मायबोली मास्टरशेफ - घोषणा

Submitted by संयोजक on 2 September, 2016 - 04:19

masterchef.jpg

आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!

या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.

चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.

स्पर्धेचे नियम -

१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________

या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या Happy

'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250

'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251

मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूपाली, 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

म पासुन मिल्क मेड किंवा मिठाई मेड चालणार नाही कारण ते ब्रँडचे नाव आहे. मूळ पदार्थ कंडेंस्ड मिल्क आहे जो म य ब ल मध्ये बसत नाही.

कुणाला 'याम' नावाचे कंद नाही का सुचले?>>> कंदालाच इंग्रजीतून याम म्हणतात. त्यामुळे यीस्ट चालणार नाही तसंच यामही खरंतर चालू नये Happy

जर मी चुकत नसेन, तर कंद म्हणजे इंग्रजीत ट्युबर. याम हा एक प्रकारचा कंद आहे.

भास्कराचार्य, मूळात याम हा शब्द मराठी नाही, त्यामुळे 'यीस्ट'ला खमीर म्हणतात म्हणून ते स्पर्धेसाठी घटक पदार्थात चालणार नसेल तर यामही चालू नये असे मला म्हणायचे आहे.
अर्थातच, अंतिम निर्णय संयोजकांचा आहे त्यामुळे माझे काहीही म्हणणे असले तरी त्याची दखल घ्यायला पाहिजेच असे काही नाही.

मंजूडी,
यीस्ट वापरता येईल, असं संयोजकांनी सांगितलं आहे.
**
संयोजक | 7 September, 2016 - 09:03

ममो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण खमीर हा मूळ पर्शियन शब्द मराठीत आणि हिंदीतसुद्धा वापरला जातो, तसाच यीस्ट हा इंग्रजी शब्दसुद्धा मराठीत वापरला जातो. त्यामुळे 'य' साठी यीस्ट वापरता येईल.

**

मंजुडी, याम हा रताळ्यासारखा दिसणारा वेगळा कंद आहे. याम वापरलेला चालणार आहे.
याम हा मुख्य घटकपदार्थ असणाऱ्या दोन प्रवेशिका आलेल्या आहेत.

रुपाली,
१. गणेशोत्सव २०१६ ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१६ या ग्रुपातले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
२. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
मायबोली मास्टरशेफ - (पदार्थाचे नाव) - (मायबोली सदस्यनाम)
३. ’विषय’ या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यू)मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये ’मायबोली गणेशोत्सव २०१६’ हे शब्द लिहा.
५. आता या नवीन धाग्यावर पाककृतीचा मजकुर लिहा. प्रकाशचित्र टाकण्यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व'मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.
६. मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या’, यातील image या शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वांत वर दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
७. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ’ग्रूप’ असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. ’सार्वजनिक’ या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
८. Save ही कळ दाबा.
९. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल /बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

मी मोबाइल वरतुन फोटो कसे अपलोड करायचे ते विचारल.वर सांगितल्या प्रमाणे मी मेसेज प्रयंत पोहचले पण ते 'send to text area' option दिसत नाही प्लीज मला मदद मिळेल का?

वर चे उत्तर लवकर मिळेल तर बरे होईल मला मायबोली मास्टर शेफ मधे रेसिपी पोस्ट करायची आहे.मी ग्रुप ची नवीन सदस्य आहे.

माझा asus zen android mobile आहे.फाइल ब्राउजर मधे मायबोली ओपन केेली आहे.तसे माझ्या कडे crome पण आहे

रुपाली, फोटो अपलोड झाल्यानंतर तिथे काहीच ऑप्शन येणार नाही. तुम्ही जिथे प्रतिसाद लिहीत आहात किंवा नवीन लेखन करत आहात त्या विंडोमधे जाऊन जिथे टाइप करता त्या विंडोखालीच 'मजकूरात image किंवा link द्या.' असे लिहिलेले दिसेल. तिथल्या image या निळ्या अक्षरांवर टिचकी मारा मग तुम्ही जिथे फोटो अपलोड केला होता ती विंडो उघडेल, त्यातली तुम्हाला हवी असणारी फोटो फाइल सिलेक्ट करा आणि वर 'Upload Thumbnails Delete Resize Send to textarea' असे ऑप्शन दिसतील त्यातल्या Send to textarea वर टिचकी मारा. त्या फोटोची लिंक तुमच्या लिखाणात आपोआप जाईल त्यामुळे हि विंडो बंद करा. लेखनाच्या विंडोमध्ये लिंक दिसत असेल. आता सगळ्यात शेवटी असणार्‍या 'प्रतिसाद तपासा' वर टिचकी मारा. फोटो दिसत असेल तर save वर टिचकी मारा.

इमेज अपलोड झाल्यावर त्याच ( दुसऱ्या) विंडो मध्ये अपलोड लिहिलेल्या लिंक च्या जवळच सेंड टु टेक्स्ट एरिया असे लिहिलेली लिंक आहेती लिंक क्लिक केल्यावर परत पहिल्या विंडोमध्ये ( जिथे तुम्ही टेक्स्ट लिहिले होते जा. ( दुसरी इमेज अपलोडींग वाली विंडो मिनिमाइझ करुन परत पहिली विंडो उघडा.) तिथे टेक्स्ट एरिया मध्ये तुम्हाला इमेजची लिंक आलेली दिसेल. तो मेसेज सेव्ह केल्यावर प्रतिसादात इमेज दिसेल.
I hope whatever i wrote is understandable

१. मोबाईलवर क्रोममधून मायबोली ओपन करा.
२. लॉगिन करा.
३. पाककृती लेखन करा.
४. इथे लिहिल्याप्रमाणे पाककृतीत फोटो द्या - http://www.maayboli.com/node/1556

यापैकी काहीही जमत नसेल तर गणेशोत्सव संयोजक किंवा अ‍ॅडमिनना फोटो ईमेलने पाठवा आणि त्यांना ते फोटो पाककृतीत समाविष्ट करण्याची विनंती करा.

रुपाली, वरीलपैकी काहीच जमत नसेल तर फोटो sanyojak@maayboli.com या idवर मेल करा. तुमची पाककृती लिहून प्रकाशित करा, संयोजक त्यात फोटो समाविष्ट करतील.

Pages