जोक कसा मारायचा?

Submitted by विद्या भुतकर on 7 March, 2016 - 23:57

जोक कसा मारायचा? घाबरू नका डिस्क्लेमर टाकत आहे.
डिस्क्लेमर: ही पोस्ट जोक कसे लिहावे, बनवावे किंवा सांगावे यावर नाहीये. तर ही पोस्ट 'हाऊ टू किल अ जोक?' यावर आहे. मराठीमध्ये शब्दश: भाषांतर केल्यामुळे असा घोळ होणे साहजिक आहे. मी अजिबातच 'जोकाळू' (हा ही नवऱ्याचा शब्द वापरत आहे) वृत्तीची नाहीये. उलट जरा 'खडूस' च म्हणाल तर खोटे नाही. माझे सर्व मित्र मैत्रिणी केवळ त्यांच्या चांगलेपणामुळे माझे मित्र आहेत, माझ्या नाही. माझे सर्व मित्र -मैत्रिणी माझी ही पोस्ट वाचून जोक सांगायचे किंवा पाठवायचे बंद करतील याची मला खात्री आहे. असो घडाभर तेल पाजळून झालेलं आहे तर मुद्द्याचं बोलते.

जोक सांगणे ही एक कला आहे तसेच जोक "मारणे" ही सुद्धा असावी असं मला वाटतं. आता मी माझे खडूस वागण्याचे असे रहस्य सांगितले नसते पण माझ्याच मित्र-मैत्रीणीना का त्रास? बाकी लोकांना पण होऊ द्या की. म्हणून हा उपद्व्याप.

१. आज काल व्हॉटस एप वर खूप जोक येत राहतात. त्यातले बरेचसे चांगले पण असतात. नवीन जोक आला की तो इतका फॉरवर्ड होत जातो की कमीत कमी चार पाच ग्रुपवर एकच जोक येतो. त्याच्यावर मग स्मितहास्य, तोंड उघडून हसू, डोळे बंद करून जोरजोरात हसणे तर डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणे असे अनेक प्रकारचे स्माईली चे उत्तर येते. पण असा फॉरवर्ड केलेला जोक मारायचा असेल तर पाठवणाऱ्याला स्पष्ट सांगायचे, "अरे, किती जुना जोक पाठवतोस? जरा नवीन कायतर पाठव की." बिचारा.
२. पी. जे. - हा प्रकार म्हणजे एखाद्याने कानात मारली तरी चालेल पण जोक नको असा वाटणारा पांचट किंवा फालतू जोक.
उदा: हनी सिंगच्या मोठ्या भावाला काय म्हणाल?

.

.

.

ज्येष्ठमध.

घ्या मारून !!
अशा जोकला योग्य उत्तर देणे म्हणजे स्वत:ला त्रास करून घेणे आहे. त्यामुळे अशा जोकला मारण्यासाठी फक्त एकाच उपाय, दुर्लक्ष करणे. कुणी पाठवला असेल तर त्याला 'जेवलास ना?' वगैरे संबंध नसलेले प्रश्न विचारावा.
किंवा समोर असेल तर कुणीच काहीही बोलले नाहीये असे तोंड करून समोरचे काम करत राहावे.
३. स्मार्ट जोक: आजकाल केवळ ठराविक ग्रुपच्या लोकांना कळतील असेच जोक पण येतात किंवा सांगतात. म्हणजे केवळ केमिकल इंजिनियर साठी किंवा 'जावा डेव्हलपर साठी' इत्यादी. असा जोक सांगितलाच कुणी तर गोंधळलेला चेहरा करावा. त्यामुळे समोरच्या जावा डेव्हलपरला पूर्ण जोक समजावून सांगायला लागला पाहिजे. त्याने समजावले तरी समजले नसतेच किंवा न समजल्याचा आव आणावा. बस म्हणायचं समजावत ! जोक्स ऑन यू !! Happy
४. डिस्कशन जोक: असा जोक म्हणजे ज्यात कुणाची किंवा कुठल्या वस्तूची चेष्टा केली आहे आणि तोच मुद्दा घेऊन एकदम महत्वाचे डिस्कशन सुरु करावे.
उदा: कुणी सांगितले की माझे आय-फोनचे हेडफोन फारच भारी आहेत कारण ते दोन चार वेळा मी खिशात तसेच ठेवले गेले आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत. हसायचे सोडून मग मी म्हणायचे, "अरे हो खरंच ते हेडफोन भारी आहेत. आणि बाकीचे कसे खराब आहेत". बाकी लोक पण मूळ मुद्दा विसरून डिस्कशन मध्ये भाग घेतील. Happy यामध्ये तुम्हाला जोक कळलाच नाहीये असे वाटण्याची दाट शक्यता आहे, मग त्यात तीन नंबरचा मुद्दा परत कामात येतो. समजावायला सांगा. Happy
५. भांडण जोक : आज काल बायकांवर, नवरा-बायकोवर इ बरेच जोक येत असतात. मध्ये एकाने, 'अरेंज मेरेज' आणि 'लव मेरेज' केलेल्या बायकोची रोटी कशी असते याचे चित्र पाठवले होते. आता जोक म्हणून नुसते सोडून द्यायचे नाही. स्त्री हक्कावर भांडायचे. केवळ चपाती बनवण्यासाठीच लग्न केले आहे का असे विचारायचे? असे अनेक प्रकारचे विषय मिळू शकतात भांडायला. जोक सांगणारा नक्की पळून जाईल. Happy
एव्हढेच लिहिल्यानंतर कळले आहे की माझे नाव सर्व मुद्दे खोडून काढण्यासाठी माझ्याशीही कुणीतरी भांडायला येतील. मी जोक वरून भांडू शकते तर अशा पोस्टवरून का भांडणार नाहीत? हसवण्यासारखे चांगले काम नाही. कुणाला हसवले तर वाईट काय आहे त्यात इ.
त्यामुळे अजून एक डिस्क्लेमर टाकून इथेच थांबते. Happy

अजून एक डिस्क्लेमर: वरील पोस्ट केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. कुणाचे मनोरंजन हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण त्यात कुणाचे मन दुखावण्याचा हेतू नाही. (मित्रांना त्रास देण्याचा असू शकतो. )
त्यामुळे कृपया चू.भू.द्या. घ्या.
पोष्ट टाकल्यावर लक्षात आले की आज महिला दिन आहे. यासारखा चांगला मुहूर्त मिळणार नाही हे प्रयोग करून बघायला. Wink आज महिला दिन तर 'बेंदूर' हा पुरुषदिन असा जोक नक्की येईल, तयार राहा. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. हलकं फुलकं.
ज्येष्ठमध>>>> Angry

हा हा! छान लिहिलंय! Happy

अजून एक प्रकार आहे जोक मारायचा. तो म्हणजे त्याचा उत्तरार्ध लिहुन पार जोकची वाट लावुन टाकायची.
उदा. व्हॉट्सॅपवरिल हा जोकः
मुलगा मुलगी बघायला जातो.
मुलगा: तुला व्हॉट्सॅप चालवता येतं का?
मुलगी: नाही. लग्नानंतर तुम्हीच चालवा, मी मागे बसेन.
मुलगा (ओरडून): हीच मुलगी पाहिजे, हिच्याशीच लग्न करणार.

यावर आपण उत्तरार्ध टाकायचा:
मग मुलगी ओरडते: "बाबा हाकला या पोराला. एकतर व्हॉटसॅप "चालवता" येते का असा काहितरी गावंढळ शब्दप्रयोग करतो आणि त्यावर मी चेष्टा केली तरी याला कळत नाही."

यातले बाकी मुद्दे पटेश
ज्येष्ठ मध चा जोक मला स्वतःला खूप आवडतो आणि असे शब्दावरुन असलेले सर्व पीजे Happy
त्यामुळे त्याबाबतीत सहमत नाही

आवडला..

पण मी सहसा ज्योक मारत नाही हो.. उगाच समोरच्याचा विरस वगैरे होतो ( त्यापेक्षा पाल, झुरळं, माश्या, उंदीर वगैरे मारणे सोपे पडते Happy )

मला एक समजत नाही. आजकाल मास्तर - गण्या, मास्तर - बंडू असे जे जोक येतात ते जोक लिहून झाल्यानंतर खालील प्रकारची वाक्ये पेरण्याचा बिनडोकपणा कोणी सुरू केला असावा?

१. मास्तर हिमालयात गेले आहेत
२. मास्तर आता मेंढ्या हाकतात
३. मास्तर आता सैरावैरा पळत आहेत
४. मास्तर आता भाजी विकतात

वगैरे वगैरे

प्रकारची वाक्ये पेरण्याचा बिनडोकपणा कोणी सुरू केला असावा?>>
ह्यातच उत्तर आहे, वरचा भाग पोकळ असलेल्याने सुरु केलं असावं Wink हघ्या

ह्या बिनडोकपणाचा जनक कोण ते माहीत नाही, पण कदाचित मास्तर - गण्या, मास्तर - बंडू यांच्यात घडणारे संवाद पुरेसे विनोदी नाहीत अस लेखकाला वाटल असेल, म्हणुन मग लोकांना हसायला कारण मिळण्यासाठी असल्या अ‍ॅडीशन्स..

खर सांगायच तर अख्ख्या संवादांपेक्षा या वन लाईनरमुळेच जास्त हसायला येत..

छान विषय, चांगला मांडलाय.....
पण मला "जोक" वगैरे फारसे कळतच नाहीत, कळले तरि फार उशिरा कळतात, सबब ते मारायचि वेळ सहसा येत नाही (उलट मला जोक सांगणार्याचा तो कपालबडवतियोग असतो... Proud )
तरीही,
वरील उपाय वगैरे बाबी मी "अनुल्लेख" मारण्याकरता मात्र सर्रास करतो..... Happy
(बर्का बेफिकीरभौजी, काल कट्ट्यावर तुम्ही कैत्रि शंका काढली होतीत..... तर ते हे अस आहे..... ) Happy

तुम्ही सांगितलेले उपाय मायबोलीवर वापरले जात होते, आज उद्देश कळाला. . आज महिला दिनानिमित्त एका महिलेकडून छान प्रबोधन झालेय धन्यवाद!

मस्त
काही मी वापरत असलेली वाक्ये..

तू स्वता बनवला आहेस का हा जोक?

पोरींना पाठवायचे जोक्स ग्रूपवर टाकू नकोस बे

केवढा फालतू जोक Lol Lol Lol
... या जोरजोरात हसणार्या स्माईली जोकसाठी नाही तर जोक टाकणार्यासाठी असतात हे वेगळे सांगायला नको.
काही वेळा मग समोरून उत्तर येते, काही का असेना हसलास ना. याला परत उत्तर देत बसायचे नाही.

हे झाले व्हॉटसपचे. पण प्रत्यक्षात असा पोपट करायला खडूसपणा आणि त्याला साजेसा स्पष्टवक्तेपणा अंगी उपजत असावा लागतो.

मला यातले काही जोक्स वाचायला मजा येते.'मला चंद्राकडे बघायला आवडते' वाला तीन शाळेतल्या मुलांचा जोक आहे तो आवडला होता.काहीकही मास्तर वाली जोक खूप उद्धट वाटतात.
पण एकंदर स्क्रॉल न करता वाचता येईल असा छान जोक असला तर मनोरंजन होते.'आशा पारेख आणि राजेश खन्ना जुन्या जमान्यात सेल्फी स्ट्क वापरताना ' असा एक फोटो होता तो हसवून गेला होता.
जोक पाठवणारे चालून जातात.अमक्या तमक्या जाती धर्मा बद्दल विष पसरवणारे फॉरवर्ड डोक्यात जातात.

अरेरे रात्री पोस्ट करून झोपून गेले. त्यामुळे एकदम महत्वाच्या चर्चेला मुकले असे दिसत आहे.
मास्तरांचे जोक ओढून ताणून असतात हे पटलं. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन.
बाकी सर्वाना पण वाचल्याबद्दल आणि कमेंट साठी धन्यवाद. आता आपण एकटेच त्रास देतोय असे वाटणार नाहि.

आज महिला दिन तर 'बेंदूर' हा पुरुषदिन असा जोक नक्की येईल <<<

  • किती घिसापिटा जोक ! आजकाल "नया है यह" असं भासवत लोक सगळे घासून घासून गुळगुळीत झालेले जोक सांगतात! आणि वरून हसण्याची अपेक्षा करतात !
  • त्यापेक्षा हा जोक वाचा! (खरोखरीच नया है बरे का!)
    पुरुषदिनाला बेंदूर, तर महिलादिनाला काय म्हणतील?
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    भाईपास!
  • बाय दी वे बेंदूर म्हणजे काय? या शब्दातून काहीच अर्थबोध होत नाहीय. तरीही तर्क करायचा प्रयत्न केल्यास उगीच काहीबाही डोळ्यासमोर येते.
  • जाऊ दे! आजकाल महिलादिनाच्या नावे काहीही खपवायची फ्याशन आली आहे. झालं.

.
.
.
.
.
विद्याजी, जमले का जोक मारायला? Lol Light 1

गंमत केली हो. तुमचा लेख आवडला. आणखी थोडा मोठा असता तरी चालला असता.

विद्याजी, जमले का जोक मारायला? हाहा दिवा घ्या >> Sorry जोक कळला नाही. समजावून सान्गाल काय? Happy

विद्या.

Pages