'यथा काष्ठं च काष्ठं च' (अभिवाचन) - श्री. महेश एलकुंचवार / श्री. मोहित टाकळकर

Submitted by admin on 6 September, 2016 - 00:35

महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’, 'बंदिश' अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र ’आसक्त’च्या दृष्टीने नाट्यचळवळ म्हणजे फक्त उत्तम नाटकांचे तितकेच उत्तम प्रयोग करणं नव्हे. ’आसक्त’च्या नाट्यचळवळीत महत्त्वाचा आहे तो समाज आणि प्रेक्षक. प्रेक्षकाशी नातं जोडणं हे ’आसक्त’च्या दृष्टीनं गरजेचं आहे, आणि या प्रेक्षकाचं नाटकाशी असलेलं नातं जितकं घट्ट, तितकी नाट्यचळवळ सशक्त होत जाईल, हे 'आसक्त' जाणून आहे.

प्रेक्षकांचं नाटकाशी आणि लेखक-कलावंताचं समाजाशी असलेलं नातं जोमदार व्हावं, या हेतूनं ’आसक्त’नं ’रिंगण’ हा एक मस्त उपक्रम सुरू केला. यंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष. चाकोरीबाहेर पडून वेगळं आणि उत्तम असं ऐकू-पाहू इच्छिणार्‍यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी सादर होणारा ’रिंगण’ हा उपक्रम एक पर्वणीच आहे.

या उपक्रमात जानेवारी महिन्यात श्री. महेश एलकुंचवार यांच्या 'यथा काष्ठं च काष्ठं च' या ललितलेखाचं वाचन श्री. मोहित टाकळकर यांनी केलं. हे अभिवाचन कसदार वाचिक अभिनयाचा एक वस्तुपाठ आहे.

मायबोलीवर साजरा होणार्‍या यंदाच्या गणेशोत्सवात श्री. महेश एलकुंचवार व 'आसक्त', पुणे, यांच्या सौजन्यानं 'यथा काष्ठं च काष्ठं च'च्या वाचनाचं ध्वनिचित्रमुद्रण सादर करत आहोत.

***

या ध्वनिचित्रमुद्रणाचे सर्व हक्क संबंधितांकडे राखीव आहेत.

हे ध्वनिचित्रमुद्रण श्री. महेश एलकुंचवार व 'आसक्त', पुणे, यांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमाद्वारे इतरत्र प्रसारित करण्यास मनाई आहे.

हे ध्वनिचित्रमुद्रण मायबोली.कॉमवर प्रसारित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. महेश एलकुंचवार व ’आसक्त’, पुणे यांचे मन:पूर्वक आभार.

ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध करून दिल्याबद्दल ’आसक्त’, पुणे, श्री. मोहित टाकळकर, श्री. आशीष मेहता व श्री. हृषिकेश पुजारी याचे आभार.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users