'इजाजत' ....भावबंधाच्या दृकश्राव्य शब्दकळा...

Submitted by अजातशत्रू on 23 July, 2016 - 00:17

इजाजत........
बाहेर रोमँटिक पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर, जिथे रेखा, नसिरुद्दीन त्या गदगदून आलेल्या, घनगर्द असलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत.
एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात.
मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन काही जुन्या खपल्या देखील निघाल्यात.
त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....
रात्रभर तो तिच्या कडे बघत बोलत राहतो मात्र ती अधून मधून नजर चुकवत राहते.
त्याला खरे तर माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये.
तिलाही आठवत्येय की सुरुवातीला आपण किती सुखी होतो मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा हे तिला उलगडलेले नाही.

रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय अन मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय,
निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खंडबडीत दगडी भिंती रात्रभर त्या दोघांना ऐकून सुन्न होऊन गेल्या आहेत,
ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसलया आहेत तर पहाटेच्या गारव्याला त्यांना जवळ आणायचे आहे.
मात्र ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र यांचा अबोला भावतो आहे. तो स्थितप्रज्ञ होऊन दोघांना आपल्या कवेत घेऊन बसला आहे.
तिथल्या हेडलॅम्पला या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.
तो हळूहळू गुलाबाची एकेक पाकळी अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तिच्या पुढ्यात मांडतोय,

ती ऐकता ऐकता आतूनच धुमसून निघत्येय, आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.
तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते ? तो तसं का वागला होता ?
त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे.
तो जीवापाड प्रयत्न करतोय,
त्याच्या चेहऱयाकडे बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून पाहतायत अन दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय !
ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तो तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित करतोय.

आता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. झालं गेलं विसरून जा अन माझ्याकडे परत ये इतकंच सांगायचे बाकी राहिल्येय असं सांगायचेच बाकी आहे.
रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडाच्या पालवीला आत जाग आलीय अन वाऱ्याचा रात्रीचा सूर देखील बदललाय.
तो मनाचा हिय्या करून आता बोलणारच आहे इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना घेऊन "तो' येतो, हा तिचा सध्याचा पती !
त्याचे शब्द गळ्यातच विरतात अन अश्रू डोळ्यात कोमेजून जातात.
तिचे रात्रभर दोलायमान झालेलं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं.
तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत तो रडवेला होऊन जातो.

त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली,त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प., तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय.
सारेच हिरमुसले आहेत.
मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालो आहे.

आता पाऊस पूर्ण थांबला आहे...
प्रसन्न सकाळ झालीय अन आकाश निरभ्र झालेय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात मी व्हिक्टरीचे 'व्ही' शोधत शीळ घालत निघतोय....

जीवन असेच आहे एका हातात काही तरी आलेय म्हणेपर्यन्त दुसऱया हातातले काही तरी गळून पडलेले असते. साऱ्यांना सारे मिळत नसते, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिले की दुःखाचाही सुखाइतकाच आनंद घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर हळुवारपणे जीवनातील नात्यांचा उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे ..
मनात खोल खोल रुतून बसणारी अन उत्तुंग अभिनयाने सजलेली, नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे...
मी जेंव्हा जेंव्हा इजाजत पाहतो, नात्यांचे अर्थ नव्याने शिंकतो ...

जीवनातील आनंद आणि सुखदुःखाच्या व्याख्या नव्याने सांगणारया, आशयघन चित्रपट दाखवणारया रुपेरी पडद्यास 'नम आँखोका आँसूभरा' सलाम .....

- समीर गायकवाड.

ब्लॉगवर भेटणार ?....या ब्लॉगपत्त्यावर मी भेटेन ...तोवर इजाजत असावी ..
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_44.html

ijaazat2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इजाजत आवडता चित्रपट
म्हणून उत्सुकतेने आलो वाचायला पण
'गदगदून आलेल्या, घनगर्द असलेल्या स्टेशन' पाशीच अडखळलोय....

जरा सावरलो की मग पुढचा लेख वाचेन म्हणतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर हळुवारपणे जीवनातील नात्यांचा उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे ..>>

सुरेख लेख!

गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..
वो भिजवा दो.. मेरा वो सामान लौटा दो..
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...

गुलझार, पंचम. आशा, रेखा, नसीर, अनुराधा..सगळ्यांना सलाम..

छान लेख.. धन्यवाद..

इजाजत वर कित्येकांनी त्यांच्यापरीने लिहल आहे.ह्या सिनेमाला आनि त्यातल्या सगळ्यांनाच ---/\---
तुमचा हा लेख ही आवडला Happy

छान लिहिलय!
इजाजत पहिल्यांदा पाहिला तेव्हा खूपच आवडला होता. गाणी फार सुरेख आहेत. दुसर्‍यांदा पाहिला तेव्हा नाही भावला येवढा. `मासूम' प्रमाणेच यातली नासिरुद्दिन ची व्यक्तीरेखा ही सदोष वाटली. शेवट आवडला.

छान लिहिलंय.
इजाजत आवडला. नेहमी आवडतोच. प्रत्येक प्रसंग, प्रेम, डायलॉग्ज, गाणी, सीनमधली लोकेशन्स वैगेरे सगळं.
फक्त तिचं शेवटचं पायाला हात लावणं झेपत नाही. नेहमीच.

फक्त तिचं शेवटचं पायाला हात लावणं झेपत नाही. > हो हो . खरच. पण तरीही नव्याने आपलं आयुष्य पुढे चालु ठेवते. जोडीदारही चांगला आणि ते नातं ही पारदर्शी वाटतं. हे आवडलं.

मला अनुराधा खूप आवडलेली या सिनेमात. ती का नाही फार पुढे आली देव जाणे!
अगदी स्वरुपसुंदर अभिनेत्रीं मधली एक होती खरं तर!

फार छान लिहिलेय.

या चित्रपटातून मला रेखा नव्याने कळली... आणि आवडायला लागली.

अनुराधा आणि तिचे कॅरॅक्टरही खुप आवडले होते.

चांगलं लिहिलंयत पण हे वाचून थोडं उदास वाटतं, चित्रपट पाहून उदास नाही वाटत. रेखाचं व्यक्तिमत्व खूप शालीन, भारदस्त, मॅच्युअर्ड आहे या चित्रपटात. तिला लग्नाच्या आधीपासून त्या दोघांबद्दल ठाऊक असतं, तरीही ती ते लग्न स्वीकारते आणि निभावण्याचा प्रयत्न करते. पण परिस्थितीच अशी येते की ती दोघांमधे न येताना लांब जायचा निर्णय घेते. दोघांमधे गैरसमज असतील, पण कटुता नसते.

खूप आवडता सिनेमा आहे. लेख पण आवडला.

हिंदी सिनेमात नेहमी सगळा दोष एका पात्राला (बहुतेक वेळा व्हिलन) देऊन आपल्याला कथेपासून अलग होता येते. यात मात्र दोष कोणाकाडेच जात नाही आणि सिनेमा आपली मानगुट सोडत नाही.

ही माझी रिक्षा: http://www.maayboli.com/node/37324

हाय !!!

क्या ब्बात है Happy
इजाजत मधल्या कुठल्या गोष्टी चे कौतुक आपण करावे, आणि कुठली सोडावी असा प्रश्न पडतो..
कथा, पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन गुलजारांचे संगीत पंचम चे आणि चित्रपटातील ४ ही गाण्यांना पार्श्वगायना साठी लाभलेला आवाज आशाताईंचा. पडद्यावर नसीरभाई, रेखा आणि अनुराधा पटेल सगळंच कौतुकास्पद. ह्या सगळयांबरोबर चित्रपटात लक्षात राहतं ते त्याचं चित्रीकरण.....मुळात गुलजार त्यांच्या चित्रपटात फ्लॅशबॅक तंत्राचा सुरेख वापर करतात, आणि इजाजत मधे अशोक मेहेता ह्या वल्ली चा कॅमेरा इतका सुंदर न्याय देतो ना त्या कथेला.. Happy
इजाजत मधील गाणी हा एक स्वतंत्र विषय आहे लेखा चा परंतू मी म्हणीन मुळात इजाजत हा संपूर्ण चित्रपट च एक काव्य आहे.....मुक्तछंदातले, अनेक-विविध रंग आणि पैलू असलेले..