अवघे धरू सुपंथ

Submitted by स्वीटर टॉकर on 8 September, 2016 - 12:53

माझे वडील स्टेट बॅन्केत असल्यामुळे आम्ही दर काही वर्षांनी महाराष्ट्रातच पण नवीन ठिकाणी स्थलांतरित व्हायचो. माझ्या आईवडिलांना भाषणं ऐकायची अतिशय आवड होती. गावात कोणीही चांगला वक्ता आला की दोघही मला घेऊन जायचे. वसंत व्याख्यानमाला तर कधीही चुकवली नाही. त्या विचारवंतांचे विचार, ते मांडण्याची पद्धत, एखादा अवघड मुद्दा सोप्या उदाहरणांचा आधार घेऊन समजावून देण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं बघून मी भारून जायची.

तुमच्या आमच्यासारखेच हे लोक, पण अवतीभवतीच्या जगाच्या निरीक्षणातून, त्यांना आलेल्या चांगल्यावाईट अनुभवांतून, संकटांमधून हे किती वेगळी आणि सकारात्मक शिकवण घेतात!

लग्न झाल्यावर दहा वर्षं स्वीट टॉकरबरोबर जवळजवळ अखंडित बोटीवर भटकले. तिथे सर्व देशांतले लोक. तिथे मराठी किंवा हिन्दी कानावर पडणं तर सोडूनच द्या, इंग्रजी देखील अपरिचित भाषेचं कातडं पांघरूनच यायची.

चिनी माणूस जेव्हां ‘why how’ म्हणतो तेव्हां तो दोन प्रश्न विचारत नसतो. त्याला ‘White House’ म्हणायचं असतं!

नव्वद साली पुण्यात स्थायिक झाल्यावर माझी भूक पुन्हा जागृत झाली पण आता मी बहुतांशी single parent असल्यामुळे भाषणांना जाणं शक्य होईना. मग मी विचार केला, की आपल्या घरामध्येच याचं आयोजन का करू नये? त्याला निव्वळ भाषणापेक्षाही भाषण कम् गप्पांचं स्वरूप येईल. चांगल्या विचाराच्या लोकांचं येणंजाणं आपल्या घरी होईल, आपल्या मुलीला, सुट्टीवर असेल तेव्हां स्वीट टॉकरला आणि जितक्या मैत्रिणींना यात रस असेल त्या सगळ्यांनाच याचा आस्वाद घेता येईल.

एक्क्याण्णव साली सात मैत्रिणींसह घरीच मंडळ सुरू केलं. दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी दुपारी अडीच ते चार. अशी वेळ ठेवल्यामुळे नोकरी करणार्या भगिनींना (हो. हे फक्त स्त्रियांपुरतंच मर्यादित ठेवलं आहे त्याचं कारण पुढे येईलंच.) येणं शक्य नव्हतं पण त्याला इलाज नव्हता. कोठलाही दिवस आणि कोठलीही वेळ ठेवली तरी सगळ्यांना सोयीचं होणं शक्यंच नसतं. हां हां म्हणता सभासदांची संख्या वाढत गेली. आमच्या दिवाणखान्यात एक झोपाळा आहे त्यावर वक्ते/वक्त्या बसायच्या, आम्ही सगळ्या गालिचा घालून जमिनीवर आणि ज्यांना वयोपरत्वे बसायला खुर्चीच पाहिजे त्यांनी खुर्च्या वापरायच्या.

कुठल्या वक्त्याला बोलवायचं हे कसं ठरवतो? त्याचा मुख्य निकष म्हणजे आमच्यापैकी एका तरी सभासदाने त्यांचे विचार आधी ऐकले असले पाहिजेत. राजकारण सोडून कोणताही विषय वर्ज्य नाही. मात्र सकारात्मक दृष्टिकोन हवा.

पहिली दहा मिनिटं मंडळाचं काम. मग एक तास भाषण. शेवटची वीस मिनिटे प्रश्नोत्तरं. हे मंडळाचं पंचवीसावं वर्षं चालू आहे. म्हणजे साधारण अडीचशे प्रोग्रॅम झाले. आजपर्यंत एकही म्हणजे एकही प्रोग्रॅम सुरू व्हायला एकही मिनिट उशीर झाला नाही! हो. क्वचितप्रसंगी तो संपायला उशीर होतो कारण तो संपूच नये असं वक्त्याला आणि आम्हाला देखील वाटतं. प्रश्नोत्तरं लांबू शकतात. पण सुरू व्हायला उशीर नाही.

‘बायकांना होणारा उशीर’ या विषयावर बरेच (पाचकळ) विनोद आहेत. मात्र
१. ‘नवर्याबरोबर असलं की दर वेळेस बायकोला उशीर होतो’ आणि
२. ‘शंभर बायका एकत्र जमल्या तरी अडीचशे कार्यक्रमात एकदाही उशीर होत नाही’
ही एकसामायिक समीकरणं (simultaneous equations) सोडवली की उशीर कोणामुळे होत असणार हे उत्तर सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ दिसतं. असो.

या मंडळानिमित्त श्रीमती सिंधूताई सपकाळ, डॉ. अनिल अवचट यांच्या सारखी मंडळी माझ्या घरी आली हा मला मिळालेला बोनस.

जशी सभासदांची संख्या वाढायला लागली तसं माझं घर अपुरं पडायला लागलं. हॉलची भाडी अवाच्या सवा. ‘नवीन मेंबर करून घेता येणार नाहीत’ असं सांगायला जिवावर यायचं पण इलाज नव्हता.

आमच्या घराजवळ ‘आनंदबन’ नावाचा एक क्लब आहे. आमचा आवडता आहे. पोहोण्याचा तलाव, जिम्नॅशियम, टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, टेबल टेनिस हॉल वगैरे. त्या क्लबमध्ये पैसे लावून पत्ते खेळायला परवानगी नाही, दारू प्यायला नाही, सिगरेट ओढायला नाही, मांसाहार करायला नाही. काय करता येणार नाही याची नियमावली लांबलचक. त्यामुळे कित्येक लोक त्याला ‘आयुर्वेदिक क्लब’ म्हणून हेटाळतात.

ह्या क्लबचे मालक श्री. कोठारी चांगल्या कामाला मदत करायला नेहमीच तयार असतात. त्यांनी टेबल टेनिसचा हॉल आम्हाला अल्प भाड्यानी देण्याचं कबूल केलं. जागेचा मोठाच अडसर दूर झाला आणि मंडळानी बाळसं धरलं. सभासदांची संख्या भराभरा वाढली.

सभासदांना कार्यक्रम कितीही आवडले तरी ते पुरेसं नाही. कारण कार्यक्रम ऐकणे हे पॅसिव्ह (निष्क्रीय) आहे. बायकांचा सक्रीय भाग असला तर गुणांना वाव मिळतो, नाती घट्ट होतात आणि आनंददेखील जास्त मिळतो. प्रत्येकीमध्ये सुप्त गुण असतात. मात्र प्रत्येकीला आत्मविश्वास असतोच असं नाही. अशा सभासदांना हेरून त्यांच्यावर जबाबदारी टाकूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं ही माझी जबाबदारी आहे असं मी समजते आणि त्या दृष्टीनी कामांची आखणी करते. मंडळाच्या अनुषंगाने कित्येक छोटे उपगट तयार झाले. लायब्ररी – प्रत्येकीने एक एक चांगलं पुस्तक जमा करून लायब्ररी सुरू झाली. खेळप्रेमी, संगीतप्रेमी, प्रवासप्रेमी वगैरे.

आता भगिनींच्या प्रतिभाशक्तीला ऊतच आला. वार्षिक सम्मेलनाला इतके उत्तमोत्तम कार्यक्रम त्या करायला लागल्या की वेळ कमी पडू लागला. कोणाही सभासद भगिनीला एकापेक्षा जास्त कार्यक्रमात भाग घेता येणार नाही, प्रत्येक कार्यक्रमात तीन अथवा अधिक सदस्य असले पाहिजेत वगैरे प्रथमदर्शनी जाचक वाटतील असे नियम करावेच लागले.

मग ज्यांच्याकडे काही खास कला आहे त्याचा आस्वाद सगळ्यांना कसा मिळणार? त्यासाठी ‘विविध गुणदर्शन’ नावाचा वेगळा कार्यक्रम. यात India’s Got Talent या टीव्ही कार्यक्रमाच्या च्या धर्तीवर तीन मिनिटात काहीही करून दाखवायला वाव. यात दोन्ही हातांत वेगवेगळ्या पेन्सिली घेऊन एकाच वेळेस काढलेल्या चित्रापासून तीन मिनिटात complicated केशरचना करून डोकं जोरजोरात हलवून ती किती भक्कम आहे हे पुराव्यासकट बघायला मिळालं.

नाटक असो, नाच असो, विडंबन असो, कॅटवॉक असो किंवा दुसरं काही. जर बायकांनी स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून द्यावं असं वाटत असेल तर श्रोतृवर्ग स्त्रियांपुरता मर्यादित ठेवणं जरूरीचं असतं. त्यामुळे सभासदत्व फक्त वनितांना देण्याचा निर्णय.

दर वर्षीच्या सहलीचं आयोजनही असं असतं की त्यात धमाल आणि शिक्षण असा दुहेरी फायदा व्हावा. उदा. अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला, मनशक्ती केंद्र लोणावळा वगैरे.

माझं लग्न होवून मी जेव्हां सासरी आले तेव्हां ‘मुंबई ग्राहक पंचायत’ नुकतीच स्थापन झाली होती आणि त्याचं खूप काम आमच्या घरी चालायचं. माझ्या सासू सासर्यांनी त्या चळवळीला वाहूनच घेतलं होतं. तेव्हां माझ्या सासूबाई मला सांगायच्या, “आपल्याला सगळ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन चालता आलं पाहिजे.” तेव्हां मला ते तितकसं पटायचं नाही. जर कोणी माझ्याहून जलद चालंत असेल तर मी त्याला कशाला खोळंबून ठेवायचं, आणि जर कोणी हळुबाई असेल तर आपण का आपला वेग कमी करायचा? असे माझे विचार. आता सासूबाई नाहीत, मात्र त्यांच्या विधानातली सत्यता मला मंडळ सुरू केल्यावर पटली आणि मी माझी विचारधारा बदलली.

२०१६ हे मंडळाचं रौप्यमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्त कित्येकींनी आपापलं मनोगत मांडलं. त्यात सगळ्यात समाधान देणारं होतं ते असं, “या मंडळानं मला कित्येक चांगले विचार दिले, जिवाभावाच्या मैत्रिणी दिल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, संकटांमुळे आणि टीकेमुळे माझा आत्मविश्वासच ढासळला होता तो मला परत मिळाला!”

याउपर काय पाहिजे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम आहे. ईथे मांडल्याबद्दल धन्यवाद. मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
आपण दोघेही खूप छान लिहिता..

खुप छान उपक्रम. काही पाहुण्यांची नावे आणि त्यांचे कार्यक्षेत्र याबद्दल पण लिहा ना. नुसती यादी दिलीत तरी चालेल.