मर्यादापुरुषोत्तम....रामनवमीच्या निमित्ताने !

Submitted by विद्या भुतकर on 15 April, 2016 - 10:08

अहो, आज इथे बर्फ पडला. तुम्ही परवा इकडून निघाला आणि थंडी सुरु झाली. किती म्हणत होती मृणाल तुम्हाला,' बाबा थांबा अजून थोडे दिवस'. पण तुम्हाला कुठे जमतंय असं एका जागी शांत बसायला आणि तेही जावयाच्या घरी? माझी अमेरीका फिरायची हौस काही पुरी केली नाहीत तुम्ही. आता मी कुठली जातेय या २ महिन्याच्या बाळाला घरी ठेवून एकटी? किती गोड आहे नाही नातू आपला? पण रडायला लागला की जीव घाबरा घुबरा होतो. तुम्ही तर त्याला कौतुकानं हातात घेतलं पण कसे घाबरला होतात. कधी इतक्या लहान मुलाला घेतलंय कुठे हातात तुम्ही?

आपली मुलंही घरी घेऊन आले मी तेंव्हा तीन महिन्याची होऊन गेली होती. नवव्या महिन्याच्या सुरुवातीला माहेरी गेलेली मी एकदम बाळ घेऊनच सासरी मग. पण मला ना खूप भीती वाटली होती, तुम्ही मला माहेरी सोडून जाताना. कुठे काही झालं तर? निदान तुम्हाला बघून तरी गेले असते असं वाटलं. पण त्या काळात बोलता कुठे येत होतं हे सर्व. त्यात तुम्ही तसे पहिल्यापासूनच मर्यादा पुरुषोत्तम. आमची आजी म्हणायचीच,'अगदी रामच आहे हो तुझा नवरा'. कधी कुठल्या कामाला चुकला नाहीत. धाकट्या भावाला शिकण्यासाठी खर्च केलात. बहिणीचं लग्न लावून दिलंत. आई-वडिलांना शेवटपर्यंत सांभाळलंत. माझ्या बाबतीतही, बायकोला वेळेत माहेरी सोड, सासरी आण सगळं केलंत. कधी जावई म्हणून, माझ्या घरी काही मागितलं नाहीत. खूप अभिमान वाटतो तुमचा, लोकांनी हे बोलून दाखवलं की. असो.

परवा नोकरीला जायच्या आधी मृणालने मला हा laptop दिला. कसं लिहायचं ते शिकवलं. म्हटलं तुम्हालाच लिहावं आधी. असाही दिवसभर काम पुरतं बाळाचं. तरी विरंगुळा हवाच ना काहीतरी. थोडा जरी वेळ मिळाला तर एकट वाटत राहतं, म्हणून घेऊन बसले. मुलीचं सगळं नीट करायचं म्हणून पुढाकार घेऊन इथे आलात. आता बाळ झालं, सर्व नीट पार पडल्यावर मात्र कुठे राहावतंय तुम्हाला. तिकडे जाऊन अजून कुणाची तरी जबाबदारी पार पडायचीच आहे न तुम्हाला. मला काय वाटतं, तुम्हाला ते व्यसनच लागलंय हे असं काम ओढवून घ्यायचं. ते पार पाडून पुढे जायचं अजून काही करायला. चांगलं वाटतं ना असं सर्वांचं भलं करायला?

विचार करत होते, हे सगळं करताना दोन क्षण कधी माझ्यासाठी थांबावं वाटलं का तुम्हाला? अगदी घरच्या सर्वांसाठी पैसे कमवायला शहरात गेलात. मागे या दोन मुलांना घेऊन इतक्या लोकांच्या घरात माझं काय झालं असेल याचा विचार केलात? लोकांचं करण्यात पैसे लावलेत, योग्यच केलंत ते. पण मला कधी काय हवंय म्हणून विचारलंत? आता हे आजचंच बघा ना? तुम्हालाही माहित्येय या परदेशात किती एकतं वाटतं. तुम्हालाही कंटाळा आलाच इथे असा लोकांवर विसंबून राहायचा. तरी बाळंतपण होईपर्यंत थांबलात आणि लगेच निघून गेलात. निदान माझ्यासाठी म्हणून तरी थांबायचं होतं अजून थोडे दिवस? किंवा मला घेऊन जायचं होतं आपल्यासोबत. पण असं कसं होणार ना? मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही. तुम्हाला सोडून जाता आलं सर्व, लोकांसाठी. सीतेला मात्र आपला नवरा, संसार आणि आपल्या मुलांना सोडता आलं नाही तेंव्हाही आणि आजही.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार करत होते, हे सगळं करताना दोन क्षण कधी माझ्यासाठी थांबावं वाटलं का तुम्हाला? अगदी घरच्या सर्वांसाठी पैसे कमवायला शहरात गेलात. मागे या दोन मुलांना घेऊन इतक्या लोकांच्या घरात माझं काय झालं असेल याचा विचार केलात? लोकांचं करण्यात पैसे लावलेत, योग्यच केलंत ते. पण मला कधी काय हवंय म्हणून विचारलंत?>>>>

बायकोने कधी तोंड उघडून नवर्‍याला सांगितलं की तिला काय हवं आहे? किंवा नवरा दूरगावी गेला तेव्हा त्याला थांबवण्यासाठी काही प्रयास केले? मर्यादा पुरुषोत्तमही मनकवडा नव्हता Happy

छान लिहीलंय.
पण खरंच सुविद्य, स्वतंत्र विचाराच्या जोडप्यांमधेही सुसंवादाशिवाय असं एकतर्फी वागणं होतं अजूनही [ अर्थात, अपवाद सोडून.] ?

चीकू आणि भाऊ यांच्याशी सहमत. संवाद हवा.

आता काळ बदलला आहे. स्त्रियांना आपले मत मांडता यावे ईतकातरी किमान अधिकार या पुरुषप्रधान संस्कृतीने दिला आहे. मग आपल्या घरात आपल्या माणसांशी संवाद साधायला कोठलाही संकोच वा अडचण भासू नये.

ना पटला लेख ना शीर्षक ... सुरुवातीला कौतुक केलंत आणि शेवटी एकदम बारगळल.. त्यामुळे भरकटल्यासारख वाटल.

शेवटी सुख हे मानण्यावर असत...

खूप अभिमान वाटतो तुमचा, लोकांनी हे बोलून दाखवलं की. >>> लोकांनी नाही बोलून दाखवलं तर?

हा लेख बरेच दिवस डोक्यात होता. प्रत्यक्शात पहिलेले अनुभवही होतेच. जिथे पुरुष केवळ घरी काहीतरी काम आहे म्हणून परत जातात, पण परदेशात बाईला एकट असल तरी मुलान्सठी थामबाव लागल. आणि लोक जेव्हा कोउतुक करत्तात तेव्हा अभिमान वाटतोच पण आपली फरफट होतेय हे सान्गता येत नाही. अर्थात हे मुख्य करुन आईच्या वयाच्या बायकात पाहिले आहे. सन्वाद हा असावाच पण त्या पिढीत समजुतदारपणा होता पण त्यात थोडी दु:खही.
म्हणुन हा लेख.
धन्यवाद.
विद्या.

सगळा लेख आवडला, पण शेवटच नाही.

पण मला कधी काय हवंय म्हणून विचारलंत?
>>

हे मला कधीच उमगत नाही. बऱ्याचदा विचारलं तर उत्तर मिळत, की काही नको अन नंतर हा डायलॉग ऐकावा लागतो.

(हे इन जनरल आहे, आपल्या लेखावर नाही)

बऱ्याचदा विचारलं तर उत्तर मिळत, की काही नको अन नंतर हा डायलॉग ऐकावा लागतो. >>>>>> सांगून मिळालं की त्याची गोडी नसते.न सांगता आपल्याही मनातलंओळखून जोडीदाराने वागावं,काही आणावं ही वाजवी अपेक्षा असते.(प्रातिनिधिक)