मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१६-१७

Submitted by हर्पेन on 2 August, 2016 - 07:24

नमस्कार मंडळी !

सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू झाले आहे/ होत आहे त्याची माहिती देत आहे.

जून महिन्यामध्ये अमरावती येथे आपण गावमित्रांचे प्रशिक्षण व नियोजन शिबीर घेतले. त्या शिबीरात पुढील वर्षभर काय काय करायचे याची आखणी आपण केली. त्याच्या अभ्यासाचा भाग शोभाताईंनी तयार करून गावमित्रांना सांगितला व त्याप्रमाणे त्यांची तयारी करून घेतली.

गेल्या वर्षीपासून शासनाच्या‘प्रगतशिक्षण’ धोरणामुळेशिक्षकांच्या उपस्थितीमध्ये व शिकवण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला बदल घडून येत आहे. आपण पहिल्यापासूनच शिक्षकाना सहकार्य करण्याचे धोरण ठेवले आहे. आता सर्वच शिक्षक आपल्याला सहकार्य करत आहेत, शाळेची गुणवत्ता वाढवता कशी येईल याविषयी आपल्याशी चर्चा करत आहेत ही चांगली बाब आहे. आपले गावमित्र, शाळा समितीची बैठक वेळोवेळी व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्याचाही परिणाम हळूहळू दिसून येत आहे व यापुढेही येईल.

या वर्षी स्वयंसेवकांच्या मदतीने 'आरोग्य आणि स्वच्छता' या विषयाकरता काही लहान उपक्रम करण्याचे आपण योजत आहोत. गावमित्रांच्या मदतीने स्वयंसेवक त्यांच्या मेळघाटातील वास्तव्यामध्ये हे काम करतील. उपक्रमांचा तपशील, स्वयंसेवकांच्या गटाला त्या त्या वेळी मिळेल.

स्वयंसेवकांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

जून २०१६ मधे नियोजन व प्रशिक्षण शिबिर ( मैत्रीच्या समन्वयक अश्विनी व शोभाताई यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली) पार पडले आहे.

जुलै-ऑगस्टमधे वैद्यकिय धडक मोहिमेचे काम अगदी जोरात (at its peak) चालू असल्याकारणाने, शाळेसंदर्भातील उपक्रम सप्टेंबर पासून पुढे राबवण्याचे ठरले आहे.

सप्टेंबर २०१६ - ११/१२ ते १८/१९ सप्टेंबर
११/१२ ला पुण्यातून निघायचे आणि १८/१९ ला तिकडून निघायचे. (गणपती विसर्जनाच्या आसपास)

ऑक्टोबर २०१६ - ७ ते १६ ऑक्टोबर
७ ला पुण्यातून निघायचे आणि १५ ला तिकडून निघायचे. (दसर्‍याच्या सुमारास)

नोव्हेंबर २०१६ - ५ ते १३ नोव्हेंबर
५ ला पुण्यातून निघायचे आणि १२ ला तिकडून निघायचे. आनंदमेळावा (किमान१० स्वयंसेवक हवेत)

डिसेंबर २०१६ - २३ ते ३१ डिसेंबर
२३ ला पुण्यातून निघायचे आणि ३० ला तिकडून निघायचे. (नाताळच्या सुमारास)

जानेवारी २०१७ २६ ते ३१ जानेवारी
२६ ला पुण्यातून निघायचे आणि ३० ला तिकडून निघायचे. अभ्यासदौरा वर्धा

फेब्रुवारी व मार्च२०१७ - २४ फेब्रुवारी ते ४ मार्च
२४ फेब्रुवारीला पुण्यातून निघायचे आणि ३ मार्चला तिकडून निघायचे. (होळीच्या आधी)

एप्रिल व मे २०१७ - २९ एप्रिल ते ३ मे
२९ एप्रिलला पुण्यातून निघायचे आणि २ मे ला तिकडून निघायचे. आढावा व पुढील वर्षाचे नियोजन व शिबिर (अश्विनी व शोभाताई यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली)

प्रत्यक्ष काम

मेळघाटात पोहोचणे
स्वयंसेवक, संध्याकाळच्या गाडीने पुण्यामधून निघतील. दुसर्‍या दिवशी सकाळी ते परतवाडा येथे पोहोचतील आणि सकाळच्या 9 च्या एस. टी. बसने चिलाटीकडे निघतील. चिलाटीला दुपारी 1:30- 2:00 पर्यंत पोहोचतील.

प्रत्यक्ष काम
मुलांना शाळेत जाऊन शिकवणे
मुलांना बरोबर घेऊन गावमित्रांच्या मदतीने गावामध्ये काही काम करणे (शिक्षणाला पूरक असे)
मुलांना गाणी शिकवणे, गोष्टी वाचून दाखवणे
गावमित्रांना काही प्रमाणात मार्गदर्शन करणे

पुण्यात परत येणे

निघण्याच्या दिवशी सकाळी तुम्ही परत येण्याकरता चिलाटीमधून निघाल. त्याच दिवशी संध्याकाळी / रात्री परतवाडा/अमरावती मधून बस /आगगाडीने निघून दुसर्‍या सकाळी पुण्यात पोहोचाल. चिलाटीला तयार केलेला अहवाल परत आल्यानंतर लगेच दुस-या दिवशी ‘मैत्री’ कार्यालयात पाठवावेत. (कोणी एकाने सर्वांचे आणून दिले तरी चालतात). प्रत्यक्ष येऊन देणे शक्य नसेल तर स्कॅन करुन इमेल द्वारा पाठवावेत. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी हे काम आठवणीने करावे.

आल्यानंतरच्या रविवारी सकाळी जाउन आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी ‘मैत्री शिक्षण’ गटाच्या बैठकीला यावे असे अपेक्षित असते. त्याच दिवशी पुढच्या महिन्यात जाणाऱ्या नवीन बॅचची मंडळी पण हजर असतात. त्यायोगे आपला अनुभव व अभिप्राय त्यांना ऐकायला मिळतो. असे केल्याने तिकडे जाणाऱ्या नवीन स्वयंसेवकांना त्या त्या वेळच्या स्थितीचे नीट आकलन होऊ शकते.

स्वयंसेवकांची नावनोंदणी
• तुमची जाण्याची तारीख निश्चित झाली की ‘मैत्री’ कार्यालयात येऊन तुम्ही तुमची माहिती एका संमतीपत्रात भरून द्यायची आहे. त्याचवेळी तुम्ही नवीन असाल तर मेळघाटाविषयीची माहिती तसेच तिथे काय करायचे, काय टाळायचे हे तुम्हाला सांगितले जाईल.
• तुमचे जाण्यायेण्याचे तिकीट पण लवकरात लवकर काढावे. तसेच मेळघाटामधील राहणे व जेवणाचे शुल्क दर दिवशी रु. १०० /- याप्रमाणे प्रत्येकाने कार्यालयात जमा करावे.
• ‘मैत्री’ कार्यालयात नावनोंदणी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे सोम. ते शुक. 10:00 ते 5:00 किंवा शनिवारी 9:00 ते 12:00 या वेळात केव्हाही तुम्ही जाऊन हे करावे.
संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ ( लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१

www.maitripune.net

अनेक मायबोलीकरांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख केल्याशिवाय हा लेख संपवणे औचित्यपुर्ण ठरणार नाही. अशा सर्वच मायबोलीकर हितचिंतकांना भेटण्यास मी व मैत्री परिवार उत्सुक आहोत. त्याच बरोबर मी इतरही मायबोलीकरांना आवाहन करतो की त्यांनी पुणेस्थित मैत्री-कार्यालयाला जरूर भेट द्यावी.

मायबोलीवर असलेले याआधीचे लेख

http://www.maayboli.com/node/49640
http://www.maayboli.com/node/39286
http://www.maayboli.com/node/44146
http://www.maayboli.com/node/45066
http://www.maayboli.com/node/49301
http://www.maayboli.com/node/55409

मायबोलीकरांनो, मान्य आहे सगळ्यांनाच तिकडे जायला जमेल असे नाही तरीपण तुम्हाला मदत करायची ईच्छा आहे तर मेळघाटात न जाता तुम्ही कशी मदत करु शकाल/ कसे सहभागी व्हाल?

स्वयंसेवक म्हणून पुण्यातच सहभागी होऊन – पुण्यातील शिबिरामध्ये मदतीसाठी येणे, शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी मदत करणे, अमरावती अथवा पुण्यामध्ये प्रशिक्षण शिबिरांकरता जागा/जेवणाची व्यवस्था करणे, आपल्याकडील एखादे कौशल्य गावमित्रांना शिकवणे (फलक लेखन, गोष्ट वाचन, हस्ताक्षर, संवाद कौशल्य इ.)

शैक्षणिक साहित्य देऊन – पेन्सिल इ. किंवा स्केचपेन/ रंगीत पेन्सिली, रंग, तेली खडू (क्रेयॉन) इ. किंवा जाड कागद (कार्डशीट),कोरे/ पाठकोरे कागद, ओरिगामी कागद, कात्र्या, फेव्हिकॉल इत्यादी
वाचनपेटी करता पुढील मदत करुन– गोष्टींची पुस्तके, चित्रांची पुस्तके, Children Activity books, मासिकांची (किशोर, चंपक, ठकठक इ.) वर्गणी मेळघाटातील एका/ अधिक गावांसाठी भरणे, स्टीलची पेटी घेण्याकरता आर्थिक मदत देणे ई. ई.

'मैत्री'च्या उपक्रमांना आर्थिक मदत करण्यासाठी खालील लिंक पहा. त्यात बँकेचे डिटेल्स आणि मैत्रीकडून देणगीची पावती मिळण्यासाठी काय माहिती पाठवायची ते सविस्तर दिले आहे.

http://www.maitripune.net/PlusYou_contribute.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदाची गोष्ट अशी आहे की या वर्षी आपल्या मुलांकरता लागणार्‍या वह्या ऑलरेडी जमा झाल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी साध्या वह्या लागणार नाहीत. (चित्रकलेच्या वह्या लागतील)

तसेच आपल्याकडे असलेल्या अकरा गावांपैकी आठ गावांकरता वाचन पेटी तयार झाली आहे.

अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यावर्षी ३ स्त्रिया, 'गावमित्र' संकल्पने नुसार समन्वयक म्हणून काम करायला तयार झाल्या आहेत व तिघीही आपापल्या गावात 'मैत्री' चे उपक्रम राबवण्याकरता सज्ज आहेत.

नोव्हेंबर २०१६ - ५ ते १३ नोव्हेंबर
५ ला पुण्यातून निघायचे आणि १२ ला तिकडून निघायचे. आनंदमेळावा (किमान१० स्वयंसेवक हवेत)

या दरम्यान कोणाला जमतंय का?
स्वयंसेवक हवे आहेत.