कोर्ट - मराठी चित्रपट

Submitted by दिनेश. on 12 August, 2016 - 09:02

रसप यांनी लिहिलेले कोर्ट चित्रपटाचे परीक्षण आणि त्यातला त्यांचा त्रागा माझ्या अजूनही लक्षात आहे,
ते पण हा चित्रपट विसरलेले नाहीत कारण अलिकडेच त्यांनी एका प्रतिसादात या चित्रपटाचा
उल्लेख केला होता.

या सगळ्यामूळे माझ्याकडे या चित्रपटाची सिडी असूनही बघावासा वाटत नव्हता.

पण गेल्या आठवड्याभरात तूकड्या तूकड्याने तो मी बघितला. माझ्या सिडी बघण्याच्या स्टाईल बद्दल
लिहायलाच हवे. समोर टीव्ही चालू ( त्यावर माझ्या आवडते ऑलिंपिकचे सामने ) जेवण चालू आणि
कानाला हेडफोन लावून मी हा चित्रपट बघितला.

रसप यांनी माझी मानसिक तयारी करून घेतली होती, हे मला मान्य करावेच लागेल, कारण
सतत स्क्रीनवर डोळे रोखन हा चित्रपट बघायची गरजच नाही. कोर्टात जश्या तारखा पडतात,
तसाच टप्प्या टप्प्याने बघितला.

त्यांनी लिहिल्याप्रमाणे अक्षरशः कॅमेरा कुठेतरी खुंटीला टांगून ठेवल्यासारखे चित्रण आहे.
त्यांनी काही सीन्सचा उल्लेख केलाय त्याहूनही बरेच सीन्स आहेत. एका सीन मधे वकिलाचा
तोंडावर काळे फासल्यानंतर तो पार्लर मधे जाऊन स्टीम घेतो. त्या सीन मधे दुसरे काही होतच
नाही. पण निदान त्या मशीन मधून वाफ तरी येताना दिसते, तेवढीच हालचाल.
दुसर्या एका सीनमधे तो बेडवर पाठमोरा बसलेला असतो, त्यात तर काहिही हालचाल नाही.
( मला वाटले माझी सिडीच अडकली कि काय )

आणखी एका प्रसंगात वकीलावर "गोयमार" लोक हल्ला करतात, त्याच्या तोंडाला काळे फासतात
हा सर्व प्रसंग घडताना, कॅमेरा मात्र एकाच ठिकाणी बघत असतो आणि हे सगळे कॅमेराच्या अपरोक्ष
घडते.. या मागचे लॉजिक मला कळले नाही.

पण या अश्या कॅज्यूअली बघण्यातून मला यातले काही नर्म विनोद कळले, तेच इथे लिहितोय.
( ते दिग्दर्शकाला अपेक्षित आहेत का ते माहित नाही ) तसेच काही प्रसंगाना दाद पण द्यावीशी
वाटली, ते पण इथे लिहितो.

त्यातला शेवटी शेवटी येणारा कोर्ट बंद होतानाचा सीन ( ज्या बद्दल रसपनी पण लिहिलंय )
मला चक्क आवडला. अर्थात दरवाजा बंद केल्यानंतरचा काळोख नाही.
पण कोर्टात, कामाच्या शेवटच्या दिवशी असेच असते. ( घड्याळ्यात सव्वा सहा वाजलेले आहेत )
कॅमेरा एकाच जागी, म्हणजे जिथे साक्षीदार वगैरे बसतात त्याच्याही मागे आणि स्थिर. जजसाहेब
चेंबर मधे निघून गेल्यानंतरच्या स्टाफच्या हालचाली अगदी अस्सल. हा सीन कसा चित्रीत केला
असेल त्याचे नवल वाटते. कारण हा संपूर्ण सलग शॉट आहे. कॅमेरात दिसणारी कुठलीच व्यक्ती
कॅमेरा कॉन्शियस वाटत नाही.

नारायण कांबळेचे पुढे काय झाले याबद्दल चित्रपट काही बोलतच नाही आणि तेही कोर्ट च्या बाबतीत
अगदी खरे आहे. कुणाबदद्लही कसलीही भावना न दाखवता कोर्टाचे कामकाज कसे चालते, त्याचे हे प्रतीक
आहे. ( माझा स्वतःचा अनुभव मात्र अगदी वेगळा होता. मे. न्यायाधिशांनी अत्यंत प्रेमाने माझी समजुत काढली होती,
पण तो अपवादच असावा.)

कोर्टाचे कामकाज चालते ते कोड ( सी.पी.सी ) नुसार. हे कोड अत्यंत आंधळेपणाने अनुसरले जातात.
याचे एक बोचरे उदाहरण चित्रपटात आहे. केवळ स्लीवलेस ड्रेस घातलाय, म्हणून एका केसची सुनावणी होत
नाही. मला फस्सक्न हसूच आले ( असा कोड आहे का ते माहित नाही. )

आणखी एक मुद्दा म्हणजे कायद्यातील भाषा. एका प्रसंगात सरकारी वकील आक्षेपार्ह वस्तूंची यादी वाचून
दाखवतात. बॉम्ब, केमिकल्स पासून सुरु होणारी हि यादी वगैरे वगैरे सारख्या शब्दावर थांबते. आणि त्या
शब्दांचा आधार घेत सरकारी वकील जे तर्कट लढवतात, ते तर फारच मजेशीर आहे.

आम्हाला काही कायदे सी.ए. आणि बी. कॉम. च्या अभ्यासातही होते ( त्याला दोन तपांहून अधिक काळ
लोटला ) पण त्यातील डोक्यात गेलेली काही वाक्ये तर अजूनही विसरलेलो नाही..
नथिंग कंटेण्ड हिअरइन शाल अप्लाय टु द प्रोव्हायझो ऑफ.... अॅण्ड इव्हन इफ इट अप्लाईज, इट मे बी
सब्जेक्ट टू सच कंडीशन्स अॅन्ड रेस्टीक्र्श्नस अॅज मे बी स्पेसिफाईड............ हुश्श !

आपण अनेक कायदे ब्रिटीशांच्या काळापासून बिनडोकपणे फॉलो करतो आहोत. त्याची काही उदाहरणे
पण इथे आहेत. एक कायदाच ड्रामॅटीक परफॉर्मन्सेस अॅक्ट असे नाव येते ( असा कायदा नाही बहुतेक)
तो असाच जुनापुराणा. ११० वर्षांपुर्वी बंदी घातलेल्या एका पुस्तकाचाही असाच मजेशीर उल्लेख आहे.

या जून्यापुराण्या कलमांबद्दल एक आठवण सांगायलाच पाहिजे. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट शिकवायला, अॅड.
गोविलकर होते. त्यांची लेक्चर्स म्हणजे नर्म विनोदांची पखरण असे. त्यांनीच सांगितलेला एक किस्सा.
ते म्हणाले या कायद्यात, स्त्री, वेडसर व्यक्ती आणि अज्ञ बालक ( वूमन, ल्यूनेटीक अॅण्ड मायनॉर ) यांच्या बाबतीत काही कलमे समान आहेत.
"ती तशी का हे मला ( म्हणजे त्यांना ) कळत नव्हते पण कायद्यात आहेत म्हणून वर्षानुवर्षे मी वर्गात शिकवत असे.
तर एका वर्षी एक मुलगी ऊभी राहून म्हणाली, सर मला याचे कारण माहीत आहे. मला नवल वाटले.मी म्हणालो,
अवश्य सांग.
तर ती मुलगी म्हणाली, स्त्रीला यांच्या सोबत ठेवलेय कारण ती एकाची पत्नी असते तर दुसर्‍याची माता !!!"

चित्रपटात येणारी केस तर अत्यंत विचित्र आहे. शाहीर नारायण कांबळ्यावर आरोप काय तर त्यांनी एका
गाण्यात, गटार सफाई कामगारांनी आत्महत्या करा, असे सांगितल्यावर एका कामगाराने आत्महत्या केली.
हा आरोप कुणालाही हास्यास्पद वाटत नाही. आणि तपास अधिकारी, सरकारी वकील आणि अर्थातच
न्यायाधिश.. अगदी सिरियसली या केसचे कामकाज पाहतात.

तपास अधिकारी कसे मूर्खपणे वागतात ते तर यात पदोपदी जाणवते. एकतर साक्षी पुरावे नीट गोळा
करत नाहीत. साक्षीदारांना कोर्टात सादर करत नाहीत इतकेच नव्हे तर तपास करताना देखील, अगदी
बेसिक नियमांचे ( परत कोड ) पालन करत नाहीत.

इथे सर्वच जण डोके गहाण ठेवल्यासारखे वागताना दिसतात. पोलिसांनी केस दाखल केलीय ना, मग ती
बाजू मला लढलीच पाहिजे. हा सरकारी वकिलांचा खाक्या. तपासातले साधे साधे विरोध त्या बाईंच्या नजरेत
येत नाहीत, पण स्वतःच्या आर्ग्यूमेंटस साठी मात्र अनेक पुरावे आणि संदर्भ गोळा केलेले दिसतात.

यातली एकमेक माणुसकी असलेली व्यक्ती म्हणजे तो गुजराथी वकील. त्याचे प्रामाणिक प्रयत्न या सर्व
सिस्टीम पुढे कायमच अपयशी ठरतात. त्याचे बहुतेक अर्ज विनंत्या ( कुठल्यातरी नियमावर बोट ठेवून )
मे. कोर्ट नाकारते. आणि तो ते हताशपणे मान्य करतो. हि केस वर्षानुवर्षे चालणार आहे, हे त्यालाही माहीत
आहे.

मृत व्यक्तिच्या पत्नीची साक्ष तर एकाचवेळी अत्यंत करुण आणि विनोदी आहे ( हा विनोद बोचर्या अंगाने )
पतीच्या मृत्यूनंतर तिचा उदर निर्वाह कसा चालत असेल याची या व्यवस्थेला फिकीर नाही, तिने विचारलेल्या
प्रश्नांची मात्र व्यवस्थित उत्तरे दिली पाहिजेत, हा आग्रह. तिची मानसिक तयारी आहे का याची चिंता केवळ
आरोपीच्या वकीलाला. आणि तिचा, आणखी किती वेळा कोर्टात यावं लागेल, हा प्रश्नही अगदी मार्मिक.

कोर्टातील वातावरण अगदी अस्सल पणे टिपलेय. बहुतेक चित्रण चालू कोर्टातच केले असावे अगदी त्या
प्रॉपर्टीसकट, तरीपण काही बाबी खटकल्या.

१) कुणालाही शपथ दिली जात नाही.
२) एका केसचा पुकारा करताना, प्रतिवादीचे नाव घेतले जात नाही.
३) बेलची सुनावणी होताना घड्याळात सकाळची वेळ आहे ( बेलचे अर्ज सहसा दुपारच्या सत्रात सुनावणी
साठी घेतले जातात.)
४) जज साहेब कोर्टात येण्यापुर्वी अजूनही होशिय्यार चा पुकारा होतो, तो नाही.
५) तूमच्या केसमधे दम नाही, असे जज साहेब प्रत्यक्षात थेट क्वचितच बोलतात.
६) वकील सहसा कोर्टात येताना आणि जातानाही अभिवादन करतात, तसे होताना दिसत नाही.

कोर्टाचे चित्रण फक्त कोर्ट रुम मधलेच आहे. पण त्या वातावरणाचे घटक असलेले नाझर ऑफिस, सर्टीफाइड
कॉपीज मिळण्याचे ऑफिस, बाहेरची गर्दी, आशाळभूत पक्षकार आणि वकिल यापैकी काहीच
येत नाही चित्रपटात.

यातले पोवाडे मात्र अतिशय सुंदर आणि असस्ल आहेत, पण ते पुर्ण नाहीत. दुसर्‍या पोवाड्यात मागच्या फलकावर
दादासाहेब फाल्के असे लिहिलेय, मराठी माणूस सहसा अशी चूक करणार नाही.

आपल्याकडच्या चित्रपटात कोर्टाबाहेरचे न्यायाधिश क्वचितच दिसतात. इथे ते दिसतात आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचे काही वेगळेच कंगोरे आपल्याला दिसतात.

कंटेप्ट ऑफ कोर्ट ( कोर्टाचा अवमान ) हा आपल्याकडे अजूनही गुन्हा मानला जातो, त्यामूळे असा बोचरा विनोद
असणारा चित्रपट तयार झाला आणि त्याला मान्यताही मिळाली, याचे मला कौतूक वाटतेय.
तो आणखी योग्य रितीने संकलित केला असता, पटकथेवर जरा जास्त मेहनत घेतली असती, तर पूर्ण चित्रपटही
आवडला असता.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन-तीन महिन्यांपुर्वि पाहिलेला पण एव्हढं ॲनलायज करण्याच्या लायकिचा वाटला नाहि. कुठलं तरी पारितोषिकहि मिळालय बहुतेक या चित्रपटाला. वर उल्लेख केलेला वकिलाला मारहाणीनंतरचा (तो फ्रिज केलेला) सीन हा उच्चकोटिचा कलाविष्कार वगैरे आहे, आजकालच्या ट्रेंडनुसार... Happy

71st Venice International Film Festival (Orizzonti)[2]

Best Film
Lion of the Future or the Luigi De Laurentiis Award for best debut film
16th Mumbai Film Festival (International competition)[32]

Golden Gateway of India - Best Film
Silver Gateway of India - Best Director
Jury Special Mention for Ensemble Cast
51st International Antalya Golden Orange Film Festival (International competition)[33]

SİYAD International Feature Film Award
Vienna International Film Festival[34]

FIPRESCI award
Hong Kong Asian Film Festival[35]

New Talent award
Minsk Film Festival Listapad (Youth on the March competition)[35]

Best Film
Auteur Film Festival (International Competition)(Serbia)[36]

Grand Prix Aleksandar Sasa Petrovic - Best Film
FIPRESCI Prize Serbia Slobodan Novakovic
Molodist Kyiv International Film Festival (International competition)[35]

Special mention of the jury
Singapore International Film Festival[37]

Best Film: Asian Feature Film section (Silver Screen Award)
Best Director
2morrow Festival (Moscow)[38]

Best Script (Chaitanya Tamhane)
Best Cinematography (Mrinal Desai)
FICUNAM (Unam International Film Festival) (Mexico)[39]

Special mention of the jury (International competition)
62nd National Film Awards (India)[5]

Best Feature Film
India's official entry for the Academy Awards-2016

(विकू के हवाले से )

अत्यंत फडतूस सिनेमाला मिळालेले हे सन्मान पाहून मला मनातल्या मनात स्वत:च्या सिनेआकलन कुवतीची शरम वाटली.

>>Best Feature Film India's official entry<<

आॅस्कर देत नसल्याने ॲकेडमीवर सूड उगारला असेल बहुतेक...

पुरस्कार देणार्‍या संस्थांनी पण त्यांची परिक्षणं ( मे बी स्पॉयलर अलर्ट देऊन ) पसिद्ध केली पाहिजेत.. नाहितर आम्ही मठ्ठ ते मठ्ठच राहू नं !

या चित्रपटात तसेही काही दोष आहेतच.. उदा. केस चा उल्लेख वकील आपापसात बोलताना क्वचितच केस हा शब्द वापरतात, ते मॅटर असाच शब्द वापरतात.

मी चित्रपट अजून पाहिला नाही पण एकमेकांना काटकोनात छेदणारी मते वाचून एकदातरी बघावा असे वाटतेय.

एखाद्या कलेच्या आविष्काराचे खूप प्रकार असतात. जसे चित्रकलेत ज्यावर कला साकारते ते माध्यम आणि त्याच्यातून साकारते ते मध्यम ह्या दोन्ही गोष्टीत वैविध्य आहे, जसे कॅनव्हासवर जलरंग, तैलरंग, कोळसा वगैरे प्रकार, ब्रश, नाईफ वगैरेंचा वापर. मूर्त, अमूर्त, पोर्ट्रेट, लँड्सकॅप इत्यादी अनेकविध प्रकार. लिखाणात पद्य, गद्य, कविता , लेख, गजल इत्यादी.

तसेच चित्रपटातहि प्रकार असतात हे मला पुणे 52 ची वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली परीक्षणे वाचताना कळले. कोर्ट हा चित्रपट अर्थातच सैराट किंवा कट्यारच्या कॅटेगरीतला नाहीय. मुळात सैराट आणि कट्यार यांचीहि वैयक्तिक कॅटेगोरी वेगवेगळी आहे हे आपण मान्य करतो. इथे माबोवरच दोन्ही चित्रपटांची तुलना झालीय आणि दोघांना एकच मापदंड लावता येणार नाही हे अनेकांनीं लिहिले. तशीच कोर्टची कॅटेगरी वेगळी आहे/असावी/असणार. सैराट आणि कट्यार ची कॅटेगरी वेगवेगळी असली तरी मनोरंजन हा समान मुद्दा त्यांच्यात होता. कोर्टच्या बाबतीत ते नसावे.

चित्रकलेत आपल्याला अमूर्त कळत नाही असे म्हणून आपण तो नाद सोडून देतो, आपल्याला जरी कळत नसले तरी काहींना त्यात काही कळू शकते हे आपल्याला मान्य असते. लेखनात आपण गजलेच्या वाट्याला जात नाही. कारण परत तेच. पण तेव्हा आपण अमूर्त चित्रे कशाला काढता? गजला कशाला लिहिता? हा प्रश्न उपस्थित करत नाही.

प्रत्येक पुस्तक जसे मनोरंजनासाठी नसते,तसेच चित्रपट हि कला असे मानले तर मग तोही प्रत्येक वेळी मनोरंजनासाठीच बनवला असेल असे नसणार. केवळ कलेचे माध्यम चित्रपट आहे म्हणून प्रत्येक चित्रपटाने एकाच प्रकारची कला सादर करावी हि अपेक्षा योग्य नाही.

आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकाने आजवर फक्त मनोरंजनासाठीच बनवलेले चित्रपट पाहिलेत. काही थोर दिग्दर्शकांनी केलेल्या वेगळ्या प्रकारातही आपण मनोरंजक मूल्ये शोधलीत आणि ती मूल्ये आपल्याला सापडली म्हणून आपण त्या थोरांना थोर मानले. कोर्टच्या बाबतीत मनोरंजक मूल्ये अजिबात नसतील पण त्याचा जो काही वेगळा प्रकार आहे तो दिग्दर्शकाने समर्थपणे हाताळलाय हे त्याला मिळालेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांवरून सिद्ध होते. सामान्य माणसाला तो वेगळा प्रकार कळत नसेल तर सा.मा.ने आपल्या कक्षा वाढवाव्यात नाहीतर अशा वेगळ्या प्रकाराच्या मागे जाऊ नये.

नक्कीच हा मनोरंनात्मक सिनेमा नाही. मात्र कॅमेरावर्क वगळता दिग्दर्शकाने फार कमाल वगैरे केलेली मला तरी जाणवली नाही. अगदी कोणत्याही दृष्टीकोनातून बघितले तरी.
प्रथम कथेबद्दल सांगायचे, तर हा चित्रपट भारतीय न्याय व्यवस्थेवर भाष्य करतो. इथे पराचा कावळा कसा केला जातो? आणि सामान्याला गुन्हेगार कसं सिध्द केलं जातं? अशा आशयाचे कथाबीज आहे. मात्र त्यापुढे जाऊन सिनेमा न्यायालयीन प्रक्रियेची जी पानं आपल्या समोर उलगडतो तेच मुख्यत्वे दिग्दर्शकाला सांगायचे आहे असे मला वाटते. म्हणुनच सिनेमाचे नाव ‘कोर्ट’ असावे. नारायण कांबळे नावाचा दलित चळवळीचा शाहीर आपल्या गाण्यातून “आपल्यावर अत्याचार करणारे कोण आहेत ते ओळखा” असे आवाहन करतोय. सीनइंट्रो किंवा मागील बॅनर पहिला तर “वडगाव हत्याकांड विरोधी समिती”चा हा कार्यक्रम आहे असे लक्षात येते. म्हणजे दलित अत्याचार विरोधी चळवळीतील हा इव्हेंट असल्याचे समजते. असे कार्यक्रम करून नारायण दलित चळवळीला आपल्यापरीने योगदान देत आहे. मात्र त्याचे कवन ऐकून त्याच्याच समाजातील वासुदेव पवार हा गटार साफ करणारा व्यक्ती आत्महत्तेस प्रवृत्त झाला आणि मेला. असे दोषपत्र ठेऊन त्यावर खटला चालवला जातो. ज्यात आधी त्याला जामीन मिळावा म्हणून आणि नंतर आरोपातून सुटका मिळावी म्हणूनची संयत न्यायालयीन लढाई आहे.
कथेचा शेवट सूचक आहे असे वाटते. मात्र तो fandry इतका ठसठशीत झालेला नाही. सादरी करणाच्या प्रामाणिकपणा आणि चित्रीकरणाचे प्रयोगतत्व इतक्याच दोन जमा बाजूंवर सिनेमाला अवार्ड असावेत. कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. पार्श्वसंगीत जास्तीत जास्त अम्बियंसवर भागवलेल आहे. दोन गाणी मात्र संभाजी भगत यांनी दमदार लिहिली आणि गायिली आहेत. चित्रपट फसला आहे तो पटकथा आणि संवादात. पटकथेत अजिबात दम नाही. माझ्या मते सिनेमात एकही फ्रेम अनावश्यक नसावी. मात्र इथे दोन्हीही वकिलांच्या वैयक्तिक जीवनाचे चित्रण अगदीच अनावश्यक वाटले. थोडा बदल चेतकबदल म्हणून ठीक होता मात्र तोही रंजक नाही. संवादांची भाषा हिंदी, मराठी, गुजराथी आणि जास्तच इंग्लिश आहे. म्हणजे या सिनेमाला मराठी सबटायटल्स असायला हवे होते असही वाटलं. अर्ध्याहून अधिक संवाद इंग्रजी आहेत मग मराठी प्रेक्षकाने कुठे बोंब मारावी. (ती कथेची गरज असली तरी). ऑर्डर ऑर्डर .. अमुक अमुक हाजीर हो .. देवा शप्पथ ... असं काहीही टिपिकल, जे जास्तीच फिल्मी वाटतं, ते जाणीव पूर्वक ठेवलं नसावं. कारण सिनेमा कुठेही लाउड करायचा नसावा. मारामारी सुद्धा दिसू दिलेली नाही. कुठे डोळ्याचा ओघळ नाही.. रागाचं नामोनिशाण नाही .. हसू नाही...की सन्नाटा नाही... सगळंच बथ्थड

आवडलेल्या बाबी अश्या - विदाऊट मूव्ह केलेलं शुटींग. स्टील कॅमे-याने कथानक उलगडणे हे काही खायचे काम नाही. एन्ट्री आणि एक्झिट करताना वातावरण निर्मितीसाठी वापलेला ७..८ सेकंदाचा काळ जिथे फक्त चित्र बोलतं आणि परिणाम करतं ते अत्यंत चांगलं जमलेलं आहे.
आणि शेवट जिथे न्यायव्यवस्था आरामात झोपाळ्यावर डुलक्या घेतेय आणि तिला उठवणाऱ्यांपैकी जो हाती लागेल मग तो निर्दोष का असेना त्यालाच शासन करतेय. हे फार उत्तम सूचक होतं. जज्जच्या सुट्टीचे सगळेच सीन सुंदर आहेत, संवादी आहेत.
इतकं सगळं असलं तरी हा सिनेमा कशासाठी पहावा याचं उत्तर माझ्याकडे तरी नाही. कदाचित नारायणचा जो “अपमानाचा इतिहास” दाखवायला हवा होता तो तसाच त्या छापखाण्यात पडून राहिला.

मला आवडला होता हा पिक्चर. अगदी बिलीव्हेबल वाटला होता. चित्रपटाचा पेस, कन्व्हेन्शनल मनोरंजन नसणे ह्याने मला फारसा फरक पडला नाही.

खूप मस्त आणि अभ्यासपूर्वक लिहिलं आहे. मला आजही ह्या सिनेमाच्या आठवणीने अघोरी कंटाळा येतो ! माझं परीक्षण भावनिक (जसं ते नेहमीच असतं बहुतेक !) होतं, पण तुम्ही खूप शांतपणे विचारपूर्वक लिहिलं आहे. जे मला कधीच जमणार नव्हतं, ते इथे आलं आहे.
आजही माझं हेच मत आहे की अत्यंत ओव्हररेटेड सिनेमा होता हा. एक प्रयोग म्हणून चांगला म्हणू किंवा एकंदरीतही सिनेमा म्हणून चांगला म्हणू, पण महान वगैरे तर अजिबातच वाटला नाही मला.

मस्त लिहिलंयत दिनेशदा ! Happy

२-३ तास वाया गेले.... बाकी परिक्षण मस्त... मला वाटलं मला चित्रपटाची चव कळणं बंद झालंय की काय... पण अनेक लोकांचा समान अनुभव ऐकुन बरं वाटलं.

कथा सांगता आली पाहिजे.

चित्रपट संपलेला कळला नाहि . शेवटी काय होतं हे आपण ठरवायच असावं. मला तर नारायण कांबळे बाजूला
राहिला की काय असेच वाटले. कोर्टाचे काम कसे चालते हे दाखवायचं होतं की परिणामकारक साहित्य
निर्माण झाल्यावर काय होतं ते दाखवायच होत, हे कळत नाही. या चित्रपटाचं एवढं कौतुक का झालं कळत नाहि.
मला असुया नाहि पण कौतुकाचं आश्चर्य वाटलं.

साधना :: अगदी योग्य... प्रतिसाद आवडला..!!!

मला तरी हा सिनेमा आवडला...

आमचा सिनेमा खुप वेगळा आहे अस म्हणुन तेच ते दाखवणार्‍या टुकार चित्रपटा पेक्षा हा सिनेमा थोडा तरी वेगळा वाटला...

मला हा सिनेमा भयंकर आवडला. स्पेशली कॅमेरा दूरवर ठेवून कोणीतरी कॅमेर्‍याच्या एका कोपर्‍यातून हळूच एंट्री करतो, आणि तो पूर्ण चालत जाईपर्यंत कॅमेरा तसाच स्थिर एकटक राहतो, ही टेक्निक तर प्रचंड आवडली. जज शेकोटीभोवती 'हिल पोरी हिला'वर नाचतात, तो सीनही खूप मस्त वाटला.

अत्यंत चांगला चित्रपट आहे खरे तर. मागेपण कुणीतरी ह्याचे परिक्षण लिहिले होते तिथेही मी काही प्रतिसाद दिले होते, खासकरुन शेवटाबद्द्ल.

मलाही हा चित्रपट अतिशय आवडला. इतक्या सगळ्या कलाकारांकडून नैसर्गिक अभिनय कसा करून घेतला असेल ही शंकाच आहे! जजसाहेब शेवटी ट्रीपला जातात तिथे ती मुले खोडी करून त्यांची झोपमोड करतात आणि जज त्या एका मुलाला मारतात - तो सीन भारी आहे! - कदाचित ह्यातच त्या सिनेमातून नक्की काय दाखवायचे आहे याचे सार आले आहे.

बर्‍याच उशीराने तू-नळीवर पाहिला. ठीक. १-२ कलाकारांची कामे चांगली.

थेटरात पाहायची गरज नव्हती . तिथे जरी पाहिला असता तरी कळकट मळकट पडद्यावरच पाहतोय असे वाटले असते.
अतिशय संथ.

पुरस्कारास ठीक. प्रेक्षकांना पैसे देउन मात्र महाबोअर ! वास्तववादी पुस्तक वाचणे ठीक आहे; चित्रपट हा 'चित्रपट' वाटला पाहिजे.
आणि चित्रपट मराठी भाषेतच आहे का असाही प्रश्न पडावा इतकी इंग्लिश, हिंदी व गुजरती भाषांची भेसळ. कायद्यातले उतारे च्या उतारे इंग्लिशमध्ये वाचून दाखवायची काय गरज होती ? कांबळेचा वकील मराठी भाषिकही घेता आला असता.

कोर्ट हा रुढार्थाने चित्रपट नाही तर अनुभव आहे. कोर्टाचा अनुभव. मनोरंजन* अशा अर्थाने चित्रपट बघायला जाणार्‍यांचे भ्रमनिरास होणे साहजिक आहे.

*मनोरंजन = नवरसांपैकी कोणत्या तरी एका रसाचा आस्वाद घेणे. कोर्ट चित्रपटात नवरसांपैकी कोणताही रस नसावा... Happy

मी हे जरा अवांतर लिहितोय त्याकरिता कृपया आपण मला माफ करावे. गेले दोन तास मी स्वतःला लिहू नये म्हणून आवरतोय, पण लिहिल्याशिवाय मला राहवलंच नाही शेवटी!

किती आश्चर्य आहे पहा! मला वाटलं होतं कि हा धागा मी अगोदर वाचलेला नाही. म्हणून मी प्रथम 'दिनेश' यांनी लिहीलेलं चित्रपटाचं परीक्षण पूर्ण वाचलं. मग सर्वांच्या प्रतिक्रिया वाचत खाली येत होतो तेव्हा 'साधना' यांनी दिलेली ६ व्या क्रमांकावरची प्रतिक्रिया वाचली. ती मला पूर्णपणे पटली आणि आवडलीसुद्धा. म्हणून मी लगेच ठरवलं की पुढच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून झाल्या की शेवटी आपणही प्रतिक्रिया लिहावी कि 'साधना, आपला प्रतिसाद आवडला' म्हणून!

मी पुढील प्रतिक्रिया वाचू लागलो. आणि काय आश्चर्य!!! अक्षरशः १३ व्या क्रमांकावर मी स्वतःच प्रतिक्रिया लिहिलेली होती की 'साधना, आपला प्रतिसाद आवडला.' अगदी हुबेहूब आता माझ्या मनात आलेलीच प्रतिक्रिया होती ती. दिनांक २१ ऑगस्ट १६ रोजी मीच स्वतः लिहिली होती. आणि मी पूर्णपणे विसरून गेलो होतो.

वास्तविक गेल्या सहा महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. तरीसुद्धा आता अगदी तशीच प्रतिक्रिया द्यावी असं कसं काय मला पुन्हा वाटलं? अगदी तसेच विचार पुन्हा माझ्या मनात कसे काय आले? मला या गोष्टीचे आणि योगायोगाचे किती आश्चर्य वाटतंय म्हणून सांगू!!!

संवादांची भाषा हिंदी, मराठी, गुजराथी आणि जास्तच इंग्लिश आहे. म्हणजे या सिनेमाला मराठी सबटायटल्स असायला हवे होते असही वाटलं. अर्ध्याहून अधिक संवाद इंग्रजी आहेत मग मराठी प्रेक्षकाने कुठे बोंब मारावी >>> याला तर १ लाख वेळा अनुमोदन.

माझे एक ज्येष्ठ सहकारी नेहेमी म्हणायचे, '' पुरस्कारप्राप्त चित्रपट बघायला जाताना मला धाकधूक होते....आपल्याला आवडेल ना बाबा हा सिनेमा, नाहीतर पस्तावा व्हायचा''.
'कोर्ट' पाहिल्यावर मला त्यांच्या विधानाची तीव्रतेने आठवण झाली !

रसग्रहण आणि प्रतिसाद वाचून अतीव दुःख झाले...

चांगला चित्रपट म्हणजे काय हे कळण्याची भारतीय पब्लिक ची पात्रता चं नाही... हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले...

व्यक्तिशः मला अतोनात आवडला हा मुव्ही..

सॅल्यूट टू ताम्हाणे!

Pages