समुद्र किनार्‍यावर/बीचवर जाताना घ्यायची काळजी

Submitted by चैत्रगंधा on 2 February, 2016 - 22:38

कोकणात मुरूड-जंजिरा ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. बरोबर लहान मुलं असल्याने जंजिर्‍यावर जायचा विचार नाहीये.
पण मुरूडला नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने काळजीत पाडले आहे. तो समुद्रकिनारा सुरक्षित आहे का?

साधारणपणे बीचवर जातांना काय काळजी घ्यायला हवी? भरती/ओहोटी चे टाईमटेबल आधी कळते का? ऑनलाईन शोधले पण मुंबईचे मिळाले फक्त.
प्लिज टिप्स द्या. पहिल्यांदाच लहान मुलांना घेऊन जात आहे.

********************************************************************************************
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद लोक्स Happy
प्रतिसादातली शक्य तितकी माहिती खाली अ‍ॅड केली आहे. काही राहिले असेल तर सांगा.

भरती - ओहोटीची गणिते:
--------------------------
१. तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. . उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी

२. भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अ‍ॅड करतात.
नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)
तसेच ९ * ३ = २७ मिनीटे
एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे
यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.

३. तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.

काही गोल्डन रूल्स:
-----------------------
१. स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.

२. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.

३. काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.

४. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.

५. किनार्‍यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.

६. जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.

७. कोणत्याही समुद्र किनार्‍यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो.

८. बीचवर अशा काही अ‍ॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या.

धोकादायक समुद्रकिनारे:
---------------------------
१. काल सकाळ मध्ये आल होते की नागाव, किहीम हे बीच सुरक्षीत नाहीत, तिथे गार्ड्स नाहीत. त्यामुळे पाण्यात उतरताना लाम्बवर, अती खोल जाऊ नका.

२. गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. त्यापेक्षा भंडारपुळ्याला जा (दीड दोन किमी अंतरावर आहे) तिथला किनारा सुरक्षित आहे तरीही स्थानिकांना विचारून घ्या.
मांडवी बीच (काळा समुद्र) रत्नागिरी: पाण्यात उतरू नका. अनेक खडक आहेत.
पांढरासमुद्र फार सुरक्षित बीच आहे पण खूप घाण आहे, जाववत नाही असली अवस्था.
भाट्ये बीच (रत्नागिरी) : खेळण्यासाठी खूप चांगला बीच पण चेंजिंग रूम वगैरे सोयी नाहीत. बीचवर काही रीझॉर्ट आहेत तिथे सोयी आहेत. पाण्यात उतरण्यासाठी झरीविनायकापेक्षाही पुलाजवळच्या किनार्‍यावरून उतरा.
वेळणेश्वरः खेळण्यासाठी चांगला बीच. बर्‍याच सोईदेखील आहेत.
गणेशगूळे बीचः आमचा आवडता पण गर्दी फार नसते.

३. कोणत्याही बीच च्या लगेच शेजारी लागुनच डोंगर/टेकडी असेल, किनारा खडकाळ असेल, तर तो जास्त उताराचा अरुंद किनारा हमखास धोकादायक असतो. (उदा. गणपतीपुळे/हरिहरेश्वर, हेदवी) इत्यादी.
आंजर्ल्याचा किनारा खरे तर अतिशय सुरक्षित मानला जातो. पण तेथिल दोनही टोकांचे भाग असुरक्षित आहेत, एकीकडे वर म्हणले तसा डोंगर आहे, तर दुसरीकडे नदीचे पात्र येऊन मिळते.

४. अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.

मुलांसाठी बीचवर जातांना जवळ ठेवायच्या वस्तू:
---------------------------------------------------
१. रबरी ट्यूब्ज
२. प्यायचे पाणी
३. सनबर्न/ जळजळ टाळण्यासाठी क्रिम्स, कॅप्स
४. बीच टॉईज
५. कोरडा खाऊ
६.ओले कपडे, मातीने माखलेले टॉवेल ठेवता येतील अशा प्लॅस्टिक पिशव्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी स्थानिक गावकर्‍यानाच विचारा भरती-ओहोटीबद्दल. त्यानाच जास्त माहिती असते. माहिती विचारताना अजीबात सन्कोचु नका. ते तिथले आहेत, आपण देशा वरचे आहोत. त्यामुळे आपल्या पेक्षा कमी शिकलेले असले तरी त्यान्चे जीवन त्यातच गेले आहे ही जाण प्रत्येकाने ठेवावी.

काल सकाळ मध्ये आल होते की नागाव, किहीम हे बीच सुरक्षीत नाहीत, तिथे गार्ड्स नाहीत. त्यामुळे पाण्यात उतरताना लाम्बवर, अती खोल जाऊ नका.

लहान मुलान्करता छोट्या रबर ट्युब्ज ( पाण्यात उतरताना घालतात त्या) घ्या. किनार्‍यावर जी दुकाने असतात त्यात सर्व असते.

बोटीत बसणार असाल तर आधी क्ष्मतेपेक्षा जास्त तर भरली जात नाही ना हे बघा.

तुम्हाला प्रवासासाठी खूप शुभेच्छा,मुलान्ची काळजी घ्या.

तिथल्या लोकल लोकांना विचाराच. पण भरती - ओहोटीचं सोप्पं गणित मला नुकतंच सेनापती कडून कळलंय - तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी. हे गणित वापरून आधी प्लॅन ठरवायला सोयीचं आहे.

मी गेले होते य शनिवार आणि रविवारी मुरूडला.
मुरुडचा किनारा खूपच छान आहे. जंजिर्याला जाणेदेखिल सुरक्षीत आहे. मोटरबोट ने नेतात. कधीकधी किल्ल्याच्या दाराजवळ बोटींची गर्दी होते आणि मोटरबोटला परतायची घाई असते म्हणून मोटरबोटीतून शिडाच्या होडीत बसवतात किल्याच्या दाराजवळच आणि मग आपल्या होडीचा नंबर लागेल तेव्हा किल्ल्यात उतरवतात. मोटरबोटचे तिकीट काढताना किनार्यावरच तशी स्पष्टं कल्पना देतात. शिवाय ४५ लोक झाल्याशिवाय तिकीट देतच नाहीत कारण ४५ ची बोट आहे. त्याहून जास्तंही बसवत नाहीत. बरेच लोक तान्ह्या बाळांना घेऊनही आले होते. मुळीच धोका नाही.

जिथे हा अपघात झाला तिथेच खोली घेऊन राहिले होते मी. तिथला किनारा थोडा खराब आहे. तिथे पाण्यात खड्डा आहे त्यामुळे तसेही तिथे कोणी पर्यटक जात नाहीत. तिथले लोकच सांगतात जाऊ नका म्हणून (या मुलांनाही सांगितले होते). तो भाग वापरात नसल्याने तिथे कचराही खूप आहे. कोळी लोकांची जाळी तिथे तशीच पडलेली असतात. थोडं पुढे, मुख्य चौपाटीजवळ छान आहे. पण तरीही, किती आत जायचं ते आपण ठरवलं पाहीजे. कमरेपर्यंतच्या पाण्यात जायला हरकत नाही पण त्याहून पुढे त्रासदायक होऊ शकतं (हे जवळ जवळ सर्वच किनार्यांसाठी). तिथले लोक सांगतात लगेच तुम्हाला.
किनार्याजवळच मित्राचे लॉज आहे. त्यानेही सांगितले की मुलांना तिथल्या घोडे फिरवणार्यांनी वगैरे सांगितलं होतं नका जाऊ म्हणून. जेवणाची वेळ होती आणि सर्वांना जेवायला यायला सांगितले होते तरीही काही मुले गेलीच. जबाबदारीने वागले की अश्या घटना टाळता येतात. शिक्षकांनी सगळी मुली आलीत का ते नीट मोजलं असतं तर बरं झालं असतं पण एवढ्या मोठ्या मुलांच्या मागे काय लागावं म्हणून त्यांनीही टाळाटाळ केली असावी. नेमकं काय नी कसं झालं त्यांनाच माहीत.

१८-२० कि.मी. वर काशिद आहे. तिथे अजूनच छान स्वच्छ किनारा आहे. मुख्य गर्दीपासून आजूबजूला शांतता व एकांत मिळू शकतो कारण फिरण्यायोग्य किनारा खूप मोठा आहे.

लहान मुले असो वा नसो सोबत... जंजिरा पर्यंत चा बोटी चा प्रवास अजिबात सेफ नाही... अतिशय वाईट अनुभव आलाय आम्हाला.

मुंबई आणि कोकण किनारपटवर भरती-ओहोटीच्या वेळेत फार फरक नसावा, कारण मुंबई आणि कोकण हे एकाच रेखावृत्तावर असल्याने चंद्रोदय-सुर्योदयाच्या वेळेत जास्त फरक नसतो. असलाच तर फार फार १० मिनीटांचा असतो.

तसंही गुडघाभर पाण्यात जाणे सेफ असते. त्यातही अनवाणी पायांनी वाळूचा मऊ मऊ स्पर्श अनुभवणे म्हणजे..
पण आता जवळ जवळ सगळ्याच बीचेस वर दारु पिऊन बाटल्या फोडून काचा तशाच टाकलेल्या असतात. तेव्हा पायाला इजा होण्याची शक्यता असते.

हे काचेचे तुकडे वाळूत खेळताना (किल्ले बनवणे) पण त्रासदायक ठरु शकतात.

काही बीचवर लोक बाईक नि कार पण चालवत असतात. तेव्हा लहान मुलांना जास्त दुर जाऊ देऊ नका.

मुख्य, ओहोटीच्या वेळी खूप आत जाऊ नका, नॉर्मली लोकं ओहोटी आहे म्हणून जास्त आत जातात.. पण अशा वेळी पायाखालची जमीन आत खेचली जाते आणि खूप आता गेला तर बाहेर पडणे कठीण होते.. भरतीची वेळ त्यातल्या त्यात योग्य.. फोर्स किनार्याच्या दिशेने असतो. शुभेच्छा!

गौरी,

त्या भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अ‍ॅड करतात.

नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)

तसेच ९ * ३ = २७ मिनीटे

एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे

यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.

कालच नवमी होती, कालची भरतीची वेळ ७:१० होती. अर्थात एकदम तंतोतंत वेळ मिळत नाही, पण ५-१० मिनीटे मागे पुढे झाली तरी आपल्या सारख्या सामान्य पर्यटकांना फारसा फरक पडत नाही.

मुरूडचा समुद्रकिनारा सुरक्षित आहे. ही दुर्घटना जिथे घडली ती जागा मुख्य किनार्यावर नाही. त्याच जागी ६ महिन्यांपूर्वी ६ जणांचा बळी गेला होता. ते तर नोकरदार होते, तरीही जबाबदारीने न वागता धोक्याच्या जागी पाण्यात गेले. स्थानिकांना विचारूनच पाण्यात जावे हेच उत्तम.
तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.

गमभन, वावे, वरील उपयुक्त गणिता बद्दल धन्यवाद! Happy

भरती ओहोटीच्या वेळात शुद्ध वद्य पक्षाने काही फरक पडतो का?
वरील गणित हे दोन्ही पक्षांसाठी सारखेच का?

ओहोटी सुरू होइपर्यंत भरती सुरूच असते का? म्हणजे ६ तास रहाते का?
समजा पौर्णिमेला १२ ला भरती सुरू होणार असेल तर त्यातल्या त्यात सेफ पिरीअड काय असेल?
सॉरी बेसिक प्रश्न विचारतेय पण माझे समुद्राबद्दल फारच कमी ज्ञान आहे.

मुरूड माझे गाव आहे, त्यामुळे तिथला किनारा मला ओळखीचा आहे. लहान्पणापासून आम्हाला समुद्रात जाताना सांगण्यात आले आहे की समुद्रात खोलवर जाऊ नका. गुढघ्यापर्यंत पाण्यात जा. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.

व्यवस्थित पीक टाईम भरतीलाच आणि कंबरभर च्या पुढे नाहीच(फक्त मोठ्यांनी). लहान मुलांना रबरी ट्यूब. लाटांचा फोर्स पण त्यांना पाडतो आणि मग नाकातोंडात पाणी जाऊन कधीकधी समुद्राची भीती बसते.

माझी मुलगी पहिल्यांदा "ते पाणी सारखं सारखं बाहेर येतंय" म्हणून समुद्रात जायचीच नाही. स्विमिंग पूल चीच सवय. पण नंतर अगदी कमी पाण्यात लाटांत मांडी घालून बसण्याचा खेळ दाखवला तेव्हा आवडायला लागले.

समुद्र फसवा असतो, वाळू सरकली की तुमचे पाण्याच्या खोलीचे सर्व कॅक्ल्युलेशन्स चुकतात.
लोकांना 'निवांत, जास्त गर्दी नसलेली,नीट क्रिकेट खेळता येईल, मनसोक्त सेल्फी काढता येतील' अशी जागा पाहिजे असते ती शोधण्याच्या नादात अयोग्य जागी जातात आणि पाण्याचा अंदाज येत नाही.

तारकरली किल्ला बघायला गेलो होतो तिथे बोटीत लिहीलेल्या कपॅसिटीच्या १०-१५ लोक जास्त होते.त्यांना विचारले तर 'काही होत नाही हो, लाईफ जॅकेट आहेत' म्हणाले. पुढच्या फेरीला थांबण्याचा पर्याय नव्हता, त्यात परत जास्त लोकच भरले होते. घाबरत घाबरत बोटीतून गेलो.अंतर कमी होते.

ओहोटी सुरू होइपर्यंत भरती सुरूच असते का? म्हणजे ६ तास रहाते का?>>> नाही. हे चक्र असतं म्हणजे आधी ओहोटी असेल तर हळूहळू समुद्राची पातळी आत जाते. ती एका पॉइंटपर्यंत आणि वेळेपर्यंत गेली की नंतर हळूहळू पुढे येऊ लागते आणि भरती चालू होते. ओहोटीला पाणी आत खेचत अस्तं. पायाखालची वाळू आत खेचली जात असते म्हणून ओहोटीला जरी समुद्राची पातळी आत गेलेली दिसली तरी बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. भरतीला पाणी किनार्‍याच्या दिशेने येत असते त्यावेळी समुद्र किंचीत उफाळल्यासारखा वाटतो. पण जरी लाटा जोरात येत राहिल्या तरीही पाणी किनार्‍याच्या दिशेने फेकलं जात असल्याने बुडण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून भरतीच्या वेळी पाण्यात जाणं अधिक सोयीस्कर.

पाण्यात खेळण्यासाठी लहान मुलं सोबत असतील तर खूप खोल पाण्यात जाऊच नका. गुडघ्याइतक्या पाण्यामधेय मुलांना घेऊन भरपूर मज्जा करता येते. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका. जरी पोहोता येत असलं तरी समुद्र म्हणजे स्व्मिंग पूल नाही हे लक्षात ठेवा, आणि जास्त पाण्यात जाऊ नका. पाण्यात उतरताना किनार्‍यावर जर कुणी थांबलेलं असेल तर अधिक चांगलं.

समुद्राच्या पाण्याने काही मुलांना स्किनवर जळजळ वगैरे होऊ शकते अशावेळी लावण्यासाठी काही क्रीम वगैरे सोबत ठेवा.

पाण्याच्या लाटा जोरात आल्याने मुलं हिंदकळून पडतात आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी जाते. म्हणून मुलांवर लक्ष ठेवा. पाणी तोंडात गेलं तर काही मुलं उल्टीदेखील करतात. आईवडील अथवा इतर मोठ्यांनी पाण्यात खेळताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला हवं. जवळपास सोबत प्यायचं पाणी नक्की ठेवा. खारट पाण्यात खेळल्याने खूप तहान लागते.

काही मुलं (जर समुद्र पहिल्यांदाच पाहिला असेल तर घाबरतात. अशावेळी त्यांना जबरदस्तीने पाण्यात नेऊ नका. त्याऐवजी त्यांना किनार्‍यावर बसून खेळू द्या. समुद्रात खेळणं म्हणजे केवळ पाण्यात डूंबणं नाहीच तर वाळूचा मखमली स्पर्श, फेसाळ लाटा, येणारी जाणारी लाटेची गंमत त्यावर पडलेला सूर्यप्रकाश चांदणं हे सर्व पाहणं, किनार्‍यावर असलेले शंखशिंपले गोळा करणे, खेकड्याच्या पाठून धावणं हे सर्व काही आहेच की.

गोल्डन रूल म्हणजे स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे. त्यांना समुद्र आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यांचं आयुष्य इथेच गेलं आहे म्हणून त्यांना जास्त माहिती आहे हे मान्य करणे! एखाद्या मच्च्छीमाराने "इथे खेळू नका, अर्धा किमीवर असलेल्या बीचवर पाण्यात जा" हे सांगितलं तर "इतका मोठा समुद्र आहे, काय होतंय अर्ध्या किमीने?" अशी चक्रम उत्तरे ऐकवण्यात आलेली आहेत.

इथे कोणकोणते समुद्र किनारे सेफ आहेत आणि कोणकोणते डेंजरस आहेत याची यादी करून ही हेडरमध्ये टाकल्यास चटकन संदर्भ मिळेल.

वाचतेय. परत एकदा सर्वांना खूप धन्यवाद. __/\__

मामी, तो पिकनिकचा धागा अथ पासून इति पर्यंत वाचल्यावर गणपती पुळे आणि हरिहरेश्वर हे दोन समुद्रकिनारे सुरक्षित नाहीत हे नोट केले होते. अजून कोणते आहेत? मुरूड सुरक्षित आहे अस इथेच वाचलय.

बरोबर ठेवायच्या वस्तूत क्रीम, बीचवर खेळतांना प्यायचे पाणी, रबरी ट्यूब्ज अ‍ॅड केले आहे.

मामी. मला जे खात्रीने माहित आहेत त्यांची यादी टकत आहे. तरीही योग्य ती खबरदारी घेऊनच पाण्यात उतरा.

गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. त्यापेक्षा भंडारपुळ्याला जा (दीड दोन किमी अंतरावर आहे) तिथला किनारा सुरक्षित आहे तरीही स्थानिकांना विचारून घ्या.
मांडवी बीच (काळा समुद्र) रत्नागिरी: पाण्यात उतरू नका. अनेक खडक आहेत.
पांढरासमुद्र फार सुरक्षित बीच आहे पण खूप घाण आहे, जाववत नाही असली अवस्था.
भाट्ये बीच (रत्नागिरी) : खेळण्यासाठी खूप चांगला बीच पण चेंजिंग रूम वगैरे सोयी नाहीत. बीचवर काही रीझॉर्ट आहेत तिथे सोयी आहेत. पाण्यात उतरण्यासाठी झरीविनायकापेक्षाही पुलाजवळच्या किनार्‍यावरून उतरा.
वेळणेश्वरः खेळण्यासाठी चांगला बीच. बर्‍याच सोईदेखील आहेत.
गणेशगूळे बीचः आमचा आवडता पण गर्दी फार नसते.

आता यात इतरांनी भर घाला.

नंदिनी, छान सांगितलेस.
माझ्यामते मात्र, कोणत्याही समुद्र किनार्‍यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. त्यानंतर मात्र भरती असो की ओहोटि, धोका असतोच असतो. तो कसा?
तर पूर्वीही कुठेतरी लिहिले होते, परत लिहितो.... या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. भरती वा ओहोटीचे वेळेस, लाटेचे परतीचे पाणी या उतारावरुन खाली जात असते, व व्यक्ति जर उताराचे जवळ असेल अन त्या ओघात सापडली तर आत खोल खेचली जाते. ओहोटिच्या वेळेस या पाण्याचा आत जाण्याचा जोर जरा जास्तीच असतो.
ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो. ज्याठिकाणी खोल किनारा असतो, तिथे सहसा लांबलचक लाटा फुटत नाहीत. (अपवाद खडकाळ किनारा/वादळी परिस्थिती). मला इथे आंजर्ल्याच्या किनार्‍याचा फोटो देता येत नाही, नाहीतर त्याच एका किनार्‍या वरच्या सुरक्षित व असुरक्षित जागा दाखवता आल्या असत्या.

मी मुद्दामहून, भरती/ओहोटो, दोनही वेळेस धोकादायकच, असे जाणुनबुजुन म्हणले आहे याचे दुसरे कारण असेही आहे की, ओहोटिच्या वेळेस समुद्र खुप आतवर गेलेला असतो. लोक अगदी तिथवर जातात, घोटाभर पाण्यातच खेळतात, वेळेचे भान रहात नाही. पण भरती सुरू झाली की कित्येकदा , लोक उभी आहेत, परतत आहेत तिथली जमिनीची पातळी व किनार्याची पातळी व मधिल अंतर याचे गणित बिनसलेले असेल, तर लोक परत किनार्‍यापर्यंत यायच्या आतच भरतीच्या पाण्याची पातळी भराभर वाढत जाते, इतकी की कमरेभर, गळाभर पानि हां हां म्हणता येते, अशा वेळेस भरतीच्या लाटेच्या परत जाणार्‍या पाण्यात सापडल्यास गच्छंती निश्चित. शिवाय, ओहोटीमुळे जिथे पुळण (किनार्‍यावर साठलेल्या वाळूचा सपाटसा भाग) संपुन खोल उतार सुरु होतो, त्याच्या अधिकच जवळ पोहोचलेले असता. सबब भरती सुरु होऊनही अपघात घडलेले पहाण्यात आहेत. (गुहागरचा किनारा - तिथे तर किनार्‍यावर एक बेट तयार होते, चारीबाजुंनी पाणी, मधे अडकता, किनार्यावरील कोणाच्या लक्षात आले तर ठीक, नैतर ते बेटही पाण्यात बुडते - या किनार्याचाही फोटो मला आत्ता देता येत नाहीये).

बुडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, रोजच्या आन्घोळीकरता बादलीभर पाण्याशिवाय तुमचा कधीही इतक्या पाण्याशी संबंध आलेला नसतो, अन तरीही तुम्ही तिथे जाता... कमरभर पानी छातीभर झाले की एखादी लाट तुम्हाला सहज आडवे करते, अन अशावेळेस जमिनीवरल्याप्रमाणे तुम्ही पाय खाली टेकवत आधार शोधू लागता जेव्हा की पाण्यात "आडवेच रहावे" हे तरंगण्याचे सुत्र टाळले जाते व बुडत्याचा पाय अधिक खोलात प्रमाणे नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरायला होऊन बेभान झाल्याने घाबरल्याने परिस्थिती भयावह होते. तशात लाटेचा परतीचा जोर जोसात असेल, तर अवघड परिस्थिती होते.
लक्षात घ्या, लहान मुलांना, जर ती आडवी पडली, तर तुमच्या कमरेइतके पाणी सहज बुडवु शकतेच, आतही खेचू शकते. मी स्वतः हा अनुभव धाकटीच्या बाबतीत घेतलेला आहे अन तरी आम्।ई मांडीयेवढ्या पाण्यातच होतो, धाकटीही शाळकरी, पण बुटकी होती, आमचे लक्ष सतर्क होतो, म्हणुन दोघांनीही जाऊन खेचुन धरली, अनुभव असाकी एकट्याचा जोर खेचायला पुरा पडत नाही.
तेव्हा मुद्दा इतकाच, काळजी घ्या, समुद्र म्हणजे मैदान नाही.
तो तितकाही धोकादायक नाही, जे गेटवेऑफ इंडिया ते एलेफण्ट केव्हज वगैर पोहोतात, पण ते त्या माध्यमाशी कष्टाने अभ्यास करुन सरावलेले असतात, तेव्हाच तो धोकादायक नाही.
अन्यथा, घरात लहान मूल असेल, तर बाथरुम मधे उघडि ठेवलेली अर्धी भरलेली बादलीही जीवघेणी ठरु शकते.
दुर्दैवाने, मौजमजामस्ती म्हणजे "बेसावधपणा बाळगलाच पाहिजे" किंवा दुसर्या शब्दात, सावधपणा/अखंड सतर्क रहाणे म्हणजे मौजमजामस्तीच्या काहीतरी विरुद्ध आहे असा तरुणाईचा समज असतो. व तोच समज मुरुड सारख्या घटना घडण्यास कारणीभूत ठरतो. बाकी उरतात त्या बाबी फक्त भौतिक मोजमापांच्या चर्चा असतात.

कोणत्याही बीच च्या लगेच शेजारी लागुनच डोंगर/टेकडी असेल, किनारा खडकाळ असेल, तर तो जास्त उताराचा अरुंद किनारा हमखास धोकादायक असतो. (उदा. गणपतीपुळे/हरिहरेश्वर, हेदवी) इत्यादी.
आंजर्ल्याचा किनारा खरे तर अतिशय सुरक्षित मानला जातो. पण तेथिल दोनही टोकांचे भाग असुरक्षित आहेत, एकीकडे वर म्हणले तसा डोंगर आहे, तर दुसरीकडे नदीचे पात्र येऊन मिळते.
आम्ही एक लक्षण बघतो, ते म्हणजे किनार्‍यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.
समुद्राचे काठावर गेल्यावर, मागे झाडांची रांग/किनारा किती दूरवर व उंचावर आहे याचाही अंदाज घ्यावा लागतो. गणपतीपुळे येथे ही उंची अफाट भासते. तिथे घोटाभर पाण्या पेक्षा जास्त पुढे जाऊच नये.
जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये. हा संकेत आम्ही कटाक्षाने पाळतो.
हा संकेत समजावण्याकरताच मला आंजर्ल्याचया किनार्याचा फोटो हवा होता.

समुद्राक डे पाठ व हातात लहान मूल घेउन सेल्फी काढायचा चुकूनही प्रयत्न करू नका. हे सर्व अपघात. इव्हन मुंबई समुद्रकिनार्‍यावरचे अपघात देखील सेल्फी काढायच्या नादात झाले आहेत. सुरक्षित जागेवर उभे राहूनच सेल्फी किंवा इतर फोटो काढा.

मी मुरूड जंजिरा केले आहे. पण बोटीतून जंजिरा केले फक्त. मुरूड बीच वर पाण्यात गेलेच नाही.
लाईफ गार्ड व लोकल्स चे ऐकणे हे बरोबर सल्ले आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आम्ही समुद्रालाही देव मानतो, त्याच्याशी श्रद्धेने भक्तिने संवाद करतो, त्याची हेळसांड होईल अशारितिने वागत नाही, व समुद्रास खार्या पाण्याच एक भलामोठ्ठा नैसर्गिक साठा इतकेच न मानता, त्याचा "देव" म्हणून, निसर्गाची ताकदवान शक्ति म्हणून "आदरच ठेवतो" .
दुर्दैवाने, श्रद्धा/भक्ति /विश्वास या गोष्टींच्या फाट्यावर मारल्याने वा या गोष्टी त्याज्य ठरविल्याने, "आदरयुक्त भिती" हा प्रकारच नाहिसा झाला आहे. त्याचे परिणाम केवळ समुद्र किनार्‍यावरच नाही तर रस्त्यारस्त्यांवरही दिसतात.
आम्हाला आमच्या बुप्रा व्यक्तिस्वातंत्र्यापोटी, कशाचीच भिती बाळगायची नसते, आदर ठेवायचा नसतो, मग ते आईबाप असोत, आजीआजोबा नावाचे अनप्रॉडक्टिव बोज असोत, वा समुद्र, वा वाहने वा डोंगर... कशाकशाची भिती आम्हांस नसते, व असतो तो फक्त अन फक्त मुजोरीपणा की यावर आम्ही आमच्या "भौतिक कौशल्याने" मातच करु.
बहुतेक अपघात या खोट्या असलेल्या अवास्तविक अतिआत्मविश्वासापोटीच होतात, मग ते समुद्रातले असोत वा रस्त्यांवरचे.
आम्हाला दुसर्‍याने काही सांगितले/सुचवले तर तो आमचा अपमान वाटतो,
आम्हाला काय अक्कल नाहीये का? आम्हाला काय कळत नाही का? अन हा फाटक्यातुटक्या अर्धवट कपड्यातला लंगोटी लावलेला काळाबेंद्रा फाटका माणूस आम्हाला असे कसे काय सांगू शकतो की तिकडे जाऊ नका? आम्ही जाणारच... कै होत नै, झाले तर बघुन घीउ..... दुर्दैवाने समुद्रात जाणे/कडेकपारी चढणे/रस्त्यावरुन दोनशे सीसी पेक्षा जास्त सीसीच्या बाईक हेल्मेटशिवायच बुंगाट चालविणे हे "शनिशिम्गणापुरच्या" चौथर्यावर चढण्याच्या आंदोलना इतके सोप्पे नसते. फिल्म इन्स्टिट्युटच्या बाहेर लाल बावटे लावुन घोषणाबाजी/पत्रकबाजी करण्यायेवढेही सोप्पे नसते. तिथे तुम्ही सश्रद्ध असा वा नसा, देव माना वा नका मानू, कोणत्याही जातीधर्माचे आर्थिक स्थितीचे असा, तिथे चुकीला क्षमा नसतेच नसते.

सुदैवाने हे लहानपणीच शिकवणारी आई आम्हाला भेटलि होती, अन आम्हीही, ती जे सांगते ते मनोभावे ऐकुन घेऊन लक्षात ठेवले व आचरणात आणले, असे नै म्हणले कधी की आइ तू फक्त सातवि पास, तुला काय कळतय, मी बघ ग्रॅज्युएट झालोय/होतोय, कॉम्प्युटर चालवतोय, आज जग कुठुन कुठे चंद्रावर्/मंगळावर चाललय, अन तू मला इथे जाऊ नको तिथे जाउ नको हे काय सांगति आहेस? नाही, आम्ही असे कधीच म्हणले नाही.

लिंबुभौ, तुमचे वरचे दोन्हीही प्रतिसाद माहीतीपूर्ण आणि महत्वाचे आहेत. आंजर्ला समुद्रकिनार्‍याचे फोटो तुम्हाला 'जिप्सि' च्या एकाद्या चित्रमालिकेमध्ये मिळतील.

जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.
>> हे कळालं नाही, लिंबूकाका.

विजय, चैत्रगंधा, मी इमेज द्यायचा प्रयत्न केलाय लिंकद्वारे.
मधिल एकच फोटो मला दिसतो आहे. हा आंजर्ल्याचा किनारा आहे.
नीट बघितल्यासः
फोटोचे मध्यभागी डावीकडिल समुद्रात आतुन दूरवरुन लांबलचक लाटा येताना दिसतील. हा भाग सुरक्षित आहे.
याच फोटोचे खालील बाजुस किनार्‍याचे अगदी जवळच लाटा उठताना दिसताहेत, जितेह लाटा उठताहेत, तिथुन पुढे खोल जागा आहे. व ही जागा किनार्‍याचे अगदी लगत आहे, कंपेअर टू वरील मध्यभागी दिस्णारा समुद्र.
खालिल बाजुस नदीचे मुख आहे (नदी येऊन मिळते/खाडी) या ठिकाणच्या लाटा लांबीला कमी आहेत. तोकड्या आहेत व फारच कमी अंतर "वहात येऊन" लगेच फुटताहेत.
एक्/दोन वर्षामागे नेमक्या याच जागी एक नवखे कुटुंबास अपघात होऊन काही जण दगावले होते.

यापेक्षाही चांगला फोटो मिळायला हवा होता, तर अधिक चांगल्या रितीने समजले असते.

सोनु यांची पोस्ट छान आहे.

लिंब्या आंजर्ले Happy

असो. तर समुद्रच काय कुठल्याच पाण्याशी मस्ती करु नये. एक अनुभव आहे.

कान्द्या, तुझ्याकडे मागे बर्‍याच वर्षांपूर्वी काढलेले आंजर्ले किनार्‍याचे फोटो आहेत, तर जमल्यास त्यातिल टाक इकडे.
नैतर किमान लिंक तरी दे, मला फोटोच्या वरच्या टोकाची डोंगररांग व तेथे न उमटणार्‍या लाटा दाखवायच्या होत्या. गुगल मधे फोटो मिळतात, पण मला लिन्क देता येत नाहीये.

दुर्दैवाने समुद्रात जाणे/कडेकपारी चढणे/रस्त्यावरुन दोनशे सीसी पेक्षा जास्त सीसीच्या बाईक हेल्मेटशिवायच बुंगाट चालविणे हे "शनिशिम्गणापुरच्या" चौथर्यावर चढण्याच्या आंदोलना इतके सोप्पे नसते. फिल्म इन्स्टिट्युटच्या बाहेर लाल बावटे लावुन घोषणाबाजी/पत्रकबाजी करण्यायेवढेही सोप्पे नसते. तिथे तुम्ही सश्रद्ध असा वा नसा, देव माना वा नका मानू, कोणत्याही जातीधर्माचे आर्थिक स्थितीचे असा, तिथे चुकीला क्षमा नसतेच नसते.>>>>> कृपया विषय सोडून बोलू नका.. फक्त आपल्या आजू बाजूला जाणकार लोक असतात काही त्यातील माहितगार असतात मग ते कोणत्याही स्वरुपात असतील लहान किंवा मोठे, गरीब किंवा श्रीमंत, अगदी भिकारी असेल, फाटक्या कपडे घातलेले असेल किंवा कोट बूट मध्य असेल, स्त्री असेल किव्हा पुरुष असेल, त्याने सांगितलेले ऐकावे. त्यचे पटले नाही तर आजूबाजूला दुसर्यांना विचारून खात्री करून घ्यावी.
प्रत्येकाला आयुष्यात कोई न कोणी भेटतो, आम्हाला सुद्धा आई , बाबा, शिक्षक भेटले होते...त्यांनी शिकावेले आम्ही आचरणात आणतो..

राहले समुद्र किंवा पाण्याविषयी त्या साठी, कोणत्याही पाण्यात उतरताना प्रथम आपण या प्रकारचे पाण्यात पोहलो आहोत का? हे समजून घ्यावे. पाणी किती खोल आहे हे जर समजत नसेल तर आजू बाजूला विचारून त्याची खात्री करून घ्यावी. उगाचच मित्र किंवा बाकीचे जातात म्हुणून आपण त्यात उतरू नये.
हे आपण बराचश्या गोष्टी फाट्यावर मारतो त्याला काही अंशी आपण जबाबदार आहोत. आपण जर त्यांना ह्या सुट (pocket money जेवढा हवे तेव्हा आणि तसा, खर्च , लागेल त्या गोष्टीचा हट्ट पुरवणे, कशेही वागायला प्रतिबंध करणे) दिल्या नसत्या तर कोणाची किंमत होते दिलेल्या सूचना न पाळायला.
हल्ली कोण पण उठतो आणि सहलीला जातो पण जेव्हा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा तेथील पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या लोकांना डावलून त्यांनी सांगितलेले सोडून तुम्ही आपलेच खरे करता आणि मग पशाताप करता, हे खूपच चुकीचे आहे. मला वाटते जे झाले ते बरोबर झाले लोकांनी यातून बोध घेतला तर बरे होईल.

Pages