सर्वाभूती नारायण

Submitted by मिरिंडा on 23 June, 2016 - 10:28

एका नगरात एक गुरू राहत होते . त्यांचे अनेक शिष्य होते. महोक्ष नावाचा त्यांचा एक आवडता शिष्य होता. शिक्षण पुरे झाल्याने त्यांनी त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली. जाण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना उद्देशून भाषण केले. " माझ्या लाडक्या शिष्यांनो हे लक्षात ठेवा की सर्वाभूती नारायण आहे आणि त्याचा आदेश पाळला पाहिजे. ही साधना तुमची पुरी झाली आहे. आता आयुष्यातले अनुभव त्यानुसार घ्यावेत हे लक्षात ठेवा. " सर्वांनीच होकार भरला. महोक्षाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी त्याला भावी आयुष्या बद्दल आशीर्वाद दिले. तो जायला निघाला. त्याचा रस्ता एका जंगलातला होता. चालता चालता महोक्षाला सगळ्याच सृष्टीची जाणीव असल्याने तो " नारायण , नारायण " असा जप करीत चालला होता. सकाळची वेळ असल्याने त्याने थांबून ध्यान धारणा करून गुरुपत्नीने दिलेली न्याहरी केली. मग तो मार्गक्रमण करू लागला. एकीकडे त्याच्या मनात आई वडिलांची आठवण येऊन त्याला उत्सुकता लागली होती.
त्याच नगराच्या राजाचा एक हत्ती पिसाळला होता. गजशाळेतून पळत सुटला. त्याला आवरण्यासाठी रक्षकांची माहुताची चांगलीच धडपड चालली होती . राजरस्त्यावरून धावणाऱ्या त्या हत्तीने अनेकांना जखमी केले होते. इकडे महोक्ष काही अंतर कापल्यावर राजरस्त्याला लागला. त्याला हत्ती मोकाट सुटल्याचे माहीत नव्हते. अचानक आलेल्या हत्तीला पाहून तो गांगरून गेला. पण गुरूंचा उपदेश आठवून समोरून येणाऱ्या हत्तीला न चुकविता तो रस्त्याच्या मध्यावरच उभा राहिला. त्याने विचार केला सर्वांमध्ये नारायण आहे म्हणजे हत्तीमध्येही नारायण आहेच की. हत्तीतला नारायण मला इजा पोहोचवू शकणार नाही. माहुताने ओरडून महोक्षाला बाजूला होण्यास पुन्हा पुन्हा सांगितले. सगळेच नारायणमय असल्याने त्याने माहुताच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी हत्तीने जवळ येऊन त्याला सोंडेत धरून गरगर फिरवले व फेकून दिले. तो जंगलात दूरवर जाऊन पडला.जखमी आणि मरणासन्न अवस्थेत त्याला आपल्या गुरूंची आठवण झाली. गुरूंनाही अंतर्ज्ञानाने महोक्ष संकटात असल्याचे जाणवल्याने ते ध्यान सोडून त्याच्या नावाने हाका मारीत जंगलात शिरले. काही वेळाने ते मरणासन्न अवस्थेत पडलेल्या शिष्या जवळ आले व त्याला मांडीवर घेऊन शोक करू लागले. महोक्षाने त्यांना विचारले. "गुरुजी माझे हातून काय प्रमाद घडला. आपल्या उपदेशाप्रमाणेच मी नारायणाचा अनुभव घेत होतो. हत्ती हा नारायण स्वरुपी आहे. मग असे काय झाले. " गुरुजी म्हणाले " बाळा , अरे माहूत हाही नारायण स्वरुपी असूनही त्याचे म्हणणे तू ऐकले नाहीस म्हणून तुझी ही अवस्था झाली. " शिष्याला गुरुजी काळाच्या जबड्यातून बाहेर काढू शकले नाहीत. अर्थातच तो मृत्यू पावला. तात्पर्य, जीव वाचवण्याचे व्यावहारिक ज्ञान महोक्ष विसरला, म्हणून त्याची ही अवस्था झाली. ज्ञान व्यवहाराच्या कसोटीवर घासूनच वापरावे लागते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users