माझी पर्स

Submitted by विद्या भुतकर on 21 March, 2016 - 18:42

आज ऑफिसला पोचले आणि लिफ्टजवळ सिक्युरिटीला आय-कार्ड दाखवायचे होते. पर्स उघडली तर वरच सापडले कार्ड पण, पर्सच्या आत वर एक छोटासा कप्पा असतो आज काल तिथे. एका मिनिटांत कार्ड दाखवून आत जाण्याची पहिलीच वेळ असेल. नाहीतर बऱ्याच वेळा आख्खी पर्स पालथी घातली आणि सगळ्या जगाला आपल्या पर्समध्ये काय सामान आहे हे कळले तरी आय-डी सापडत नाही. त्यामुळे जरा आनंद झाला. माझ्या शेजारीच अजून एक बाई होतीच पर्स, Bagpack धुंडाळत. काही वेळा असंही झालंय की तो आय-डी ला लावलेला मोठा दोर असतो ना, त्यात सर्व वस्तू अडकल्या आहेत आणि त्या बाहेर येउन पडल्यात पण जिथे कार्ड अडकवले असते तिथे मात्र काही नाहीये. असो.

मी कॉलेजमध्ये असताना एक सिनियर होती. तिच्याकडे मी एकदा एक डेनिम चे वालेट पाहिले. जीन्सच्या मागच्या खिशात तिने ते स्टाईल मध्ये ठेवलं. मग काय आपण पण लगेच कॉपी केलं ना भौ. Happy तर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासून हातातल्या त्या पर्सला कलटी दिली आणि फक्त डेनिम वोलेट मागच्या खिशात. नोकरी मिळाल्यावर तसं काही करता येणार नव्हतं त्यामुळे छोटीशी पर्स बाळगायला सुरुवात केली. पण तिचंही ओझं व्हायचं. आता ट्रेकसाठी पावसाळ्यात भटकताना ती पर्स कुठे ठेवणार बरं? पण नाईलाज होता. थोडंफार सामान तर लागायचंच, गाडीची, रूमची किल्ली, एक छोटी डायरी असायची तेव्हा नंबर लिहून ठेवायची, एक पेन आणि पैसे. साधारण हा असा साचा बरेच दिवस राहिला पर्सचा. पण ही पोरं झाली आणि सगळं बदललं.

सुरुवातीला मी माझं मी-पण टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एक वेगळी डायपर ब्याग केली होती सर्व सामान ठेवायला. पण मग नंतर बाळाला, पर्स आणि ती वेगळी ब्याग म्हणजे नको नको झालं. त्यामुळे लकवरच एक मोठ्ठी पिशवीच घेतली, अर्थात तोवर पर्ससाठी खूप पैसे भरायचं नाटक पण सुरु झालं होतं. त्यामुळे खूप पैसे घालून भारीतली मोठ्ठी पिशवी घेतली. त्यात मग पेन सापडला नसता पण एक डायपर नक्की मिळाला असता. पुढे स्वनिक मोठा होईपर्यन्त हे असंच चालू राहिलं. त्यात खायची एखादी तरी गोष्ट, पोरांचे सॉक्स, एखादा रुमाल तर कधी टिशू पेपर सर्व काही कोंबल जाऊ लागलं. प्रवासात कधी तापाची गोळी तर कधी चोखायची ठेवली जाऊ लागली. आणि हळूहळू पर्स म्हणजे सर्व वस्तू ठेवायचं पण कधीही न मिळण्याचं ठिकाण झालं.

गेल्या थोड्या दिवसांपासून जरा मार्गाला लावायचा प्रयत्न चालू आहे. कचरा बाहेर काढून, नियमितपणे सर्व लावून ठेवायला लागते. पण अजूनही एखाद्या ठिकाणी गेल्यावर, मुलं कंटाळली की संदीप अपेक्षेने बघतो की पर्समध्ये कुठे काही सापडतं का त्यांना खायला द्यायला. तर कधी हातातल्या वस्तू ठेवायला सांगतो. मीही मग कधीकधी वैतागून पर्स घरीच ठेवून त्याच्या भरवशावर जाते बाहेर. पण खरं सांगू का, बायकांच्या पर्सला कितीही नावं ठेवली तरी एखादी लागणारी गोष्टं त्या पर्समध्येच मिळते. कधी किल्ली विसरली तर तिच्या पर्समध्ये ज्यादा किल्ली असतेच. बाबांच्याकडे न मागता येणारे पैसे आईकडूनच मिळतात. कधी आईबाबांना,'तुम्ही थांबा' म्हणत अभिमानाने हॉटेलचे बिल भरता येते आणि कधी पडून लागल्यावर एखादी band-aid पण असतेच नक्की.

आपल्यासाठी पर्स हि केवळ पर्स नसते कधीच. कधी ती त्याने, भावाने कधी आईने दिलेले गिफ्ट असते. कधी पहिल्या पगाराची साठवण असते. कधी, 'मला स्वत: घेतलेली पर्स टिकत नाही' किंवा 'माझ्या पर्समध्ये पैसे कधी टिकत नाहीत' अशी मनाची ठाम समजूत असते. कधी फाटली असले तर चांगल्या दिवसांची ओढ असते. आत एखादी फाटकी नोट तर कधी जुन्या फोटोची जपणूक असते. कधी हरवून सापडलेल्या पर्सची मजेशीर गोष्ट असते. घरातून बाहेर पडताना हातात घ्यायची मनात नोंद असते तर 'फोन, किल्ल्या, पैसे' या यादीमध्ये भर असते. ही आणि अशीच अजून काही कारणं असतील प्रत्येकाची. त्यामुळे कधीही ती सोडून लोकांच्या भरवशावर राहू नका. आपली पर्स नक्की जवळ बाळगा. आणि हो कधी त्यात हवी ती वस्तू शोधूनही दाखवा. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नवरा म्हणतो, बायकांच्या पर्समध्ये हत्ती पण लपेल!!! Proud
मला पण पर्स नीटनेटकी ठेवायला आवडते.
शाळेत असताना ५-१० सुट्टे पैसे राहतील एवढी अगदी पिटुकली पर्स दप्तरात असायची, कॉलेजला असताना वॉलेट आणि बॅकपॅक, नो पर्स.
नंतर जॉब करायला लागल्यावर पर्स एकदम नीटनेटकी असायची. मेक-अप किट, टिश्यु, साधे २ रुमाल. पैसे ठेवायची पर्स, सगळ्या किल्ल्या ठेवायला आणखी छोटी पर्स, पाण्याची छोटी बाटली, एखादी कॅडबरी किंवा चॉकोलेट.
आता अथर्व झाल्यावर त्यात जास्तचं सामान असतं, डायपर, वेट-टिश्यु, पावडर, काहीतरी खायला, मोठा नॅपकीन, हॅंड सॅनिटायझर अस काय काय बरचं.
पण पाण्याची बाटली, एखादी कॅडबरी किंवा चॉकोलेट हे कायम असतं. कधीही उपयोगी पडतं.

अगदी मस्त.

माझी पर्स कधीच नीटनेटकी नसते. आठवड्यातुन नीट करते मी. मग पुढचा आठवडा पुन्हा तेच Happy

छान लिहिलय. पर्स बदलली की आयकार्डचा गोंधळ ठरलेला. पहिल्या दिवशी कितीही नीटनेटकी पर्स आवरली तरी दोन दिवसात साधी पीन शोधायला पण आख्खी पर्स पालथी करावी लागते.

आमच्या घरात कुठलीही वस्तु सापडत नसली की नवरा व लेकी एकसुरात म्हणतात आईच्या पर्समधे शोधा तिथे नक्की सापडेल Wink

मस्त लिहीलय. माझ्या ही पर्स मध्ये असत सगळं पण वेळेवर मिळेल तर शप्पथ !! मुलगा तर म्हणतो ही " आई तुझ्या पर्स मधुन चोराला ही पैसे काढण कठीण आहे , तुला तरी कसे मिळतात देव जाणे " ( स्मित)

मस्त लिहिलेय..

माझीही `पर्स' फारच अजागळ असते. माझी गर्लफ्रेंड दर महिन्याला ती झाडून साफ करते. नको नको ती बिले, कागदाचे चिटोरे, अनावश्यक विजिटींग कार्डस, जुने झालेले खपलेले रेल्वे पास असा बराच ऐवज कचर्यात निघतो Happy

विद्या.. मस्त लिहिलंयस... डोळ्यासमोर आली की दृष्यं...

कित्येक मैत्रीणींना पाहिलंय.. मोबाईल वाजत असतो आणी त्यांची धडपड , फरफर सुरु असते हँडबॅगेत .. सापडतच नाही वाजून वाजून बंद झाल्याशिवाय.. तरी पर्स घेताना आत बाहेर भरपूर खण, कप्पे असल्याशिवाय घेतच नाहीत..
Proud

मुग्धा.. Lol अगदी!!!!

>>कित्येक मैत्रीणींना पाहिलंय.. मोबाईल वाजत असतो आणी त्यांची धडपड , फरफर सुरु असते हँडबॅगेत .. सापडतच नाही वाजून वाजून बंद झाल्याशिवाय..<< वर्षू तू माझ्या बायकोला कधि भेटलीस..??? Wink

कित्येक मैत्रीणींना पाहिलंय.. मोबाईल वाजत असतो आणी त्यांची धडपड , फरफर सुरु असते हँडबॅगेत .. सापडतच नाही वाजून वाजून बंद झाल्याशिवाय >>> हमारा भी ऐसा बोत बार हुआ है.. Lol अब हम मोबाईल यादसे अलग खण मे रखते है. Happy

अब हम मोबाईल यादसे अलग खण मे रखते है.>>> हा उपायही कुचकामी ठरलाय माझ्या बाबतीत. मग मी लँडलाईनवरुन स्वतःचाच मोबाईल नं. फिरवते आणि आवाजाचा लक्षवेध करते... आपलं अलिबाबाची गुहारुपी पर्समधून फोन हुडकून काढते. : स्मित :

कित्येक मैत्रीणींना पाहिलंय.. मोबाईल वाजत असतो आणी त्यांची धडपड , फरफर सुरु असते हँडबॅगेत .. सापडतच नाही वाजून वाजून बंद झाल्याशिवाय. >> +1

धन्यवाद सर्वाना. Happy

विद्या.

छान लिहीलय.... माझी पर्स अजुन तरी नीटनेटकी असते पण आईची पर्स आठवली...
दर २ आठवड्यांनी स्वच्छ करताना -शाळेतल्या मुलांनी वाढदिवसाला वाटलेली चोकोलेट्स, नोट्स काढलेले चिटोरे, सेफ्टी पिना, २-३ रूमाल्स असला काय काय बाहेर येत... हे असं होऊ नये म्हणून आम्ही नवीन नवीन ट्रायल्स केले... कितीही कमी कप्प्यांची पर्स असो किंवा खूप कप्पे असोत.. सगळं जैसे थे च...
मोबाईलसाठी प्रकरण तेच.... हरवू नये किंवा बसम्धून प्रवास करताना चोरला जाऊ नये म्हणून तो आतल्या कप्प्यात जपून ठेवलेला असतो...या गबाळ्यात तो वाजून वाजून थकून जातो बिचारा... बाहेर काढताना आतल्या चार वस्तू बाहेर येतात ते वेगळचं...