डोनाल्ड ट्रम्प आणि इमिग्रेशन पॉलिसी

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 July, 2016 - 11:00

माझ्या सारख्या संन्याश्याला काय पडले आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या इमिग्रेशन पॉलिसीशी ? असा प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे . परन्तु आज एक विचारप्रवर्तक लेख वाचनात आला आणि मग एक विचारचक्र सुरु झाले , मग त्यातून अनेकानेक मुद्दे सुचू लागले जे कुठे ना कुठे भारतीय वैदिक हिन्दू संस्कॄती अन इतिहासाशी संलग्न आहेत ...म्हणूनमग त्यावर विचारमन्थन व्हावे यासाठी हा लेखनप्रपन्च ... असो

हा लेख वाचल्यानन्तर अनेक परदेशस्थ अथवा आम्रविका खंडनिवासी मंडळींस मी प्रतिगामी विचारान्चा आहे की काय? असा प्रश्न जरूर पडेल. परन्तु मला वाटते एकूण जगाचे भले कशात आहे ? याचा विचार करता मी मांडत असलेले मुद्दे योग्यच वाटतात . असो .......नमनास घडाभर तेल घालवून झाल्यावर आता मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे वळूया ...

१. एखाद्या देशाचा /समाजाचा विकास अन समॄद्धी आपण नक्की कोणत्या एककांत / परिमाणात मोजतो?

२. आजकाल आफ्रिका व आशिया खण्डातील जनता मोठ्या प्रमाणात युरोप अथवा अमेरिकेत स्थलान्तर करीत आहे . हा ट्रेन्ड गेल्या सुमारे शतकभरापासून सुरू झाला अन दिवसेन्दिवस वाढतच गेला . युरोपात तर काही ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मूळ युरोपियन लोकांपेक्षा स्थलान्तरित जनतेचे प्रमाण जास्त होत असल्याचा सम्भव आहे. अमेरिकेस सुद्धा इमिग्रेशन आणि इल्लिगल एमिग्रन्ट्स ची समस्या फार मोठी डोकेदुखी आहे!

३. या एमिग्रन्ट्स मुळे स्वस्त लेबर मिळणे या एकाच फायद्यासाठी अनेक घातक समस्या अन प्रश्न अमेरिकन्स अन युरोपियन्स च्या बोकांडी बसले आहेत. विस्थापित्/स्थलान्तरित इस्लामिक जनतेमधून जिहादी अन आयसिस सारख्या संघटनांचे आतंकवादी देखील घुसले .एवढेच नव्हे तर पूर्वापार काही दशकापासून युरोप-अमेरिकेत राहणार्या इस्लामी तरुणामध्ये देखील जिहादी दहशतवादाची बीजे फोफावली . आणि इस्लामी आतंकवादाचा धोका संपूर्ण जगास निर्माण झाला . यामुळे सर्वाधिक नुकसान प्रामाणिक निरपराध मुस्लिमांचे झाले आहे कारण रोजीरोटी कमावण्यासाठी स्थलान्तर करू पाहणार्या प्रत्येक मुस्लिमाकडे आता संशयाच्या नजरेतूनच पाहिले जाऊ लागले आहे.

४. याखेरीज त्या त्या देशांच्या साधनसंपत्तीच्या स्रोतांवर विस्थापित/ स्थलान्तरितांमुले अतिरिक्त ताण येणे , तसेच प्रवाशांची संख्या अतोनात वाढलुयाने विमानप्रवास व तत्सम वाहतुकीची साधने वाढून अधिकाधिक तेल वापरून संपवणे , या अधिकच्या लोकसंख्येसाठी अन्नधान्य आणि अन्य साधनसामुग्रीची वाहतूक वाढून कार्बन फूटप्रिन्ट वाढणे अशा अनेक दुष्परिणामांस सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने या गोष्टींकडे " बिझनेस मधील वाढ /विकास " म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात ते तसे आहे का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे .

५. याखेरीज गुन्हेगारी /बलात्काराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणे आणि नेटिव्ह लोकाना हे उपरे वरचढ होउ लागल्याची सल वाटणे याही बाबी आहेतच...

तर मुख्य मुद्दा असा की हे इमिग्रेशन खरेच गरजेचे आहे का ? पश्चिमेतील काही व्यापारी कम्पन्यांच्या डोक्यातून निघालेले हे ग्लोबलायझेशन चे खूळ ! त्यालाच विकासाची संकल्पना अन्धपणे मानण्याची चूक प्रत्येकाने करावीच का? प्रत्येक देश स्वयम्पूर्ण अन सार्वभौम झाल्यास, त्या त्या देशाने देशातील सर्व नागरिकांस योग्य त्या सन्धी दिल्यास ते नागरिक परदेशी जाण्याची आस का धरतील?

किंबहूना मला तर इमिग्रेशन ही संकल्पना २१व्या शतकातील गुलामगिरीचे आधुनिइक स्वरूप वाटते. हे अमेरिकन्स आपली कामे आपण करू शकत नाहीत का? का आम्ही यांची हलकीसलकी कामे करण्यासाठी गुलामासारखे अथवा भिकार्यासारखे व्हिसाच्या रांगेत उभे रहावे/?

असो... या मुद्द्याला दुसरी बाजूही आहे. अरब राष्ट्रांत जसे जास्तीत जास्त २ ते ५ वर्षांच्या एम्प्लॉयमेन्ट व्हिसावर प्रवेश देतात , तसेच इतरही देशानी सुरु करावे. त्या नवीन देशात कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी खरेद्दी करणे अथवा तिथे सेटल होणे /तिथल्या मुलीशी लग्न करणे अजिबात शक्य असणार नाही. स्थलान्तरित देशात जन्माला येणार्या मुलांस कोणतेही प्रिव्हिलिजेस असणार नाहीत. त्यान्ची नागरिकता मूळ देशाचीच असेल .

असे झाल्यास परदेशात सेटल होण्याच्या रॅट रेस ला जबरदस्त हिसका बसेल . किम्बहूना ती मनोवॄत्तीच नष्ट होइल. सर्व एमिग्रन्ट्स हे फक्त आणि फक्त एम्प्लॉयी म्हणून येतील . आणि ठराविक काळाने परत मायदेशी जातील. मग त्यांच्य पुढच्या पिढ्या मूळ संस्कॄतीपासून दूर जाणे वगैरे फाजील प्रकार देखील बन्द होतील . आणि प्रत्येक देशाची विशिष्ट ओळख सांगणारी संस्कॄती देखील घट्ट रुजेल ....

येणार्या यु एस प्रेसिडेन्ट शिप च्या निवडणुकीत ट्रम्प महोदय विजयी झाल्यास त्यानी अशा प्रकारची इमिग्रेशन पॉलिसी जररूर राबवावी ,एवढेच नव्हे तर जगभरात स्र्वत्र अशीच पॉलिसी असावी अशी सदिच्छा ! यावर लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे , पण आज इथेच थाम्बतो...

इत्यलम !
सर्वाधिकार सुरक्षित
स्वामी विश्वरूपानंद
दि. २७-जुलै-२०१६
दक्षिण डकोटा गणराज्य
अमेरिकेची संयुक्त संस्थाने

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख विचारप्रवर्तक आहे खरा पण कायद्याने इमिग्रेशन थांबवणे किती शक्य होईल हि शंका आहे.

जीव जगवण्यासाठी अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ आदी मानवाने जर इमिग्रेशन केले नसते तर तो जिथे उत्पन्न झाला तिथेच कायमचा विसावला असता. तेव्हा इमिग्रेशन करणे ही त्याची नैसर्गिक ओढ आहे आणि जास्त चांगल्या सोयी शोधत तो भटकणार. याला भिकारीपणा वगैरे म्हणणे मला पटले नाही.

पण हे कोठपर्यंत ताणणार? आपल्या आधीच्या पिढ्यांत लोक कोकणातून देशावर आले, तसे विदर्भ वगैरेंहून लोक पश्चिम महाराष्ट्रात येतात - त्यांच्याबद्दलही हे लागू होईल का? Happy

अमेरिकेच्या बाबतीत तर इमिग्र्ण्ट्स म्हणणे म्हणजे मुंबईच्या लोकल मधले कोणत्या स्टेशनात चढलेले लोक मूळचे विचारल्यासारखे होईल.

बँग ऑन प्रतिसाद @ धनि.

ट्रंपोबा निवडून यावेत म्हणून दिल्लीतल्या हिंदूबंधूंनी केलेला 'यज्ञ' आठवला.

संपुर्ण लेखाशी सहमत,विकसनशील देश आपल्या देशातील मुलांसाठी प्रार्थमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत देतात.मग हेच फुकट शिक्षण घेतलेले ,त्यातले काही हुशार लोक परदेशात विशेषतः अमेरीका आणि युरोपात स्थायिक होतात,यातुन ब्रेन ड्रेनची समस्या सर्व विकसनशील देशात आहे.ट्र्म्प यांनी कडक कायदे केल्यास यातले बरेचजण देशातच राहतील व ब्रेन ड्रेनची समस्या सुटायला सुरुवात होईल.

लेखाशी पूर्णपणे सहमत. पुढे जाऊन असे म्हणेन की अमेरिकेतल्या मूळ लोकांना तिथे ठेवून बाकी सगळ्यांना आपापल्या मूळ देशांत परत पाठवण्यात यावं. ट्रंपदादांची वंशाशळ मांडून त्यांचे पूर्वज जिथून आले, तिथे त्यांना पाठवावे.

सगळ्या देशांंंनी आपल्या नागरिकांची मुळे तपासून , जिथून आले असतील तिथे नेऊन टाकावीत.

जागतिकीकरणाची चाके उलट फिरवावीत. वसाहतवादाच्या काळापासून आजपावेतो ज्या ज्या देशांची लूट केली गेली त्यांना सव्याज नुकसानभरपाई देण्यात यावी.

म्हणजे ते इराण अफगाणीस्तानातून आलेले आर्य पण मोजायचे का? की अफ्रिकेतून निघालेले सगळेच मानव?

भरत Lol भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेपर्यंत हे रिवर्स ब्रेनड्रेन चालू ठेवावे, असे अनुमोदन देतो.

एबीसीडी सारखी आयबीओआर (ईंडिया बॉर्न ओवरकॉन्फिडन्ट रेडनेक) लोकांची सुद्धा फौज आहे म्हणायची अमेरिकेत. Wink

किंबहूना मला तर इमिग्रेशन ही संकल्पना २१व्या शतकातील गुलामगिरीचे आधुनिइक स्वरूप वाटते. हे अमेरिकन्स आपली कामे आपण करू शकत नाहीत का? का आम्ही यांची हलकीसलकी कामे करण्यासाठी गुलामासारखे अथवा भिकार्यासारखे व्हिसाच्या रांगेत उभे रहावे/?>>> आणि स्वामीजी हा लेख डकोटात बसून लिहित आहेत. Rofl

१. अनेक विकसित देशांत लोकसंख्यावृद्धी दर कमी असल्याने येणाऱ्या काळात टिकाव धरून राहण्यासाठी आकर्षक इमिग्रेशन नियम आहेत. कॅनडात दरवर्षी २५०,००० लोक इमिग्रेट होतात. टेम्पररी वर्कर वेगळे. हे केलं नाही तर देश चालवणं अशक्य होईल, बेबी बुमर्स सेवा निवृत्त होऊ लागलेत, त्याचं पेंशन, वृद्धापकालीन मदत इ. साठी प्रचंड पैसा लागणारे. कॅनडात अवैध स्थलांतरीत कमी आहेत कारण नियमात राहून स्थलांतर करणे सहज शक्य आहे. अमेरिकेत बेकायदा स्थलांतरीत आणि नियमात राहून आलेले लोक मला वाटतं सध्या अर्थव्यवस्थेचा समतोल राखून आहेत. इमिग्रेशन पॉलिसी रीफोर्म अत्यंत आवश्यक आहेत.

२. तुमच्या लेखात रेफ्युजी स्थलांतरावर काही टिपण्णी आढळली. आपल्या देशांत जर सगळं चांगलं चालू असेल तर जीव मुठीत धरून अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करून कोणी स्थलांतर करत नाही ही अनेक सर्वेक्षणांतून पुढे आलेली गोष्ट आहे. या अन्यायग्रस्त लोकांना सामावून घेणे हे कोणत्याही सहृद माणसाचे कर्तव्य आहे. पार्श्वभूमी तपासून आणि अधिकाधिक तपासण्याकरूनच लोकांना सामावून घेतले जाते. सिरीयन रेफ्युजी किंवा कोणाही रेफ्युजीला सरसकट बोटं दाखवण्यापूर्वी कृपया १०० वेळा विचार करा. अमेरिकेच्या शेजारच्या लोकशाही देशांत एका वर्षांत २५,००० सिरीयन रेफ्युजीना स्थलांतरीत करू या आश्वासनावर जुनं सरकार पाडून नवीन सरकार निवडून आलं. अमेरिकन लोकं नक्कीच विचार करतील. प्रत्येक स्थलांतरीताला भूतकाळ आहे, विचार करा.

३. वर अनेकांनी म्हटलंय तसच, इथे (अमेरिकेत) प्रत्येक जण (नेटिव्ह इंडियन, अ‍ॅबॉर्जीनल, मेटी, फर्स्ट सिटीझन सोडून) हा स्थलांतरीत आहे. आणि एकूणच या जगात कोण मूलवासी आणि कोण स्थलांतरीत हा फारच गंमतीशीर प्रश्न आहे.

४. गुन्हेगारी/ बलात्कार स्थलांतरितांमुळे होतात? नक्की?

५.आपल्याच तत्वज्ञानात कुठलंच काम हलकं नसतं असं सांगितलंय ना? बरं आणि स्थलांतरीत हलकी सलाकी कामे करायला घेत नाहीत. ते कामे करायला घेतात जेणेकरून अर्थव्यवस्था चालू राहील.

६.दुसऱ्या माणसाला सामावून घेणारी, त्याला समान अधिकार देणारी, संपूर्णपणे मुक्त जीवन जगू देणारी (घर घ्या, लग्न करा, मुलं जन्माला घाला, निवडणुकीला उभे रहा, मतदान करून तुम्हाला हवा तो प्रतिनिधी निवडून आणा, कायदे करा, बदलावेसे वाटत असतील तर बदला किंवा काहीही करू नका) सिस्टीम चांगली की अरब राष्ट्रांप्रमाणे बंधने घालणारी? यावर ही वाद व्हावा हे डेंजर आहे.

७. कुणाला मूळ संस्कृती पासून दूर जायचं असेल तर माणूस महत्त्वाचा का संस्कृतीची जोखडं? यातून मूळ संस्कृती टिकवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मग भारंभार मुलांना जन्माला घालणे ओघाने आलेच. जन्माला घालाच हा आग्रह होईल, मी कम्प्युटर कोडींग करतो म्हणून माझ्या मुलाने तेच करावे. हीच संस्कृती होईल.... हे जास्त एक्स्ट्रापोलेट केलं की भविष्यकाळ आणखीच अंधकारमय दिसू लागेल.

फ्रीडम - स्वातंत्र्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं.

>>नवीन देशात कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी खरेद्दी करणे अथवा तिथे सेटल होणे /तिथल्या मुलीशी लग्न करणे अजिबात शक्य असणार नाही. स्थलान्तरित देशात जन्माला येणार्या मुलांस कोणतेही प्रिव्हिलिजेस असणार नाहीत. त्यान्ची नागरिकता मूळ देशाचीच असेल .<<

ग्लोबलायझेशनची चाकं उलटी फिरायला लागली आहेत हे ऐकलं होतं पण हा विचार क्रांतिकारी आहे. इट इवन ट्रंप्स (नो पन इंटेंडेड) "थिंक ग्लोबल, अ‍ॅक्ट लोकल" पॅराडाय्म... Happy

छान लेख स्वामीजी

आपली अनुमति असेल तर इतरत्र शेअर करू शकतो का हा लेख ? आपल्या नावासहित ?

आगाऊ धन्य्वाद !

उत्तम विषय

डकोटा हे कट्टर दक्षिणपन्थी विचारान्च्या लोकान्चे कन्ट्रीसाइड आहे. आपण डकोटात रहात असल्याने तिथल्या नेटिव्ह क्रिश्चन विचारसरणीचे प्रतिबिम्ब दिसते आपल्या लेखात . असो \\

डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हावेत यास अनुमोदन

भिडे महोदय , मी डकोटाचा रहिवासी नाही. सध्या काही महत्त्वाच्या कामानिमित्त येथे वास्तव्य आहे. आणि हे विचार माझ्या स्वतःच्या विचार-मन्थनातून आलेले आहेत ....

असो

खटोलासाहेब आपण शेअर करु शकता ... आभार .

स्वामी,
अहो दरवर्षी येणार्‍या १+ मिलियन लीगल ईमिग्रंट्स पैकी कामं करायला येण्यार्‍यांची संख्या १००के ही नाहीये. अमेरिकन विसासाठी रांग जशी भारतात दिसते तशी ईतर देशांत तुम्ही बघितली आहे का? ही रांग अमेरिकन लोकांनी तयार केली की भारतीयांनी? ती अमेरिकेत दिसते की भारतात?
पूर्वी अश्याच आपापल्या देशात संधी नाकारल्या गेलेल्या हुशार लोकांनी एकत्रं येत अमेरिका देश बनवला. मग सर्वांना सामावून घेत प्रगती साधणे असा जर त्यांचा हेतू असेल तर तो हेतू ऊदात्त म्हणावा की कोता?
तुम्हाला रांगेत ऊभे राहून विसा घेणे भीक मागण्यासारखे वाटते मग भारतीय सरकार काय भारतीय विसा मागितल्यावर शाल-श्रीफळ देवून सत्कार करत विसा घरपोच देते की काय? Uhoh अमेरिकना एम्बसीने आता निदान शेड, मोठी एम्बसी, दहा-बारा काऊंटर्स अशी चांगली फॅसिलीटी बनवली आहे. जानेवारी मध्ये न्यू-यॉर्कच्या भारतीय एम्बसी मध्ये सकाळी आठ वाजता जावून बघा, शुन्याखाली तापमानात कुडकुडत ऊभ्या भारतीयांची रांग दिसेल दोन ब्लॉक लांब आणि आत गेल्या वर ऑफिसर लोकांचे वेतागलेले चेहरे.
साध्या ड्रायविंग लायसन्ससाठी तुम्हा आम्हाला भारतात आरटीओ ऑफिसरची मनमानी नाही सहन करावी लागत?
विचार मंथन करूयात म्हणता आणि सिलेक्टिव पोस्टस ना ऊत्तर देवून शांत बसता हे कसे?

अमेरिका रांगेबाबत एकदम ईंडीफरंट आहे. अमेरिकन नागरिकांना अमेरिकन पासपोर्ट घ्यायलाही भल्यापहाटे तासंतास रांगेत उभे राहावे लागते असं ऐकून आहे Proud
विचार मंथन करूयात म्हणता आणि सिलेक्टिव पोस्टस ना ऊत्तर देवून शांत बसता हे कसे? >> +१

धनि Happy

विकास / समृद्धी: कितीही पटो वा ना पटो, समाजाच्या विकासाचा, समृद्धीचा पाया हा अर्थशास्त्रावरच अवलंबुन आहे. हे सत्य, 'अर्थस्य पुरूषो दासः' म्हणणार्या द्रोणाचार्यांपासून, चाणक्यापासून, कार्ल मार्क्सपासून ते रघुराम राजन पर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहेच आणी आपल्याला ते पटलं, रुचलं वा कळलं किंवा नाही तरी वस्तुस्थिती बदलत नाही.

ग्लोबलायझेशन - स्थलांतरः हा मुद्दा सुद्धा गेल्या शतकातला आहे असं म्हणणं गैर आहे. युरोपातल्या मध्ययुगीन लढाया - १४५३ मधे झालेला कॉन्स्टंटिनोपल चा पाडाव - त्यानंतर चे अफ्रिकेला वळसा घालून किंवा पश्चिमेकडून युरोपातून आशियात येण्याच्या धाडसी मोहीमा ही सगळी ग्लोबलायझेशन - ईमिग्रेशन - स्थलांतर ह्याचीच वेगवेगळी रूपं आहेत. विस्तारत, प्रगत होत जाणं ही निसर्गातल्या प्रत्येक जीवाची नैसर्गिक प्रेरणा आणी स्थायीभाव आहे. ह्यालाच योगी अरविंदांनी 'विस्तारत जाणार्या जाणीवांची वर्तुळं' म्हटलय. ह्या प्रक्रियेत संघर्ष अनिवार्य आहे.

प्रत्येक जीव हा स्वतंत्र च जन्माला येत असतो आणी स्वातंत्र्य हा हक्क आहे - प्रिव्हीलेज नाही. त्यावर गदा आणणं हा मानवतेचा गुन्हा आहे.

"अमेरिकन नागरिकांना अमेरिकन पासपोर्ट घ्यायलाही भल्यापहाटे तासंतास रांगेत उभे राहावे लागते असं ऐकून आहे " - नाही. अमेरिकन पासपोर्ट मिळवणं खुप सोपं आहे. नागरिक नसाल तर तिथपर्यंत पोहोचणं ही मोठी प्रक्रिया आहे.

"भारतीय सरकार काय भारतीय विसा मागितल्यावर शाल-श्रीफळ देवून सत्कार करत विसा घरपोच देते की काय?" - भारतीय एंबसी /सीकेजीएस हा वेगळा विषय आहे, पण प्रचंड किचकट प्रक्रिया आहे.

भारतीय एंबसी आणि एंबसीमधल्या लोकांचं वागणं हा वेगळा विषय आहे असं म्हणा. एंबसीच्या पायर्‍या चढल्याबद्दल पश्चाताप करायला लावतात. 'शहाण्याने भारतीय एंबसीची पायरी चढू नये' अशीही म्हण तयार होईल बहुतेक.

माझ्या मते स्थलांतर ही अडचण नाही, मोठया संख्येने होणारे स्थलांतर हे विरोधाचे मुख्य कारण आहे.
जेव्हा महायुद्धानंतर मोठी स्थलांतरे झाली, तेव्हा मनुष्यबळाची कमतरता आणि विपुल साधनसंपत्ती या कारणास्तव अशा स्थलांतरांना फारसा विरोध झाला नाही. आता परिस्थिती एकदम विरुद्ध आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालाय, आयुष्यमान वाढले पण कार्यक्षमता तितकीच राहिली त्यामुळे साधनसंपत्तीवर झपाट्याने ताण येतोय. अन रोजगाराचे म्हणाल, तर तंत्रज्ञानाचा झपाटा इतका मोठा आहे की ज्या वेगाने रोजगार निर्मिती होते आहे, त्याच्या दुप्पट वेगाने ती कमी होतेय.

अशा परिस्थितीत आज ना उद्या प्रत्येक देशाने स्थलांतराविरोधाची भूमिका घेतल्यास नवल नाही.

पश्चिमेतील काही व्यापारी कम्पन्यांच्या डोक्यातून निघालेले हे ग्लोबलायझेशन चे खूळ ! >>> अमेरिकेतील इल्लिगल इमिग्रेशन चा व्यापारी कंपन्यांशी काहीच संबंध नाही. कंपन्यांनी 'बोलावलेले' लोक म्हणजे फक्त एच-१ बी किंवा बी-१ व्हिसा वाले. ते 'लीगल' इमिग्रण्ट्स आहेत, आणि फार तर ८-१० लाख दरवर्षी असतील, आणि त्यातले अर्धेअधिक परतही जातात. साधारण एक कोटी इल्लिगल आहेत - बॉर्डर क्रॉस करून येणारे मेक्सिकन्स व साउथ अमेरिकन्स, व्हिसा वर येउन मुदत संपल्यावर मग परत न जाणारे विविध देशातील लोक असेच जास्त आहेत. त्यांचा व्यापारी कंपन्यांशी काहीच संबंध नाही.

उलट व्यापारी कंपन्यांमुळे अमेरिकेन उद्योग परदेशात ऑफिसेस, बीपीओ वगैरे उघडत आहेत.

इत्यलम !
सर्वाधिकार सुरक्षित
स्वामी विश्वरूपानंद
दि. २७-जुलै-२०१६
दक्षिण डकोटा गणराज्य

अमेरिकेची संयुक्त संस्थाने >>>>>>>>>>>>

साहेब तुम्ही परत या..!!

Pages