स्फुट १२ - कोलकात्यातील त्या रस्त्यावर

Submitted by बेफ़िकीर on 12 June, 2016 - 23:35

कोलकात्यातील त्या रस्त्यावर
तेवीस टेम्परेचर होते
हवेचे!!
माणसांची तापमाने वेगवेगळी होती!!
फूटपाथ मढले होते
टपर्‍यांवरून पडलेल्या बटाट्याच्या फोडींनी
गाजराच्या सालींनी, पालकाच्या सडलेल्या पानांनी!!
गलेलठ्ठ घुशींचे लोळ चालत, धावत होते
नुकताच परप्रांत जिंकल्याच्या आवेशात!!
कावळे आणि मांजरे ह्यापासून वाचत वाचत
काही उंदीर नाचत होते पडलेल्या अन्नातच
तेच अन्न खात आणि त्यातच घाण करत!!
काही कावळे कर्णकर्कश्श्य ओरडत होते
एखादा जिवंत उंदीर पाहून
जणू उंदीर जिवंत राहणे हा त्यांचा अपमानच!!
कावळ्यांना उडावेच लागत नव्हते चार फुटांहून जास्त उंचीवरून!!
कारण अर्ध्या अर्ध्या फुटावर काहीतरी घाण होतीच
त्यांना अन्न पुरवू शकणारी!!
एखादा मांसाचा तुकडा, एखादे सडलेले अंडे किंवा एखादा उंदीर!!
अरुंद गल्ल्यांमधून वाहत होती
जगातील सर्वात किळसवाणी गटारे
काय नव्हते दिसत त्या गटारांमध्ये!!
भकास चेहर्‍याचे मजूर
चहा पीत, बिड्या ओढत, हातगाड्या ढकलत होते
त्यातच टू व्हीलर्सचे हॉर्न्स
पकोड्याचे, राजम्याचे, मटनाचे वास
बंगाली मिठाईचा किळसवाणा दरवळ
त्यातच कापत होते काही जण
जिवंत कोंबड्या गिर्‍हाईकांसमोरच
मांसाच्या ताजेपणाची खात्री पटावी म्हणून
कोंबड्यांची छाटलेली मुंडकी
मांजरांच्या जबड्यात जात होती
पिसे अस्ताव्यस्त, इकडे तिकडे, वार्‍यावर
रक्ताचे ओघळ वाहत आहेत
एखाद्या रस्त्याकडेच्या मारुतीच्या देवळापुढून
कोंबडीचा मृत्यू निरखणार्‍या बंगाली बायका
निश्चल नजरेने पाहत आहेत
एका बाईच्या जातीची निदान स्पष्टपणे होणारी तडफड
आणि आत्म्याची सुटकाही!!
सुटाबुटातले बंगाली
जाड चष्मे लावून गचाळ कपातून चहा पीत
स्वस्तातल्या सिगारेटींचा धूर
समोरच्याच्या नाकात सोडत होते!!
त्यांच्या भकास डोळ्यांमधील अपूर्ण स्वप्ने
गळत होती खपल्यांमधल्या रक्तासारखी
पलीकडे होते एक मेट्रो स्टेशन
तिकडे लोंढे चाललेही होते आणि
तिकडून येतही होते
भिंतींवर होत्या जाहिराती
मसाज पार्लरच्या नावाखाली
कामेच्छा पुरवणार्‍या सेंटर्सच्या
मदनिकांची चित्रे आणि फोन नंबर्स!!
गच्च भरलेल्या बंगाली बायका
इतक्या बकाल वातावरणातही
सोळा शृंगार करून फिरत होत्या
फुटपाथवर पडलेल्या दारुड्याला चुकवत
पुढच्यांचे संभाव्य धक्के आणि स्पर्श टाळत
मागच्यांकडून सभ्यतेची फोल अपेक्षा ठेवत!!
त्यातच होते चहावाले, केमीस्ट, देवळे, भाजीविक्रेते
रिक्षा, स्कूटर्स, सायकली, सायकल रिक्षा
पोस्टर्स, जाहिराती, हँड आऊट्स वाटणारे
चिकचिकाट, सुळसुळाट, बजबजाट!!

कोलकात्याचा तो रस्ता
माझ्यापेक्षा
कितीतरी स्वच्छ वाटला मला!

======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> IRONMAN | 13 June, 2016 - 11:04 नवीन

बंगाली मिठाईचा किळसवाणा दरवळ>>>>>>>
खाल्ली आहे का कधी?
<<<

अक्कल शिकवू नका. बंगालमध्येच हजारवेळा खाल्ली आहे. काय लिहिले आहे ते समजण्याची कुवत नसेल तर गप्प राहा. प्रत्येक धाग्याचा उकिरडा केलाच पाहिजे असे नाही.

स्फुट आवडले.

"माझ्यापेक्षा कितीतरी स्वच्छ वाटला" इथे मला इम्पॅक्ट कमी होत आहे असे वाटले. पण तरीही मस्त!