मैत्र

Submitted by विद्या भुतकर on 9 March, 2016 - 21:04

मला वाटतं पूर्वी मी फार पटकन मैत्री करायचे. निदान पुढे त्याचा त्रास होईल किंवा नाही असा तरी विचार करायचे नाही. शाळेतल्या आणि कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी कसे झाले आठवत नाही. इतके वर्षं झाले तरी सुटले कसे नाहीत हे ही कळत नाही. अधे मध्ये काही जोडले गेलेही तरी आता तसं पटकन जमत नाही. कुणाशी नवीन मैत्री करायची गरज वाटत नाही. जे आहे ते छान चालू आहे असे वाटते. इथे येउन एक वर्षं होत आलं तरी मला लोकांशी ओळख करून घ्यायची काही घाई नव्हती. त्यामुळे मीही खूप प्रयत्न केले नव्हते कुणाशी वेळ काढून बोलायचे.
पण ती झाली ओळखीची, नेहमी हसतमुख आणि उत्साही. बायका म्हणले की गप्पा, गॉसिप, स्वत:च्या मुलांबद्दल चर्चा आणि नवरयाबद्दल तक्रारी या पलीकडे काय असणार? खरेतर तशीच सुरुवात झाली बोलायला. मग एक दिवस कॉफीसाठी थांबले होते तेव्हा गप्पा मारल्या. म्हणले, 'अगं तुमची ती फिल्टर कॉफी खूप आवडते मला'. म्हणाली, 'घेऊन येईन'. एकदा तिला विचारले, 'मला ऑन द वे पिक करशील का?', तर आलीच आग्रहाने. जाताना मग बोलत होतो ऑफिसमध्ये साधे 'हाय' सुद्धा न करणाऱ्या लोकांबद्दल. म्हणाली,' नाही बोलत याचे वाईट वाटत नाही, पण त्यांनी तसे केलेलं आपण चालवून घेतोय, यात आपल्यातला एक चांगला हिस्सा हळूहळू नष्ट होतो असं वाटतं.' ती असं म्हणाली आणि वाटलं, 'अरे ही आपल्यासारखेच बोलते की.' मग काय गट्टी जमलीच.
पुढे मग पुस्तकांबद्दल गप्पा झाल्या कधीतरी. तिला आवडलेलं तर कुठलं मला आवडलेलं. आमच्या भाषा वेगळ्या त्यामुळे पुस्तकं वेगळीच असणार. इंग्रजीतूनच बोलणं व्हायचं. एका तमिळ पुस्तकाबद्दल बोलली. कसं चेन्नईला जाऊन आणलं याची गंमतही सागितली. ऐकून वाचावसं वाटलं. या सोमवारी घेऊन आली तेही. आणि रविवारी बनवलेले गुलाबजामही. सकाळी जागेवर पोचले तर गुलाबजामचा डब्बा आणि पुस्तक डेस्कवर होतं. खूप दिवसांनी भारी वाटलं कुणीतरी असं छान काहीतरी आपल्यासाठी केलं याचं.
एकदा दुपारी जेवताना, मी तिला काही खास जेवण बनवले ते फोटो दाखवले. म्हणाली अग मलाही आवडते असे जेवण बनवायला आणि फोटो काढायला. Happy अजून एक दोन रेसिपीही शेअर केल्या जेवताना अगदी तोंडाला पाणी सुटेपर्यंत. घरी परत निघताना तिला सांगत होते, आजकाल एक गाणं सारखं ऐकतेय 'एअरलिफ़्ट' सिनेमामधलं. म्हणाली,'कुठलं गं?' ट्रेनमध्ये चढता चढता तिने विचारून ते शोधून घेतलं. म्हणाली वाटेत ऐकते. आज घरी गेल्यावर मेसेज आला होता,'थांक्यू फॉर द सॉंग डिअर'. गाणं ऐकताना माझा स्टोप चुकला असता ना? असा खोटा रागही. Happy माझंही असंच होत कधीकधी म्हणून हसले.
विचार करतेय बहुदा अशीच छोट्या गोष्टीतून सुरुवात होत असेल चांगल्या मैत्रीची. हळूहळू आम्ही मैत्री स्वीकारत आहे असं वाटतंय. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान Happy

<< त्यांनी तसे केलेलं आपण चालवून घेतोय, यात आपल्यातला एक चांगला हिस्सा हळूहळू नष्ट होतो असं वाटतं.>> + १११११११११११११

khup Chhan , mi fan ahe tumchya likhanachi......