एक किस्सा

Submitted by कस्तुरी मित्र on 28 June, 2016 - 02:27

कालचाच एक किस्सा सांगतो. काय झालं मी आणि माझी चांडाळ चौकट(आईच्या भाषेत ) गप्पा मारत बसलो होतो. आता तुम्ही म्हणाल एवढा वेळ मिळतो हल्ली तुमच्या मित्रमंडळाला ! तर हो मिळतो. पण तो whats app वर ! काय करणार अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा माणसाला अजून किती दूर घेवून जातील सांगता येत नाही. म्हणून मग रोज भेटायचं तर कसं तर असं. त्यामुळे आम्ही तिथे रोज गप्पा मारत बसतो. हा तर आता विषयाकडे वळू , याला वळणच म्हटलं पाहिजे कारण सरळ गेलं तर म्हणे रस्ताच संपत नाही.

असो ! तर काय झालं आमची चौकट तल्लीन होऊन गप्पा मारत असताना लाडात येऊन प्रेमाच्या भाषेत बोलू लागलो ( हल्ली त्याला म्हणे शिव्या असं म्हणतात). तर आमच्या समूहात (ग्रुप ला मराठीत समूह असं म्हणतात ) मैत्रिणी पण आहेत. आता तुम्ही म्हणाल व्वा मज्जा आहे. तर तसं काही नाही. कधीतरी बोलतात, इतरवेळी खुलं मैदान आमचंच असतं (यावर जास्त बोलत नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे यात ). हां तर काय झालं, आमच्या एका मैत्रिणीला हि प्रेमळ भाषा जरा खटकली (मुलींच्या बाबतीत सहाजिकच आहे म्हणा). पण त्यामुळे आमच्या प्रेमळ भाषेचा ओसंडून वाहणारा झरा त्या दगडाला अडखलळू लागला आणि मग प्रवाहाच्या नियमानुसार गप्पांचा विषय बदलला. पण तरी कळेना नक्की कोणता पवित्रा घ्यायचा तो , कारण आक्रमक झालो तर ती समूहातून निघून जाईल आणि बचावात्मक घेतला तर आम्ही चुकलो असं वाटेल ( तसं आम्ही कधीच चुकत नाही). म्हणून मग आम्ही ठरवलं कि आज या विषयावर संशोधन करायचंच आणि मग आम्ही आमची गाडी त्या दिशेने वळवली.

पहिला शोध हा घ्यायचा ठरला कि नक्की यात नेमका त्रास काय आहे ? म्हणजे हि प्रेमळ भाषा म्हणावी तेवढी प्रेमळ नाही कि बा अतीच प्रेमळ आहे ? तर असा निष्कर्ष निघाला कि ती खूपच हिंस्त्र आहे. कारण या प्रेमळ भाषेचा उपयोग लोक फक्त भांडताना करतात. म्हणून ती हिंस्त्र आहे . म्हटलं बर पण मग आम्ही कुठे भांडत होतो ? आम्ही तर मस्करी करत होतो. मग हि हिंस्त्र कशी काय ? मग परत दुसरा शोध लागला तो म्हणजे चांगल्या घरातली माणसं हि भाषा वापरत नाहीत. मग म्हटलं असेलही. पण आम्हाला तर असं आठवतंय कि आम्ही शाळेत जायला लागल्या पासून घरातली सारखी म्हणतात , घराण्याच नाव धुळीला मिळवलं . आता तुम्हीच सांगा, एकदा का नाव धुळीला मिळालं कि मग ते चांगलं कसं ? ( असो हा प्रश्न थोडा नाही खूपच विचार करायला लावणारा आहे ). आता इथेच हे प्रकरण थांबेल अस वाटलं होतं पण ती शक्यता मग नारीशक्तीने आपलीच तीन बोट दुसऱ्याची समजून ती आपल्याकडे आहेस असा भास निर्माण करून पवित्रा घेतला. मग सुरु झालं महारामायण (आता याचा अर्थ न लावलेलाच बरा). मग तो विषय घरच्या संस्कारांपासून तो अगदी महिला आरक्षण इथंपर्यंत जाऊन पोहचला. ( आता बायकांच्या चर्चेत दुसरे काय विषय असणार.) शेवटी गप्प कोणी बसावं हा प्रश्न पुढे आला. आणि नेहमी प्रमाणे (बोलायला काही उरत नाही म्हणून ) महिला मंडळाने बचावात्मक पवित्रा घ्यायला सुरवात केली.

आता बचावात्मक पवित्रा कोण कसा घेतो यावर न बोललेलंच बरं. असो ! टोकाला गेलेला विषय कसा बदलायचा हे कोणत्याही स्त्रीला सांगायलाच नको (सांगायला कोण जाईल हे पण आहेच म्हणा). विषय बदलयचाच म्हणून मुख्य विषयाकडे कानाडोळा करून (तसं म्हणायला गेलं तर कानाडोळा जर विषयाकडे केला तर विषय वाढायला पाहिजे पण तो मिटतो असं म्हणतात ) तुझं कसं माझं कसं हा विषय सुरु झाला ( हा बायकांचा सर्वात आवडता विषय म्हणून मानला जातो ). हा विषय सुरु झाल्यावर समस्त नारीशक्ती एकवटली ( बोलायला नाही तर कोण काय बोलतं हे वाचायला). आता आम्ही बिचारे सगळे ( असं आम्हाला वाटतं म्हणून नाही, आहोतच) काय बोलायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत बसलो होतो. जर ह्यांच्या मध्ये मध्ये बोलायला लागलो तर परत अजून एखादा वाद होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नव्हतं. जरा कुठे जागा मिळते का पाहून आम्ही थोडं पुढे सरकता येईल का पाहत होतो ( बायकांच्या बोलण्यात जागा असतेच कुठे ?) .

अचानक सगळ्याजणी निरोपाची भाषा बोलू लागल्या ( बोलायला काहीच नाही म्हणून नव्हे तर एकमेकीन बद्दल समूहाने बोलता येत नाही म्हणून) . आम्हाला संधी मिळताच आम्ही पुढे सरसावलो आणि पुन्हा आमच्या लाडक्या विषयाला हात घातला ( पुरुषांचा लाडका विषय माहीतच असेल) . क्षणार्धात हर हर महादेव म्हटल्यावर मावळे जशे शत्रूवर तुटून पडत तसे सगळे मित्र समूहावर हजर झाले. (विषय रंगवण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा होताच ) 30 मिली पासून सुरु झालेला विषय ब्रँड पर्यंत कधी जाऊन पोचला याचा पत्ता लागलाच नाही (तसा तो कधीच लागत नाही). मग प्रत्येक जण आपापले किस्से सांगू लागला (खर सांगतो अर्धीत गर्दी का म्हणतात ते कळलं ) कोण किती आणि केव्हा इथंपासून ते कोणा कोणा बरोबर इथपर्यंतचा सगळा प्रवास पुढे येत होता ( तसा हा रोजचाच प्रवास आहे ). आता एवढ्या छान चर्चेला गालबोट लागलं नाही तर नवलच म्हणा ( आणि मुली जर समूहात असतील तर शक्यता नाकारणं कठीण ).

असो! आमची गहनचर्चा रंगात यायला आणि नारीशक्तीला आपलं संघटन मजबूत करायला एकच वेळ मिळाली. ( काळ आणि वेळ एकत्र येणे म्हणजे नेमकं काय? ते हे असं). आम्ही आमच्या विषयात तल्लीन आहोत हे पाहून नारीशक्तीची पहिली तुकडी पुढे आली आणि आमच्याच विषयाला त्यांनी हात घातला.
विषयात तोंड घालणे याला हात घालणे का म्हणतात हे अजूनही मला कळत नाही ( बहुतेकदा तोंडाचं आणि हाताचं मिलन विषयाला हात घालताच ठरलेलं असत म्हणून असेल कदाचित ). तर महिला मंडळाने पुरुषांच्या आवडत्या विषयाला हात घातलेला पाहून समस्त नरशक्ती मिळेल तिथून शक्ती गोळा करून एकवटली ( आता बायकांबरोबर एक पुरुष एकावेळी किती बोलणार? ) . आता प्रश्न हा होता कि कोणाची ताकद जास्त आहे. कोणी काही केल्या मागे हटेना. शेवटी असा निर्णय घेण्यात आला कि हा विषय पुन्हा या समूहात चर्चेसाठी सामील करून घेतला जाणार नाही.

असो ! काय करणार शेवटी कोणी तरी पडती बाजू घ्यायला हवीच. (आणि ती नेहमीच पुरुष घेतात हां ! ) आता कुठे वातावरण शांत होतं न होतं तोवर आमचे एक परम मित्र जागे झाले. खुप वेळ चाललेला गोंधळ त्यांचा लक्षात आला नसावा म्हणून त्यांनी पुन्हा उजळणी सुरु केली . जसा संदर्भ लागत गेला तसे त्यांनी आपली मते मांडण्यास सुरवात केली. हे पाहताच नारीशक्तीने पुन्हा पेटूनच उठायचे ठरवले ( तशी ती कायमच पेटलेली असते ). आमचे परम मित्र बिचारे एकटेच खिंड लढवताना पाहून त्यांना अजून चेव चढला. ( एकटा पुरुष दिसला कि तो चढतोच ) आणि मग पुन्हा गाडी संस्कारांकडेच वळली. ( नेहमीचच हत्यार ) आणि मग तमाम पुरुष कसे वागतात तिथं पासून ते कसे व्यसनी बनतात इथपर्यंत पुराण सुरु झाले ( चार बायका जमल्या तर विषय नको का ?)

हे सगळं आता आपल्या आंगलट येणार हे माहित असल्यामुळे आम्ही बचावात्मक पवित्रा जाहीर पणे घेतला ( नाहीतर काय या बायकांच्या तोंडाला कोण लागेल? ) . प्रकरण इथवर न थांबवता आम्ही सरळ असा निर्णय घेतला कि यापुढे असे वाद टाळायचे असतील तर आपण आपला नवीन पुरुषसमूह (ग्रुप) तयार करणे केव्हाही चांगले. खरं सांगतो सध्या आम्ही आमचे विषय आमच्याच समूहावर ना कोणतेही वाद झाल्याखेरीज मार्गी लावतो. (नारीशक्तीच्या मता शिवाय.... )

Group content visibility: 
Public - accessible to all site users