सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी

Submitted by रसप on 17 March, 2016 - 03:33

सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी
कधी चुकलोच नाही तर कसा शिकणार आहे मी ?

मला नाकार तू, झिडकार तू, सोडूनही तू जा
तुझ्या अस्वस्थ रात्री रोज लुकलुकणार आहे मी

तुला भेटायचे असलेच तर येऊन जा लौकर
जगाच्या स्वस्त ठेल्यावर मला विकणार आहे मी

कितीही धाव आयुष्या, तुझा मी माग काढीनच
नको वाटून तू घेऊस की थकणार आहे मी

जरी हा फास पहिला अन् जरी हा श्वास शेवटचा
तरी मातीत गेल्यावर, खरा पिकणार आहे मी

लढाई आत्मभानाची करे अस्तित्व माझ्याशी
न पुढचे ठाव काही आज पण टिकणार आहे मी

रसास्वादामधे ओथंबले तारुण्य हे माझे
जरा आलीच तर हमखास तुकतुकणार आहे मी

....रसप....
१७ मार्च २०१६

http://www.ranjeetparadkar.com/2016/03/blog-post_17.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wahhhh......खूपच सुंदर रणजितजी .... काय बोलावे !! प्रत्येक शेर अगदी जबरदस्त ताकदीचा बनलाय ...आवडली संपूर्ण गजल