ख्वाडा

Submitted by जव्हेरगंज on 22 November, 2015 - 03:38

गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो.
मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो.

म्हातारा असे बरेच खाचखळगे कोळुन प्यायलाय. त्याची 'डंगरी' पण त्याला नीर्भीडपणे साथ देतेय. थोरला पांडा त्याचं अस्तित्व पुसटसं दाखवुन देतो. त्याची बायको आणि पोरं काळजीपुर्वक शोधत बसावी लागतात. धाकटा बाळू दंडबैठका, जोर काढत शरीर कमावतोय. पण तो एवढा लाजुळा का? हे काही केल्या समजत नाही.

खाटी मेंढ आणि तान्या मेंढ्या हाकण्याच्या या रहाटगाड्यात 'आलतो फिरायला' म्हणत सरपंच दाखल होतो. आणि चाललेल्या मऊशार कथेला जोरदार तडका मारतो. अर्ध्याहुन कमी किंमतीत कोकरु नेणारा सरपंच पुढे फुकटात नेऊन आपला अस्सल माजुरडेपणा दाखवतो आणि उत्तरार्धातला सामना एकट्याच्या जिवावर गाजवतो. हा सरपंच भलताच ताकदीचा आहे. थोडक्या प्रसंगात जबराट भाव खाऊन जातो.

म्हाताऱ्याचं पात्रं अस्सल आहे. तोंडची भाषा अतिशय भडक. पण ती फक्त कुटुंबासाठी. आल्यागेल्यांना 'रामराम देवा' घालत पाघळवायला बघतो. पण 'ताणुन मारीन' म्हणणाऱ्या सरपंचापुढे सपशेल शरणागती 'यशस्वीरीत्या' पत्करतो.

"तुझ्या रुपाचं, तुझ्या रुपाचं चांदणं पडलय ना मला भिजु द्या" गात धमाल ऊडवणारा लग्नाळु बाळू मात्रं या संघर्षात मुकाट राहतो. एवढ्या सुंदर कथेत हे पात्र चक्कं फसलय. त्याचा लाजुळा चेहरा कथेत वारंवार बाधा आणतो. अभिनय, संवाद सगळच जेमतेम. दुर्दैवाने हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे.पण इतर ताकदीच्या कलाकारांत तो खपुन जातो.

चित्रीकरण अव्वल दर्जाचं झालयं. साऊंड ईफेक्टलातर पैकीच्या पैकी गुण. एकंदर सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास 'फँड्री' मधला जब्याचा दगड जसा पडदा फाडत बाहेर येऊन टाळक्यात बसतो त्यामानाने बाळूची कुऱ्हाड जरा बोथटच वाटली.

एकदा जरुर पहावा असा नक्कीच आहे!!!!!

khwadakhwadakhwada

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users