फुसके बार – १५ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 14 January, 2016 - 13:37

फुसके बार – १५ जानेवारी २०१६

१) जॅक जेकब व त्यांचे आयुष्य

जॅक जेकब यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. कोण होते ते? बांगला देशच्या युद्धाच्या वेळी त्यांनी मोलाची कामगिरी गाजवली होती. ते अविवाहित असल्यामुळे व त्यांच्या इतर नातेवाइकांपैकी कोणीच भारतात नसल्यामुळे जनरल जेकब यांची सर्व काळजी इतकी वर्षे स्वत: लष्कराच्या आर्टिलरी कोअरने घेतली हे आणखी एक वैशिष्ठ्य. अखेरच्या काळामध्ये त्यांना स्मृतिभंश झाला होता.

निवृत्तीनंतर त्यांनी गोव्याचे व नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही काम केले.

त्यांच्या बांगलादेश मुक्तीत असलेल्या सहभागामुळे बांगलादेशाच्या पंतप्रधान व अध्यक्ष अशा दोघांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय ते ज्यु असल्यामुळे इस्राएलच्या भारतातील राजदुतानेही त्यांच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

इराकी मूळ असलेले पालक असलेल्या जेकब यांनी भारत सोडून इस्राएलला यावे याबद्दलचे अनेक प्रस्ताव त्यांना देण्यात आले होते. मात्र मी ज्यु असल्याचा मला अभिमान असला तरी माझी मुळे भारतात आहेत व त्यामुळे मी भारतातच राहीन आणि भारतातच मरेन असा त्यांचा निश्चय होता. त्यांचा लष्करी गणवेष इस्त्राएलमधील म्युझियममध्ये ठेवलेला आहे. भारत-इस्राएल यांच्यातील संबंध वाढावेत याबद्दल ते आग्रही होते.

दुस-या महायुद्धात ब्रिटिशांकडून लढताना त्यांना उत्तर आफ्रिकेत पाठवले गेले परंतु तोपर्यंत तेथील युद्ध संपले होते. नंतर त्यांना जपान्यांशी लढण्यासाठी ब्रह्मदेशात पाठवले होते. लढाईला गेलेले असताना त्यांच्या खिशात कवितांचे पुस्तक असे.

बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये पाकिस्तानच्या जनरल नियाझी यांनी शस्त्रसंधीबद्दल बोलणी करण्यासाठी ले.ज. जेकब यांच्याशी संपर्क साधला. पण जेकब यांनी स्वत:च्या अधिकारात केवळ शस्त्रसंधीऐवजी थेट संपूर्ण शरणागतीचाच प्रस्ताव नियाझी यांच्यासमोर ठेवला. त्यावेळी बांगलादेशात भारताचे केवळ तीन हजार तर पाकिस्तानचे तेवीस हजार सैन्य असूनही संपूर्ण शरणागती पत्करली तरच स्वत: नियाझी व पाकिस्तानी सैन्याला बांगला देशींपासून भारतीय सैन्याचे संरक्षण मिळेल असे त्यांनी नियाझी यांना सांगितले होते. भारतीय सैन्य तेथे असते नसते तरी बांगलादेश स्वतंत्र होणार होताच, पण मग पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे चिडलेल्या बांगला देशी जनतने या सैनिकांचे काय केले असते हा विचार करण्यासारखा नव्हता. तेव्हा हा प्रस्ताव मान्य न झाल्यास होणा-या परिणामांची जबाबदारी नियाझी यांची असेल असेही जेकब यांनी त्यांना बजावले होते. त्याची परिणती पाकिस्तानचे ९३हजार सैनिक भारताच्या ताब्यात आले. यावर जेकब यांनी आपल्याला अक्षरश: ‘ब्लॅकमेल’ केले असेही नियाझी यांनी नंतर लिहिले.

२) मराठी भाषेचे सौंदर्य

खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ.

रंग पाण्याचे

'पाणी 'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी' भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी' जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी 'पाणी' काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी' पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी' दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी' पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे 'पाणी' होते
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता
कन्यादान पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे 'पाणी..पाणी' करती

अंतिम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेह-या‍वरती उठे तरंग

अशा गोष्टी फॉरवर्डकरताना मूळ कवीच्या नावाचा उल्लेख करण्याची पद्धत आपल्याकडे जवळजवळ नसल्यामुळे त्याचा उल्लेख करता येत नाही. कोणाला माहित असल्यास सांगावे.

३) द बकेट लिस्ट

मरणाच्या दारात असलेले दोघे जण. रूग्णालयात भेटतात. एक श्रीमंत. अ. एक सामान्य. ब. अ ने मरण्याच्या आधी कराव्या वाटणा-या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. त्यावरून स्फूर्ती घेत ब देखील त्याच्या काही ‘गोष्टी’ ठरवतो. दोघेही त्या करायला सुरूवात करतात. अ ला पैशाची काळजी नसतेच.
पंचाहत्तरीत दोघेही स्काय डायव्हिंग करतात. ब ला विमानातून उडी मारायची भीती वाटत नसते, तर उडी मारल्यावर हवे तेव्हा पॅराशुट उघडले नाही तर काय याची असते.

नंतर महागाच्या गाड्या सुसाट चालवतात. टांझानियात सिंहांच्या सफारीवर जातात. इजिप्तची पिरॅमिड पाहतात. तेथे वर चढून गेल्यावर ब अ ला सांगतो, इजिप्शियन पद्धतीमध्ये माणसाचा आत्मा मृत्युनंतर स्वर्गाच्या दाराशी गेल्यावर त्याला दोन प्रश्न विचारले जातात. पहिला, तू तुझ्या आयुष्यात आनंद मिळवला आहेस का? आणि दुसरा काय असेल? दुसरा, तू तुझ्या आयुष्यात दुस-यांना आनंद दिला आहेस काय? यातल्या एका प्रश्नाचेही उत्तर ‘नाही’ असे असले, तरी त्याला पृथ्वीवर परत पाठवले जाते. यातल्या दुस-या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात अ त्याच्या आयुष्याची कथा ब ला सांगतो. त्याची मुलगी त्याच्या मनाविरूद्ध एकाशी लग्न करते. त्याला तिच्या लग्नालाही बोलावत नाही. नंतर आणखी काही कारणाने ती याच्याशी सगळेच संबंध तोडून टाकते.

तेथून हिमालयात. याला त्याच्या आयुष्यात काहीतरी मॅजेस्टिक पहायचे असते. पण त्या दिवशी नेमके हवामान खराब असते आणि त्यांना परत फिरावे लागते. तेथून हॉंगकॉंग. तेथून ब अ ला सांगून घरी परतायचा मानस सांगतो. परतल्यावर ब मुद्दाम त्यांची गाडी अ च्या मुलीच्या घरासमोर आणतो. पण अ चा राग शांत झालेला नसतो. तो आणखी चिडतो. अर्थात अ आणि ब पुन्हा भेटणार नाहीत अशी स्थिती होते.

ब ला एका क्रिटिकल सर्जरीसाठी दाखल केल्यावर मात्र ते पुन्हा भेटतात. अ ला एका प्रकारची कॉफी फार प्रिय असते. ब त्याला त्या कॉफीची गोष्ट सांगतो. सुमात्रा बेटावर कॉफीच्या बिया असतात, तिथली रानमांजरे त्या खातात. त्या न पचता त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात. अशा बिया गोळा करून त्यांच्यापासून केलेल्या कॉफीला तो खास अॅरोमा येत असतो. हे ऐकल्यावर दोघेही खळाळून हसतात. की ब त्याच्या यादीतील एका इच्छेवर खाट मारतो. ती असते, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणे.

तेथे सर्जरीमध्येच ब जातो. त्याच्या शोकसभेत अ म्हणतो की त्यांची ओळख जेमतेम तीन महिन्यांची, पण ब च्या आयुष्याचे शेवटचे तीन महिने हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहेत.

नंतर ब ची इच्छा म्हणून अ आपल्या मुलीच्या घरी जातो. त्याला त्याची नातही तेथे दिसते. तो त्यांच्या सामायिक यादीतील आणखी एका इच्छेवर खाट मारतो. जगातल्या सर्वात सुंदर मुलीचा पापा घेणे.

अ जॅक निकोल्सन आणि ब मॉर्गन फ्रीमन. या सिनेमाची कथा फ्रीमनलाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली गेली. अ च्या भुमिकेसाठी प्रथम क्लिंट इस्टवूदला विचारण्यात आले होते. जेमतेम दीड तासाची, पण पर्वणी.

मराठीत एखादाच ध्यासपर्व आणि एखादाच फॅंड्री बनतो. हिंदीतही त्यापेक्षा थोडीच बरी म्हणावी अशी स्थिती आहे. बाकीचे बहुतेक मारून-मुटकून आजच्या पद्धतीने प्रमोशन केलेले सिनेमा असतात. ‘जगायचे कसे’ ही एकच थीम घेऊन सिनेमा काढायचे म्हटले तर ‘तेथे’ खजिना पडलेला आहे. तुम्हाला फार डोके लावायचीही गरज नाही. त्यांची भ्रष्ट नक्कल जरी केलीत आणि आजच्या बहुतेक टुकार अभिनेत्यांना जरी घेतलेत, तरी आम्हाला खरेच काही तरी चांगल्यासारखे मिळू शकेल. तमीळ-मल्याळीतला दृश्यम कसा फ्रेम टू फ्रेम हिंदीत आला, अगदी तसे हे हिन्दी-मराठीत आणलेत तरी आम्ही भरून पावू. मात्र फ्रेम टू फ्रेम येऊ देत. म्हणजे मग फसलेला प्रयोग, दिग्दर्शक कमी पडतो वगैरे नेहमीची रडगाणी ऐकू येणार नाहीत.

का रे दुरावा, होणार सून मी त्या घरची, आता येणारी पसंत आहे मुलगी यांच्या दळभद्री मालिका लेखकांना व त्या चॅनल्सच्या निर्मात्यांनाही हाच निरोप आहे, तुमच्या जाहिरातींमध्येच का होईना, पण काही तरी चांगले पहायला मिळू द्या. चांगले दाखवा लोक पाहतील. टीआरपीच्या भंपक कल्पनेपोटी तुमची माथी भ्रष्ट झालेली आहेत. ती ताळ्यावर आणा.

४) आता हे ठिगळ

आगामी साहित्य संमेलनात शरद पवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यांचे एक पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे, म्हणजे ते साहित्यिक झाले म्हणून लगेच ही मुलाखत की काय? ते पुस्तक किती गुडीगुडी व आत्मस्तुती करणारे आहे याबद्दल आपण वाचलेच असेल.

संमेलनात राजकारणी स्टेजवरही नकोत म्हणता म्हणता ते तेथून हटणे शक्य नाही, हे तर अाता पक्के कळून चुकलेले आहे. आता हा तर थेट संमेलनातच घुसण्याचा प्रकार चालू झाला आहे. याबद्दल प्रश्न विचारणार कोण हा खरा प्रश्न आहे.

सत्तेत असताना समाजविघातक जातीय शक्तींना उघड-छुपे समर्थन देऊन मराठी समाजात उभी जातीय फुट पाडण्याचा बहुमान तुमचा आहे काय, हा प्रश्न त्यांना कोण व कधी विचारेल याची मी वाट पाहतो आहे. असाच दुसरा प्रश्न म्हणजे त्यांना जेव्हा त्यांचे चमचे जाणता राजा असे म्हणतात, तेव्हा त्यांना खरे तर त्या संबोधनामुळे शरम वाटते का?

त्यांची मुलाखत घेणा-यांमध्ये त्यांच्याच आशीर्वादाने सासवडला अध्यक्षपद मिळवणारे लाळघोटेही आहेत. हे आताचेदेखील यांचे माझ्यावर उपकार नाहीत असे भलेही म्हणत असले तरी भविष्यात तेच उपकार कसे फेडतील ते पहायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users