पडूद्या की प्रश्न! - श्री. केतन दंडारे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असतानाची गोष्ट. त्या सुमारास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मत व्यक्त केले होते की, दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण झालेच नाही, ज्यूंचे हत्याकांड हा केवळ एक बनाव आहे. या विधानाचा अर्थात सार्वत्रिक निषेध झाला. पण विद्यापीठातील आर्थर बट्झ नामक एका सहयोगी प्राध्यापकाने मात्र त्यांच्या खाजगी वेबपेजवर या विधानाचे समर्थन केले. असे करण्याची या बट्झमहाशयांची पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी आधीसुद्धा अश्याच स्वरुपाची विधाने केली आहेत. थोडक्यात, त्यांची ही मते सर्वज्ञात आहेत. हे प्रकरण जेव्हा पेटले तेव्हा मला वाटले की आता ह्यांना डच्चू मिळणार. तर तसे काहीच झाले नाही. दोनेक दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अध्यक्षांकडून (म्हणजे आपल्याकडचे कुलगुरू) इमेल आली. त्यात त्यांनी विद्यापीठाची भूमिका विशद केली होती. त्याचा सारांश असा की, 'विद्यापीठ या प्राध्यापकांचा कडक निषेध करते, विद्यापीठाला त्यांची मते घृणास्पद वाटतात व त्या प्राध्यापकांनी अशी मते सातत्याने व्यक्त करणे हे विद्यापीठाला अत्यंत लज्जास्पद वाटते. परंतु, ती मते त्या माणसाची खाजगी मते आहेत आणि ती व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तसेच त्यांनी ही मते त्यांच्या शिकवण्यामध्ये कुठेच अंतर्भूत केली नाहीयेत किंवा त्यावर वर्गात चर्चा केली नाहीये (ते अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत). तेव्हा त्यांच्या खाजगी मतप्रदर्शनावरून विद्यापीठास त्यांच्यावर कुठलीच कारवाई करता येणार नाही. विद्यापीठे ही विचारस्वातंत्र्याची रक्षणकर्ती असतात आणि तशी कारवाई करणे ही विद्यापिठांच्या मूलधर्माशी प्रतारणा करणारे ठरेल.' हे पत्र नंतर विद्यापीठाच्या संकेतस्ठळावरही प्रसिद्ध करण्यात आले, ते अजूनही अस्तित्वात आहे आणि संपूर्ण वाचनीय आहे.

मला नंतर असेही कळले की, नाझींनी ज्यूंचे नृशंस हत्याकांड केले या इतिहासाचा खोटेपणा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात या प्राध्यापकांनी १९७६ साली अख्खे पुस्तकच लिहिले आहे. आता ही पार्श्वभूमी असूनही त्यांना कामावर ठेवणार्‍या विद्यापीठाचा मला अचंबा वाटला. मला लख्ख आठवतंय की, अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे २००६ सालीसुद्धा, माझ्या डोक्यात विचार आला होता की पुणे विद्यापीठातील एखाद्या अभियांत्रिकीच्या प्राध्यापकाने किंवा आयआयटीमधील प्राध्यापकाने जर गांधीहत्या किंवा शिखांचे शिरकाण किंवा आरक्षण अश्यांपैकी काही विषयावर जर काही वादग्रस्त विधान केले असते तर काय झाले असते? निषेधावर आपण थांबलो नसतो, त्या माणसाचे निलंबन झाले असते, तोंडाला काळे फासणे तर नक्कीच. यातील तुलनेचा भाग थोडा प्रासंगिक व वरवरचा आहे हे मान्य. खरे सांगायचे तर नॉर्थवेस्टर्नचा हा प्रसंग माझ्यासाठी वस्तुनिष्ठ विचारांचा धडाच होता. विचारांमधील वस्तुनिष्ठता किती आणि कशी असावी, ती वस्तुनिष्ठता खाजगी पातळीवरून एखाद्या समाजात सर्वदूर कशी पोहोचवली जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक मला बघायला मिळाले. बुद्धिप्रामाण्यवाद (रॅशनलिझम) हा शब्द न उच्चारता ते बीज कसे रुजवावे, जोपासावे याचेही ते प्रात्यक्षिक होते. आता आपण पुरोगामी आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे शब्द उठताबसता बघतो, वापरतो आणि परत परत या प्रसंगाची आठवण येते.

पुरोगामी / सुधारकी विचार व बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दांचा महाराष्ट्रातील प्रवास मला मननीय ते चिंतनीय ते वर्तनीय ते आदरणीय ते चलनी ते अंगवळणी ते अपशब्द असा दिसतो. कधी कधी वाटते की, एखाद्या वेळी की स्वतःच तोंडाला काळे फासून घ्यावे, एकदोन अंडी स्वतःच स्वतःवर फोडून घ्यावीत, पुढील काही महिन्यांची पैश्यांची सोय करून ठेवावी, गुद्दे खाण्याची आणि कानफटात मारली जाण्याची सवय करून घ्यावी आणि सुरू व्हावे... मुद्दाम काहीतरी आचरट बोलावे, अगदी जाहीरपणे बोलावे, मुद्दाम भावना दुखावणारे बोलावे आणि ते आता मुळीच अवघड नाही. थोडक्यात, अगदी ठरवून कुरापत काढावी. मला बघायचंय की किती काळ झोडतील? एकदा, दोनदा, दहादा? मी असले उद्योग दोनतीन वेळा केले तर नंतर माझ्याकडे 'तो एक मूर्ख' म्हणून दुर्लक्ष करतील का? मग मी 'या बाजूचा फ्रिंज एलेमेंट' म्हणून गणला जाईन का? आणि मग माझ्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करायला लागले तर त्याचा अर्थ ते त्यांना न पटणार्‍या गोष्टी निदान ऐकून घ्यायला तयार झालेत असा होतो का? येनकेन प्रकारेण जर लोकांना ऐकून दुर्लक्ष करण्याची सवय लागली तरी काय हरकत आहे? निदान बोलता तरी येत आहे! मथितार्थ असा की या टोकाचा विचार आता होऊ लागला आहे, आणि हा टोकाचा विचार आहे हे नि:संशय.

पण मग असाही विचार येतो पुरोगामी विचार म्हणजे आपल्या लेखी नक्की काय आहे? बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच पुरोगामी विचार का? की त्यात अजूनही काही अंतर्भूत आहे? एक मी वाचलेली व्याख्या अशी होती की 'बुद्धीच्या कसोटीवर न उतरणार्‍या सर्व धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धांशी व रुढींशी संघर्ष करून या देशातील जनतेच्या मनात शास्त्रीय दृष्टिकोन व सहिष्णुता रुजवण्याचा प्रयत्न करणे' हा बुद्धिप्रामाण्यवादाचा हेतू आहे. बहुतेक वेळा अश्याच अर्थाचे काहीतरी लोकांच्या डोक्यात असते, असे माझ्या अनुभवास आले आहे. बुद्धीची कसोटी, शास्त्रीय दृष्टिकोन व सहिष्णुता हे यांतील सर्वप्रिय प्रचलित शब्द. मला यांतच किंचित संदिग्धता वाटत आली आहे.

प्रश्न असा आहे की, प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार कसोटी लावायला लागला तर ते पुरेसे आहे का? कारण व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचेच निष्कर्ष भिन्न येऊ शकतात. मग उचित-अनुचित, योग्यायोग्य ठरवायचे कसे? की परत दुसर्‍याच्या बुद्धीच्या आश्रयास जायचे? उदाहरणार्थ, ही व्याख्या कोणी थोर विचारवंताने लिहिली आहे म्हणून ती स्वीकारावी का? ते तर मुळीच नाही. मी विचार करतो, जर आपल्याला काय पाहिजे हे सुस्पष्ट नसेल, त्यात सुसंगती नसेल, तर काय नको आहे हे बघावे लागेल. कदाचित जे अपेक्षित आहे ते खूप स्पष्ट नाही झाले तरी चालेल, उलट काय पाहिजे हे अतिस्पष्ट नकोच. पण काय नको आहे हे मात्र मला स्पष्ट कळले पाहिजे. मला पोथिनिष्ठता नको आहे, मला 'बाबावाक्यम् प्रमाणम्' हे नको आहे. संशय घेतलाच गेला पाहिजे. अविश्वास दाखवला गेलाच पाहिजे. आणि जगातील कुठलीही गोष्ट या संशयाच्या कक्षेबाहेर नसावी. केवळ आईवडील म्हणतात म्हणून, अनेक वर्षे आमच्या घरी ही प्रथा आहे म्हणून, अनेक वर्षे समाजात ही रुढी आहे म्हणून... ही कारणे असतील तर कधीतरी 'का?' हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. पाडव्याला कडुनिंबाची डहाळी आवश्यक असते ही प्रथा, अगदी शेकडो वर्षांची. आपली श्रद्धा आहे आणि कर्मकांडे कराविशी वाटतात हेसुद्धा मान्य. पण मग स्वतःलाच 'का आहे श्रद्धा? का कराविशी वाटतात कर्मकांडे?' असे प्रश्न विचारायला काय हरकत आहे? हे स्वतःच स्वतःला विचारायचे आहे. याचे एक उत्तर मी ऐकले आहे की, व्यवस्थित पूजा केली की मनाला शांत वाटते. मी हे नाकारणार नाही. शांत वाटत असेल तर ते सत्य आहे आणि ते नाकारणे मूर्खपणाचे ठरेल. पण अश्या वेळी 'ही कर्मकांडे करण्यासाठी सध्याच्या काळात मी झाडे ओरबाडणे उचित आहे का?' हा प्रश्नसुद्धा आला पाहिजे. सणवारांची कालसुसंगती, सध्याच्या काळचे त्यांचे औचित्य हे स्वतःच विचार करण्याचे विषय आहेत. वरील प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेसुद्धा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की, निदान स्वतःला 'का? याची सध्याच्या काळात सुसंगती काय?' हा प्रश्न निदान विचारला तरी जावा. माझ्या एका विद्यार्थ्याने परीक्षेला जायच्या आधी देवाला नमस्कार करणे बंद केले, घरातील ज्येष्ठांना मात्र नमस्कार करून जायचा. यावर त्याच्या घरच्यांनी किंचित नापसंती दर्शवली. पण तो ठाम राहिला. आता यात 'मग वडीलधार्‍यांना नमस्कार तरी का करायचा?' असे प्रश्न उद्भवू शकतात, पण माझ्या मते मुद्दा तो नाही. मुद्दा हा की त्याने स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली.

स्वतःची बुद्धी वापरायची म्हणजे निष्कर्ष काढणे आले. पण निष्कर्ष काढायच्या आधी मी स्वतः शक्य तितका सांगोपांग विचार केला पाहिजे. यातील सांगोपांग हे महत्त्वाचे. म्हणजे काही निष्कर्ष काढायच्या आधी भरपूर वेळ आपोआपच दिला जाईल. बर्‍याच वेळा मी असे अनुभवले आहे की एखादी बातमी वाचली, पटकन काहीतरी निष्कर्ष काढण्याच्या मनस्थितीत आलो, पटकन फेसबुकावर काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची तीव्र इच्छा झाली... पण थांबलो, काही काळ रवंथ केले. यात जो काळ गेला त्या काळात बातमीच्या इतर बाजू पुढे आल्या आणि मग माझे मत तयार होण्याच्या प्रक्रियेला आणखी आयाम मिळाला, मत / निष्कर्ष निर्माण होण्याची प्रक्रिया आणखी विस्तृत झाली, अनेकांगी झाली. हे जेव्हा मी स्वतःच्याच बाबतीत वारंवार अनुभवतो तेव्हा हेही कळत गेले की, आपण विचारांची किती घाई करतो. जेव्हा आपल्याला स्वतःला कळते की आपण विचारक्षम आहोत तेव्हा तर ही विचारांची घाई अनावर असते. यात प्रामुख्याने दुसर्‍यास 'संशयाचा फायदा' दिला जात नाही, जो बुद्धीच्या कसोटीस आवश्यक आहे. समोरची व्यक्ती आणि तिचे विचार यात एक अंतर आपण निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. त्या व्यक्तीचा इतिहास, तिच्याबद्दलचे आपले पूर्वग्रह यांनी घेरून जाऊन होतो आपला विचार. आणि हे आपण सर्वचजण इतक्या अभावितपणे, इतके स्वतःच्याच नकळत करतो की कमालीचे आश्चर्य वाटावे! मराठा म्हणजे ब्राह्मणद्वेषानेच बोलला असेल इथपासून ते ब्राह्मण म्हणजे आरक्षणविरोध करणारच इथपर्यंत किंवा दाभोलकरांचे विचार म्हणजे आमच्या (आणि फक्त 'आमच्याच!') श्रद्धेवर घाला घालणारे असतात इथपासून ते भागवतांचे प्रत्येक विधान हे आपल्याला मागे नेणारेच असेल, इथपर्यंत आपल्या कोतेपणाचा विस्तार आहे. कोतेपणा इतका विस्तृत असू शकतो हीसुद्धा एक गंमतच! माझे अनेक मित्र अश्या विचारांना व्यवहार्य विचार म्हणतात, ते म्हणतात की जे दिसते तेच आम्ही बोलतोय. माझ्या दृष्टीने बुद्धीची कसोटी लावणे म्हणजे समोरच्यास संशयाचा फायदा देणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून इतर विचारांना सामोरे जाणे... यालाच मी वस्तुनिष्ठता मानतो.

शास्त्रीय दृष्टिकोन आणि सहिष्णुता हे मला स्वतःला फार वेगळे करता येत नाहीत. शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे शेवटी शास्त्रात काय सांगितले आहे ते... असे तर मुळीच नाही. विज्ञान काय म्हणते हीतर केवळ माहिती झाली. विज्ञान आजूबाजूच्या जगाविषयी, विश्वाविषयी काही विधाने करते, ती विधाने माहिती असणे म्हणजे पुरेसे आहे काय? विज्ञानात काय सांगितले आहे यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे, विज्ञान तसे का म्हणत आहे हे जाणून घेणे. विज्ञानाचे कुठलेही विधान हे 'आतापर्यंत उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार...' या शब्दांनी सुरू होते आणि हे शब्द अलिखित असतात. म्हणजेच अशी सुरुवात करून आपली विधाने चिरकाल, चिरस्थायी नसण्याची शक्यता आहे आणि वेळ पडलीच तर ती विधाने बदलावी लागतील हे विज्ञान खुद्दच मान्य करत आहे. याचाच अर्थ विज्ञान स्वतःच्या चुकांविषयी अतिशय जागरुक आहे. म्हणजे विज्ञान चुका करत नाही असे मुळीच नसून उलट चुका असतील हेच विज्ञानाने गृहीत धरले आहे. त्याअर्थी विज्ञान हे स्वतःविषयी अतिशय सहिष्णू आहे. मला ही सहिष्णुता अत्यंत महत्त्वाची वाटते. बुद्धिप्रामाण्यातील सहिष्णुता ही इतरांसाठी, इतरांच्या मतासाठी असेलही, पण त्याहीपेक्षा जास्त ती स्वतःच्या मतांविषयी आहे. आपण माणूस आहोत, चुका करणारच आहोत, त्या चुकांना घाबरू नका, त्या चुकांना सामोरे जा आणि त्याबद्दल स्वतःला अनैसर्गिक दोष देऊ नका, हेच त्या वैज्ञानिक सहिष्णुतेचे सांगणे आहे. माझे विचार चुकीचे होऊ नयेत म्हणून त्यांना चिरकाल, चिरस्थायी व 'सदामंगल' अश्या प्रकारचे करायचे हा अतिशय दुधखुळा दृष्टिकोन आहे. अशी वैचारिक ताठरता तेव्हाच येते जेव्हा आपण माणूसपणाचे ठळक वैशिष्ट्यच नाकारतो, ते म्हणजे आपली लवचिकता. समलिंगीसंबंध हे अनैसर्गिक आहेत, हे ठामपणे सांगणे, या ठामपणातली अनैसर्गिकता आपल्यालाच कळत नाही, ही सर्वांत दुर्दैवाची बाब.

मी जेव्हा या चुका करू देण्याच्या सहिष्णुतेचा विचार करतो तेव्हा मला असे दिसते की आपला समाज नेहमीच चुकांपासून आणि प्रश्नांपासून दूर पळत आला आहे. विशेषत: सामाजिक बाबतीत तरी. चुका करण्यापासून वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक परंपरांमध्ये इतके परावृत्त केले जाते की आपण आता काहीही करायलाच बिचकतो. चुकले तर? ही टांगती तलवार सतत असते डोक्यावर. आपण प्रश्न उपस्थित करण्याला किंवा प्रश्न उपस्थित होण्याला फार घाबरतो. प्रश्ननिर्मिती आपल्याला नकोशी असते. आपला बहुतेक कल हा प्रश्न निर्माणच कसे होणार नाहीत याकडे आहे. आपण का घाबरतो एवढे? म्हणजे प्रश्न निर्माण करावेत, निर्माण होत असतील तर होऊ द्यावेत, त्यांना सामोरे जावे, त्याची उत्तरे शोधावीत, त्या उत्तरांमधून आणखी पुढचे प्रश्न निर्माण व्हावेत... ही प्रक्रिया आपल्याला मानवत नाही. मुळात प्रश्न नकोत, ते प्रसंगोपात्त झालेच तर मग एकदम रामबाण उत्तरच मिळायला पाहिजे अशी आपली मानसिकता आहे. भावना दुखावल्या जातात तर आपले उत्तर भावना दुखावणार्‍यांवर कारवाई. म्हणजे समलिंगीसंबंध बेकायदेशीरच करावे. म्हणजे गोहत्याबंदी करावी. पुस्तकांवर बंदी घालावी. म्हणजे प्रश्नच निर्माण होणार नाही. पण 'जाऊ दे दुखावल्या भावना तर, त्या सततच्या दुखण्यावर काहीतरी उत्तर काढू', हा विचार आपण करत नाही. 'कुमारी माता हे सत्य आहे, तेव्हा ते स्वीकारून त्यांच्या बाळांना दत्तक देता / घेता येईल अशी व्यवस्थाच करावी' हा विचार करता येणे म्हणजे प्रश्नांना सामोरे जाणे होय.

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने जेव्हा निषेधार्ह व लज्जास्पद भूमिका घेतली तेव्हा, म्हणजे १९७६ सालीच, त्याला कामावरून काढून टाकता आले असते. म्हणजे भविष्यातील प्रश्न मिटलाच असता. पण तसे न करता त्याच्या कृतीला उत्तर म्हणून विद्यापीठात ज्यू संस्कृतीच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे, ज्यूंच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी खास संशोधनवृत्ती, स्नातकवृत्ती सुरू करणे, ही पावले विद्यापीठाने उचलली. हे प्रश्नांना सामोरे जाण्याचे धोरण होय. प्रश्न निर्माण झाला याचा अर्थ तोल ढळला असाच आपण काढतो. पण तोल ढळला याचा अर्थ समाज प्रवाही आहे, जिवंत आहे हे आपण का बघत नाही? आणि तोल हा ढळण्यासाठीच असतो, तो नवा शोधून काढण्याचा प्रवास म्हणजेच संस्कृती हे आपल्याला का कळत नाही?

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. केतन दंडारे व श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***

या लेखातील मजकूर लेखक व प्रकाशक यांच्या परवानगीशिवाय इतरत्र प्रसारित करण्यास वा प्रकाशित करण्यास मनाई आहे.

***
प्रकार: 

चांगला लेख आहे. ह्यावरची चर्चा वाचायला आवडेल. श्री. दंडारे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत काय?

भास्कराचार्य,
श्री. दंडारे हे अभियंते आणि भौतिकशास्त्रात खोल बुडी मारलेले शिक्षक आणि संशोधक आणि लेखक आणि रसिक आहेत. शिवाय सामाजिक कार्यही करतात.

छान, लेख आवडला.

<<पुणे विद्यापीठातील एखाद्या अभियांत्रिकीच्या प्राध्यापकाने किंवा आयआयटीमधील प्राध्यापकाने जर गांधीहत्या किंवा शिखांचे शिरकाण किंवा आरक्षण अश्यांपैकी काही विषयावर जर काही वादग्रस्त विधान केले असते तर काय झाले असते? >>
------- घटना १९९३ च्या काळातली आहे. एका पत्रकात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु यान्ना अपशब्द वापरले या कारणावरुन आमच्या एका अत्यन्त लाडक्या प्राध्यापकान्ना प्रशासनाने निलम्बित केले होते.

प्राध्यापक महाशय हाडाचे शिक्षक आणि सर्व थरातल्या विद्यार्थीवर्गात खुप प्रिय होते. पदार्थविज्ञानातला कुठलाही किचकट विषय असला तरी तासभर गप्पा मारताना ते तहानभुक विसरायचे. कमालीचा स्पष्टवक्तेपणा, परिणामान्चा विचार न करणे हा त्यान्चा स्वभाव होता.

परिणाम, कुठलेही नेतृत्व नसताना सर्व विद्यार्थी एकत्र आली आणि त्यान्नी वरिल अघोरी निर्णय प्रशासनाला रद्द करायला लावला.

नेहेमीप्रमाणेच अत्यंत कसदार, तर्कनिष्ठ आणि विचार करायला भाग पाडणारं लेखन. इथे पुनर्प्रकाशित केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.

लेख आवडला.

प्रश्न विचारायलाच हवेत! प्रत्येक गोष्ट करताना नुसतेच अंधानुकरण न करता आपण हे का करतो आहोत याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे.

मुद्दा खरोखर पोचला, पण लेख (ऑर्गॅनिक रॅशनलिझम) नैसर्गिक बुप्रावादाच्या स्टेशनला पोचेपर्यंत, लोकशाही,वैज्ञानिक दृष्टीकोन, पुरोगामी मानसिकता, सहिष्णुता, माणुसकी, अनेकानेक सामाजिक प्रश्नांचा बुप्रावादाच्या दृष्टीकोनातून ऊहापोह अश्या अनेक गल्ल्यांमध्ये वळणे घेत राहतो असे वाटले. अर्थात ह्या संदर्भाने ते विषय टाळणेही अवघड आहे म्हणा. लेख आवडला. अपेक्षा आहे की हा त्या सगळ्यांपर्यंत पोचावा जे त्यांना मिळालेल्या ह्या सारासार विचार करण्च्याच्या दैवी शक्तीपासून अजूनही अनभिज्ञ आहेत.

माझे मत ...

रॅशनलिझम साठी प्रोसेस करावयाचा, एका सामान्य माणसाचा आणि संशोधकाचा/वैज्ञानिकाचा डेटा सेट ह्यात एवढी तफावत आहे की तुम्ही कोणता डेटा सँपल वापरला त्यावर तुमचे बुप्रावाद जोपासण्याचे फलित अवलंबून राहिल ना?

जनसामान्यांच्या बुद्धीला काहीतरी पटतं (लिमिटेड डेटा सेट, एक्ट्रीम ते माईल्ड सामाजिकधार्मिक/ सांस्कृतिक बायसेस ई. डेटा वायोलेशन्स) म्हणूनच ते रिअ‍ॅक्ट होतात.
म्हणून मला वाटतं वाढत्या शिक्षणप्रसाराने बुप्रावाद जोपासला जातो आहे पण बुप्रावादाच्या रिग्रेशन प्रोसेसमधून जाणारा डेटा लिमिटेड आणि बायस्ड आहे. ह्याचेच फलित म्हणजे मासेसचे हाफ बेक्ड विचार आणि त्याचे दुर्दैवी परिणाम. त्यामुळे बुप्रावाद जोपासण्याला चालना/आवाहन देण्याआधीही हा अवेलेबल डेटा सेट सुधारला पाहिजे, जंक डेटा नष्टं केला पाहिजे.

आता वरच्याच ऊदाहरणात बट्झमहाशयांच्या बुद्धीलाही काहीतरी चांगलेच पटले होते म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले (डेटा जनरेशन) पण विद्यालयाने त्यांचे बायस्ड विचार (माझ्या मते जंक डेटा) योग्य माहिती ऊपलब्ध करवून किंवा ती ऊपलब्ध होण्यासाठी पावलं ऊचलून विद्यार्थांच्या बुप्रावादावर एकप्रकारे दाखवलेला विश्वासच होता.

नासाला भेट देऊनही, मार्शिअन/ईंटरस्टेलार सारखे सिनेमे आयमॅक्स मध्ये बघूनही मंदिरात नवग्रहांना नऊ फेर्‍या मारणार्‍यांना, खड्यांच्या अंगठ्या घालणार्‍यांना नेमका कुठला बुप्रावाद समजला हा प्रश्नं मला कायम पडतो.

उत्तम लेख.

श्री केतन दंडारे पुन्हा माबोवर दिसू लागले तर अत्यंत आनंद होइल मनाला असे भावनिक होवून लिहितो !

हो, खरंतर स्वतःचं इतरत्र प्रसिद्ध झालेलं लेखन काही काळाने स्वतःच इथे पुनर्प्रकाशित न केल्याबद्दल श्री. दंडारे यांचा णिषेध. Proud माबोपरंपरेला शोनाहो

लेख आवडला. प्रश्न विचारल्यानेच प्रगती होते हे नक्की.
<हे. माझे विचार चुकीचे होऊ नयेत म्हणून त्यांना चिरकाल, चिरस्थायी व 'सदामंगल' अश्या प्रकारचे करायचे हा अतिशय दुधखुळा दृष्टिकोन आहे. अशी वैचारिक ताठरता तेव्हाच येते जेव्हा आपण माणूसपणाचे ठळक वैशिष्ट्यच नाकारतो, ते म्हणजे आपली लवचिकता. > हे अतिशय पटले.

अनेकवेळा असेही होते की आपल्याला सत्याची प्रत्यक्ष तपासणी करता येत नाही. एका माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे ते काम असते तेंव्हा कुठेतरी विश्वास ठेऊनच पुढे जावे लागते. विज्ञान, धर्म दोन्ही ठिकाणी हे दिसते. अर्थात हा विश्वास ठेवायच्या आधी बुध्दीने सारासार विचार केलाच पाहिजे.

उत्तम लेख ...हा लेख मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचला होता

म्हातारबुवां नंतर अरभाट पण दिसत नाहीयेत आजकाल Wink Happy

लेख वाचायला आवडला.

हायजनबर्ग शेवटचं वाक्य काही कळलं नाही. नासाला भेट देणे किंवा इंटरस्टेलर बघणे आणि नवग्रहांची उपासना करणे ह्यात काय काँट्राडिक्शन दिसतं? ( मी अज्ञानातून विचारते आहे हा प्रश्न. नवग्रहांची उपासना का करतात हे मला माहित नाही पण एखाद्याने अमुक एक गोष्टीला, कल्पनेला देव समजून त्याची आराधना केली तर काय बिघडलं?)

सुंदर लेख.
कुठल्याही विधानावर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी फॅकट्स चेक करायचा थोडा तरी प्रयत्न करा. कुठल्याही विषयातील कुणीही कधीही सर्वोच्च आणि म्हणूनच शेवटचा शब्द असत नाही. लहान मुलाना भरपूर प्रश्न विचारा/ विचारू द्या आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायला चर्चा करायला उद्युक्त करायचा प्रयत्न करतो.

>>उलट काय पाहिजे हे अतिस्पष्ट नकोच, संशयाचा फायदा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून इतर विचारांना सामोरे जाणे >> हे सगळ्यात आवडले.

मस्त लेख. गेल्या वर्षी माहेरमधे वाचला होताच.

श्री. केतन दंडारे यांची मी फॅन आहे. पण आताशा त्यांचं व्हर्चुअल दर्शनही अत्यंत दुर्मिळ झालं आहे. कसे आहेत ते? त्यांना माझा नमस्कार सांगाल का चिनूक्सकाका?

लेख मस्तच आहे.. आधी माहेरमध्ये वाचला होताच. मला सारखं वाटतं की शाळेत आठवड्यातून एखादा तास विचार करण्यासाठी ठेवला पाहिजे. साधे प्रश्न घ्यायचे आणि मुलांना अर्धा वेळ स्वतः विचार करण्यासाठी द्यायचा आणि अर्धा वेळ चर्चेसाठी. एकदा विचार करण्याची सवय लागली की मग ती जन्मभर सुटत नाही!

माझ्याही मनात असेच काहीसे घोळतेय बरेच दिवस. पण विचारांची सुसूत्रता नाही अन आळस सोबतीला म्हणून लिहिणे, नोट्स काढणे जमेनाच. आता हे जे काही लिहितोय त्यातही चुका असतील, असणारच. पण who care?

तुमचा सांगोपांग विचार करायचा मुद्दा चांगला आहे. पण त्यात गोम अशी की जितका अधिक वेळ तुम्ही लावाल तितकी उत्सुकता तरी संपते किंवा पुन्हा नवीन फाट्यांनी नवीन प्रश्न उभे राहतात. ते चांगलेच आहे म्हणा पण परत एका निर्णयासाठी सतत कंफुज्ड असणे या स्पर्धेच्या जगात तरी धोकादायकच. (मुळात सतत कंफुज्ड असणे हीच खरी अवस्था) ह्यासाठी सराव हवा, पुस्तकं, चिंतन अशा गोष्टींसोबत बेसिक पक्के हवे. माझ्यामते बेसिक म्हणजे तुमच्यातली निरागसता. वाढत्या वयानुसार शिकता शिकता कोरपना कधीच निघून गेलेला असतो पण तरी प्रयत्नांनी कोरेपणाच्या जवळ जाता यायला हवे.
रशियन डिरेक्टर तारकोस्की म्हणत असे कि माझे चित्रपट मोठ्यांपेक्षा लहान मुलांना पटकन समजतात म्हणून. हाच तो कोरेपना.

मी माझ्या काही भक्त मित्रांना(माझे भक्त नाही.. कुणाचे ते माहित्येय कि सगळ्यांना) सांगत असतो की दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे तयारी केलीत कि निम्मे प्रश्न सुटतात. पुढे म्हणणे पटत नाही तर विचार करायचा आळस असेल तर सोडून द्या. दारुड्या बडबडतोय असे समजा. पण विचार करूनही पटत नाही तर त्याकडे दुर्लक्ष करावे हे आपसूकच समजून येते आपल्याला. काही असो विचार पटो न पटो हिंसक निषेध चूकच!

बाकी इतर मुद्द्यांवरही लिहिण्या-बोलण्यासारखे आहे पण तूर्तास पोटापाणी व आळस दोन्हींना गुंफत टाटा बाय बाय!

लेख आवडला.

जिज्ञासा +१

मुलांना लहानपणा पासूनच विचार करायला प्रवृत्त करायला हवे.

लेख चांगला आहे पण कुठेतरी हा एक डेलिकेट बॅलन्स आहे असं नाही का वाटत? व्यक्तिगत विचारस्वातंत्र्य आणि दुसर्‍याला तुमचे विचार ऑफेन्सिव्ह वाटणं..यात काय निवडायचं?
म्हणजे ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल त्या प्राध्यापकाने काही लिहिलं म्हणून ते त्याचं वैयक्तिक मत आहे असं म्हटलं गेलं आणि नोकरी टिकली.
इथे मायबोलीवरच एका जुन्या सदस्याचा आयडी त्याने एका समाजाबाबत/सरकारी धोरणाबाबत त्याचं निगेटिव्ह मत व्यक्त केलं म्हणून स्थगित केला गेला..असं काहीतरी झालं होतं. म्हणजे मायबोलीवर अनेकदा अनेक समाजांवर, धोरणांवर सडकून टीका होते व ती विचारस्वातंत्र्य म्हणून स्वीकारलीही जाते पण काही विशिष्ट टॉपिक्स 'नो गो' असतात तिथे गेलात तर काही खरं नाही असंही आहे. आपल्याकडे काही कायदेही त्या अनुषंगाने पूर्वीच केले गेले आहेत व त्याला काही कारणंही असतीलच.

चांगला पण प्रश्न आणि विचारात अडकलेला लेख.

प्रश्न पडावेत जरूर, त्यातला कुठला प्रश्न महत्वाचा आहे, त्या करता मी काय करू शकतो/ते, त्यातून मला कसे कळेल की प्रश्न सुटला आहे अथवा नाही ही अंगेही महत्वाची आहेत.

ट्यागो यांची पोस्ट [टंकाळ्यासहित] पटलेली आहे.

ट्यागो, लेखक सतत कन्फ्युज रहा असं सांगत आहे असं मला वाटलं नाही.
एखादा निर्णय पूर्ण विचार करून घ्या, पण काही काळाने, नव्या माहितीनुसार, परीस्थेतीनुसार किंवा कोणत्याही करणानुसार काही बदल झाले, जे होतातच, आणि तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर केवळ गेल्यावेळी आपण असे वागलेलो म्हणून (नोट केवळ म्हणून) परत तसेच वागायचे असे न करता बदललेल्या माहितीनुसार फेरफार करा.
कुठलीही गोष्ट अंतिम सत्य नसते, म्हणून अती ठाम राहू नका. म्हणजे कायम कन्फ्युज रहा असं अर्थात नाही, भोंगळ रहा असं ही नाही. ठाम रहायला काहीच हरकत नाही.

श्री. केतन दंडारे>>>> नाव 'ओळखीचे' वाटतेय. Wink

श्री. केतन दंडारे यांची मी फॅन आहे. पण आताशा त्यांचं व्हर्चुअल दर्शनही अत्यंत दुर्मिळ झालं आहे. कसे आहेत ते? त्यांना माझा नमस्कार सांगाल का चिनूक्सकाका?>>> लोल Lol

लेख मस्त Happy

Pages