बाबा तू चुकला रे

Submitted by मित्रहो on 14 January, 2016 - 11:55

(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो. अशावेळेला आईवडीलांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास एके अभ्यास करनाऱ्या आमच्यासारख्याचे हे व्यंगात्मक दुःख.)

बाबा तुला आठवत, लहाणपणी शाळेत जाताना
मी कसा रडलो होतो, अगंणात जाउन लोळलो होतो
तरी तू मला उचलून नेला, शाळेत नेउन बसवला
माझा अनपढ, गवार राहण्याचा हक्कच हिरावून घेतला
लोकशाहीच्या मूल्यांवर आघात केला
माझ्या स्वप्नांचा पार चुराडा केला,
काय स्वप्ने पाहीली होती मी
आपणही कधीतरी हातात चाकू घेउन फिरु,
चौकात नाही जमली तर गल्लीत दादागिरी करु
कधीतरी दहीहांडी आयोजित करु
कुण्या चिकन्या हिरोइनला बोलावू
तिच्यासोबत एखादा सेल्फी घेउ
आता हिरोइनच्या पोस्टरसोबतच सेल्फी काढतो मी
दुसऱ्या रांगेच्या टिकिटाचे पैसे मोजतानाही रडतो मी
कस माझ्या स्वप्नांच पार पोतेर केलस तू
एका होतकरु गावगुंडाला पगारदार नोकर केलस तू
बाबा तू चुकला रे, तू चुकला रे

खर सांगू बाबा मी दहावीत असताना ना
मला त्या सुटलेल्या अमीबापेक्षा समोरच्या अंजुची फिगर आवडत होती
कविता मॅडमच्या कवितांपेक्षा, कविता मॅडमच जास्त आवडत होती.
तुला आता सांगतो, अशी गोची होत होती रे,
म्हणून तर तुला म्हटल होत दहावीला ड्रॉप घेतो
वर्षभर घरी बसतो, आराम करतो, मग परीक्षा देतो
तुला माझ्या वेदना कधी कळल्याच नाही
माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहचल्याच नाही
तू आपला एकच हेका लावीत होता
अभ्यास कर नाहीतर घर सोड म्हणत होता
आपल्या खानदानात कधी कुणी ड्रॉप घेतला नाही
हा काय माझा दोष होता.
असा तास न तास अभ्यास करुन
नाइट मारुन, ट्वेंटी वन वाचून, एक्स्ट्रा क्लास करुन
कुणाचा बिल गेट्स होइल कारे कधी,
आयुष्याची गोड गणित सोडवायची सोडून,
दुसऱ्या महायुद्धाची फालतू कारणे पाठ करुन
त्या ओळखीच्य ना पाळखीच्या थिट्याचे साइन कॉस काढुन
कुणाचा स्टिव्ह जॉब्स होइल कारे कधी,
शेवटी जे घडायला नको होते तेच घडले
मी दहावीत पास झालो नी सारेच गणित बिघडले
गेट्स आणि जॉब्स तर दूर राहीले
आता नको तिथे पाणी भरतो मी
महीन्याचा पगार मोजीत रडतो मी
एका उद्योजकाचा धंदाच बसवला तू
मिलियन डॉलर्स पाण्यात बुडविले तू
बाबा तू चुकला रे, तू चुकला रे

त्या टिव्हीवरचे, सिनेमातले स्टार बघ
कसे अभिमानाने सांगतात आम्ही क्लासेस बंक केले
उगाच वर्गात बसून स्ट्रेंग्थ ऑफ मेटरियल शिकण्यापेक्षा
कँटीनमधे बसून कॉलेज मटेरियलच्या स्ट्रेंग्थ डिस्कस केल्या
सिगरेटी ओढल्या, शिव्या घातल्या, असाइनमेंट कॉपी केल्या
बघ त्यांच्या आईवडीलांना केवढा आभिमान पोरांचा
तू मात्र प्रिसिंपॉलच्या एकाच पत्राला घाबरला
कॉलेजातून काढून टाकण्यातली शान तुला कधी कळलीच नाही
सतत पास होण्यातली लाज तुला कधी समजलीच नाही
अरे छान नापास झालो असतो,
दारु पिऊन लोळलो असतो
कुणा पोरीच्या मागे फिरलो असतो,
कुणाला ठोकून आलो असतो
झाली असती पोलीस कंप्लेंट म्हणून काय आभाळ कोसळल असत
पण पोलीसात नाव गेले म्हणून कॉलेजात केवढ नाव झाल असत
कॉलेजात काय आता ऑफिसातही कुणी ओळखत नाही
गल्लीतल्या पोरांच सोड रस्त्यावरच कुत्रही भुंकत नाही
एका होनाऱ्या नामवंताला बेनाम केलस तू
गळ्यातल्या ताइताला पायातला बूट केलस तू
बाबा तू चुकला रे, तू चुकला रे

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

·मस्त आहे. असच काहितरी माझ्या भावाला समजावलेल जेव्हा त्याला समजत नव्हत की कॉलेजमध्ये जाऊन काय होणारे

छान आहे. आवडलं.
इंजिनियरींगला १००% हजेरी असायची बहुतेकांची कारण करण्यासारखं दुसरं काही नव्हतच तेव्हा (असं आम्हाला वाटायचं). आता लोक त्यांच्या कॉलेजच्या गमती सांगतात तेव्हा वाटतं, अरेच्चा, आमी नाय असं काय केलं.

धन्यवाद सोनु, अमोल, mansmi18 , मराठी कुडी, मानव, टीना
आजची शिक्षणपद्धती सर्वात्तम आहे असे नाही त्यात सुधारणा हव्याच पण मी न शिकताच मोठा झालो याचा जो वृथा अभिमान वाढलाय त्याची मात्र चीड येते.