फुसके बार – २२ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 21 November, 2015 - 12:33

फुसके बार – २२ नोव्हेंबर २०१५
.
१) . काही वर्षांपूर्वी बहारिन व कतार या देशामध्ये काही बेटांवरून असलेला वाद संपून त्याबाबत एक करार करण्यात आला. त्यासंदर्भात त्यावेळी काही विनोद ऐकू येत. या दोन्ही देशांचे स्वत:चे असे सैन्य नाही. इतर देशांमधून भाड्याने घेतलेले सैनिक त्यांच्याकडे असतात. वदंता अशी होती की हे सैनिक समोरच्या देशाच्या सैनिकांकडे आपला बायोडेटा देऊन ‘बघ तुमच्याकडे माझ्या नोकरीसाठी काही करता येतंय का ते’ असे म्हणत. हा प्रकार वाढू लागल्याने अखेर दोन्ही सरकारांनी हा वादच मिटवायचे ठरवले.

२) महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुणे महापालिकेतर्फे सत्कार करण्याचा ठराव दफ्तरी दाखल करण्याचे महापालिकेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीतर्फे ठरवण्यात आले. याच नगरसेवकांनी यापूर्वी पुरुषोत्तम खेडेकर या महामानवाचा महापालिकेतर्फे सत्कार करण्याचे ठरवले होते. त्याला विरोध झाल्यानंतर तो ठरावही असाच दफ्तरी दाखल केला गेला होता. बाबासाहेबांचा सत्कर करण्याचे रद्द करून या लोकांनी त्याची फिट्टंफाट केलेली दिसते. वर कारण काय सांगत आहेत, की त्यांना ७८साली ानपत्र देण्यात आले होते. एकाच व्यक्तील दोन वेळा मानपत्र देण्याची पद्धत नाही. कितीही झाले तरी हा खेडेकर हा महामानव महाराष्ट्रभूषण होण्याच्या लायकीचा नाही, तेव्हा बाबासाहेबांच्या बाबतीत तरी असे करायला नको हे समजण्याची या नतद्रष्टांच्या लायकी नाही. शिवाय यांचे जे मोठे नेते आहेत, त्यांनी आधी बाबासाहेबांबद्दलचे जहर समाजात मुक्तपणे पसरू दिले आणि पुरस्कारसोहळ्याच्या थोडेच आधी मवाळ भूमिका घेतल्याचा आभास निर्माण केला होता. आता हा ठराव रद्द करण्यात या नेत्यांचा हात नसेलच असे समजण्याचे कारण नाही.

जाऊ द्या, या म्हाता-याचा सत्कार नाही केला, तरी त्या म्हाता-यासह कोणाला काय फरक पडणार आहे?

३) द फिफ्थ इस्टेट या ज्युलियान असांजवरील सिनेमातले असांजच्या तोंडचे वाक्य:
If whistle-blower’s identity is kept secret, then he has nothing to fear. As Oscar Wilde said, “Give a man a mask, and he will tell you the truth.”
याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला सत्य काय आहे हे ऐकण्यात रस नसतो, ते सत्य कोण सांगतो आहे यावरून आपण आपली प्रतिक्रिया ठरवणार असतो.
बाकी या सिनेमामधला एक भाग लक्षात आला नाही. असांजने कोणत्याही परकीय वकिलातीत वा देशात आश्रय घेतलेला नसतानाही अमेरिकेचे लोक तो त्यांची गुपिते फोडत असतानाही त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला जेरबंद करू शकत नाहीत. हे थोडे विचित्र वाटते. शिवाय या सर्व काळात तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही दिसत असतो. असो. पण तो सिनेमा जबरदस्त आहे. मुळात पाचवा स्तंभ ही या सिनेमाच्या नावामागची संकल्पनाच भन्नाट आहे.

४) विविध रेसिपींचे फोटो टाकले जातात. सहसा त्यात सामीष पदार्थांच्या रेसिपी दिसत नाहीत. मात्र तशी ती कोणी टाकलीच, तर आमच्या भावना दुखावल्या असा आरोप आजवर कोणी केलेला दिसत नाही. पहा, अजुनही किती सहिष्णुता शिल्लक आहे समाजात.

५) पुन्हा इंद्राणी मुखर्जी - शिना बोरा हत्येवरून सगळ्या वाहिन्यांचे वेळ खाणे चालू. आपली मराठी चॅनल्सही अचानक आपण प्रादेशिक वाहिनी असल्याचे विसरतात आणि तेच चर्वित-चर्वण चालू करतात, त्यामुळे मग पाहण्यासारखे काही रहात नाही.

६) वाईटातही चांगले शोधावे म्हणतात. मस्तानी व काशीबाई यांचे एकत्र नृत्य दाखवून घोळ घातलाच आहे, तरी एक डायलॉग ऐकू येतो आहे की हम ने मोहब्बत की है, ऐय्याशी नहीं. क्या बात है। शिवाय बाजीराव म्हणून भन्साळीने त्याचा आवडता हिरो सलमानखानला आपल्यावर लादले असते तर आपण काय करणार होतो? तेव्हा भन्साळीचे आभार.

७) अर्णब गोस्वामीचे नवे हत्यार – उघडू का टेलिफोन लाईन्स?
लालूच्या मुलाचे काहीही कर्तृत्व नसताना त्याला थेट उपमुख्यमंत्री केल्यामुळे काल अर्णब फार पेटला होता. अमेरिकेतून शिकून आलेला नितीशकुमारांच्या पक्षाचा जनार्दन तिवारी व लालूच्या पक्षाचा कोणी सिन्हा हे त्यांची बाजू मांडणारे तसे नवखेच होते. जनार्दन तिवारी बोलण्यात – वागण्यात सभ्य वाटत होता पण त्याच्यावर लालूच्या दिवट्याचे समर्थन करण्याची वेळ आल्याने तो ते काम नाइलाजाने करत होता.

एखाद्याला धमकी द्यायची असेल तर जसे कोणी म्हणेल की माझ्याकडचे कुत्रे तुझ्या अंगावर सोडीन बरं का, सोडू का? तसे अर्णब या दोघांना वारंवार धमकी देत होता की टेलिफोन लाइन्स चालू करू का? होते काय, कि अनेकदा हे प्रेक्षक फोनवर बोलताना खूप तावातावाने बोलतात व आरोप करतात. त्यामुळे पक्षप्रवक्त्याची पंचाईत होते. एकवेळ ते अर्णबचा मारा थोपवून ठेवू शकतात, तेही अवघडच, पण या प्रेक्षकांवर ओरडणारा पक्षप्रवक्ता मी तरी अजून पाहिलेला नाही. त्यामुळे कितीही तीव्र आरोप असले तरी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे किंवा चक्क शांत बसणे हे दोनच पर्याय त्याच्यापुढे उपलब्ध असतात.

डोळ्यासमोर आणून पहा, अर्णब त्या पक्षप्रवक्त्याला वारंवार धमकावतोय, उघडू का टेलिफोन लाइन आणि तो पक्षप्रवक्ता गयावया करतोय, नको रे, तू परवडलास, पण प्रेक्षक नकोत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

''विविध रेसिपींचे फोटो टाकले जातात. सहसा त्यात सामीष पदार्थांच्या रेसिपी दिसत नाहीत. मात्र तशी ती कोणी टाकलीच, तर आमच्या भावना दुखावल्या असा आरोप आजवर कोणी केलेला दिसत नाही. पहा, अजुनही किती सहिष्णुता शिल्लक आहे समाजात.''

माबो वाचन वाढवा.
जमल्यास ऐ अ वर बीफच्या रेसिपींचा धागा आहे तो ही वाचून पहा.
सगळी चंमतग आहे.

४. भावना दुखावतात. प्रादेशिक अस्मिताही.
७. काही काही पक्षांची नेट आर्मी असते तशी टेलिफोन आर्मीही निघेल आता.