मायबोली मास्टरशेफ - धनि - येडा बटाटा

Submitted by धनि on 13 September, 2016 - 15:55

मित्रांनो आणि मैत्रिणींनो - गणपती बाप्पा मोरया !!

या वेळची मास्टरशेफ स्पर्धा जाहीर झाली. आता संयोजकांनी विकांताला जाहीर केली म्हणून माझ्या बघण्यात आली नाही Wink तरी रमड (rmd) सांगत होती की जाहीर झालेली आहे बरं ! पण मीच आळशी. नेहमी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही न करण्याची वाईट सवय लागलेली आहे. आता मात्र "डेडलाईन राक्षस" दिसायला लागल्यावर माझ्या खांद्यावरच्या "प्रोक्रॅस्टिनेशन माकडाने" पळ काढला आणि आम्ही ही पाककृती तयार केली. आता इतकं सांगितलं पण खरं म्हणजे मागच्या रविवारपासूनच दोघांच्याही डोक्यात काय करता येईल असे विचार सुरू होतेच. त्यात नेहमीप्रमाणे एक घटक पाहिजे असं काही न सांगता संयोजकांनी स्पर्धा अजून थोडी अवघड करून डोक्याला चालना देण्याचा नविन उपक्रम सुरू केलेला आहे अशी एक शंका येऊन गेली Lol

तर ' म, ब, य, ल ' यापैकी ३ अक्षरांपासून सुरू होणारे महत्त्वाचे घटक पाहिजेत अशी मुख्य अट होती. हळू हळू मुख्य धाग्यावर काय काय साहित्य असू शकते त्याची बाराखडी पण आली. ती वाचली तरीही आम्हा दोघांना आवडत असणारा घटकच बच्चन असणार आपल्या पाककृतीचा हे निश्चित झाले होते. आता बच्चन म्हटले की ' ब' वरून येणारा बटाटा हा हिरो झाला. आपले बॉलिवुड चित्रपट नाही का एक मोठा हिरो आला की दोन लव्ह इंटरेस्ट घेऊन येतात तशा मग दोन हिरॉइनी पण निश्चित झाल्या मिरची आणि लसूण Wink घ्या, नमनालाच घडाभर तेल ओतून झाले पण या तेलात तुम्हाला तीन मुख्य कलाकार मिळाले. त्यांना घेऊन काढायच्या पिक्चरचे नाव डेव्हिड धवन आणि दादा कोंडके यांना वंदन करून येडा बटाटा ठेवण्याचे निश्चित झाले. आता सहाय्यक कलाकार पाहू.

साहित्य
१) टाटे २ मोठे - उकडून
२) मिरच्या (त्या मोठ्या गोड असतात त्या, भज्याच्या) ४ मध्यम - आतल्या बिया साफ करून
३) सूण कितीही घ्या फक्त सोलून घ्या( सगळीकडे बोंबाबोंब मधल्या किंगपाँग बरोबर कुस्ती असेल तर अजूनच जास्त घ्या )
४) हिरवी मिरची - थोडा तिखटपणा पण हवाच ना
५) कोथिंबीर
६) चाट मसाला
७) मीठ , तिखट, जीरा पावडर - चवी नुसार
८) तेल
९) मोझारेला - मुख्य नसले तरी म वरून आहेत
१०) लिंबू - आणि हे ल वरून
११) साखर - थोडी
१२) क्याचे पोहे - बारीक करून

yeda_Sahity_collage.jpgyeda_cheese.jpgकृती

१) वरती दिसतोय तसा बटाटा उकडून मॅशर ने मस्त मॅश करून घेतला. नंतर हाताने नीट उरलेली ढेकळं फोडून मऊसूत करून घेतला.
२) मिरच्या धुवून साफ करून घेतल्या.
३) हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या.
४) सोललेला लसूण किसून घेतला.
५) कोथिंबीर बारीक चिरून घेतली.
६) आता त्या बटाट्याचे दोन भाग केले. एक मोठा आणि एक छोटा
७) मोठ्या भागात कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, तिखट, मीठ, जीरा पावडर आणि चाट मसाला घालून घेतला आणि सगळं नीट एकत्र केलं.

yeda_Saran.jpg

८) आता बटाट्याच्या दुसर्‍या भागात मोझारेला घातलं.
९) त्याचबरोबर लिंबू, साखर आणि थोडे मीठ घातले.
१०) हे सगळे साहित्य चांगलं मळून घेतलं. हे आपलं सारण झालं.
११) हे सारण साफ केलेल्या मिरच्यांमध्ये भरले. अगदी पूर्वीच्या काळी बंदुकीत दारू ठासून भरायचे तसे ठासून भरा!
१२) या मिरच्या थोड्या तेलावर परतून घेतल्या. अशा परतून घेतल्यावर त्या थोड्याशा शिजल्या जातात आणि आतले चीज पण थोडेसे वितळते.

yeda_mirchi.jpg

१३) मिरच्या थोड्या थंड झाल्या की दुसरे बटाट्याचे मिश्रण त्यांच्या चहूबाजूने लावून घेतले. मिरच्या पुर्ण गुडूप झाल्या पाहिजेत.
१४) आता हे गोळे बारीक केलेल्या मक्याच्या पोह्यांमध्ये घोळून घेतले.
१५) हे घोळलेले गोळे अगदी कमी तेलात भाजून घेतले. खुप जास्ती तेल टाकू नका कारण बटाटे लगेच तेल पितात आणि विरघळू शकतात.

yeda_tava.jpg

१६) असे भाजून झाले की मस्त रंग येतो. तो आकार थोडा फार रसेट बटाट्या सारखाच येतो.

काय गार्निशिंग करायचे असेल ते करा. किंवा धीर निघत नसेल तर लगेच सुरीने कापून खायला सुरूवात करा Wink

yeda_final_2.jpg

हा कापल्यावर येडा बटाटा असा दिसतो :

yeda_Final_1.jpgटीपा

१) सारण म्हणून बटाटा आणि मोझारेला वापरले आहे त्याऐवजी तुम्हाला आवडेल ते वापरू शकता. पण येडा बटाटा आहे त्यामुळे दोन ठिकाणी बटाटा असणे बरोबर वाटते.
२) घोळण्याकरता ( बाहेरचे कव्हर) ब्रेड क्रंब्स वापरता येतील.
३) तेल कमीच घ्या आणि गॅस मध्यम ठेवा.

माहितीचा स्रोत

ही पाककृती रमड (rmd) च्या सुपिक डोक्यात तयार झाली आणि मग तिच्यात आम्ही भर टाकली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ़ारच मस्त ,मनोरन्जक, मजेदार, लिहिलयत!! पदार्थ दिसायला सुरेख , गोन्डस आहे.
नाव पण अफ़लातुन दिलय. (चव कळायला अजुन वे़ळ आहे!)

येडा बटाट्या ऐवजी यम्मी बटाटा असे नाव कसे वाटले असते? रेसेपी लय भारी आहे. मिर्ची आवडणार्‍यांची चंगळ आहे. फोटु पण भारीयेत. स्पर्धेसाठी शुभेच्छा.

येडा बटाटा मस्त वाटतंय.
या वीकेन्ड ला करणार, आधी बटाटा जीव की प्राण त्यात बटाट्याची तिखट रेसिपी म्हणजे सोने पे सुहागा.

भारी आयड्या आहे. फोटो मस्तच आलेत. रच्याकने, मिरच्या परतून चीझ वितळवून का घ्यायचं? नंतर शॅलो फ्राय करताना वितळेलच की.

शॅलो फ्राय खुप जास्ती वेळ करायचा नाही बटाट्याचं आवरण तेल पिऊन विरघ़ळू शकतं. आणि बाहेरून आवरण पण जाड असणारे त्यामुळे थोडी मिरची शिजवून घेतली आधीच आणि चीज पण वितळवून घेतलं.

येडा बटाटा हे नाव फारच आवडलंय. आता कुणाला येडा असं नुसतं न म्हणता, तो ना? तो येडा बटाटा आहे असं म्हणायला सुरुवात झालेली आहे. Lol

Pages