रा.चिं.ढेरे : अखंड नंदादीप - श्रीराम रानडे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

रा.चिं ढेरे परिवाराचे आणि आमचे खूप वर्षापासूनचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध. नुकतेच ढेरेअण्णा गेले. एक हाडाचा संशोधक, एक विचारवंत, एक लेखक आणि एक व्यक्ती म्हणूनही रा.चिं.ढेरे आम्हा सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या पातळ्यांवर स्फूर्तीदायक व्यक्तीमत्व होतं. अण्णा गेले तेव्हा माझे आई-बाबा अमेरीकेत असल्याने त्यांच्या अखेरच्या दर्शनाला, ढेरे परिवाराला भेटायला प्रत्यक्ष जाऊ शकले नाहीत ही खंत आई-बाबांना अस्वस्थ करत असणार. या अस्वस्थतेतच बाबांच्या हातून 'अण्णांना आदरांजली' या भावनेनं उतरलेला हा लेख - अखंड नंदादीप !
---------------------------------------------
माझा मित्र (कै) रमाकांत कवठेकर 'मुरळी' या विषयावर एक लघुपट बनविण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याला मुरळी प्रथेची अस्सल माहिती हवी होती. त्यानं ही माहिती मिळवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. 'मुरळी', लोककला, लोकसंस्कृती या विषयावरचा जाणकार तज्ञ कोण? असा विचार मनात चालू झाल्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला - डेक्कन जिमखान्यावरच्या गुडलक चौकातल्या फूटपाथवर, रद्दीच्या दुकानात जुनी पुस्तकं निवडत उभा असलेला, पायजमा नेहरू शर्ट आणि खांद्यावर शबनम पिशवी अशा एकदम साध्या वेशातला माणूस. रस्त्यावरून माणसांची अखंड जा-ये. पण त्याला त्याचं जराही भान नाही. समाधिस्त योगीच जणू ! मला, मुरळी या विषयावरची अभ्यासपूर्ण माहिती पुरवणारा हा संशोधक, लेखक म्हणजेच डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे उर्फ रा.चिं.ढेरे.

ढेर्‍यांची काही पुस्तके मी वाचलेली होती. 'गधेगाळी' हा शिव्यांच्या उगमाविषयी अत्यंत संयमानं आणि शास्त्रीय विचार पद्धतीनं लिहिलेला लेख वाचून मी प्रभावितही झालो होतो. त्यांच्या कन्येच्या - अरूणाच्या हुजुरपागेच्या वार्षिकामधून आलेल्या काही कविताही माझ्या वाचनात आल्या होत्या. बी. एड. करत असताना माझ्याच वर्गात असलेल्या कृ.पं उर्फ शशिकांत देशपांडे यांचा आणि ढेर्‍यांचा अगदी घरगुती स्नेहसंबंध मला माहित होता. आमचे स्नेही आणि नातलग मोरेश्वर वाळिंबे यांची आणि ढेर्‍यांची विशेष सलगी. या सगळ्या भांडवलावरच मी रा.चिं ढेरे या विद्वानाशी ओळख करून घेण्याचं धाडस करणार होतो. ढेर्‍यांबरोबरच्या पहिल्या भेटीतच मला जाणवलं की हा माणूस अत्यंत मृदू स्वभावाचा आहे. अहंकाराचा लवलेशही याचे ठायी नाही. अनेक दिवसांची ओळख असल्याप्रमाणेच त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्यांच्यापाशी 'मुरळी' या प्रथेविषयी आपल्याकडं काही माहिती असल्यास ती मला हवी आहे याची विचारणा केली. उद्या सकाळी नारायण पेठेतल्या माझ्या खोलीवर या असं त्यांनी सांगितलं . पडत्या फळाची आज्ञा मानून मी त्यांच्याकडे गेलो. ढेरे माझी रस्त्यावरच वाट पहात उभे. तुम्हाला पत्ता सापडेल-न सापडेल म्हणून मीच तुमची वाट पाहत थांबलो, असं ढेरे मला म्हणाले. उंच पायर्‍या चढून आम्ही त्या जुन्या इमारतीत शिरलो. जिन्यावरून ढेर्‍यांच्या खोलीत गेलो आणि माझे डोळेच दिपले. भिंतीला लागून असलेल्या सर्व कपाटात, फडताळात पुस्तकंच पुस्तकं. लिहिण्यासाठी बैठं लाकडी डेस्क. ढेर्‍यांनी डेस्कवरचं एक टिपण माझ्या हाती ठेवलं. अत्यंत सहज सुंदर एकटाकी. कुठेही खाडाखोड न केलेलं ते टिपण म्हणजे 'मुरळी' या प्रथेची माहिती होती. माझा जीव हरखून गेला. लघुपट तयार झाला आणि माझी आणि ढेर्‍यांची ओळख पक्की झाली.

'मनोहर' चे संपादक श्री. भा. महाबळ आणि माझी चांगलीच मैत्री. ते माझे मामा पण समवयस्क असल्यामुळं दोस्तीच अधिक. माझी लेखनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला दर महिन्याला 'मनोहर'मधे सदर लिहायला सांगितलं. 'लेखक आपल्या घरी' हे त्या सदराचं नाव. रा.चिं. ढेरे यांच्या मुलाखतीनं मी सदराची सुरुवात केली. एव्हाना मी ढेर्‍यांना 'अण्णा' नावानं संबोधायला सुरुवात केली होती. आपलं शनिवार पेठेतील बिर्‍हाड आवरून अण्णा तुळशीबागवाले कॉलनीतील 'विदिशा' या आपल्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेले होते. मुलाखतीच्या निमित्तानं अवघ्या ढेरे परिवाराशीच स्नेह जुळला.

अण्णांनाही माझ्याबद्द्ल बरीच माहिती होती. 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण' ही नाटकं त्यांनी बघितलेली होती. 'महानिर्वाण - एक विरुपिका' हा त्यांचा दीर्घलेखही प्रसिद्ध झाला होता. 'महानिर्वाण' या मराठी ब्लॅक कॉमेडीवर सर्वांगाने प्रकाश टाकणारा असाच हा लेख आहे . मिरजेच्या वसंतव्याख्यानमालेचे वसंतराव आगाशे आणि माझे दत्तक गेलेले ज्येष्ठ बंधू पंडितराव खाडिलकर यांच्याशीही त्यांचा उत्तम स्न्हेह होता. या सर्व पार्श्वभूमीवर ढेरे यांच्या घरी त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं झालेला प्रवेश ही माझ्यादृष्टीने शुभघटनाच होती. ढेरे आणि त्यांचा सर्वच परिवार आमच्या मुलाखतीमधे सामील झाला. अण्णांनी त्यांच्या जीवनाचा पटच माझ्यासमोर उलगडून दाखवला -

पुणे परिसरातील अंदरमावळ भागात ढेर्‍यांचा जन्म झाला. एक धाकटी बहीण. लहानपणीच मातापित्याचं छत्र हरपलं. घरची अत्यंत गरीबी. आजी आणि मामानी या दोघा भावंडांची जबाबदारी स्वीकारली. पोट भरण्यासाठी आणि विद्या शिकण्यासाठी ढेरे पुण्यात आले. लहानपणी पडतील ती कामं केली. चार पैसे कमवत असतानाच विद्यादेवीची आराधना अखंड सुरु होती. रात्रप्रशाला, प्रेसमध्ये कंपोझिटर, सवड मिळेल तेव्हा वाचन, कंपोझिंगला आलेल्या मजकूराचे नुसतेच खिळे जुळवणं नाहीतर त्या मजकूराचं वाचन करणं, त्यांतल्या चांगल्या वाईटाची पारख करणं हा छंद त्यांना लागला. यातूनच त्यांची अभ्यासाची गोडी वाढली. कळत नकळत त्यांच्यातला लेखक प्रगट होत होता. रात्रप्रशालेमधूनच ढेरे मॅट्रीक झाले पण तिथेच थांबले नाहीत. महाविद्यालयीन शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी आपलं शिक्षण सुरुच ठेवलं. नोकरी, लिखाण, अखंड वाचन आणि शिक्षण असा कार्यक्रम.

या तरूण मुलाची बौद्धिक क्षमता, कामावरील निष्ठा, संशोधनाची चिकाटी आणि विद्यार्जनाची उर्मी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी अचूक हेरली आणि 'कृष्णदयार्णव' या संशोधनपर ग्रंथासाठी त्यांनी इंद्रायणी प्रकाशनाचे श्री. कोपर्डेकर यांचेकडे ढेर्‍यांची शिफारस केली. ढेर्‍यांनी ते काम इतक्या चोखपणे केलं की संशोधन क्षेत्राची दारं त्यांच्यासाठी खुली झाली. चरितार्थाचा प्रश्न होताच. त्यातच कवी प्रवृत्तीचा हा लेखक इंदूमती कुलकर्णी या मुलीच्या प्रेमात पडला. मुलीच्या घरचा प्रचंड विरोध. पण तो सारा विरोध सहन करुन रामाची ही सीता ढेर्‍यांशी लगीनगाठ बांधून वनवासला तयार झाली. ढेर्‍यांच्या प्रत्येक सुखदु:खाच्या प्रसंगी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. गृहीणी, सखी, सचिव हे सुभाषित इंदूताईंच्या बाबतीत एकशे एक टक्के सत्य आहे.

आता ढेर्‍यांचा लेखक म्हणून लौकिक वाढू लागला. संशोधनपर लेखन असूनही त्यांची ललित भाषा वाचकांना भुरळ पाडू लागली. रुक्षता, जडजंबाल वाक्यरचना या सार्‍यांना फाटा देऊन ढेरे अत्यंत मूलगामी संशोधनपर लेखन करु लागले तेव्हा लेखक आणि वाचक यातील अंतर कमी होऊ लागले. त्यांच्या पुस्तकांची मागणी वाढली. प्रकाशक आता ढेर्‍यांकडे लिखाणाची विनंती करू लागले. वास्तविक पैशाची आत्यंतिक गरज असूनही ढेर्‍यांनी मागणी तसा पुरवठा हे तत्त्व स्वीकारले नाही. विषयाचे पूर्ण आकलन, मनन, चिंतन झाल्यावरच त्यांनी लेखणी कागदावर टेकवली. प्रकाशित झालेले ढेर्‍यांचे अनेक लेख, अनेक पुस्तके आवर्जुन बघा - तळटीपा आणि ग्रंथसूचींनी ती समृद्ध झाली आहेत. आपण ज्या वर्गात शिकत आहोत त्याच वर्गाला आपणच लिहिलेले पाठ्यपुस्तक अभ्यासण्याचं अनोखं भाग्य किती लेखकांना लाभलं असेल? अण्णा ढेरे त्या दुर्मिळ लेखकांपैकी एक आहेत.

ढेर्‍यांची लिहिण्याची खोली 'राजेशाही' थाटाचीच होती. दीड खोलीचा संसार. स्वयंपाकघर, माजघर, दिवाणखाना सारं एकत्रच. वाड्यात बिर्‍हाडकरुंची लगबग. शांतता अजिबात नाही. अश्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात रामचंद्र चिंतामण ढेरे हा लेखक मांडीवर पाट ठेवून अत्यंत एकाग्रतेने आपली लेखनसमाधी लावीत असे. आणि लेखन साधेसुधे नाही तर मूलभूत संशोधनपर. आता आकाशवाणीवरही त्यांच्या लेखनाची शिफारस होऊ लागली. पण भाषण कागदावर उतरावयाला ढेर्‍यांच्यापाशी ना निवांत जागा ना निवांत वेळ. डोक्यात विषय रटारटा शिजत असायचा. अशावेळी ढेरे कागद, लेखणी घेऊनच जंगलीमहाराज देवळाजवळील पाताळेश्वर मंदिरात जायचे. आकाशवाणीवरील भाषणाचा मजकूर एकटाकी लिहायचे आणि तसेच तडक आकाशवाणीवर ध्वनिमुद्रणासाठी हजर. रेकॉर्डींगच्या वेळेचं , लाल दिव्याचं भान ढेर्‍यांच्याबाबत कधी चुकलं नाही. योग्य, अचूक, वेळेवर सुरु होणारं आणि वेळेतच संपणारं संशोधनपर ललितरम्य निवेदन ! श्रोते ढेर्‍यांची आकाशभाषणे ऐकायला उत्सुक असायचे.

दोन भिन्न क्षेत्रातील 'बेडेकरांनी' ढेर्‍यांचा केलेला गौरव हा एक विलक्षण प्रकार. ढेरे आपली प्रसिद्ध झालेली काही पुस्तके घेऊन मालतीबाई बेडेकरांना भेटायला गेले. दार बंद होतं. ढेर्‍यांनी दारावरची बेल वाजवली. दार उघडलं. दारात विश्राम बेडेकर उभे. 'काय काम आहे?' बेडेकरांचा खडा सवाल. ही पुस्तके मालतीबाईंना द्यायची आहेत. ढेर्‍यांचं उत्तर. 'द्या ती माझ्याकडं, त्या बाहेर गेल्या आहेत. आल्या की त्यांना देतो'. हा सगळा संवाद दारातच. ढेरे पुस्तकं देऊन थोड्या खट्टू मनानंच घरी परतले. आणि अहो आश्चर्यंम ! काही दिवसातच दस्तुरखुद्द विश्राम बेडेकरच पत्ता शोधत शोधत ढेर्‍यांच्या शनिवार पेठेतील बिर्‍हाडी अकस्मात हजर. बरोबर एक हजार रूपयांचा चेक. घडलं होतं असं की ढेर्‍यांनी दिलेली पुस्तकं बेडेकरांनी सहज म्हणून नुसती चाळायला घेतली आणि त्यात ते बुडूनच गेले. बेडेकर म्हणजे मनस्वी व्यक्तिमत्त्व ! एखादी गोष्ट मनाला भिडली म्हणजे त्याचं कौतुक करणार. ढेर्‍यांच्या पाठीवर विश्राम बेडेक्रांसारख्या बुजुर्गाची कौतुकानं थाप पडली ती अशी रसरसून !

दुसरा बेडेकरी मसालाही असाच खमंग आणि रसदार आहे. नारायण पेठ पोलीस चौकीशेजारी अण्णा बेडेकरांचं चहा, मिसळ, पावभाजीचं छोटसं हॉटेल. ढेरे कंपोझिटरचं काम करायचे तेव्हा या हॉटेलात चहापाण्यासाठी जायचे. त्यातूनच या दोन अण्णांचं मैत्र जमलं. पुढं ढेर्‍यांना डॉक्टरेट मिळाली. अण्णा बेडेकरांनी ढेर्‍यांना आपल्या हॉटेलवर बोलावलं. ढेर्‍यांच्या गळ्यात भलामोठा पुष्पहार घातला, पुष्पगुच्छ आणि पेढ्याचा पुडा हातात ठेवला. दोन अण्णांची कडकडून गळाभेट झाली. अनेक ठिकाणी झालेल्या जाहीर सत्काराहूनही हा सत्कार अपूर्व असाच होता.

मुलाखतीच्या निमित्तानं ढेरे परिवारात माझा चंचूप्रवेश झाला आणि काही काळातच मी त्यांच्या घरचाच होऊन गेलो. कृ. पं. देशपांडे, मी, माझी पत्नी सौ संजीवनी त्यांच्या घरी आवर्जून जायचो आणि पुढचे तीन-चार तास ढेर्‍यांच्या ज्ञानगंगेत मनसोक्त सुस्नात व्हायचो. ढेर्‍यांच्या वरच्या खोलीत केवढी ग्रंथसंपदा. जुन्या पोथ्यांची बाडं. हस्तलिखितं. ग्रंथवैभव म्हणजे काय हे ज्याला पुस्तकांचं वेड असेल त्यांनाच उमजेल - बाकीच्यांच्या लेखी केवळ कागदी पसारा. यातलं पुस्तक अन् पुस्तक ढेर्‍यांनी फक्त वाचलेलंच नाही तर सखोल अभ्यासलेलं. बोलता बोलता काही संदर्भ हवा असला की अण्णा बसलेल्या खुर्चीवरून न उठता सांगायचे त्या कपाटातल्या वरून दुसर्‍या कप्यातलं ते पुस्तक काढा. हे पान उघडा आणि वाचा - संदर्भ अचूक आणि तात्काळ मिळणार म्हणजे मिळणारच!

पण हे सारं भांडार सांभाळताना वहिनींची आणि अण्णांच्या धाकट्या बहीणीची माईंची मात्र पुरती दमछाक व्हायची. ही पुस्तकं काळजीपूर्वक सांभाळणं, त्यांना कसर लागू नये म्हणून वेखंडाची पूड घालणं, त्यांना ऊन दाखविणं या सगळ्या उसाभरी करता करता त्यांच्या कमरेचा काटा ढिला व्हायचा. पण अण्णांची संशोधक, लेखक म्हणून असलेली उंची त्या पुरेपूर जाणून असल्यामुळं त्यांनी अत्यंत आवडीचं काम म्हणूनच याचा स्वीकार केला होता. अण्णांचं पुस्तक संग्रहाचं वेड तर अफलातूनच. काही घरगुती वस्तू खरेदी करायला बाहेर पडलेले अण्णा परत यायचे जुन्या दुर्मिळ पुस्तकांचा गठ्ठाच्या गठ्ठाच काखोटीला मारून. तिखट, मीठ, धान्य, भाजी, गहू - तांदूळ, रॉकेल या रोजच्या रोज संसाराला आवश्यक असणार्‍या गोष्टी अधिक गरजेच्या असतात हे त्यांच्या गावीही नसायचं. असं हे अण्णांच पुस्तकाचं वेड आणि त्यांच्या संग्रही असलेलं ज्ञानभांडार !

एकवीस जुलै हा अण्णांचा जन्मदिवस! त्यांच्या आबालवृद्ध, शिक्षित, अशिक्षित चाहत्यांसाठी ही आनंद पर्वणीच! सकाळपासूनच अण्णांच्या 'विदिशा' या निवासस्थानी चाहत्यांची गर्दी दाटायची. लेखक, राजकारणी, संशोधक, मित्र, चाहते, ओळखीचे, अनोळखी सार्‍यांची मांदियाळी! तो एक अपूर्व स्नेहमेळावा असतो. मग काही वेळा अण्णांच्या नवीन पुस्तकाचा घरगुती प्रकाशन सोहळा तर कधी ब्रेल लिपीतील त्यांच्या किंवा त्यांच्या मुलींच्या पुस्तकाचे वाचन. चिरंजीव मिलिंद आणि त्याचे सहकारी आपल्या कॅमेर्‍यामधे ही सारी दृश्ये टिपून घेताहेत. या सगळ्या सोहळ्यात कुठं भपका नाही. साधं, सोज्ज्वळ, निखळ, आनंदी वातावरण. मी आणि माझ्या सौभाग्यवती संजीवनीनं असे अण्णांचे अनेक वाढदिवस बघितले आहेत. नम्रपणे अण्णांच्या पायावर डोकं ठेवू जाताच ते बळेबळे उठवायचे आणि प्रेमाने छातीशी धरायचे. आम्हाला धन्य धन्य वाटायचं. एखाद्या वाढदिवशी पुण्यात नसलो तर आवर्जून फोन केला जायचा, अगदी मुलींकडे परदेशी अमेरिकेत असलो तरी आणि धेरे परिवाराकडून तितकाच स्नेहाळ प्रतिसाद.

नटवर्य चंद्रकांत गोखले परिवाराचा आणि आमचा घरोब्याचा जिव्हाळा. एका समारंभात चंद्रकांत गोखल्यांना एक छानशी पुणेरी पगडी भेट म्हणून मिळाली. एके दिवशी ती त्यांनी माझ्याकडे आणून दिली आणि म्हणाले - मी अशिक्षित माणूस. 'श्रीगणे' एवढ्या तीन अक्षरात माझं शिक्षण आटपलं. मी ही पगडी डोक्यावर मिरवून काय करू? रानडे, ही माझी तुम्हाला भेट. मी गांगरलोच, पण त्यांच्याकडून पगडी घेतली आणि त्यांना सांगितलं - बाबा, तुम्ही रंगभूमीवरचे आणि चित्रपटातले नटवर्य आहात. मी ही पगडी अश्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर चढवेन की जो साहित्यप्रांतातली दिग्गजच असेल. काही महिन्यातच एकवीस जुलै - अण्णांचा वाढदिवस आला आणि मला त्या पगडीची आठवण झाली. त्यादिवशी मी ती पगडी अण्णांच्या मस्तकी चढवली आणि सांगितलं - "नटवर्य चंद्रकांत गोखल्यांची ही पगडी साहित्यसंशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या मस्तकावर चढवताना मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. माझ्यासाठी त्या पगडीला योग्य न्याय मिळाला".

माणूस एकदा आपला म्हटलं म्हणजे त्याच्या बारीक-सारीक हिताचीही काळजी कशी घ्यायची हे अण्णांच्याकडून शिकावं. अशीच एका वाढदिवसाची गोष्ट. आम्ही उभयता त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी बरीच मंडळी अण्णांना भेटून गेली होती. हॉलमधे तीन-चार जण होते, त्यांच्याशी अण्णांनी माझी ओळख करून दिली. त्यातील एका व्यक्तीनं अगदी आवर्जून माझं नाव, पत्ता, फोन नंबर टिपून घेतला. आपण कोणीतरी विशेष आहोत हा विचार उगाचच मनात चमकून गेला. गप्पा पुढे सुरू झाल्या. काही वेळाने ती मंडळी गेली. नवीन आली. सर्व ढेरे परिवाराचा निरोप घेऊन मी जिना उतरून बंगल्याच्या फाटकापाशी आलो. माझ्यामागोमाग स्वतः अण्णा घाईघाईने आले. अहो अण्णा! तुम्ही कशाला आलात? वर माणसं आहेत ना? मला अधिक बोलू न देता अण्णा म्हणाले - तुम्हाला सावध करायला. मघाशी तुमचं नाव पत्ता मागणार्‍या माणसापासून सावध करायला. माणूस विद्वान आहे पण लोकांचे घरी जाऊन पैसे मागण्याची त्यांना सवय आहे. देणार असाल तर फार मोठी रक्कम देऊ नका. आणि एकदा दिलेली रक्कम परत मिळण्याची आशाही बाळगू नका. आणि खरोखरच आठ-दहा दिवसांनी त्या गृहस्थांचा फोन आलाच. थातुर-मातुर उत्तरं देऊन मी त्यांची भेट कटाक्षानं टाळली. अण्णांचा होरा एकदम खरा ठरला होता.

माझे ज्येष्ठ बंधू पंडितराव खाडिलकर यांचे अकाली निधन झाले. त्यांची साहित्य, संगीत, समाजसेवा, राजकारण, या विविध विषयातील उत्कट आवड लक्षात घेऊन प्रतिवर्षी आम्ही रानडे परिवारानं काही रक्कम वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्याची योजना केली. अण्णांचा आणि पंडितरावांचा स्नेह लक्षात घेता ही रक्कम अण्णांना द्यावी असं मनात आले. आम्ही अण्णांना आमचा हेतू सांगितला. अण्णांनी मान्यता दिली आणि मोठ्या मनानं आमचा अत्यंत अल्प रकमेचा धनादेश लाखाचा धनादेश असल्याप्रमाणं स्वीकारला.

अण्णा स्वतः उत्तम वक्ते होते, पण उठ -सूठ व्याख्याने दिली नाहीत. त्यांचा तो वेळ संशोधन कार्यात आणि लिखाणात व्यतीत करीत. त्याचप्रमाणे विरोधकांना उत्तरे देणं, प्रतिवाद निर्माण करणं यात त्यांना बिलकुल रस नव्हता. मी माझा सिद्धान्त ठोस पुराव्यानिशी मांडला आहे. काही काळानंतर यात काही वेगळेपण सांगणारा पुरावा माझे हाती आला तर माझे मीच पूर्वीचे लिखाण रद्द करेन. आजच त्यावर वादविवाद कशाला? टीका करणार्‍यांना खुशाल टीका करू द्यात, ह्या मताचे अण्णा होते.

आमच्या परिवारातील ज्येष्ठ मित्र आणि मिरजेच्या खरे मंदिर आणि वसंत व्याख्यानमालेचे अध्वर्यू श्री. वसंतराव आगाशे यांचं पुण्यात ५ मार्च २०११ रोजी निधन झालं. अण्णांचा आणि त्यांचा गाढ स्नेह. अण्णांनी आपलं एक पुस्तक वसंतरावांनाच अर्पण केलं आहे. वसंतरावांच्या प्रेमळ आग्रहाखातरच अण्णा मिरजेच्या वसंतव्याख्यानमालेत हजेरी लावत. व्याख्यान तर उत्तम होईच पण व्याख्यानाच्या मानधनापोटी दिलेल्या रकमेत स्वतःची भर टाकून ती सर्व रक्कम वसंतरावांच्या हाती संस्थेच्या कामासाठी देत. इतकी आपुलकी, इतका जिव्हाळा. वसंतराव जाण्याच्या आधीच्या दिवशी अरूणा आणि मिलिंद त्यांना भेटून आले होते इतका ढेरे परिवाराशी आगाशे कुटुंबाचा गाढ संबंध. वसंतरावांच्या निधनानंतर त्यांच्या लेखांचे पुस्तक करण्याची जबाबदारी माझ्या 'भारद्वाज प्रकाशन' वर सोपविण्यात आली. 'स्मरण साखळी' पुस्तक तयार होत आले. वसंतरावांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना कुणाची घ्यायची? - अर्थात अण्णांची. अण्णांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती. पण आमचे आणि अण्णांचेही जवळचे मित्र कै. शिरूभाऊ सहस्रबुद्धे यांनी अण्णांना गळ घातलीच आणि अण्णांनीही प्रकृतीची अजिबात तमा न बाळगता छोटेसे प्रास्ताविक लिहिले. . आपल्या लेखात अण्णा लिहतात - 'मी स्वतः अंथरूणावरून उठूही शकत नसल्यामुळे त्यांची अखेरची भेट घेऊ शकलो नाही आणि अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. या विपरीत परिस्थितीची खंत मला आयुष्यभर बोचत राहील. त्यांच्या लेखसंग्रहासाठी हे प्रास्ताविक चार शब्द लिहिताना, मला बोटात लेखणीही धरवत नाही, एवढ्या शारीरिक यातना मी सहन करीत आहे, ते अशासाठी की, वसंतरावांविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून देता येईल." अण्णांचं हे छोटसंप्रास्ताविक म्हणजे स्नेह, मैत्र कसं जपावं याचा आदर्श नमुनाच आहे.

काही वर्षांपूर्वी मी पुणे लोकसत्तामधे नाट्यविषयक लेख लिहित होतो. माझे ते लेख अण्णा आवर्जून वाचायचे आणि अभिप्राय कळवायचे. वासुदेवशास्त्री खरे यांच्याविषयीचा लेख वाचून- रामभाऊ, लेख चांगला उतरला आहे. अधिक लिहीत चला. पुस्तक तयार होईल असा निरोप अण्णांनी मला पाठवला. माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. अधिक इर्षेने लिहू लागलो. वर्षभर लेखमाला सुरू होती.

गेल्या काही वर्षात मात्र ढेरे परिवाराला आजारांनी, अपघातांनी भंडावून सोडलं होतं. अण्णांना अर्धांगवायूचा झटका आला. डॉ. सदानंद बोरसेंच्या हॉस्पिटलमधे उपचार सुरू होते. ती काळजी असतानाच सौ. वहिनींचं आणि श्रीमती माईंचं दुखणं. मागील वर्षी अण्णांच्या वाढदिवशी त्यांना भेटायला गेलो आणि पोटात गलबलले. अण्णा खुर्चीवरून उठूही शकत नव्हते आणि बोलूही शकत नव्हते. लोकसत्तामधे आलेल्या लेखांचं अनेक अडचणींना तोंड देत आमच्या 'भारद्वाज प्रकाशन' तर्फे प्रकाशित झालेलं 'कालमुद्रा - मराठी नाट्यसृष्टीतील' हे पुस्तक अण्णांच्या हाती दिलं. नम्रपणे नमस्कार केला. त्याही अवस्थेत अण्णांचे डोळे चमकले. त्यांनी पाठीवर शाबासकी दिली. सर्वांचा निरोप घेऊन निघालो तर पाय जडशीळ झाले होते.

नुकताच, २९ जूनला न्यूजर्सीत मुलीकडे आलो आणि दुसर्‍या दिवशीच बातमी धडकली. अण्णा गेले. घडणारे अटळ होते तरीही असह्य. अण्णांची विविध पुस्तकं, लेख आणि आठवणी - माझ्या आयुष्यातला हा अमूल्य ठेवा आहे. अण्णांचा हा ज्ञानदीप माझ्या ग्रंथ देव्हार्‍यातच नाही तर मनातही सतत तेवत राहणारा आहे. आयुष्याच्या पुढील वाटचालीतही, ह्या नंदादीपाच्या स्निग्ध, शांत प्रकाशाची सोबत असणार आहे.
अण्णांच्या अखेरच्या भेटीला आपण पुण्यात नाही याची खंत वाटत होती. बातमी कळल्यापासून मनात एक हुरहुर, अस्वस्थता होती. अखेर दु:खाला वाट मोकळी करून दिली. कोरे कागद पुढे ओढले. लेखणी सरसावली आणि मनी जे दाटलं ते कागदावर उतरवत गेलो. अण्णांसारख्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला, संशोधकाला आणि लेखकाला ह्यापेक्षा वेगळी कोणती आदरांजली वाहणार !

* हा लेख टाइप करण्यात rmd ने केलेल्या मदतीबद्द्ल मनापासून धन्यवाद .

प्रकार: 

सुंदर लेख. अत्यंत समर्पक शब्दांत डॉ. रा. चिं. ढेरें बद्द्लच्या आठवणी मांडल्या आहेत. हा लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद रार.

आरती, लेख पूर्ण वाचून नाही झाला. जेवढे वाचले ते खूप छान लिहीले आहे बाबांनी.

फिनीक्सला यायचा प्लॅन आहे का? काही कार्यक्रम वगैरे?

सुंदर लेख , डॉ. ढेरेंच्या आठवणी इथे शेअर केल्याबद्दल बाबांना धन्यवाद सांग.
जमलं तर तुझ्या बाबांविषयी अजुन वाचायला आवडेल.

अतिशय हृद्य लेख आहे. शब्दा शब्दातून आदर जिव्हाळा जाणवतो आहे. इतक्या जवळच्या माणसाबद्दल असं लिहीण खूप कठीण आहे. श्री. ढेरे ह्यांना माझी आदरांजली. हे शब्दबद्ध केल्याबद्दल रानडे काकांची ऋणी आहे.

सर्वार्थाने अखंड नंदादीप असेच अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य जगलेले (आणि देहाने नसले तरी अशा सुंदर व्यक्तिचित्रांतून नित्यनेमाने भेटत राहाणारे...) डॉ.रा. चिं. ढेरे यांच्या विषयीचा हा लेख म्हणजे काळजाला अगदी हात घालणारा असाच उतरला आहे स्क्रीनवर....वाचताना सतत जाणवत जाते की त्यांच्या दृष्टीने ग्रंथसंपदेसारखी जगात दुसरी संपत्ती नसणार. घरातील माणसांपेक्षाही पुस्तकांसाठी ते जागा करून देत असत असे त्यांच्याबाबतीत आदराने म्हटले जात असे, ते किती सत्य आहे हे या लेखावरून जाणले जातेच.

धन्यवाद.

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या हृद्य आठवणींचा सुरेख लेख.

अनेकानेक धन्यवाद रार, rmd
रार, नितांत सुंदर लिहिलंय गं बाबांनी, त्यांनाही आवर्जून सांग.

वरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर लेख ! इथे वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रार आणि रमड>>> +१

sundar!

वरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर लेख ! इथे वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रार आणि रमड. >>> +१११

Pages