीत याची तावातावाने चर्चा करणारे ‘सीझनल क्रीडाप्रेमी’ ऑलिंपिक संपताच ती चर्चाही आटोपती घेतात. मग पुढली चार वर्षं आपले खेळाडू काय करतात, कुठे-कुठे जाऊन खेळतात, कुणाला हरवतात, कुणाविरुद्ध हरतात याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. त्या-त्या खेळातले जागतिक विक्रम कोणते, जागतिक रॅकिंग असणारे अन्य खेळाडू कोण, त्यांच्या आणि आपल्या खेळाडूंच्या कामगिरीत काही तफावत आहे अथवा नाही, हे सारे तपशील हवेत विरून जातात. चार वर्षांनी परत एकदा ऑलिंपिक स्पर्धा येतात. चर्चा करणारे तोवर परत एकदा ताजेतवाने झालेले असतात; त्यांना चघळायला बर्‍याच दिवसांत नवीन विषय मिळालेला नसतो; ऑलिंपिक्ससारखी आयती संधीही चालून आलेली असते, मग हे होतात सुरू!
पण खेळाडूंना असं करून चालणारं नसतं! एकतर त्यांच्यासाठी दर चार वर्षांनी येणारी ऑलिंपिक्सची संधी ‘आयती चालून आलेली’ नसते. तिथे निवड होण्यासाठी जिवाचं रान करावं लागतं; राष्ट्रीय स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इतर विविध स्पर्धा, अमुक मास्टर्स, तमुक ग्रां-प्री, ढमुक लीग अशा या ना त्या ठिकाणी सतत उत्तम कामगिरीची पराकाष्ठा करावी लागते. डोक्यात सतत खेळाचा, अभ्यासाचा, स्वतःच्या चुका सुधारण्याचा विचार चालू ठेवावा लागतो; त्यापायी वैयक्तिक मौजमजेवर, कुटुंबासोबतच्या वेळेवर पाणी सोडावं लागतं; पण त्याच्याही आधी अशा सततच्या स्पर्धात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी व्यक्तिमत्त्वात एक जिगर असावी लागते.
उदाहरणार्थ, रिओतली सिंधूची वाटचाल आठवा. प्री-क्वार्टरफायनलला तिने दोन गेम्समध्ये तैपेईच्या खेळाडूला हरवलं आणि क्वार्टरफायनलला प्रवेश केला. पहिल्यावहिल्या ऑलिंपिक्समध्ये इथवर येणं हेच केवढं मोठं काम! पण असं म्हणून ती जर निवांत झाली असती, तर चीनची वांग यिहान दबा धरून बसलेलीच होती. म्हणजे परत एकदा पहिल्यापासून सुरूवात! प्रत्येक पॉईंटसाठी झुंजायचं, ४-६ वर्षांचा अथक सराव पणाला लावायचा... आधीच्या मॅचला हे सगळं करून झालेलं असतं; तरी परत करायचं! सिंधूने ते केलं, यिहानला हरवलं. पहिल्यावहिल्या ऑलिंपिक्समध्ये सेमीफायनलला पोहोचणं हे तर आधीपेक्षाही भारी काम! पण आता नवीन आव्हान - ओकुहाराचं. पुन्हा एकदा, काय काय शिकलोय ते प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येऊन ठेपते; पुन्हा झुंज, दोन गेम्स, कदाचित तीन; झुंजायचं, झगडायचं, हरलो तर काय हा विचार डोक्यात येऊ न देता लढायचं... सिंधू लढली, चक्क फायनलला पोहोचली. फायनलला प्रवेश झाला म्हणजे पदक तर नक्की होतं; पण आगेकूच अजून संपलेली नव्हती. आता तर समोर कॅरोलिना मरीन उभी ठाकलेली... ती सध्याची वर्ल्ड चँपियन, युरोपियन चँपियन, ऑल इंग्लंड चँपियन! परत एक लढाई सुरू, निकराची झुंज... वाचून आपल्याला दमायला होतं! कॅरोलिना मरीन फायनलला येईतोवर एकही गेम हरलेली नव्हती. फायनलच्या पहिल्या गेममध्येही ती १९-१६ ने पुढे होती. तिथून सलग ५ पॉईंटस घेत सिंधूने पहिली गेम घेतली. कुठून काढले तिने हे ५ पॉईंटस हे त्या एका ‘शटल’लाच ठाऊक! जिगर असल्याशिवाय हे होत नाही!
सिंधूचं केवळ एक उदाहरण झालं; ऑलिंपिक्स ही अशी जागा आहे, की जिथे या जिगरीपणाचे अनेक आविष्कार आपल्याला दिसतात. खेळात जिगर दाखवता दाखवता खेळाडूंव्या व्यक्तिमत्त्वातही ती पाझरत असावी. वंशभेदासारख्या क्रीडाक्षेत्रातल्या काही मूलभूत वैचारिक अंतर्धारा जेव्हा आडव्या येतात तेव्हा तर अशी जिगरी व्यक्तिमत्त्वं तळपतातच. याचं एक स्तिमित करणारं उदाहरण आहे १९६८ सालच्या मेक्सिको सिटी ऑलिंपिक्सच्या वेळचं. पुरूषांच्या २०० मी. पळण्याच्या शर्यतीत टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस या अॅफ्रो-अमेरिकी खेळाडूंनी गोल्ड आणि ब्राँझ पटकावलं होतं; तर सिल्वर मिळालं होतं ऑस्ट्रेलियाच्या पीटर नॉर्मन या श्वेतवर्णी खेळाडूला. टॉमी आणि जॉन दोघांनीही ठरवलं होतं की पदक स्वीकारताना वंशभेदाच्या विरोधात आवाज उठवायचा; कृष्णवर्णीय खेळाडूंची हलाखीची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणायची. आपल्या या मताशी पीटर नॉर्मन सहमत आहे का ते जाणून घेणं त्या दोघांना आवश्यक वाटलं. त्यांनी पीटरला तसं विचारल्यावर त्याने तात्काळ त्यांना आपली सहमती दर्शवली. इतकंच नव्हे, तर टॉमी आणि जॉनने आपापल्या गणवेषावर ‘ऑलिंपिक प्रोजेक्ट फॉर ह्युमन राईट्स’चा जसा एक-एक बिल्ला लावला होता, तसाच एक पीटरनेही स्वतःसाठी मागून घेतला. पदकसोहळा पार पडला. अपेक्षेनुसार अमेरिकी खेळाडूंची ऑलिंपिक-व्हिलेजमधून तात्काळ हकालपट्टी झाली. मायदेशी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. काही काळानंतर त्यांच्या या लढ्याला मान्यताही मिळाली. मात्र या घटनेनंतर पीटर नॉर्मनला जी वागणूक मिळाली ती फार धक्कादायक होती. ऑस्ट्रेलियाच्या एकंदर ऑलिंपिक-चित्रातून पीटरला जणू खोडून टाकण्यात आलं. १९७२ सालच्या म्युनिक ऑलिंपिक्ससाठी तो पात्र ठरला होता. पण तरीही त्याला ऑस्ट्रेलियाच्या चमूतून वगळलं गेलं. इतकंच नव्हे, तर त्याला उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळवणं मुश्किल होऊन बसलं. त्याने केवळ एकदा आपल्या ‘त्या’ कृत्याची माफी मागितली असती तर हे चित्र बदललं असतं; त्याला २००० सालच्या सिडनी ऑलिंपिक कमिटीत सन्माननीय सदस्यत्त्व मिळालं असतं. पण त्याने तसं केलं नाही. दरम्यान निराशा आणि दारूच्या व्यसनात तो पूर्णपणे गुरफटला गेला आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा तडकाफडकी मृत्यू झाला. ही घटनाही कुणाच्या गावी नव्हती. त्याच्या अंत्ययात्रेत टॉमी आणि जॉन दोघंही सहभागी झाले. पीटरने आयुष्यभर दाखवलेली जिगर त्याच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारला खर्‍या अर्थाने उमगली. २०१२ साली ऑस्ट्रेलियाच्या संसदेने एका निवेदनामार्फत पीटरची जाहीर माफी मागितली...
... काळ पुढे सरकला. २०१६ चं ऑलिंपिक्स उजाडलं. महिला-जलतरणाच्या १०० मी. फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या सिमोन मॅन्युएलने सुवर्णपदक जिंकल्यावर ‘जलतरणातलं वैयक्तिक पदक पटकावणारी पहिली अॅफ्रो-अमेरिकी खेळाडू’ म्हणून तिचं जगभरात कौतुक झालं. त्यावरची तिची प्रतिक्रिया बोलकी होती - 'एक दिवस असा येईल की माझ्यासारखे अनेक इथे असतील; मग बातमीदारांना असा खास उल्लेख करावा लागणार नाही!' म्हणजे बघा, वरती सिंधूबद्दल जे जे लिहिलं तेच जलतरणाच्या चौकटीत सिमोननेही केलं असणार, पण सोबत तिला वंशभेदाच्या डंखानेही सतत डिवचलं असणार. अंगात जिगर नसती तर तिला त्या डंखाशी झुंजत सुवर्णपदकापर्यंत पोहोचता आलं असतं? कदाचित नाही!

आणखी एक वेगळीच कहाणी कोसोव्होच्या मायलिंदा केल्मेंदीची. रिओत महिलांच्या ज्युदो स्पर्धेत ५२ किलो गटात केल्मेंदीने सुवर्णपदक जिंकलं. पदक स्वीकारताना तिला अश्रू आवरत नव्हते. कारण कोसोव्होचं ते पहिलंच ऑलिंपिक-पदक होतं. १९९१-९२मध्ये युगोस्लाव्हिया देशाचे अनेक तुकडे झाले; त्यातल्या काही तुकड्यांचे आणखी तुकडे झाले; त्यातला एक तुकडा म्हणजे कोसोव्हो. २००८मध्ये कोसोव्होने सर्बियापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. पण २०१२च्या लंडन ऑलिंपिक्सच्या वेळी कोसोव्होला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे तेव्हा केल्मेंदी शेजारच्या अल्बेनियातर्फे ऑलिंपिक्समध्ये उतरली होती. २०१४मध्ये कोसोव्होला स्वतंत्र राष्ट्र म्हणून ऑलिंपिक्समध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली आणि आपल्या जन्मभूमीसाठी पहिलंवहिलं ऑलिंपिकपदक मिळवण्याचा विक्रम केल्मेंदीने केला. जगातल्या मोजक्याच देशांनी कोसोव्होला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यांत सर्बिया अर्थातच नाही. इंटरनेटवरच्या एका वृत्तानुसार सर्बियाने आपल्या खेळाडूंना ताकीद दिली होती, की कोसोव्होच्या कोणत्याही खेळाडूसोबत पदकांच्या मंचावर उभं राहायचं नाही, अगदी त्यांच्याशी हस्तांदोलनही करायचं नाही! कोणत्याही सामन्यानंतर विजेता खेळाडू आणि पराभूत खेळाडू दोघांनी एकमेकांचं अभीष्ट चिंतणं हा तर क्रीडाक्षेत्राचा आत्मा; पण आंतरराष्ट्रीय राजकारणाला त्याची काय फिकीर असणार?! ज्युदोच्या त्या स्पर्धेत सर्बियाची एकही खेळाडू नव्हती म्हणून बरं झालं, नाहीतर केल्मेंदीच्या कामगिरीला कोणतं गालबोट लागलं असतं याची कल्पनाही करवत नाही. पण हे सारं बाजूला सारून सुवर्णपदक पटकावल्यावर केल्मेंदी काय म्हणाली असेल? - मी स्वतः अल्बेनियन आहे; त्यामुळे लंडनमध्येही मी माझ्याच माणसांचं प्रतिनिधित्व करत होते. फक्त आता मी माझ्या देशासाठी खेळते आहे!

केल्मेंदीला उशीरा का होईना, पण आपल्या देशातर्फे सहभागी तरी होता आलं. पण रिओ ऑलिंपिक्समधे काही खेळाडू असेही होते की त्यांना अंतर्गत यादवीमुळे आपापले देश सोडावे लागले होते; निर्वासित म्हणून अन्य देशांचा आसरा घ्यावा लागला होता. आय.ओ.सी.ने असे दहा गुणी खेळाडू निवडून त्यांचा एक संघ तयार केला - ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’. या संघातल्या युसरा मार्दिनी या मूळच्या सिरीयाच्या जलतरणपटूबद्दल याआधीही बरंच बोललं-लिहिलं गेलेलं आहेच. युसराव्यतिरिक्त या संघातले पाच धावपटू केनियाच्या काकुमा रेफ्युजी कँपमधून आलेले आहेत. २०१४ च्या जागतिक निर्वासित दिनादिवशी (२० जून) केनियाची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू तेग्ला लोरूप हिने या कँपला भेट दिली. तेव्हा आयोजित केल्या गेलेल्या धावण्याच्या शर्यतीतली काही जणांची कामगिरी पाहून तिला अतीव आश्चर्य वाटलं. त्यांतल्या वीस जणांना तिने आपल्यासोबत सरावासाठी नैरोबीला नेलं. पुढे तिच्याच पुढाकाराने आणि आय.ओ.सी.च्या सहकार्याने त्या वीस जणांपैकी पाच जण थेट रिओ ऑलिंपिक्समध्ये जाऊन पोहोचले!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जेव्हा खेळाडू अशी लखलखती कामगिरी करतात तेव्हा फार आनंद होतो. तो आनंद यावेळी सर्वाधिक कुणी दिला असेल, तर दीपा कर्माकरने!
दीपाची कहाणी समजून घ्यायची तर आधी भारतीय जिम्नॅस्टिक्सची कहाणी समजून घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्सच्या चित्रात भारत कुठेच नाही हीच ती कहाणी. मला आठवतं, शाळेत असताना १९८२ सालच्या ‘एशियन गेम्स’ दूरदर्शनवर डोळे फाडफाडून बघितल्या होत्या. त्या गेम्समध्ये भारताची एक जिम्नॅस्ट मुलगी होती, ती देखील चक्क मराठी - संजीवनी करंदीकर. चीन-जपान-कोरियाच्या जिम्नॅस्टस्‌पुढे तिचा तिथे निभाव लागला नाही. पण तेव्हा आपल्या देशात होणार्‍या अशा गेम्स, त्याचं टीव्हीवरचं प्रक्षेपण हे सगळंच इतकं अद्भुत होतं, की त्यात या गोष्टीची फार चर्चा झाली नाही. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या भारताच्या कुठल्याही जिमनॅस्टचं नाव पटकन आठवत नाही.
२०१० सालच्या दिल्लीतल्या राष्ट्रकूल क्रीडास्पर्धांमध्ये आशीष कुमारने ‘फ्लोअर एक्सरसाईझ’मधे ब्राँझ पटकावलं. (त्यावर भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या महान पदाधिकार्‍यांनी आशीषच्या रशियन प्रशिक्षकाला ‘हे काय? इतकं करून फक्त ब्राँझच?’ असा प्रश्न करून पुरतं चीतपटही केलं.) दीपा कर्माकर प्रथम प्रकाशात आली २०११ सालच्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये. तेव्हा तिने जिम्नॅस्टिक्सच्या चारही वैयक्तिक प्रकारांमध्ये सुवर्णपदकं मिळवली. पण सुरूवातीला म्हटलं तसं, ऑलिंपिक्सव्यतिरिक्त इतर वेळी आपले खेळाडू काय करतात, कुठे खेळतात याचा पाठपुरावा कुठे केला जातो?! त्यात, आपल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित होणं अपेक्षित असताना २००१-२०१५ या कालावधीत आठऐवजी केवळ पाचवेळाच आयोजित केल्या गेल्या. ऑलिंपिक्समधल्या भारताच्या कामगिरीचा धांडोळा, लेखाजोखा वगैरे घेणार्‍यांनी आधी या गोष्टीची झाडाझडती घेतली पाहिजे. जिथे खेळाडूंनी आपला पाया पक्का करायचा तिथे आयोजनापासूनच असं कमालीचं औदासिन्य असताना आपल्या खेळाडूंनी थेट ऑलिंपिक्सच्या गगनाला गवसणी घालण्याची अपेक्षा धरणं, त्यावरून त्यांना टोकणं म्हणजे अक्षरशः पाप आहे!
या सार्‍या झाकोळून टाकणार्‍या पार्श्वभूमीवर २०१४च्या ग्लास्गो राष्ट्रकूल क्रीडास्पर्धांमध्ये दीपाने व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक पटकावलं. तिने सादर केलेला ‘प्रोडुनोव्हा व्हॉल्ट’ हा व्हॉल्टमधला सर्वात कठीण प्रकार मानला जातो. १९९९ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियाच्या एलेना प्रोडुनोव्हाने तो सर्वप्रथम यशस्वीरीत्या सादर केला. म्हणून त्या प्रकाराला तिचं नाव दिलं गेलं. त्या आधी आणि नंतरही अनेकांनी तसे प्रयत्न केलेले आहेत. त्यातला धोका असा की तो सादर करताना रेसभर जरी चूक झाली तरी कायमचं अपंगत्व किंवा मृत्यू ठरलेला. आजवर जगातल्या केवळ पाचच महिला जिम्नॅस्ट तो यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलेल्या आहेत. दीपा त्यांच्यापैकी एक आहे.
रिओत जगभरातल्या भल्याभल्या जिम्नॅस्टस्‌सोबत दीपा उभी राहिली; जिगरी कौशल्य दाखवत पठ्ठी थेट व्हॉल्टच्या अंतिम फेरीत पोहोचली; तिथेही चौथी आली! गंमत अशी, की ऑलिंपिक्स ‘रेग्युलरली फॉलो’ करणार्‍या अनेकांना तिचं आडनाव नक्की ठाऊक नव्हतं. बरेच जण तिला ‘करमरकर’ म्हणत होते. ती त्रिपुराची आहे हे देखील अनेकांना माहिती नव्हतं. ते कळल्यावर ‘त्रिपुराची??’ हे जे उद्गार कानावर पडायचे त्यातच तिच्या कहाणीचं सार दडलेलं होतं.
दत्तू भोकनाळची कहाणीही अशीच अभिमानास्पद आणि भिडणारी आहे. पाथरवटाची कामं करण्यात त्याचं बालपण गेलं. सैन्यात नोकरीला लागल्यानंतर त्याचा नौकानयनाशी प्रथम संबंध आला. ऑलिंपिक्स पात्रतास्पर्धेच्या आधी त्याची आई एका अपघातात जबर जखमी झाली. मेंदूला दुखापत झाल्यामुळे ती माणसांना ओळखू शकत नव्हती. अजूनही तिची अवस्था फारशी सुधारलेली नाही. रिओच्या तयारीत गुंतलेला दत्तू अनेक महिने आपल्या आईला पाहू शकलेला नव्हता. या सार्‍या प्रतिकूल घटकांना मागे सारत त्याने रिओतल्या ‘रोईंग-सिंगल स्कल्स’ स्पर्धेत भाग घेतला आणि तो १३वा आला. रिओतली त्याची कामगिरी आधीच्या भारतीय कामगिरीला उंचावणारी ठरली. ऑलिंपिक्सचं हेच तर मर्म आहे. पदक मिळवणं हे सर्वोच्च ध्येय असतंच; पण ते नाही मिळालं तर वैयक्तिक किंवा देशासाठीची कामगिरी उंचावणं याचं मूल्य पदकापेक्षा जराही कमी ठरत नाही. ललिता बाबर, टी. गोपी, खेताराम यांनी ते केलं.
पण द्युती चंद या आपल्या धावपटूला निराळ्याच आव्हानाला तोंड द्यावं लागलं. ती स्त्री नाहीच असा निष्कर्ष काढून तिला महिलांसाठीच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. ऑलिंपिक्सपूर्वी तिला ही न्यायालयीन लढाई लढावी लागली. केवढे मानसिक क्लेष झाले असतील तिला! पण न्यायालयात विजय मिळवून ती रिओला रवाना झाली. तिथे तिला तिच्यासारखीच एक सखी भेटली - दक्षिण आफ्रिकेची कॅस्टर सिमेन्या. अशा पद्धतीच्या भेदभावाचा डंख कसा असतो हे दोघींना ठाऊक असल्यामुळे, त्याला तोंड देण्यासाठी मनाचा किती कणखरपणा हवा याची एकसारखीच प्रचिती आलेली असल्यामुळे दोघी एका धाग्याने बांधल्या गेल्या आणि त्यांचा सेल्फी प्रसारमाध्यमांना हवाहवासा वाटला.
शारिरीक क्षमतांपेक्षाही असा मनाचा कणखरपणा क्रीडाक्षेत्रात तर फार प्रकर्षाने समोर येतो. या कणखरपणाची अनेक रूपं रिओत पाहायला मिळाली. त्याचं एक रूप होतं सारा अत्तार. नखशिखांत क्रीडावेष धारण केलेली सौदी अरेबियाची सारा मॅरेथॉनमध्ये धावली. तशी ती लंडन ऑलिंपिक्समध्येही दिसली होती. दोन्ही ठिकाणी स्पर्धा जिंकणं हे तिचं ध्येय नव्हतंच. आपल्या देशात महिला खेळाडूंची संस्कृती फुलवण्यासाठी तिची धडपड चालू आहे. असं प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी केवढी जिगर हवी!
पुरूषांच्या रग्बी-सेव्हन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या फिजीच्या संघाचीही अशीच कथा. १९२४ नंतर प्रथमच रग्बी-सेव्हन या क्रीडाप्रकाराचा ऑलिंपिक्समध्ये समावेश झाला. फिजीच्या रग्बीपटूंकडे सरावासाठी योग्य साधनं, साहित्य काहीही नव्हतं. चेंडूऐवजी प्लॅस्टिकच्या बाटल्या, टी-शर्ट्सचे बोळे, नाहीतर रबरी स्लिपर्स वापरून ते खेळ शिकले. उन्हातान्हात सतत अनवाणी पायांनी खेळण्याने त्यांच्या तळपायांवर भाजल्याच्या कायमस्वरूपी खुणा उमटलेल्या आहेत. संघातले अनेकजण इतर बारीकसारीक नोकर्‍या करतात. बहुतेकांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. फेब्रुवारीत आलेल्या भयकारी चक्रीवादळाने त्यांच्यातल्या अनेकांची घरंच्या घरं वाहून नेली. तरीही हा संघ ऑलिंपिक्ससाठी सराव करत राहिला आणि अखेर चक्क सुवर्णपदक घेऊन गेला!
अशा या प्रेरक आणि जिगरबाज क्रीडाकहाण्या; सांगू तितक्या त्या कमीच आहेत. त्यांत ओक्साना चुसोविटिना आहे; दीपा कर्माकरप्रमाणेच व्हॉल्ट फायनलला प्रोडुनोव्हा करणारी हीच ती उझबेकिस्तानची जिमनॅस्ट. तिचं हे सातवं ऑलिंपिक होतं. क्रिस्टिन आर्मस्ट्राँग - ही आपली नोकरी सांभाळून शिवाय सायकलिंगही करते. रिओत तिने सलग तिसरं सुवर्णपदक मिळवलं, ते देखील वयाच्या ४३व्या वर्षी. जर्मनीची रायफल-शूटर बार्बरा एंगलडेर, हे तिचं चौथं ऑलिंपिक होतं; याआधीच्या तीनही ऑलिंपिक्समध्ये ती पदकाच्या जवळपासही पोहोचू शकलेली नव्हती; यावेळी मात्र ती सुवर्णपदक जिंकून गेली. सुवर्णपदक मिळवल्यानंतरचा तिचा जल्लोष अगदी पाहण्यासारखा होता. २००४ पासूनची तिची झुंज, जिद्द, जिगर अखेर २०१६ मध्ये फळाला आली! ग्रेट ब्रिटनचा धावपटू मो फराह - ऑलिंपिक्सच्या इतिहासातला तो केवळ दुसरा असा धावपटू ज्याने ५००० मी. आणि १०,००० मी. पळण्याच्या शर्यतींत सलग दोन ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदकं मिळवली...
रिओतल्या अकरा हजारांहून अधिक खेळाडूंच्या तितक्याच कहाण्या; प्रत्येकाच्या वयाच्या पाचव्या-सातव्या वर्षी सुरू झालेल्या; अजूनही सुरूच असलेल्या;
यापुढे एखाद्या दिपीकाकुमारीवर टीका करण्यापूर्वी हा विचार करा, की तिने तिच्या सुरूवातीच्या दिवसांत हाताने बनवलेल्या धनुष्य-बाणाने झाडावर लटकणार्‍या कैरीवर नेम धरून सराव केलेला आहे. सांगायचंच झालं तर आपल्या पोराबाळांना हे सांगा, की ती गेली ४-५ वर्षं जगातल्या पहिल्या १० महिला नेमबाजांमध्ये गणली जाते; तिने नेमबाजीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आणि वर्ल्डकपमध्ये मिळून आजवर एकूण ५ रौप्यपदकं मिळवलेली आहेत...
यापुढे कुणा मनीषसिंग रावतचे वाभाडे काढण्यापूर्वी हा विचार करा, की त्याने एकीकडे उदरनिर्वाहासाठी वेटरची अर्धवेळ नोकरी करत २० किमी चालण्याच्या शर्यतीसाठी दररोज पहाटे ४ वाजता उठून अथक मेहनत घेतलेली आहे; या शर्यतीसाठी चालण्याची पद्धत जरा वेगळी असल्याने त्यावरून लोकांची कुत्सित चेष्टा सहन केली आहे; त्याला प्रोत्साहन देणं, मदत करणं तर दूरच, गावच्या लोकांनी मजा वाटून त्याचे व्हिडिओ काढले त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. सांगायचंच झालं तर आपल्या पोराबाळांना हे सांगा, की रिओत तो १३ वा आला, केवळ १० सेकंदांनी त्याचं पदक हुकलं, भल्याभल्यांना त्याने त्या दरम्यान मागे टाकलं, त्यात लंडनमध्ये रौप्यपदक मिळवलेला खेळाडूही होता!
सांगायचंच झालं, तर आपल्या पोराबाळांना ब्राझिलच्या राफाएला सिल्वाबद्दल सांगा. रिओतल्या बकाल झोपडपट्टीत अत्यंत गरीबीत लहानाची मोठी झालेली राफाएला, तिला ‘माकड’ म्हणून हिणवलं गेलं होतं, तिने आपल्या पहिल्याच ऑलिंपिक्समध्ये ज्युदोत सुवर्णपदक पटकावलं.
ब्राझिलच्याच थियागो ब्राझ दा सिल्वाबद्दलही सांगा. त्याने पोल-व्हॉल्टमध्ये नवीन ऑलिंपिक रेकॉर्ड केलं याचा त्याच्या देशवासियांना पत्ताही नव्हता; त्याने सुवर्णपदक जिंकलं तेव्हा समस्त ब्राझिलवासी त्यांच्या संघाची व्हॉलीबॉलची मॅच पाहण्यात गर्क होते.
या जिगरी झुंजींच्या कहाण्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायलाच हव्यात, कारण असं समजा, की ‘I will still rise...’ या ओळीतला ‘still’ हा शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर, याच्या प्रिंट काढून सगळ्यांना वाचायला दिल्या पाहिजेत. अगदी कळकळीने, मनाला भिडणारे लिहिले आहे.

आपल्या कडे फक्त पदकविजेत्या खेळाडूच्या त्याग आणि मेहनातीबद्दल लिहिले जाते, पण प्रत्येक खेळाडू तितकाच मेहनत घेऊन तिथवर आलेला असतो हे सगळे विसरतात. तो जिंकला नाही म्हणून त्याचा त्याग, त्याची तयारी कमी ठरत नाही.

अतिशय सुंदर लेख . केवढी मेहनत घेतलीये या खेळाडूंनी .

आपल्या कडे फक्त पदकविजेत्या खेळाडूच्या त्याग आणि मेहनातीबद्दल लिहिले जाते, पण प्रत्येक खेळाडू तितकाच मेहनत घेऊन तिथवर आलेला असतो हे सगळे विसरतात. तो जिंकला नाही म्हणून त्याचा त्याग, त्याची तयारी कमी ठरत नाही.>>>> +१

पीटर नॉर्मनच्या लढ्याबद्दल या लिंकवर अधिक माहिती मिळेल

http://www.filmsforaction.org/articles/the-white-man-in-that-photo/

अतिशय सुंदर लेख . केवढी मेहनत घेतलीये या खेळाडूंनी .

आपल्या कडे फक्त पदकविजेत्या खेळाडूच्या त्याग आणि मेहनातीबद्दल लिहिले जाते, पण प्रत्येक खेळाडू तितकाच मेहनत घेऊन तिथवर आलेला असतो हे सगळे विसरतात. तो जिंकला नाही म्हणून त्याचा त्याग, त्याची तयारी कमी ठरत नाही.>>>> +१

पीटर नॉर्मनच्या लढ्याबद्दल या लिंकवर अधिक माहिती मिळेल

http://www.filmsforaction.org/articles/the-white-man-in-that-photo/

खूपच भारी लेख ललिता ! अनुभवच्या फीड वर टिझर पाहिलं होतं. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
शेवटच्या पॅराग्राफला खूप अनुमोदन! डे बाईंपासून ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच्या असंवेदनशील कमेंट्सपर्यंत प्रत्येक वेळी चिडचिड व्हायची. शक्य तिथे वाद घातले पण किती जणांना समजावणार!