आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2016 - 06:10

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी .........

नुकत्याच तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्या पुणे मुक्कामी आल्या होत्या तेव्हाचा प्रसंग. संभाजी पुलावरुन बुवांची पालखी येण्याचा अवकाश - कुठल्याशा लाऊडस्पीकरवरुन मोठ्ठा जयजयकार झाला - संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय ....
आणि बुवांचा एक जोरकस अभंग मनात तरारून उठला ...

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |
पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||

अशा काही अभंगातून बुवांचे जे दर्शन होते त्याने आपण केवळ थरारून जातो - वाटते कसे हे निश्चयात्मक बोल , कसा हा अचानक उन्मळणारा सार्थ अभिमान, कशी ही नि:संदिग्ध वाणी, कशी ही कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेली कान-उघाडणी....
भगवद्भक्तित स्वतःला अगदी हीन-दीन म्हणवणारे बुवा आता अशा गर्जना करताहेत की आपली छाती पार दडपून जावी ...

बुवा म्हणताहेत - आम्हाला ऐरेगैरे समजू नका - आमचे वसतीस्थान प्रत्यक्ष वैकुंठ. भगवंताच्या नित्य सान्निध्यात रहाणारे आम्ही आता इथे पृथ्वीलोकात का अवतरलो आहोत सांगू ----
तर ऐका - कितीयेक वरुषांपूर्वी आमचे ऋषि-मुनी कंठरवाने सांगून गेले - उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | ... ती तेजस्वी वाणी लोप पावली असे वाटल्याने त्यांचे सांगणे प्रत्यक्ष आचरुन दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत ....

आमच्या आधी अनेक संतांनी जो शुद्ध परमार्थ स्वतः जगून, आचरुन दाखवला त्याचा या विषयलोभी मंडळींनी पार सत्यानाश केला - केवळ पोपटपंची करणारे भोंदू बुवा आणि महाराज यांनी परमार्थ साधना तर बुडवलीच आणि वर जनसामान्यांना आडरानात पाठवले...

पण लक्षात ठेवा - आम्ही हे सारे बदलवून टाकणार - या संतांचे या ऋषि-मुनींनी आखून दिलेले मार्ग आम्ही पुन्हा स्वच्छ करणार, उजळवणार - म्हणजेच आम्ही ते आचरुन दाखवणार ... पुन्हा या जनांना सन्मार्गावर आणणार..

कुठला हा सन्मार्ग ?? - विठ्ठलभक्ति हा सन्मार्ग. उत्तम विधियुक्त आचरण हा सन्मार्ग. विठ्ठलाला आठवून केलेला प्रपंच हा सन्मार्ग. एकमेकांविषयी आदर राखून केलेला व्यवहार हा सन्मार्ग. उत्तम व्यवहाराने धन जोडून ते अतिशय निर्लिप्त भावाने समाजालाच परत देण्याचा हा सन्मार्ग. कोणाही जीवाचा न घडो मत्सर असे सर्वेश्वराच्या पूजनाचे वर्म सांगणारा सन्मार्ग. आपल्याच घरातील दास-दासींना पुत्रवत मानणारा सन्मार्ग (दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी|) - अशी ही सन्मार्गाची विविध अंगे आम्ही लख्ख आचरणार आणि मग सहाजिकच जनांच्या ते नेमके लक्षात येणार आणि हे जनलोकही तसे वागण्याचा प्रयत्न करणार.....

भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग | ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ||
अशा सगळ्या भक्तिमार्गाच्या व्याख्या आम्ही पुन्हा उजळवणार - हा भक्तिमार्ग झळाळून काढणार - त्याची दिप्ती काय आहे म्हणून सांगू !! या भक्तिने प्रत्यक्ष त्या जगनियंत्यालाच आमच्या ह्रदयसंपुटी साठवले आहे, एका नम्रभावाने त्या ब्रह्मांडकर्त्यालाही आम्ही आकळू शकलो आहे.

केवळ देहसुखासाठी प्रपंच करणे तर पशुही जाणतात, पण प्रपंचात विवेक राखून या देहातीत असणार्‍या विठ्ठलाला प्राप्त करुन घेण्यासाठी हा नरदेह मिळाला आहे हे ठणकावून सांगणार. याला साधी सोपी युक्ति म्हणजे नामस्मरण (सतत भगवंताचे अनुसंधान) आणि धर्मविदीत सगळ्या विषयांचे विधीयुक्त सेवन.
विधीने सेवन | विषयत्यागाते समान ||
या प्रपंचातले सगळे विषय काही टाकाऊ नाहीयेत. धर्माने आखून दिलेल्या चौकटीतले सगळे विषय आपण भोगू शकतो - पण तो किती भोगायचा याला काही मर्यादा आहे का नाही ? या मर्यादा धर्म सांगतो. त्या मर्यादांचे पालन करीत हे सगळे भोग भोगता येतात. आणि अशा मर्यादेने भोग भोगत असतानाच विठ्ठलाचे स्मरण कायम ठेवणार - हा मुख्य धर्म...
मुख्य धर्म देव चित्ती | - देव चित्तात रहाणे हाच मुख्य धर्म.

सगळ्या इंद्रियांना वळण लावणार -
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पहा विठोबाचे मुख |
तुम्ही आईका रे कान | माझ्या विठोबाचे गान |

असं करता करताच हे जीवन सुखरुप होत होत शेवटचा दिसदेखील गोड होईल यात शंका कसली ? उगाच कसे तरी वागून काहीतरी करुन का शेवटची घडी साधणारे, समाधान मिळणारे ? समाधान मिळवायचे असेल तर असे क्षण क्षण समाधान गोळा करीत करीतच त्या अखंड समाधानाला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त होऊ यात...

वैकुंठवासी याचा अर्थ परमेश्वराजवळ रहाणारे. म्हणजेच आपल्याच अंतरात भगवंताला दृढ करणारे. आता भगवंत जिथे रहाणार ते स्थान कसे पाहिजे ? तर हे अंतःकरण अतिशय शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे तरच तो गोपाळ यात राहणार... असे हे वैकुंठात वास करणारे बुवा जी तेजस्वी वाणी बोलून गेलेत तीच वाणी आम्ही बुवांची लेकुरे पुन्हा पुन्हा वाचणार आणि त्यानुसार चार पावले टाकण्याचा प्रयत्न करणार - अशी आगळी वारी साधायचा आम्ही प्रयत्न करणारच करणार ..

बुवांच्या नावाचा जयजयकार करीत बुवांपाशीच प्रार्थना करणार -
हे चि दान देगा तुझा(बुवांचा) विसर न व्हावा | गुण गाईन आवडी | हे चि माझी सर्व गोडी |
न लगे मुक्ति धन-संपदा संतसंग देई सदा | संतसंग देई सदा .....

---------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | - कठोपनिषद
- उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा. ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे, असं (विद्वान) कवी सांगतात.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥अभंगगाथा ४६||

भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥
उदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका ह्मणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥ २१७७||

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥३४७||

विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥
बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥३१६||

घेइ घेइ माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथें धांव घेइ । राहें विठोबाचे पायीं ॥३॥
तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥७५०||

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाइऩपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाइऩट । वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥
तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥२८५४||

याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥१३२३||

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाइऩ आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देइ सदा ॥२॥
तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥२२९६||

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर विवेचन

नेमका आजच विकी वर हा अभंग वाचला आणि आमच्या बालबुध्दीला समजलेला सरळ अर्थ लावून मोकळे झालो .

तसं पाहिलं तर चार ओळींचा अभंग पण त्या सरळ अर्थाच्याही पलिकडे जावून घेतलेला परामर्श सुरेखच .... धन्यवाद
Happy

उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्यवरान्निबोधत | क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति | - कठोपनिषद
- उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा. ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे, असं (विद्वान) कवी सांगतात.

<<

हे तत्वज्ञानात आहे म्हणून जरा तात्विक प्रश्न विचारतो.

या ज्या श्रेष्ठ, ज्ञानी व्यक्ती असतात, त्या श्रेष्ठ किंवा ज्ञानी कशा काय बनतात? यांना कुणी गुरू भेटला असे समजू. तर मग आद्य गुरू कुठून आला?

"मी" कधीही श्रेष्ठ किंवा ज्ञानी बनूच शकत नाही, अशी कन्सेप्ट प्रत्येकच भक्ताच्या मनात यायची व्यवस्था का व कुठून होते?

ज्ञान हे इतके अप्र्याप्य किंवा दुष्प्राप्य असायला हवे असते?

अन असेच असेल, तर रिलायन्सवाला जिओ फुकट देऊन गूगल देखिल फुकट ज्ञानापर्यंत का नेते? किंवा अम्रिकन युनिवर्सिट्या पैसे घेऊन ज्ञान का देतात?

रच्याकने I know the difference between knowledge and information. पण त्याच वेळी, information उर्फ Data ही तितकाच महत्वाचा आहे. अन ज्ञान म्हणजे माहितीवरून काढलेल्या निष्कर्षांचे संकलन, अशी माझी समजूत आहे.

आता या प्रश्नांची उत्तरे अध्यात्म बाजूला ठेवून समजावलीत तर बरे होईल.

अन्यथा वेमा / अ‍ॅडमिन हा धागा अध्यात्म ग्रूपात हलवायला समर्थ आहेत

॥जैजै अ‍ॅडमिन समर्थ॥

***
(विद्वान) कवी :ड