हिसाब

Submitted by स्वप्ना_राज on 14 October, 2016 - 01:43

'आई ग!' वैतागून सुजीतने सुरी बाजूला फेकली. अर्धवट सोललेलं मोसंबं तसंच ठेवून आधी तो Band-aid शोधायला धावला कारण बोटातून रक्ताची धार लागली होती. पण नेहमीप्रमाणेच Band-aid मिळेना. मग मसाल्याचा डबा शोधून त्याने चिमूटभर हळद बोटावर चेपली. तरी बरंय मागच्या महिन्यात आई आली होती तेव्हा हा मसाल्याचा डबा भरून गेली होती नाहीतर हळदसुध्दा वेळेत मिळाली नसती. मग २ मिनिटं तो शांत बसला. तोवर रक्त यायचं बंद झालं होतं. अचानक त्याला आठवलं की बेसिनजवळच्या कपाटात Band-aid ठेवलंय. ते काढून लावता लावता तो विचार करायला लागला. आजकाल वेंधळेपणा वाढलाय आपला. २ दिवसांपूर्वी राधिका आली होती तेव्हा तिला condensed milk चा डबा उघडून देताना पण टीनओपनर लागला होता हाताला. राधिका म्हणालीसुध्दा की तुझं लक्ष असतं कुठे रे आजकाल, किती पट्ट्या लावून ठेवल्या आहेस हाताला. त्या विचारासरशी त्याने आपल्या हाताकडे पाहिलं. दोन्ही हात मिळून आधीच चार ठिकाणी पट्ट्या होत्या. आजची पाचवी. साला, हे नव्या प्रोजेक्टचं काम सुरु झाल्यापासून डोक्याला ताप झालाय नुसता. त्याचं टेन्शन आहे म्हणूनच हे सगळं होतंय. अजून ४ महिने कसं निभावणार आहे काय माहीत. आता जरा काळजी घ्यायला पाहिजे. अश्याच पट्ट्या वापरत राहिलो तर Johnson & Johnson वाले घरी येऊन सत्कार करतील आपला. स्वत:शीच हसत त्याने मोसंबं फ्रीजमध्ये ठेवलं आणि किचनमधला दिवा बंद करून तो झोपायला गेला.

सकाळी ऑफिसला जाईपर्यंत कुठं कापलं लागलं नाही पण चहा करताना कसा कोणास ठाऊक चहाच्या पातेल्याचा चटका बसला. लगेच पाण्याखाली हात धरला म्हणून नाहीतर पोका आला असता. तरी थोडा वेळ चुरचुरत राहिलं. ऑफिसमध्ये पोचल्यावर कामाच्या गडबडीत सगळं विसरायला झालं. लंचनंतरच्या मिटींगसाठी प्रोजेक्टच्या डॉक्युमेंटसचे प्रिंटआऊट काढायचे होते. आपल्या क्युबिकल मध्ये बसून लंच घेता घेताच त्याने प्रिंट कमांड देऊन टाकली आणि मग उठून प्रिंटरजवळ जाऊन बघतो तर काय चारच पानं प्रिंट झालेली. चरफडत ट्रे उघडला तर आत पेपर्स नाहीत. खालचा drawer उघडून बघितला तर त्यातही नाहीत. च्यायला....ह्या नामदेवला नुसतं बसून चहा ढोसायला पाहिजे. ही सगळी कामं आम्हीच करायची. आता एचआरची सीमा बसते तिथल्या क्युबिकल मधून आणावे लागणार. नामदेवाला ऐनवेळी आठवतील तेव्हढ्या सगळ्या शिव्या मोजून सुजितने सीमाच्या डेस्कखालचं कपाट उघडलं आणि खसकन पेपर्स ओढले. झालं! एका पेपरची धारदार कड बोटाला लागली आणि तिथून रक्त यायला लागलं. आता मात्र सुजितला शिव्या द्याव्या का रडावं तेच कळेना झालं. नशिब रिसेप्शनची मिसेस डीकोस्टा तेव्हढ्यात आली आणि धावत जाऊन तिने मेडिसिनच्या कपाटातून पट्टी आणून बोटाला लावली. हाताला लागलेल्या बाकीच्या पट्ट्या बघून ती अवाक झाल्याचं सुजितच्या नजरेतून सुटलं नाही. 'Why are you always in such a hurry young man? You have to be careful'.

त्याच्या पायांवर बूट होते म्हणून नाहीतर मिसेस डीकोस्टाला काय वाटलं असतं काय माहित. रविवारी रात्री घाईघाईत बाथरूमचा दरवाजा बंद करताना डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला आणि अंगठा काळानिळा झाला होता. त्याआधी संध्याकाळी एयरपोर्टवरून घरी येताना बॅग ओढताना पायाला लागून उजव्या पायाचं एक बोट दुखावलं होतं. आणि परवा सकाळी उठल्यावर पाठ का चुरचुरतेय म्हणून बाथरुममधल्या आरश्यात पाहिलं तर पूर्ण पाठीवर ओरखडे उठले होते. वैतागून त्याने आधी हाताची सगळी नखं जिव्हारी लागेपर्यंत कापली होती.

मिसेस डीकोस्टाचे आभार मानून तो प्रिंटरकडे आला. अर्ध्या तासात मिटींगला पोचायचं होतं. भराभर प्रिंटआऊटस् काढून त्याने ते फोल्डरमध्ये कोंबले आणि निघाला. बाहेर एकही रिक्षा दिसेना. बोंबला! तेव्हढ्यात उलट्या बाजूने एक येताना दिसली. 'रिक्षा, रिक्षा' म्हणून तो धावला आणि त्या नादात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रककडे त्याचं लक्षच गेलं नाही. 'थाड' असा आवाज झाला. रस्त्यात आपण ठेच लागून पडतो तेव्हा पडताना कसं आपल्याला हे होतंय ह्यावर क्षणभर विश्वासच बसत नाही तसंच त्याला वाटलं. मग सगळीकडे अंधार झाला.

त्याने डोळे उघडले तेव्हा तो आपल्या घरी होता आणि शेजारी राधिका बसलेली होती. 'सुजित, आता कसं वाटतंय? ज्यूस देऊ का थोडा? आता हिंदी पिक्चरमधल्या हिरोसारखं "मै कहा हू" असं विचारू नकोस हं.' ती थट्टा करत होती तरी तिच्या चेहेऱ्यावरची काळजी सुजितला जाणवली. तो काही बोलायच्या आतच ती म्हणाली 'तुला accident झाला आठवतंय ना? नशिब ऑफिसच्या समोरच झाला. तुझ्या ऑफिसमधला अमोल तिथल्या टपरीवर चहा घेत होता. डावा हात फ्रेक्चर झालाय आणि सगळीकडे खरचटलंय खूप. पण डोक्याला काही मार लागला नाही हे आपलं नशिब. मी आईंना फोन केलेला नाहीये. म्हटलं तूच करून सांग म्हणजे तू ठीक आहेस ते त्यांना कळेल. आणि हो, डॉक्टर म्हणत होते की दोन दिवस थोडं अंग दुखेल कारण मुका मार बराच लागलाय. आता तू थोडा वेळ पडून रहा स्वस्थ. मी स्वयंपाकाचं बघते."

ती गेल्यावर सुजितने जवळ पडलेला फोन उचलला. बरेच मेसेजेस आलेले दिसत होते. आधी अम्याचा वाचावा. 'हाय दोस्त, कसं वाटतंय मस्त पडून राहायला? तुझी मजा आहे लेको. आता इथे कपूर साला मला राबवून घेणार. चलो, टाईम मिले तो इस नाचीझ दोस्तको मेसेज जरूर करना. फिर मिलेंगे." आणि मग एक फिदीफिदी हसणारी स्मायली. हा अम्या पण ना. परदु:ख शीतळ. ह्याला नाही कल्पना येणार माझ्या दु:खाची. हा विचार मनात आला मात्र आणि सुजित चमकला. हे वाक्य कुठेतरी ऐकलंय. कुठे बरं? आत्ताच कधीतरी. पण कधी? कुठे? ठणकणारया अंगाकडे दुर्लक्ष करून सुजित विचार करायला लागला. आणि जेव्हा त्याला आठवलं तेव्हा त्याच्या अंगभर एक भीतीची लाट पसरली.

'राधिका, राधिका, इकडे ये लवकर.'
राधिका धावत बाहेर आली. 'सुजित, काय होतंय?'.
'मला डेहराडूनला जायचंय'
'डेहराडूनला? सुजित, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. घरातून बाहेर पडायला पण नाही म्हणालेत. काय बोलतो आहेस तू?'
'मला डेहराडूनला जायचंय. तू तिकीट काढ. आत्ताच्या आत्ता. जे फ्लाईट लवकरात लवकर असेल त्याने'.

चंदिगडला पोचेपर्यंत राधिकाने धीर धरला. पण एयरपोर्टवरून जेव्हा त्यांची गाडी डेहराडूनच्या दिशेने निघाली तेव्हा मात्र तिला रहावलं नाही.
'सुजित, हे काय चाललंय मला सांगशील का?'

सुजित काही बोलला नाही. काय बोलणार? सांगितलं तरी तिचा विश्वास बसणार नाही हे त्याला माहीत होतं. स्वत;च्या डोळयांनी पाहून खात्री केल्याशिवाय त्याची काही बोलायची इच्छा नव्हती. क्षीणपणे मागे मान टाकून तो खिडकीच्या काचेतून बाहेर बघत राहिला. पण मनात विचारांचं थैमान सुरूच राहिलं.

एक आठवडा झाला नाही त्याला इथून निघून? रविवारी सकाळी तो डेहराडूनहून चंदिगडला जायला निघाला होता. १-२ तासांनंतर बसून बसून अंग आंबल्यासारखं वाटायला लागलं. नेमकी तेव्हाच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची दाटी दिसायला लागली होती. गाडी थांबवायला सांगून हातपाय मोकळे करायला तो उतरला होता. रानात आत जाणारी एक पायवाट बघून थोडं आत फिरून यावं म्हणून तो निघाला. नीरव शांतता. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं. मध्येच किलबिलणारे पक्षी. असं वाटत होतं इथंच रहावं. चालता चालता तो एकदम एका मोकळ्या जागेत आला आणि समोर ते मोठं झाड दिसलं. झाड कसलं वृक्षच होता तो. अर्थात कसला होता ते काही त्याला माहीत नव्हतं. पांढरंधोप गुळगुळीत खोड. त्याने सहज खिशात हात घातला आणि हाताला स्वीस नाईफ लागली. डेहराडूनवरून निघताना ड्रायव्हरकडे बघितली तेव्हा त्याने बघू तरी कशी असते म्हणून हातात घेतली होती. आत्ता उतरताना नकळत ती खिशात टाकली गेली होती. त्याने ती बाहेर काढली. एकदम काय झालं कोणास ठाऊक. त्या झाडाच्या खोडावर आपलं नाव कोरावं असं त्याला वाटलं.

'सुजि' एव्हढं लिहून होतंय तेव्हढ्यात मागून आवाज आला 'बाबुजी, क्या कर रहे हो?'. तो दचकला. इथे आणखी कोणी असेल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याने झटकन हात खाली घेतला. बघतो तर एक फाटका दिसणारा गरीब खेडूत बाजूच्या छोट्या पायवाटेने आला होता. आधी सुजितला लाज वाटली. मग त्याचा शहरीपणा उफाळून आला. मला वाटेल ते करेन मी. हा कोण मला विचारणारा? त्याने काही उत्तर दिलं नाही. पुन्हा नाईफ घेऊन त्याने आपलं लिखाण पूर्ण केलं.

'बाबुजी, आप कल्पना नही कर सकते लेकिन पेडोंको भी दर्द होता है. उन्हे नुकसान मत पहुचाईये.' तो माणूस परत विनवणीच्या सुरात म्हणाला.

सुजितने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं. आणि मग हातातल्या शस्त्राने त्या झाडाच्या बुंध्यावर सटासट वार केले. आडवेतिडवे कसेही. त्या माणसाच्या चेहऱ्यावर जणू त्यालाच लागतंय अशी वेदना होती. त्याच्याकडे विजयी मुद्रेने पहात एक शेवटचा वार करून सुजित मागे फिरला, गाडीत बसला आणि त्याने स्वीस नाईफ ड्रायव्हरकडे परत दिली.. सुजित निघताना तो माणूस काहीतरी म्हणाला होता पण काय ते त्याला कळलं नव्हतं आणि जाणून घ्यायची इच्छाही नव्हती. सीटवर मान टाकून तो गाढ झोपी गेला.

आज मात्र हे सगळं आठवताना त्याला कापरं भरत होतं. हे सगळं त्यामुळेच तर......छे! असं कसं होईल? पण खात्री करून घ्यायलाच हवी. तो एरिया जवळ आला तसं सुजितला अस्वस्थ वाटू लागलं. पण रस्त्याच्या कडेला एका बाजूने तुटलेल्या बांधाची खूण त्याच्या पक्की ध्यानात होती. त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि तो धावत रस्त्याच्या दुसर्या बाजूला क्रॉस करून गेला. मागून राधिका धावत येतेय ह्याचंही त्याला भान उरलं नाही. 'आई ग' तिचा मधेच आवाज आला. पण तो थांबला नाही. झपाटल्यासारखा पुढे जात राहिला. थोड्याच वेळात तो मोकळा भाग आला. आणि समोर ते झाड दिसलं. ते झाड बघितलं आणि तो पायांतली शक्ती गेल्यासारखा मटकन खालीच बसला.

'सुजित, अरे काय झालंय? मला काही सांगशील का?' असं म्हणत राधिका त्याच्याजवळ आली. तिने आपलं मनगट एका हाताने दाबून धरलं होतं. त्याने खसकन तिचा हात ओढला आणि बघितलं तर वाटेत कुठेतरी काटेरी फांदी लागून तिला खरचटलं होतं.

सुजित भेदरल्या नजरेने एकदा तिच्या हाताकडे आणि एकदा त्या झाडाकडे बघत राहिला. कसा कोण जाणे पण त्या झाडाचा बुंधा पूर्वीसारखाच गुळगुळीत झाला होता. सुजितने केलेले जवळजवळ सगळे वार नाहीसे झाले होते. फक्त दोन खुणा शिल्लक होत्या. एक सुजितने लिहिलेली नावं - 'सुजित-राधिका'. आणि दुसरा त्याने वरपासून खालपर्यत केलेला शेवटचा वार. त्याच्या नकळत तो वार त्या दोन्ही नावांना छेदून गेला होता.

कसं कोणास ठाऊक पण तो माणूस काय म्हणाला होता ते सुजितला आत्ता कळलं.

तो म्हणाला होता - हिसाब पुरा होगा बाबुजी, जरूर पुरा होगा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी.
अस जर खरंच प्रत्यक्ष्यात घडल तर सगळी झाड, गड किल्ले वाचतील.

व्वा !! छान लिहिलंय.

मला वरील लिखाण वाचून खालील ओळ आठवली

आज किसीने दिल तोडा तो, हमको जैसे ख्याल आया
जिनका दिल हमने तोड़ा था.... वो जाने कैसा होगा !!!

स्वप्ना खूप दिवसांनी,,... छानच लिहीलय.. हेवेसांन...

अस जर खरंच प्रत्यक्ष्यात घडल तर सगळी झाड, गड किल्ले वाचतील. >> +१००

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

>>बाकी काही नाही पण डेहराडुन ला जायला चंडिगडला कशाला जायचे. दिल्ली वरुन कारने किंवा शताब्दीने जायचे ना.

सुजितचं काम चंदिगडला होतं. दिल्लीला नाही. तिथून तो डेहराडून बघायला गेला होता Happy

>>इतकं रेअरली का करत आहेस लेखन आजकाल

लोकांनी 'का लिहिता' असं विचारण्यापेक्षा 'का लिहित नाही' असं विचारलेलं बरं Happy

अस जर खरंच प्रत्यक्ष्यात घडल तर सगळी झाड, गड किल्ले वाचतील.
>>>>
गड किल्ल्ल्यांमध्ये जीव नसतो.
आपल्या भावना गुंतलेल्या असतात ईतकेच:)

अफलातून लिहिलंय..... शेवट खूप आवडला. पहिल्या भागात मला स्वतःवर होणार्‍या अव्याहत जखमां च्या सीझन्स ची आठवण आली. खूपच मस्त!!

स्वप्ना, मस्त लिहिलं आहेस. तुझ्या नेहमीच्या लिखाणापेक्षा वेगळ्या धर्तीचं. एकदम मस्त जमलंय.

अजून येउंद्यात .....

Pages